पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

परीक्षा पे चर्चा 2024 कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद


"आपल्या मुलांमध्ये लवचिकता निर्माण करणे आणि त्यांना दबावांचा सामना करण्यात मदत करणे महत्वाचे आहे"

"विद्यार्थ्यांच्या आव्हानांवर पालकांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे तोडगा काढायला हवा"

"विद्यार्थ्यांच्या वाढीच्या दृष्टीने निकोप स्पर्धा असायला हवी"

"शिक्षकाचे काम केवळ नोकरी करणे नाही तर विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते"

“पालकांनी आपल्या मुलांचे रिपोर्ट कार्ड हे त्यांचे व्हिजिटिंग कार्ड बनवू नये”

"विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील बंध हे अभ्यासक्रम आणि पाठयक्रमाच्या पलिकडचे असायला हवेत"

“तुमच्या मुलांमध्ये स्पर्धा आणि चढाओढीचे बीज कधीही पेरू नका. भावंडे ही एकमेकांसाठी प्रेरणा असायला हवीत”

"तुम्ही करत असलेल्या सर्व कामात आणि अभ्यासात प्रामाणिक आणि निर्णायक राहण्याचा प्रयत्न करा"

"उत्तरे लिहिण्याचा शक्य तितका सराव करा. जर तुम्ही असा सराव केला असेल तर परीक्षेच्या वेळी बहुतांश ताण निघून जाईल”

“तंत्रज्ञान हे ओझे बनायला नको. त्याचा विवेकी वापर करा"

“योग्य' वेळ असे काहीही नसते, म्हणून त्याची वाट पाहू नका. आव्हाने येतच राहतील आणि त्या आव्हानांनाच तुम्ही आव्हान दिले पाहिजे”.

"जर लाखो आव्हाने असतील तर त्यावर कोट्यवधी उपाय देखील आहेत"

"अपयशांमुळे निराश होऊ नका. प्रत्येक चूक नवीन शिकवत असते”

"मी माझ्या देशवासीयांच्या क्षमता जितक्या अधिक वाढवतो तितकी आव्हानांना आव्हान देण्याची माझी क्षमता सुधारते"

"उत्तम कारभारासाठी देखील, तळापासून वरपर्यंत योग्य माहितीची व्यवस्था आणि वरून खालपर्यंत योग्य मार्गदर्शनाची व्यवस्था असायला हवी"

"मी माझ्या आयुष्यात निराशेचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आहेत"

"जेव्हा स्वार्थी हेतू नसतो, तेव्हा निर्णय घेताना कधीच गोंधळ होत नाही"

Posted On: 29 JAN 2024 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे परीक्षा पे चर्चाच्या 7 व्या आवृत्तीदरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी आयोजित  कला आणि हस्तकला प्रदर्शनाचीही त्यांनी भेट दिली.

परीक्षा पे चर्चा ही एक चळवळ आहे जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजाला एकत्र आणून एक असे वातावरण निर्माण करण्यासाठी सुरु केली  आहे जिथे प्रत्येक मुलाचे अनोखे व्यक्तिमत्व साजरे केले जाते, प्रोत्साहन दिले जाते आणि स्वतःला मुक्तपणे व्यक्त करण्याची परवानगी असते.

उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना  संबोधित करताना, पंतप्रधानांनी प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचा उल्लेख केला ज्यामध्ये त्यांनी विविध आकारांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासारख्या आकांक्षा आणि संकल्पना व्यक्त केल्या आहेत. नवीन पिढ्या विविध समस्यांवर कशा प्रकारे विचार करतात आणि या समस्यांवर त्यांच्याकडे कोणते उपाय आहेत हे या प्रदर्शनांमधून दिसून येते असे ते म्हणाले.

आपल्या संवादाची सुरुवात करताना, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना भारत मंडपम या ठिकाणाचे महत्त्व समजावून सांगताना त्यांना जी 20 शिखर परिषदेबद्दल सांगितले जिथे जगातील सर्व प्रमुख नेते एकत्र जमले  होते आणि जगाच्या भविष्याविषयी चर्चा केली होती.

