पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रोजगार मेळ्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 51 हजारांहून अधिक नियुक्तीपत्रं प्रदान


या अमृत काळाचे तुम्ही अमृत रक्षक आहात

गेल्या काही वर्षात निमलष्करी दलांच्या भर्ती प्रक्रियेत आम्ही अनेक मोठे बदल केले आहेत

कायद्याचे राज्य असलेले सुरक्षित वातावरण विकासाची गती वाढवते

गेल्या नऊ वर्षात परिवर्तनाचा एक नवीन टप्पा दिसून आला

नऊ वर्षांपूर्वी याच दिवशी सुरू झालेल्या जन धन योजनेने खेडी आणि गोरगरिबांच्या आर्थिक सक्षमीकरणात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे

देशाच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनामध्ये जन धन योजनेची भूमिका हा खरोखर एक अभ्यासाचा विषय आहे

सरकार आणि प्रशासन यांच्यात बदल घडवून आणण्याच्या माझ्या मोहिमेत तुम्ही सर्व युवा वर्ग माझे सर्वात मोठे बलस्थान आहात

Posted On: 28 AUG 2023 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑगस्ट 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना 51 हजारांहून अधिक नियुक्तीपत्रे प्रदान केली. देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्या द्वारे, केंद्रीय राखीव पोलीस दल (सी आर पी एफ), सीमा सुरक्षा दल (बी एस एफ), सशस्त्र सीमा दल (एस एस बी), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सी आय एस एफ), भारत तिबेट सीमा पोलीस दल (आय टी बी पी) आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन सी बी) तसेच दिल्ली पोलीस अशा विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सी ए पी एफ), केंद्रीय गृहमंत्रालय भर्ती करत आहे. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी, गृह मंत्रालयाच्या  विविध संस्थांमध्ये, हवालदार (जनरल ड्युटी), उपनिरीक्षक (जनरल ड्युटी) आणि बिगर जनरल ड्युटी श्रेणीतील पदे,  अशा विविध पदांवर रुजू होणार आहेत.

या प्रसंगी संबोधित करताना, पंतप्रधानांनी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अमृत काळातील अमृत रक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. या सर्वांना पंतप्रधानांनी अमृत रक्षक असे संबोधिले कारण नवनियुक्त कर्मचारी केवळ देशाची सेवा करणार नाहीत तर देशाचे आणि देशवासीयांची रक्षण देखील करणार आहेत. तुम्ही सर्व जण या अमृत काळातील अमृत रक्षक आहात, असे पंतप्रधान म्हणाले.

रोजगार मेळाव्याची ही आवृत्ती अशा क्षणी होत आहे, जेव्हा संपूर्ण देश अभिमान आणि विश्वासाच्या भावनेने प्रेरित आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की चांद्रयान 3आणि प्रज्ञान रोव्हर  चंद्राच्या नवीनतम प्रतिमा सतत प्रसारित करत आहेत. अशा अत्यंत प्रतिष्ठित क्षणी नवनियुक्त कर्मचारी आपल्या आयुष्याचा प्रवास सुरु करत आहेत असे सांगून त्यांनी उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.

संरक्षण किंवा सुरक्षा दले तसेच पोलीस दलात नियुक्त झाल्यावर येणाऱ्या जबाबदारीला अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की या सर्व दलांच्या गरजांबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. निमलष्करी दलांमधील भर्ती प्रक्रियेत केलेल्या मोठ्या बदलांची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. अर्जापासून अंतिम निवडीपर्यंत भर्तीची प्रक्रिया वेगवान झाली आहे,  आता इंग्रजीऐवजी 13 स्थानिक भाषांमध्ये किंवा पूर्वीप्रमाणे हिंदी मध्ये परीक्षा घेतल्या जात आहेत. छत्तीसगड सारख्या नक्षलग्रस्त भागात नियम शिथिल केल्याने शेकडो आदिवासी युवकांना भर्ती प्रक्रियेत सामावून घेता आले असे ठळकपणे सांगून सीमावर्ती भाग आणि कट्टरपंथी  प्रभावित भागातील तरुणांसाठी असलेल्या विशेष कोट्याबाबतही त्यांनी माहिती दिली.

राष्ट्राच्या विकासातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचा विशेष उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की कायद्याचे राज्य असलेले सुरक्षित वातावरण विकासाची गती वाढवते. यासंदर्भात उत्तर प्रदेशचे उदाहरण देऊन त्यांनी सांगितले की हे राज्य एकेकाळी विकासाच्या दृष्टीने मागे पडले होते आणि इतकेच नव्हे तर तेथील गुन्हेगारी दर देखील उच्चांकी होता. मात्र उत्तर प्रदेशात कायद्याच्या राज्याची सुरुवात होताच हे राज्य आता विकासाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे आणि तेथे भयमुक्त नवा समाज स्थापन होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अशा व्यवस्थेमुळे लोकांचा विश्वास पुन्हा दृढ होतो. राज्यात गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारीचा दर कमी होत आहे तर ज्या राज्यांमध्ये गुन्हेगारी दर अधिक आहे, त्या राज्यांमध्ये अतिशय कमी गुंतवणूक होते आहे आणि रोजगार निर्मितीच्या सर्व संधी जिथल्या तिथे ठप्प होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

