पंतप्रधान कार्यालय
पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
Posted On:
18 JUL 2023 1:47PM by PIB Mumbai
नमस्कार!
अंदमान - निकोबार द्वीपसमूहाचे नायब राज्यपाल डी. के. जोशी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी भाई ज्योतिरादित्य शिंदे, व्ही. के. सिंह, संसदेतील माझे सोबती खासदार, इतर सर्व उपस्थित मान्यवर आणि अंदमान - निकोबार द्वीप समूहाच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!
आजचा हा कार्यक्रम भलेही पोर्ट ब्लेअरमध्ये होत असेल, मात्र संपूर्ण देशाचे लक्ष या कार्यक्रमावर आहे. वीर सावरकर विमानतळाची क्षमता वाढवण्यात यावी, अशी अनेक दिवसांपासूनची अंदमान निकोबारमधील लोकांची मागणी होती. आणि यापूर्वीचे जे खासदार होते ते तर दर आठवड्याला माझ्या कक्षात येऊन या मागणीचा पाठपुरावा करत होते. आज ते खूप आनंदात दिसत आहे आणि मी देखील दूरचित्रवाणीवर माझ्या जुन्या साथीदारांना पाहत आहे. या उत्सवात तुमच्याबरोबर मी प्रत्यक्षात तिथे येऊन सहभागी झालो असतो तर मला अधिक आनंद झाला असता. पण वेळेअभावी मी येऊ शकलो नाही. मात्र तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहणारा आनंद मी पाहतो आहे. आनंदाने भारावून गेलेले हे वातावरण मी अनुभवत आहे.
मित्रांनो,
देशभरातून जे कोणी अंदमान निकोबारला जाऊ इच्छितात त्यांची देखील हीच मनीषा होती. सध्या कार्यरत असलेल्या टर्मिनलची क्षमता आजवर दर दिवशी 4 हजार पर्यटकांना सेवा देवू शकेल इतकी होती. नव्या टर्मिनलच्या निर्मितीनंतर विमानतळाची क्षमता आता दररोज जवळपास 11 हजार पर्यटकांना सेवा देण्याइतकी वाढली आहे. नव्या व्यवस्थेनुसार आता या विमानतळावर एकाचवेळी दहा विमाने उभी राहू शकतील. म्हणजेच अंदमान निकोबारसाठी नव्या विमानांचा मार्ग देखील खुला झाला आहे. आणि अधिक विमानांची वाहतूक होईल, त्यामुळे पर्यटकांच्या वर्दळीमध्ये अधिक वाढ होणार आहे. याचा अर्थ, जास्तीत जास्त रोजगार निर्मिती. पोर्ट ब्लेअरच्या या नव्या टर्मिनल इमारतीमुळे प्रवास आणखी सुखकर होईल, व्यवसाय सुलभीकरण आणखी वर्धित होईल आणि संपर्क सुविधा वृद्धिंगत होईल. मी देशातील लोकांचे, पोर्ट ब्लेअरच्या सर्व साथीदारांचे या सुविधेसाठी हार्दिक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
भारतात बऱ्याच काळापर्यंत विकासाची झेप काही मोठी शहरे, काही ठराविक क्षेत्रांपर्यंतच मर्यादित राहिली. काही पक्षांच्या स्वार्थी राजनैतिक धोरणांमुळे विकासाचा लाभ देशातील दुर्गम भागांपर्यंत पोहोचलाच नाही. हे पक्ष त्यांचे हित साध्य होईल, त्यांच्या परिवाराचे भले होईल अशाच कामांना प्राधान्य देत होते. याचा परिणाम असा झाला की, आपल्या देशातील आदिवासी क्षेत्र, आपली बेटे, त्यावरील जनता विकासापासून वंचित राहिली, विकासासाठी तिष्ठत राहिली.