बाह्य दबाव आणि तणाव

ओमानमधील एका खाजगी सीबीएसई शाळेतील दानिया शाबू आणि सरकारी सर्वोदय बाल विद्यालय, बुरारी मधील मोहम्मद अर्श यांनी  विद्यार्थ्यांवर अतिरिक्त दबाव वाढवणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक अपेक्षांसारख्या बाह्य घटकांचा कसा सामना करायचा हा  मुद्दा उपस्थित केला. त्यावर पंतप्रधान म्हणाले की सांस्कृतिक आणि सामाजिक अपेक्षांशी संबंधित प्रश्न  परीक्षा पे चर्चा मध्ये नेहमीच जरी ती  7 वी आवृत्ती असली तरी विचारले जातात.  त्यांनी विद्यार्थ्यांवर बाह्य घटकांच्या अतिरिक्त दबावाचा प्रभाव कमी करण्यात शिक्षकांची भूमिका अधोरेखित केली आणि पालकांनी  देखील वेळोवेळी याचा अनुभव घेतला आहे याकडे लक्ष वेधले. स्वत:ला दडपण हाताळण्यास सक्षम बनवून हा जीवनाचा एक भाग आहे असे समजून त्यासाठी तयारी करण्याची सूचना त्यांनी केली.  प्रतिकूल हवामान असलेल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाच्या प्रवासाचे उदाहरण दिले ज्यामध्ये मनाने आधीच प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याची तयारी केलेली असते, तसेच मानसिकदृष्ट्या स्वतःला कणखर बनवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांनी तणावाच्या पातळीचे मूल्यांकन करणे आणि हळूहळू ते वाढवत  पुढे जाण्याची सूचना केली जेणेकरुन विद्यार्थ्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होणार नाही. मोदी यांनी विद्यार्थी, कुटुंबे आणि शिक्षकांना बाह्य तणावाच्या समस्येवर एक पद्धतशीर सिद्धांत लागू करण्याऐवजी त्याला  एकत्रितपणे सामोरे जाण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल अशा  वेगवेगळ्या पद्धतींवर चर्चा करावी अशी सूचना त्यांनी केली. 

समवयस्क मित्रांमधील तणाव आणि  स्पर्धा

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील सरकारी बहुउद्देशीय शाळेतील भाग्य लक्ष्मी, गुजरातमधील जेएनव्ही पंचमहाल येथील दृष्टी चौहान आणि केंद्रीय विद्यालय, कालिकत, केरळ मधील स्वाती दिलीप यांनी उपस्थित केलेल्या समवयस्क मित्रांमधील  दबाव आणि स्पर्धेच्या समस्येवर बोलताना  पंतप्रधानांनी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्पर्धा निकोप असायला हवी यावर भर दिला. 

कौटुंबिक परिस्थितीत अनेकदा  स्पर्धेची बीजे रोवली जातात त्यामुळे भावंडांमध्ये विकृत स्पर्धा निर्माण होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. पालकांनी मुलांमध्ये तुलना करणे टाळावे असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. पंतप्रधानांनी एका व्हिडिओचे उदाहरण दिले ज्यामध्ये मुलांनी निकोप स्पर्धा करत एकमेकांना मदत करण्यास प्राधान्य दिले होते . ते म्हणाले की, परीक्षेत चांगली कामगिरी करणे हा एकाचा फायदा आणि दुसऱ्याचा तोटा नाही कारण स्पर्धा ही स्वत:शी असते , एका मित्राने चांगली कामगिरी केली तर तो इतरांना चांगली कामगिरी करण्यापासून थांबवू शकत नाही. यामुळे, जे प्रेरणादायी नाहीत  त्यांच्याशी मैत्री करण्याची प्रवृत्ती वाढू शकते असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करू नका असे त्यांनी पालकांना सांगितले.  आपल्या मुलांचे प्रगती पुस्तक (रिपोर्ट कार्ड ) हे व्हिजिटिंग कार्ड बनवू नका असे ते म्हणाले.  आपल्या  मित्रांच्या यशात आनंद मानण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना केले.  ”मैत्री ही व्यवहारिक भावना नाही’ असे पंतप्रधान म्हणाले.

मुलांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका यावर विशेष भर देत पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील उप्परपल्ली येथील जिल्हा परिषदेतील माध्यमिक शाळेतील संगीत शिक्षक कोंडकांची संपता राव आणि शिवसागर आसाम येथील शिक्षक बंटी मेडी यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. केवळ एका वर्गातील विद्यार्थी नव्हे तर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना ताणतणावातून मुक्त करण्याची क्षमता संगीतामध्ये आहे, असे त म्हणाले. वर्गाच्या पहिल्यादिवसापासून ते परिक्षेपर्यंतच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातले बंध हळूहळू दृढ होत गेले पाहिजेत यामुळे परीक्षेच्या काळातील ताणतणाव पूर्णपणे दूर होईल, असे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी केवळ आपण शिकवत असलेल्या विषयापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक उपलब्ध असावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्याप्रमाणे डॉक्टरांचे आपल्या रुग्णांबरोबर एका वैयक्तिक पातळीवर संबंध असतात, त्यावेळी आजार तिथेच निम्मा बरा झाला असतो, असे उदाहरण त्यांनी दिले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांबरोबर आपलेपणा जपावा आणि विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे वेळोवेळी कौतुक करावे, असेही पंतप्रधान म्हणाले. शिक्षक ही काही नोकरी नव्हे तर त्यांच्या खांद्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्याची, त्यांचे जीवन समृद्ध करण्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

परीक्षेच्या ताणाशी दोन हात कसे करावेत

पश्चिम त्रिपुराच्या प्रणवंदा विद्या मंदिरची विद्यार्थिनी अद्रिता चक्रवर्ती, छत्तीसगडच्या  बस्तर येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी शेख तैफुर रेहमान आणि ओडिशा येथील कटक मधील आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी, राज्यलक्ष्मी आचार्य यांनी पंतप्रधानांना परीक्षेच्या तणावाबाबत प्रश्न विचारला. पालकांच्या अतिउत्साहामुळे किंवा विद्यार्थ्यांच्या अति एकाग्रतेमुळे होणाऱ्या चुका टाळल्या पाहिजेत असा सल्ला त्यांनी दिला. पालकांनी परीक्षेच्या दिवशी नवीन कपडे, धार्मिक रितीरिवाज किंवा लिखाणाचे नवीन साहित्य आणून त्या दिवसाला अवास्तव महत्व देऊ नये. तसेच विद्यार्थ्यांनीही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षेसाठी सराव न करता अत्यंत शांत चित्ताने परीक्षेला सामोरे जावे आणि उगीचच ताण वाढेल अशा प्रकारच्या कोणत्याही बाह्य गोष्टींना महत्व देऊ नये, असे पंतप्रधान म्हणाले.  विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करावे आणि शेवटच्या क्षणी उद्भवणाऱ्या भीतीला थारा देऊ नये, असे ते म्हणाले. बऱ्याचशा परीक्षांमध्ये अजूनही हाताने लिहावे लागते आणि संगणक आणि फोन यामुळे आता लिखाणाची सवय कमी होऊ लागली आहे असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना लिहिण्याचा सराव कायम ठेवायला सांगितले. आपल्या अभ्यासातील पन्नास टक्के वेळ लिखाणाला द्यावा असे त्यांनी सांगितले. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिहून काढता, तेव्हाच तुम्हाला ती पूर्णपणे समजते. इतर विद्यार्थ्यांच्या गतीमुळे घाबरून जाऊ नका, असेही ते म्हणाले. 

निरोगी आरोग्यशैलीचा अंगीकार

परीक्षेची तयारी आणि निरोगी जीवनशैली राखणे यामध्ये संतुलन राखण्याचा मुद्दा उपस्थित करत, राजस्थानमधील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी धीरज सुभाष, कारगिल, लडाख येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी नजमा खातून आणि अरुणाचल प्रदेशातील टोबी लहमे, सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी अभिषेक कुमार तिवारी आणि शिक्षकांनी व्यायामासोबतच अभ्यासाचे व्यवस्थापन कसे करावे असा प्रश्न विचारला. शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची गरज स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधानांनी मोबाईल फोनला रिचार्ज करण्याच्या आवश्यकतेचे उदाहरण दिले. एक संतुलित जीवनशैली राखून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा असा सल्ला त्यांनी दिला. निरोगी मनासाठी निरोगी शरीराची नितांत आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. निरोगी राहण्यासाठी  काही नियमित दिनचर्या आवश्यक आहेत, विद्यार्थ्यांनी काही वेळ सूर्यप्रकाशात व्यतीत करावा, नियमित आणि पूर्ण झोप घ्यावी असे त्यांनी सांगितले. आधुनिक विज्ञानात झोपेला अनन्यसाधारण महत्व दिले आहे असे सांगून स्क्रीन समोर वेळ घालवण्यासारख्या सवयींमुळे झोपेचा कालावधी कमी होत चालला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील आपण 30 सेकंदांच्या आत गाढ निद्रेत जाण्याची सवय लावून घेतली आहे,  “जागे असताना पूर्ण जागे व्हा आणि झोपेत असताना शांत झोप, हा एक समतोल साधता येतो”, असे ते म्हणाले. पोषणाबाबत बोलताना पंतप्रधानांनी संतुलित आहारावर भर दिला. तसेच नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली ही  शारीरिक तंदरुस्तीसाठीची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी सांगितले.

