पंतप्रधान कार्यालय

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या भारत भेटीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले  निवेदन

Posted On: 21 JUL 2023 1:40PM by PIB Mumbai

 

महामहिम राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी, माध्यमांतील सर्व सहकारी,

नमस्कार!

आयुबोवन!

वणक्कम!

राष्ट्रपती विक्रमसिंघे आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रतिनिधीमंडळातील सदस्यांचे मी भारतात हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रपती विक्रमसिंघे त्यांचा एक वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने मी त्यांना आपणा  सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा देतो. मागील वर्ष, श्रीलंकेतील लोकांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते.एक जवळचा मित्र या नात्याने, नेहमीप्रमाणेच, आम्ही या संकटकाळात सुद्धा श्रीलंकेतील लोकांच्या खांद्याला खांदा भिडवून उभे राहिलो. आणि श्रीलंकेच्या जनतेने ज्या साहसाने या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना केला त्यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

आपल्या देशांमधील संबंध आपल्या देशांप्रमाणेच प्राचीन सुद्धा आहेत आणि व्यापक देखील आहेत. भारताचे शेजारी देश सर्वप्रथम हे धोरण आणि सागर ही संकल्पना अशा दोन्हींमध्ये श्रीलंकेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. द्विपक्षीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय बाबींविषयीचे आमचे विचार आज आम्ही एकमेकांसमोर मांडले. भारत आणि श्रीलंका यांचे संरक्षणविषयक हित आणि विकास एकमेकांशी जोडलेले आहेत असे आमचे मत  आहे. आणि म्हणूनच आपण एकमेकांची सुरक्षितता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन एकत्रितपणे काम करू. .

 

मित्रांनो,

आज आपण आपल्या आर्थिक भागीदारीसाठी एका दूरदृष्टीपूर्ण दस्तावेजाचा स्वीकार केला आहे. ही दृष्टी आहे दोन्ही देशांतील लोकांमध्ये सागरी, हवाई आणि उर्जा क्षेत्र कनेक्टिव्हिटी तसेच लोकांचे आपापसातील संबंध  बळकट करणे . ही दृष्टी आहे पर्यटन, वीज , व्यापार, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांदरम्यान सहयोगाला चालना देण्याची. ही दृष्टी आहे श्रीलंकेच्या प्रती भारताच्या दीर्घकालीन कटिबद्धतेची.

 

मित्रांनो,

आम्ही असे ठरविले आहे की आर्थिक तसेच तंत्रज्ञानविषयक सहकार्य कराराबाबत लवकरच चर्चा सुरु करण्यात येईल. यामुळे दोन्ही देशांसाठी व्यापार आणि आर्थिक सहयोगाच्या नव्या संधी निर्माण होतील. आम्ही भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान हवाई वाहतुकीद्वारे संपर्क वाढविण्याबाबत सहमत झालो आहोत. दोन्ही देशांमध्ये व्यापार तसेच लोकांची ये-जा वाढविण्यासाठी, तामिळनाडूमधील नागपट्टनम आणि श्रीलंकेतील कांके-संतुरई या दोन शहरांच्या दरम्यान प्रवासी फेरी सेवा सुरु करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

दोन्ही देशांच्या दरम्यान विद्युत ग्रीड जोडण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पेट्रोलियम पाईपलाईन टाकण्यासाठी या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात येईल. याशिवाय, दोन्ही भूभागांना जोडणाऱ्या पुलाच्या निर्मितीची देखील व्यवहार्यता तपासण्याचा  निर्णय झाला आहे. श्रीलंकेत युपीआय  सुरु करण्यासाठी आज झालेल्या करारामुळे दोन्ही देशांतील आर्थिक तंत्रज्ञानविषयक जोडणीत देखील वाढ होईल.

 

मित्रांनो,

मच्छिमारांच्या उपजीविकेशी सबंधित अडचणींवर देखील आम्ही आज चर्चा केली. या बाबतीत आपण मानवी दृष्टीकोनातून पुढे गेले पाहिजे याबद्दल आमचे एकमत झाले आहे. आम्ही श्रीलंकेत पुनर्रचना आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याबाबत देखील चर्चा केली. राष्ट्रपती विक्रमसिंघे यांनी त्यांच्या समावेशक दृष्टीकोनाबाबत मला माहिती दिली. आम्हाला आशा वाटते की, श्रीलंका सरकार तमिळ लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, समानता न्याय आणि शांतीसाठी पुनर्निर्माणप्रक्रियेला चालना देईल, तेराव्या सुधारणेची अंमलबजावणी तसेच प्रांतिक मंडळांच्या निवडणुका घेण्याबाबतची वचनबद्धता पूर्ण करेल आणि श्रीलंकेतील तमिळ समुदायासाठी आदरयुक्त आणि सन्मानपूर्ण जीवन  सुनिश्चित  करेल. 

 

मित्रांनो,

हे वर्ष आपल्या द्विपक्षीय संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे कारण यावर्षी आपण आपल्या देशांदरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांचा 75 वा वर्धापनदिन साजरा करत आहोत. त्याबरोबरच, भारतीय वंशाचा तमिळ समुदाय, त्यांनी श्रीलंकेत प्रवेश केल्याची 200 वर्ष साजरी करत आहे. मला हे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की या निमित्त श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नागरिकांसाठी 75 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. तसेच श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागात सुरु होणाऱ्या विकासविषयक कार्यांमध्ये देखील भारत योगदान देणार आहे.

 

महोदय,

श्रीलंका एक देश म्हणून स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध असणे हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदी महासागर क्षेत्राच्या हितासाठी महत्त्वाचे आहे. मी पुन्हा एकदा शब्द देतो की श्रीलंकेतील लोकांच्या या संघर्षमय काळात भारतातील जनता त्यांच्या सोबत आहे.

खूप-खूप धन्यवाद!

***

S.Kane/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941395) Visitor Counter : 99