गेली नऊ वर्षे आम्ही संपूर्ण संवेदनशीलतेने पूर्वीच्या सरकारच्या त्या चूका सुधारत आहोत, इतकेच नव्हे तर नव्या व्यवस्था देखील बनवत आहोत. आता भारतात विकासाचे एक नवे प्रारूप विकसित झाले आहे. हे प्रारूप समावेशी आहे, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचे आहे. हे प्रारूप 'सबका साथ, सबका विकास' असे आहे. आणि, मी जेव्हा सर्वांचा विकास असे म्हणतो तेंव्हा त्याचा अर्थ खूप व्यापक आहे. सबका विकास म्हणजे - प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक क्षेत्राचा विकास. सबका विकास म्हणजे - जीवनाच्या प्रत्येक पैलूचा विकास, शिक्षण, आरोग्य, संपर्क सुविधा अशा प्रत्येक प्रकारे सर्वांचा विकास.
मित्रांनो,
याच विचाराने गेल्या नऊ वर्षात अंदमान निकोबारमध्ये विकासाची नवी गाथा लिहिण्यात आली आहे. पूर्वीच्या सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात, म्हणजे आमच्या पूर्वी ज्यांचे सरकार होते त्या काळात, अंदमान निकोबारसाठी केवळ 23 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र, आमच्या सरकारच्या कार्यकाळात अंदमान निकोबारच्या विकासासाठी नऊ वर्षांमध्ये सुमारे 48 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच, आमच्या सरकारने अंदमान निकोबारच्या विकासासाठी पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत दुपटीहून जास्त पैसे खर्च केले आहेत.
पूर्वीच्या सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात अंदमान निकोबारमधील 28 हजार घरांना नळाद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. आमच्या सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात येथील सुमारे पन्नास हजार घरांपर्यंत नळ जोडणी पोहोचवण्यात आली. म्हणजेच, 'हर घर जल' पोहोचवण्यासाठी देखील आमच्या सरकारने पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत दुप्पट वेगाने काम केले आहे.
आज येथील जवळपास प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते आहे. आज येथील प्रत्येक गरीब व्यक्तीला 'एक राष्ट्र एक शिधापत्रिका' या योजनेचा लाभ मिळत आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात अंदमान निकोबारमध्ये एकही वैद्यकीय महाविद्यालय नव्हते. पोर्ट ब्लेअरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करणारे आमचे सरकार आहे.
पूर्वीच्या सरकारच्या काळात अंदमान निकोबारमध्ये इंटरनेट सुविधा उपग्रहावर अवलंबून होती. मात्र, आमच्या सरकारने समुद्राच्या तळाशी शेकडे किलोमीटर सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे पसरवून ही अडचण दूर केली आहे.
मित्रांनो,
अंदमान निकोबारमध्ये अशा सुविधांमुळे जो विकास होत आहे, यामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे. जेव्हा मोबाइलद्वारे संपर्क सुविधा वाढते तेव्हा पर्यटकांचे प्रमाणही वाढते. जेव्हा आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधांचा विकास होतो तेव्हाही पर्यटकांची वर्दळ आणखी वाढते. जेव्हा विमानतळावर विविध प्रकारच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा होतात तेव्हा पर्यटकांना येथे येणे आणखी आवडू लागते. जेव्हा रस्ते चांगले असतात तेव्हा पर्यटक आपल्या भागात जास्तीत जास्त वेळा येतात. म्हणूनच, अंदमान निकोबारला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आता 2014 च्या तुलनेत दुप्पट झाली आहे.
इथे स्नॉर्केलिंग, स्कूबा डाइविंग, सी-क्रुझ सारख्या साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील वाढत आहे. आणि मित्रांनो, माझ्या अंदमान निकोबार मधल्या बंधू-भगिनींनो ऐका, ही तर केवळ सुरुवात आहे. आगामी काही वर्षांमध्ये ही संख्या कैक पटीने वाढणार आहे. त्यामुळे अंदमान निकोबारमध्ये रोजगार - स्वयंरोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होणार आहेत.
