पंतप्रधान कार्यालय

रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरण कार्यक्रमात  पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 28 OCT 2023 3:16PM by PIB Mumbai

 

नमस्कार

रोजगार मेळाव्याचा हा प्रवास या महिन्यात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच रोजगार मेळावा सुरू झाला होता. तेव्हापासून केंद्रात आणि रालोआ  शासित आणि भाजपशासित राज्यांमध्ये  रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत.सातत्याने केले जात आहेत. आतापर्यंत लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. आजही 50 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. दिवाळीला अजून काही अवधी शिल्लक आहे, मात्र नियुक्तीपत्रे मिळालेल्या  50 हजार तरुणांच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण  दिवाळीपेक्षा कमी नाही. तुम्ही सगळे  मेहनतीने या स्थानी पोहोचला आहात. यासाठी तुम्ही  सर्व, माझे तरुण मित्र , विशेषत: आपल्या मुली, खूप खूप अभिनंदनास पात्र आहात.तुमच्या कुटुंबाला  माझ्याकडून  विशेष शुभेच्छा.

 

मित्रांनो ,

देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित करण्यात आलेले रोजगार मेळावे हे तरुणांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचा दाखला आहे.   आमचे सरकार तरुणांचे भविष्य लक्षात घेऊन मिशन मोडमध्ये काम करत आहे., आम्ही केवळ रोजगारच देत नाही, तर संपूर्ण यंत्रणा पारदर्शक ठेवत आहोत, त्यामुळे तरुणांचा  नियुक्ती प्रक्रियेवर विश्वास कायम आहे. आम्ही केवळ भर्ती  प्रक्रिया सुव्यवस्थितच  केली नाही तर काही परीक्षांची पुनर्रचनाही केली आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या (एसएससी)भर्तीसाठी लागणारा वेळ आता जवळपास निम्मा झाला आहे.म्हणजेच परिपत्रक जारी करण्यापासून ते नियुक्तीपत्र देण्यापर्यंतचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करण्यात आला आहे. यामुळे तरुणांचा बराच वेळ वाचला आहे. तरुणांच्या हितासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. कर्मचारी निवड आयोगाने हिंदी, इंग्रजी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये काही परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ज्यांना भाषेचा अडसर होता त्या मोठ्या प्रमाणातील तरुणांना नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी मिळत आहे.

 

मित्रांनो,

आज भारत ज्या दिशेने वाटचाल करत आहे आणि ज्या वेगाने वाटचाल करत आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तुम्ही पाहिले  असेल, काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील धोरडो गावाला तुम्हाला माहीत असेल धोरडो हे कच्छ जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेवरील गाव आहे . या धोरडो गावाला संयुक्त राष्ट्रांनी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून गौरवले आहे. यापूर्वी कर्नाटकातील होयसला मंदिरे आणि पश्चिम बंगालच्या शांतीनिकेतनला जागतिक वारसा स्थळाची मान्यता मिळाली आहे.तुम्ही   कल्पना करू शकता की,   यामुळे येथील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेच्या विस्ताराच्या शक्यता  खूप वाढल्या आहेत . पहिले म्हणजे , पर्यटन वाढल्याचा  थेट अर्थ असा की रोजगाराच्या नवीन संधी वेगाने वाढतील.याचा फायदा हा  पर्यटनाचा परिणाम आहे,आजूबाजूची उपहारगृह , छोटे दुकानदार, बसचालक, टॅक्सीचालक, रिक्षाचालक, अगदी टुरिस्ट गाईड म्हणून काम करणारे, सर्वांना याचा फायदा होतो.त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्र हे देखील रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणारे क्षेत्र आहे. आपले  खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आहेत. हे यश आपल्या देशाच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मोठ्या बदलांचे आणि विकासाचे संकेत आहे.आणि जेव्हा क्रीडा क्षेत्राचा विकास होतो तेव्हा केवळ चांगले खेळाडूच तयार होत नाहीत तर प्रशिक्षक, फिजिओ, पंच आणि क्रीडा आहारतज्ञ अशा अनेक नवीन संधी निर्माण होतात.