करिअरमध्ये प्रगती

पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा, बॅरकपूर, येथील केंद्रीय विद्यालयातील मधुमिता मल्लिक आणि हरियाणा मधील पानिपत येथील,  मिलेनियम स्कूलच्या अदिती तन्वर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर, पंतप्रधानांनी करिअरच्या मार्गावर स्पष्टता आणण्याची आणि गोंधळ तसेच निर्णय घेण्यातील अक्षमता टाळण्याची सूचना केली. स्वच्छतेचे आणि त्यामागील आपल्या संकल्पाचे उदाहरण देत पंतप्रधानांनी  ‘स्वच्छता’ हे देशाचे प्राधान्य क्षेत्र बनत असल्याचे अधोरेखित केले. गेल्या दहा वर्षात भारताच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील बाजारपेठ  250 पटींनी वाढली आहे. "जर आपल्यात क्षमता असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो", विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये, आणि पूर्ण समर्पण वृत्तीने पुढे जावे, असे ते म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी बोलताना पंतप्रधानांनी केवळ एकाच शाखेचा विचार न करत विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रम निवडण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित केलेल्या  प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचा सहभाग, कौशल्य आणि समर्पण यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या तुलनेत सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृती अधिक चांगल्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  हॉटेल मध्ये गेल्यावर अन्नपदार्थ मागवतानाचे  उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले की तिथे काय खायचे हे ठरवावे लागते, घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक आणि नकारात्मक मूल्यमापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.

पालकांची भूमिका

या कार्यक्रमात दिल्लीवरून दूरदृश्य प्रणालीद्वारे सह्भागी झालेल्या पुद्दुचेरी सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील दीपश्री या विद्यार्थिनीने पालकांची भूमिका आणि विद्यार्थी कशाप्रकारे विश्वास निर्माण करू शकतात याबद्दल पंतप्रधानांना विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधानांनी  कुटुंबांमधील विश्वास कमी झाल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आणि पालकांनी आणि शिक्षकांनी या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी मार्ग शोधायला सांगितले. ही विश्वासाची कमतरता अचानक निर्माण झालेली नाही तर दीर्घकाळ चाललेल्या प्रक्रियेचा हा परिणाम आहे आणि प्रत्येकाच्या आचरणाचे  मग ते शिक्षक, पालक किंवा विद्यार्थी असो सखोल आत्म-विश्लेषण आवश्यक आहे,असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या वागण्यात सत्यता आणि आचरण प्रामाणिक असले पाहिजे.त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या मुलांवर संशय न घेता  विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासाच्या अभावामुळे निर्माण झालेले अंतर मुलांना नैराश्यात ढकलू शकते. पंतप्रधानांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संवादाचे मार्ग खुले ठेवण्यास  आणि पक्षपात टाळण्यास सांगितले.त्यांनी एक प्रयोग करण्याचे सांगत मुलांच्या मित्रांच्या कुटुंबियांना नियमितपणे भेटण्याची आणि मुलांना साहाय्यकारी ठरतील अशा  सकारात्मक गोष्टींवर चर्चा करण्याची विनंती केली.

तंत्रज्ञानाचा प्रवेश

महाराष्ट्रातील, पुणे इथले पालक चंद्रेश जैन यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या शिरकावाचा  मुद्दा उपस्थित केला आणि खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या समाजमाध्यम मंचांच्या पार्श्वभूमीवर, अभ्यासाचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे असा प्रश्न झारखंडमंधील रामगढ इथल्या पालक कुमारी पूजा श्रीवास्तव यांनी पंतप्रधानांना विचारला. शिकण्याचे साधन म्हणून मोबाईल तंत्रज्ञानाच्या फायद्यांचा उपयोग करताना,  परीक्षेचा ताण प्रभावीपणे हाताळण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षित आणि प्रोत्साहित करण्याचा मुद्दा , हिमाचल प्रदेशमधील  हमीरपूर येथील  कांगू येथे असलेल्या टीआर डीएव्ही स्कूलच्या  अभिनव राणा या विद्यार्थ्याने उपस्थित केला. ''कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो” असे सांगत घरी शिजवलेले अन्न पोषक तत्वांनी समृद्ध असते मात्र ते जास्त प्रमाणात खाल्ले तर पोटाच्या समस्या आणि इतर समस्या उद्भवू शकतात तसेच मोबाईलचे आहे त्याचा अतिवापर चांगला नाही, असे पंतप्रधान म्हणाले. निर्णयावर आधारित  योग्य पर्याय निवडण्याच्या मदतीने तंत्रज्ञान आणि मोबाईल फोनचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला.  गोपनीयता आणि गुप्तता या विषयाकडे लक्ष वेधत “प्रत्येक पालकांना या समस्येचा सामना करावा लागतो”, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी कुटुंबात काही नियम आणि विनियम  तयार करण्यावर भर दिला आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट न वापरण्याचा आणि घरात नो गॅझेट झोन तयार करण्याचा उल्लेख केला.. “आजच्या जगात”,कोणीही तंत्रज्ञानापासून दूर पळू शकत नाही.” असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञानाला  ओझे समजू नये, तर त्याचा प्रभावी वापर शिकणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान हे शैक्षणिक स्रोत असल्याबद्दल  विद्यार्थी त्यांच्या पालकांना समजावून सांगावे असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी  कुटुंबातील प्रत्येक सदस्यासह त्यांच्या घरातील प्रत्येक मोबाईल फोनचे पासकोड सामायिक करण्याची शिफारस देखील केली."यामुळे बऱ्याच वाईट गोष्टींना आळा बसेल", असे ते म्हणाले. समर्पित मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि साधनांच्या वापरासह स्क्रीन टाइमवर देखरेख ठेवण्याच्या मुद्द्यालाही पंतप्रधानांनी स्पर्श केला. तसेच वर्गात मोबाईलचा वापर करताना  तो हुशारीने वापरण्याच्या विविध क्षमतांबद्दल विद्यार्थ्यांध्ये  प्रबोधन करण्याची सूचनाही त्यांनी केली

पंतप्रधान तणाव कशाप्रकारे हाताळतात आणि सकारात्मक कसे राहतात?