एक अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख प्रस्थापित होत असून याच दशकात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल असा पुनरुच्चार त्यांनी केला. “मोदी अत्यंत जबाबदारीने अशी हमी देतात”, असे पंतप्रधान म्हणाले. वाढत्या अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की अर्थव्यवस्थेची वाढ सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राची वाढ होणे महत्त्वाचे आहे. कोरोना महामारीच्या काळात औषधनिर्मिती अर्थात फार्मसी क्षेत्राने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी सांगितले. आज भारतातील फार्मा उदयोगाची उलाढाल  सुमारे 4 लाख कोटी रुपये इतकी असून  2030 पर्यंत हा उद्योग अंदाजे 10 लाख कोटी रुपयांचा असेल असा अंदाज आहे. याचाच अर्थ फार्मा उद्योगात येत्या काळात अधिकाधिक युवा वर्गाची गरज असून तिथे अधिक रोजगार निर्मिती होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

वाहनउद्योग आणि वाहनांचे भाग तयार करणाऱ्या उद्योगांच्या विस्ताराचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की दोन्ही उद्योगांची उलाढाल 12 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे आणि येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. हा विकास दर कायम ठेवण्यासाठी ऑटोमोबाईल उद्योगाला आणखी अनेक तरुणांची गरज भासणार आहे, ज्यामुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी अधोरेखित केले. याशिवाय अन्न प्रक्रिया उद्योगाची वाढ देखील गतीने होत असून गेल्या वर्षभरात या उद्योगाची उलाढाल अंदाजे 26 लाख कोटी रुपये इतकी होती आणि येत्या तीन साडे तीन वर्षांमध्ये ती 35 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. "विस्तारामुळे रोजगाराच्या संधीही  वाढतात", असेही ते म्हणाले.

गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने पायाभूत सेवा सुविधांच्या विकासाकरता 30 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला असे पायाभूत सेवा सुविधांच्या विकासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले. यामुळे संपर्क यंत्रणा/कनेक्टिव्हिटी तसेच पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगाला चालना मिळत असून नवीन रोजगार निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान म्हणले.

पंतप्रधान म्हणाले की, 2030 पर्यंत पर्यटन क्षेत्रामध्‍ये  अंदाजे 13-14 कोटी रोजगार निर्माण होईल, आणि या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेत 20 लाख कोटींपेक्षाही अधिक योगदान असेल. ही  केवळ आकडेवारी नाही, तर  या आर्थिक घडामोडींमुळे  आणि मिळणा-या रोजगारामुळे राहणीमान सुलभ होईल, आणि उत्पन्न वाढेल, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

"गेल्या 9 वर्षामध्‍ये सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे परिवर्तनाचे एक नवीन युग कसे असते ते दिसून आले आहे, असे म्हणता येईल, " असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. भारताने गेल्यावर्षी विक्रमी निर्यात केली, हे जागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंना मागणी वाढल्याचे द्योतक असल्याची माहिती त्यांनी दिली. याचा परिणाम म्हणजे, देशांतर्गत उत्पादन वाढले आहे, रोजगार वाढला आहे आणि त्यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले. भारत हा  जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादन करणारा देश बनला असून भारतात मोबाईल फोनची मागणीही वाढल्याचे त्यांनी नमूद केले. मोबाईल उत्पादनात अनेक पटींनी वाढ झाल्याचे श्रेय सरकारने अनेक आघाड्यांवर केलेल्या प्रयत्नांना दिले. देश आता इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर देखील लक्ष केंद्रीत करत आहे आणि भारत आयटी तसेच  हार्डवेअर उत्पादन क्षेत्रात मोबाईल उत्पादन क्षेत्रात मिळालेल्या  यशाची पुनरावृत्ती करेल,  असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी   व्यक्त केला.