मित्रांनो,
आज अंदमान निकोबारचा वारसा आणि विकास देखील या महामंत्राचे जिवंत उदाहरण बनत आहे. अंदमान निकोबारमध्ये लाल किल्ल्याच्या आधी तिरंगा फडकवण्यात आल्याचे तुम्हा सर्वांना माहिती आहेच. मात्र तरीही या इथे केवळ गुलामगिरीच्या खूणा दिसत होत्या.
सन 2018 मध्ये मी अंदमानमध्ये त्याच ठिकाणी तिरंगा फडकवला जिथे नेताजी सुभाष यांनी झेंडा फडकवला होता, हे मी माझे परम भाग्य समजतो. हे आमचेच सरकार आहे ज्याने रॉस बेटाला नेताजी सुभाष यांचे नाव दिले. हे आमचेच सरकार आहे ज्याने हॅवलॉक आणि नील या बेटांचे स्वराज आणि शहीद बेट असे नामकरण केले. आमच्या सरकारनेच देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या वीर पराक्रमी सुपुत्रांची नावे तसेच परमवीर चक्र विजेत्यांची नावे 21 बेटांना बहाल केली आहेत. आज अंदमान निकोबार मधील हे द्वीप संपूर्ण देशातील युवकांना देश विकासाची नवी प्रेरणा देत आहेत.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या काळात आपला भारत कुठून- कुठपर्यंत पोहोचू शकला असता. आणि मी हे खूपच जबाबदारीने सांगत आहे, कुठून- कुठपर्यंत पोहोचू शकला असता. आम्हां भारतीयांच्या सामर्थ्यात कधीच कोणती उणीव राहिली नाही. सामान्य भारतीयांच्या या सामर्थ्यावर भ्रष्टाचारी आणि परिवारवादी राजकीय पक्षांनी नेहमीच अन्याय केला आहे. आज देशातील लोक 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांद्वारे पुन्हा एकदा आमच्या सरकारला सत्तेत परत स्थापित करण्याचा मानस बाळगून आहेत, त्यांनी आपला निर्णय पक्का करून ठेवला आहे.
अशा स्थितीत भारताच्या दुर्दशेला जबाबदार असलेले काही लोक आपली दुकानं उघडून बसले आहेत. हे बघून मला एका कवितेच्या काही ओळी आठवतात. एका कवी महोदयांनी अवधीमध्ये लिहिले आहे, ही अवधी भाषेत लिहिलेली कविता आहे-
''गायित कुछ है, हाल कुछ है, लेबिल कुछ है, माल कुछ है''
चोवीस साठी एकत्र येणा-या सव्वीस राजकीय पक्षांना या ओळी चपखल लागू होतात.
''गायित कुछ है, हाल कुछ है, लेबिल कुछ है, और माल कुछ है''
म्हणजेच कोणीतरी भलतेच गाणे गात आहे, तर सत्य काही वेगळेच आहे. लेबल दुसऱ्याचे आहे, तर उत्पादन त्याहून भिन्न आहे. हे त्यांच्या दुकानाचे वास्तव आहे. त्यांच्या दुकानात दोन गोष्टींची हमी असते. एकतर ते आधी त्यांच्या दुकानात जातीयवादाचे विष विकतात. आणि दुसरे म्हणजे , हे लोक अमर्याद भ्रष्टाचार करतात. आजकाल हे लोक बंगळुरूमध्ये जमले आहेत.