तामिळनाडूच्या चेन्नई येथील मॉडर्न सीनियर सेकेंडरी स्कूलमधील  एम. वागेश या विद्यार्थ्याने  पंतप्रधानांना विचारले की, ते पंतप्रधानपदावर असतानाचा ताण आणि तणाव कशाप्रकारे  हाताळतात. “आम्ही तुमच्यासारखे सकारात्मक कसे राहू शकतो?”.असा प्रश्न उत्तराखंडमधील उदम सिंग नगर इथल्या  डायनेस्टी मॉडर्न गुरुकुल अकादमीची  विद्यार्थिनी स्नेहा त्यागीने विचारला. मुलांना पंतप्रधानपदावरील ताणाची जाणीव आहे, हे ऐकून चांगले वाटले, असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येकाला अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो. ती  टाळून व्यक्त होता येऊ शकते मात्र, असे लोक आयुष्यात फारसे काही साध्य करू शकत नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. “ मी प्रत्येक आव्हानाला आव्हान देतो,  मी आव्हान आपोआप निघून जाण्याची  वाट पाहत नाही. यामुळे मला सतत शिकण्याची संधी मिळते. नवीन परिस्थितींना तोंड देणे  मला समृद्ध करते” हा माझा दृष्टिकोन  मला उपयुक्त वाटतो.  माझ्यासोबत 140 कोटी देशवासी आहेत हा माझा सर्वात मोठा  आत्मविश्वास  आहे. जर 100 दशलक्ष आव्हाने असतील तर कोट्यवधी उपाय आहेत. मी स्वतःला कधीच एकटा  समजत नाही आणि सगळे माझ्यासोबत आहेत , मला माझ्या देशाच्या आणि देशवासियांच्या क्षमतांची नेहमीच जाणीव असते. हा माझ्या विचाराचा मूलभूत मुद्दा आहे.” असे सांगत पंतप्रधान  म्हणाले की, त्यांना कायम आघाडीवर राहून काम करावे लागते आणि  त्यावेळी होणाऱ्या चुका या त्यांच्याच असतात , पण यामध्ये त्यांना देशाची क्षमता बळ देते. "मी माझ्या देशवासियांच्या क्षमता जितक्या अधिक वाढवतो तितकी आव्हानांना आव्हान देण्याची माझी क्षमता वाढते", असे ते म्हणाले. जेव्हा गरीब स्वतःच गरिबी हटवण्याचा निर्णय घेतील तेव्हा गरीबी दूर होईल, असे  गरिबी संदर्भातील प्रश्नाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले. “गरिबांना  पक्के घर, शौचालय, शिक्षण, आयुष्मान, जलवाहिनीच्या माध्यमातून  पाणी अशी स्वप्ने पाहण्याची साधने निर्माण करण्याची  जबाबदारी माझी आहे.एकदा का तो रोजच्या अवहेलनेपासून  मुक्त झाला की, त्याला दारिद्र्य निर्मूलनाची खात्री होईल”,असे  पंतप्रधान म्हणाले.त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे याचे ज्ञान असले पाहिजे. हे अनुभवातून  येते आणि प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायला शिकवते, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते स्वतःकडून झालेल्या चुकांना मिळालेला धडा समजतात, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी  कोविड महामारीचे उदाहरण दिले आणि यावेळी निष्क्रिय बसण्याऐवजी त्यांनी दिवे प्रज्वलित करणे  किंवा ‘थाळी ’ वाजवणे यासारख्या कृतींद्वारे लोकांना एकत्र आणणे आणि त्यांची सामूहिक शक्ती वाढवणे हे  निवडले, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे, क्रीडा स्पर्धांमधील  यश साजरे करणे आणि योग्य रणनीती, दिशा आणि नेतृत्व यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदकांची कमाई झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

योग्य कारभारासाठी तळागाळापासून वरपर्यंत आणि वरपासून तळागाळापर्यंत अचूक माहिती देणाऱ्या  परिपूर्ण मार्गदर्शनाची व्यवस्था असायला हवी , असे त्यांनी सांगितले.

जीवनात निराश न होण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आणि एकदा का हा निर्णय घेतला की केवळ  सकारात्मकता उरते असे सांगितले. “मी माझ्या आयुष्यात निराशेचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले. एखादी गोष्ट करण्याचा संकल्प दृढ असेल तेव्हा निर्णय घेणे सोपे होते, असे त्यांनी सांगितले. "जेव्हा कोणताही स्वार्थी हेतू नसतो, तेव्हा निर्णयात कधीही गल्लत  होत नाही", असे ते म्हणाले. सध्याच्या पिढीचे जीवन सुकर करण्यावर भर देत, आजच्या पिढीला त्यांच्या पालकांना आलेल्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही,असा  विश्वास  पंतप्रधानांनी व्यक्त केल . "केवळ  वर्तमानातच  नाही तर भावी पिढ्यांसाठी चकमदार कामगिरी करण्याची  आणि त्यांची क्षमता दाखवण्याची संधी देणारे राष्ट्र बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे"  असे सांगत  हा संपूर्ण देशाचा सामूहिक संकल्प असला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. सकारात्मक विचारांचे  सामर्थ्य अधोरेखित करत  पंतप्रधान म्हणाले की, अत्यंत नकारात्मक परिस्थितीतही सकारात्मक परिणाम शोधण्याची हे विचार ताकद देतात. पंतप्रधानांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून या संवादाचा समारोप केला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील ध्येये साध्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous versions of Pariksha Pe Charcha can be found below:

 

* * *

NM/ST/RA/Sushma/Bhakti/Sonal C/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000414) Visitor Counter : 131