"मेड इन इंडिया लॅपटॉप आणि वैयक्तिक संगणक लवकरच अभिमानाने आपली मान उंचावतील , असा दिवस आता फार दूर नाही," असे सांगून पंतप्रधानांनी ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्राचा संदर्भ दिला. पंतप्रधान म्हणाले की,  सरकार भारतीय बनावटीचे लॅपटॉप आणि संगणक खरेदी करण्यावर भर देत आहे आणि परिणामी उत्पादन आणि रोजगार वाढला आहे. देशामध्ये होत असलेल्या आर्थिक घडामोडींसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नवीन भरती केली जात आहे, आता त्यांच्या खांद्यावर येत  असलेल्या जबाबदारीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी 9 वर्षांपूर्वी याच  दिवशी ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ सुरू केल्याच्या आठवणी सांगितल्या. “या योजनेने खेडी -गावे आणि गरीबांच्या (गांव आणि गरीब) आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच रोजगार निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावली आहे”,  असे पंतप्रधान म्हणाले. या योजनेअंतर्गत गेल्या 9 वर्षात 50 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेचा लाभ थेट गरीब आणि वंचितांपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली आहे तसेच आदिवासी, महिला, दलित आणि इतर वंचित घटकांना रोजगार आणि स्वयंरोजगार मिळण्यास मदत झाली आहे. अनेक तरुणांना बँकिंग करस्पॉन्डंट – प्रतिनिधी, बँक मित्र म्हणून नोकऱ्या मिळाल्या. 21 लाखांहून अधिक तरुण बँक मित्र किंवा बँक सखी म्हणून कार्यरत आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. जन धन योजना, मुद्रा योजनेलाही मजबूत केले, असे ते म्हणाले. मुद्रा योजनेंतर्गत आतापर्यंत 24 लाख कोटी रुपयांहून अधिक तारणमुक्त कर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. लाभार्थ्यांमध्ये 8 कोटी पहिल्यांदाच उद्योजक बनले  आहेत. पीएम स्वानिधी अंतर्गत, सुमारे 45 लाख पथ विक्रेत्यांना प्रथमच तारणमुक्त कर्ज मंजूर करण्यात आले. या योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये महिला, दलित, मागास आणि आदिवासी तरुणांची संख्या मोठी आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, जन धन खात्यांमुळे खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना बळकटी मिळाली आहे. “देशातील सामाजिक आणि आर्थिक बदलांना गती देण्यासाठी जन धन योजनेने जी भूमिका बजावली आहे ती खरोखरच अभ्यास करण्‍यासारखी गोष्‍ट  आहे”, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी आज एकाचवेळी  अनेक रोजगार मेळ्यांमध्ये लाखो तरुणांना मार्गदर्शन केले आणि त्यांना सार्वजनिक सेवा किंवा इतर क्षेत्रात रोजगार मिळाल्याची माीहिती दिली. “सरकार आणि प्रशासनात परिवर्तन  घडवून आणण्याच्या मिशनमध्ये तुमच्या सारखे सर्व तरुण हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आजच्या  तरुण पिढीला सर्व काही फक्त एका क्लिकच्या अंतरावर आहे. अशा वेगवान  काळामधील आजची पिढी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी कोणत्याही गोष्‍टीचे जलद वितरण करणे महत्त्वाचे आहे, यावर भर देवून पंतप्रधान म्हणाले की, आजची पिढी समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधत आहे. ही पिढी कधीही तुकड्या, तुकड्यांनी  विचार करीत नाही. त्यांनी अधोरेखित केले की, लोकसेवक या नात्याने नवीन भरती करणार्‍या मंडळींना  लोकांसाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरतील, असे निर्णय घ्यावे लागतील. “तुम्ही ज्या पिढीचे आहात,  त्या पिढीने काहीतरी साध्य करण्याचा निर्धार केला आहे. या पिढीला इतर  कोणाच्या  मर्जीने वाटचाल करायची नाही,   फक्त कोणीही त्यांच्या मार्गात अडथळा बनू नये, अशी त्यांची इच्छा आहे,”  पंतप्रधान म्हणाले, लोकसेवक म्हणून लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. याविषयी त्यांनी आपल्या   समजूतीप्रमाणे,   काम केले तर   कायदा आणि  सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होईल, असेही ते म्हणाले.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान म्‍हणाले,  आपण जणू निमलष्करी दल आहोत, असे  समजून सर्वांनी शिकण्याची वृत्ती कायम ठेवावी, यावर त्यांनी भर दिला आणि ‘आयजीओटी  कर्मयोगी पोर्टल’वर उपलब्ध असलेल्या 600 हून अधिक अभ्यासक्रमांवर प्रकाश टाकला. “या पोर्टलवर 20 लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. मी विनंती करतो की, तुम्ही सर्वांनी देखील या पोर्टलमध्ये सामील व्हावे आणि त्याचा लाभ घ्यावा ”, असे पंतप्रधान म्हणाले. शेवटी, पंतप्रधानांनी शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला आणि नवीन भरती झालेल्यांच्या जीवनात योगासनांचा नियमित - दैनंदिन सराव म्हणून समावेश करावा, असा  आग्रह त्यांनी केला.

 

पार्श्वभूमी 

सीएपीएफ तसेच दिल्ली पोलिसांचे बळकटीकरण केले तर,  या दलांना अंतर्गत सुरक्षेमध्ये मदत करणे, दहशतवादाचा सामना करणे, बंडखोरीशी मुकाबला करणे, आणि राष्ट्राच्या सीमांचे रक्षण करणे यासारखी त्यांची बहुआयामी भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होईल.

रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. रोजगार मेळा पुढील रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

नव्याने नियुक्त केलेल्या उमेदवारांना ‘आयजीओटी  कर्मयोगी पोर्टल’ वरील ऑनलाइन मॉड्यूल कर्मयोगी ‘प्रारंभ’ द्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधीही  मिळणार आहे.  या पोर्टलवर 673 पेक्षाही  अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ‘कुठल्याही कोणत्याही उपकरणाविषयी’ शिकण्‍याच्या दृष्‍टीने उपयुक्त ठरतील, अशा प्रकारे हे सर्व अभ्‍यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

 

 

* * *

JPS/S.Tupe/Bhakti/Suvarna/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1953066) Visitor Counter : 138