एकेकाळी एक खूप प्रसिद्ध गाणं होतं, मला ते पूर्ण आठवत नाही, पण आठवतंय-एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग। तुम्हीच बघा हे लोक एका चेहऱ्यावर किती मुखवटे लावून बसले आहेत. हे लोक जेव्हा एका फ्रेममध्ये कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा देशासमोर कोणता विचार येतो- देशवासीयांच्या मनात पहिला विचार हाच येतो , पूर्ण चौकट बघून देशवासी हेच म्हणतात की - लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार. त्यामुळे देशातील जनता ही 'कट्टर भ्रष्टाचार परिषद' असल्याचे सांगत आहे. हे लोक काही वेगळेच गात आहेत, परिस्थिती काही भिन्नच आहे. त्यांनी काहीतरी वेगळं लेबल लावलं आहे, माल काही वेगळाच आहे. त्यांच्या उत्पादनात 20 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याची हमी आहे.
मित्रांनो,
या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. जर कोणी कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामिनावर आहे, तर त्याच्याकडे अतिशय सन्मानपूर्वक बघितले जाते. जर संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब जामिनावर असेल तर त्यांचे अधिक चांगले स्वागत होते. एखाद्या पक्षाचा विद्यमान मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात गेल्यास त्याला जादा महत्त्व देऊन 'विशेष निमंत्रित' म्हणून बोलावले जाते. जर कोणी एखाद्या समाजाचा अपमान केला, न्यायालयाकडून शिक्षा झाली, तर त्याचे खूप आदरातिथ्य होते. कोट्यवधींच्या घोटाळ्यात न्यायालयाने कोणाला दोषी ठरवले तर, या बैठकीला उपस्थित राहण्याची त्यांची पात्रता आणखी वाढते. उलट हे लोक त्याच्याकडून मार्गदर्शन घेतात. त्यांच्यात भ्रष्टाचाराबाबत प्रचंड आत्मीयता आणि प्रेम आहे. त्यामुळे 20 लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची हमी देणारे हे लोक एकमेकांना मोठ्या आपुलकीने आणि आत्मीयतेने भेटत आहेत.
मित्रांनो,
भ्रष्टाचाराच्या या दुकानात गुंतलेले हे सर्वजण घराणेशाहीचे कट्टर समर्थक आहेत. ना हिशोब ना वही, कुटुंब काहीही म्हणेल तेच बरोबर आहे. लोकशाहीसाठी असे म्हटले जाते- लोकांचे, लोकांद्वारे, लोकांसाठी. पण या कुटुंबियांचा मंत्र आहे - कुटुंबाचे , कुटुंबाद्वारे, कुटुंबासाठी. कुटुंब प्रथम, राष्ट्र काहीही नाही हे या लोकांचे ब्रीदवाक्य आहे, हीच त्यांची प्रेरणा आहे.
या लोकांना देशाची लोकशाही, देशाची राज्यघटना ओलिस ठेवायची आहे. मी त्यांच्यासाठी हे सांगू इच्छितो… द्वेष आहे, घोटाळे आहेत. तुष्टीकरण आहे, मन काळे आहे. अनेक दशकांपासून देश घराणेशाहीच्या खाईत आहे.
मित्रांनो,
यांच्यासाठी देशातील गरीबांच्या मुलांचा विकास नाही, तर त्याच्या स्वत:च्या मुलांचा, भाऊ-पुतण्यांचा विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. आजकाल तुम्ही पहात आहात की देशात स्टार्ट अप वाढत आहेत, आपल्या तरुणांना पेटंट मिळत आहेत, ट्रेडमार्क मोठ्या प्रमाणात नोंदवले जात आहेत, माझ्या देशातील तरुण क्रीडा जगतात वर्चस्व गाजवत आहेत, मुली आश्चर्यकारक कामगिरी करत आहेत.
ही युवा शक्ती आपल्या देशात पूर्वीदेखील होती, मात्र या घराणेशाही जोपासणाऱ्या पक्षांनी कधीच देशातल्या सामान्य युवाशक्तीला न्याय दिला नाही.
यांची एकाच विचारधारा आहे, आणि एकच अजेंडा आहे - कुटुंब वाचवा, कुटुंबासाठी भ्रष्टाचार वाढवा! देशाचा विकास थांबवणे, त्यांच्या गैरकारभारावर पांघरूण घालणे आणि त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई थांबवणे हा त्यांचा समान किमान कार्यक्रम आहे.