 

मित्रांनो,

आम्ही  रोजगार देणाऱ्या पारंपरिक क्षेत्रांना बळकट करत आहोत. आणि यासोबतच आम्ही नवीकरणीय  ऊर्जा, अंतराळ, ऑटोमेशन आणि संरक्षण निर्यात यांसारख्या  नवीन क्षेत्रांना प्रोत्साहन देत आहोत. ड्रोन तंत्रज्ञानाने संधींची  नवी कवाडे खुली केली आहेत. आज, पीक मूल्यांकन आणि पोषक फवारणीसाठी शेतकरी ड्रोनचा वापर हळूहळू वाढवत आहे. . स्वामित्व  योजनेंतर्गत जमिनीच्या मॅपिंगमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही एक चित्रफीत पहिली  असेल. हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतीमध्ये आयसीएमआरने ड्रोनच्या मदतीने औषधे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली. पूर्वी या कामाला दोन तास लागायचे पण ड्रोनच्या मदतीने हे काम 20, 25, 30 मिनिटे किंवा त्याहूनही कमी वेळात करता येते.ड्रोनमुळे मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्सनाही चालना मिळाली आहे. या क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे तरुणांना नवीन प्रकारचे ड्रोन तयार करण्यात मदत होत आहे.

 

माझ्या कुटुंबियांनो,

याच महिन्यात आपण पूज्य बापूंची जयंतीही साजरी केली आहे. गांधीजींनी स्वदेशी आणि कर्मयोगाचे सामर्थ्यशाली  प्रतीक म्हणून चरख्याचा वापर केला.  चमक गमावलेल्या खादीला आता पुन्हा चमक प्राप्त झाली आहे. 10 वर्षांपूर्वी खादीची विक्री सुमारे 30 हजार कोटी रुपये होती. आता ही विक्री  सवा  लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली  आहे. यामुळे खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. विशेषत: महिलांना यातून खूप मदत मिळाली आहे.

 

मित्रांनो,

प्रत्येक देशात वेगवेगळ्या प्रकारचे  सामर्थ्य असते. काहीं जणांकडे  नैसर्गिक संसाधने आहेत, काही खनिजांनी संपन्न आहेत, तर काहींकडे  लांब किनारपट्टीची ताकद आहे. पण ही क्षमता वापरण्यासाठी सर्वात मोठे सामर्थ्य हवे आहे  ते आपल्या तरुणांचे . युवाशक्ती जितकी प्रबळ असेल तितका देशाचा विकास होईल.आज भारत आपल्या तरुणांना कौशल्य आणि शिक्षणाद्वारे नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करत आहे. भविष्यातील आधुनिक गरजा लक्षात घेऊन देशात आधुनिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जात आहे. देशात मोठ्या प्रमाणात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी , आयआयएम  किंवा ट्रीपल आयटी  सारख्या कौशल्य विकास संस्था सुरु करण्यात आल्या आहेत . प्रधानमंत्री कौशल्य  विकास योजनेंतर्गत कोट्यवधी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपल्या देशातील कोट्यवधी कारागीर त्यांच्या पारंपरिक व्यवसायातून आपली उपजीविका चालवतात. अशा विश्वकर्मा कारागिरांसाठी पीएम विश्वकर्मा योजनाही सुरू करण्यात आली आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्ट झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपले कौशल्य आणि ज्ञान अद्ययावत  करत राहावे लागेल. कोणतेही नवीन कौशल्य शिकल्यानंतर, ते सतत वाढवणे (अप स्किल )आणि   नवे कौशल्य शिकणे (रीस्कील ) खूप महत्वाचे आहे. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागिरांची पारंपरिक कौशल्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांशी जोडली जात आहेत.

 

माझ्या कुटुंबियांनो,

तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. एक सरकारी कर्मचारी या नात्याने तुम्हाला अशा सर्व योजना पुढे नेल्या पाहिजेत आणि त्या प्रत्यक्षात  राबवायच्या आहेत. आज तुम्ही सर्वजण आपल्या  राष्ट्र उभारणीच्या प्रवासात महत्त्वाचे भागीदार म्हणून सहभागी होत आहात.  मी तुम्हाला आवाहन करतो कीआज तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करत आहात पण तुम्ही तुमच्या देशवासीयांच्या स्वप्नांची जबाबदारी स्वतः  घेत आहात. मी तुम्हाला आवाहन  करतो की या प्रवासाला ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी  तुमचे  सक्रिय योगदान खूप महत्वाचे आहे. तुम्ही आय गॉट ( I-Got ) पोर्टलवर तुमचे ज्ञान वाढवत राहावे. तुमचे प्रत्येक पाऊल देशाला विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्यासाठी  मदत करेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या परिवारातील सदस्यांनाही खूप खूप शुभेच्छा आणि येणारा संपूर्ण काळ, आज शरद पौर्णिमा आहे. येणारा संपूर्ण काळ हा सणांचा काळ आहे, तुम्ही कुठेही असाल तरी सरकारी कामात व्यस्त असाल, पण  व्होकल फॉर लोकल हा मंत्र सर्वत्र पोहोचवा, तुमच्या कुटुंबियांनाही सांगा की, आपण  व्होकल फॉर लोकलसाठी  कटिबद्ध राहू आणि ते देखील रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे  एक माध्यम आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

***

S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972891) Visitor Counter : 77