आता बघा ना, त्यांच्या कुळात जमलेली ही मंडळी, मोठमोठ्या घोटाळ्यांवर आणि गुन्ह्यांवर तोंड बंद ठेवतात. कोणत्याही एका राज्यातील त्यांचे कुशासन उघड झाले की लगेच दुसऱ्या राज्यातील हे लोक त्याच्या बचावात युक्तिवाद करू लागतात. कुठेतरी पूर घोटाळा होतो, कोणाचेतरी अपहरण होते, मग कुळातील सर्व लोक सर्वात आधी गप्प होतात.
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुका झाल्या हे तुम्ही पाहिले असेल. उघड उघड हिंसाचार, सतत रक्तपात झाला. यावरही या सर्वांची बोलती बंद झाली आहे. काँग्रेस आणि डाव्यांचे स्वतःचेच कार्यकर्ते स्वतःला वाचवण्याची विनंती करत आहेत. पण काँग्रेस आणि डाव्यांच्या नेत्यांनी स्वार्थापोटी आपल्या कार्यकर्त्यांनाही मरण पत्करायला सोडले आहे
राजस्थानात मुलींवर अत्याचार होत असतील किंवा परीक्षेचे पेपर फुटले असतील, त्यांना यातले काहीच दिसत नाही. परिवर्तनाच्या गप्पा मारून जनतेचा विश्वासघात करणारे, करोडोंचे दारू घोटाळे करतात, तेव्हा हे घराणे पुन्हा त्यांना कवच देऊ लागते. तेव्हा त्यांना त्यांचा उघड भ्रष्टाचार दिसणे आपोआप बंद होते.
देशातील कुठलीही एजन्सी त्यांच्यावर कारवाई करते तेव्हा त्यांचे टेपरेकॉर्डर सुरू होते – काही घडलेच नाही… हे सर्व षडयंत्र आहे, आम्हाला फसवले जात आहे. तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मात्र त्यांच्या वंशातील सर्वच पक्षांनी सर्वांना क्लीन चिट दिली आहे. म्हणूनच मित्रांनो, या लोकांना वेळीच ओळखा, त्यांना जाणून घ्या. बंधू आणि भगिनींनो या लोकांपासून सावध रहा.
मित्रांनो,
या लोकांच्या कारस्थानांमध्ये आपल्याला देशाच्या विकासासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल. आज जगात अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे बेटे आणि समुद्रकिनारी वसलेल्या देशांनी अभूतपूर्व प्रगती केली आहे. प्रगतीचा मार्ग निवडताना त्यांनी आव्हानांचाही सामना केला.
सर्व काही सोपे नव्हते, परंतु त्या देशांनी हे दाखवून दिले आहे की जेव्हा विकास येतो तेव्हा तो सर्व प्रकारच्या समस्यांवर उपायांसह येतो. मला खात्री आहे की, अंदमान-निकोबार बेटांवर होत असलेल्या विकासकामांमुळे हा संपूर्ण प्रदेश आणखी मजबूत होईल. कनेक्टिव्हिटीची ही नवी सुविधा, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल सर्वांसाठी लाभदायी ठरो.
या इच्छेने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या या कार्यक्रमात तुम्ही लोक एवढ्या मोठ्या संख्येने आलात, इथून तुमचा आनंद मला जाणवत आहे. मला तुमचा उत्साह जाणवतो.
या प्रसंगी देशाने नव्या विश्वासाने आणि नव्या संकल्पाने पुढे जावे आणि अंदमान-निकोबारनेही प्रगती करावी, या इच्छेसह, तुम्हा सर्वांना अनेक शुभेच्छा, अनेक धन्यवाद.
***
सुवर्णा बेडेकर/ श्रद्धा मुखेडकर/भक्ती सोनटक्के/सी .यादव
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1940640)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam