पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला केले संबोधित


विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 70,000 जणांना नियुक्ती पत्रे केली वितरित

“संपूर्ण जग आज भारताच्या विकास प्रवासात भागीदार होण्यास उत्सुक आहे ”

“भारत आज राजकीय स्थिरतेसाठी ओळखला जातो आणि आजच्या जगात याचे महत्व खूप आहे. भारत सरकार आज हे निर्णयक्षम सरकार म्हणून ओळखले जाते. हे सरकार आज प्रगतीशील आर्थिक आणि सामाजिक निर्णयांसाठी ओळखले जाते”

"सरकारी योजनांमुळे नागरिकांच्या कल्याणांचा परिणाम अनेक पटींनी वाढला आहे"

"नोकऱ्यांसाठी पैसे द्यायचे ('रेटकार्ड'चे) दिवस गेले, सध्याचे सरकार तरुणांच्या भविष्याच्या 'सुरक्षिततेवर' लक्ष केंद्रित करते"

“भाषेचा दुरुपयोग करून फूट पाडण्यात आली, आताचे सरकार भाषेला रोजगाराचे सशक्त माध्यम बनवत आहे”

“आता सरकार आपल्या सेवा घरोघरी पोहोचवत नागरिकांच्या घराघरात पोहोचत आहे”

Posted On: 13 JUN 2023 11:52AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि विविध सरकारी विभाग तसेच संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 70,000 जणांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले.  देशभरातून निवडलेले कर्मचारी वित्तीय सेवा विभाग, टपाल विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, महसूल विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय, लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग आणि गृह मंत्रालयासह विविध विभागांमध्ये सरकारमध्ये रुजू होतील.   पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान देशभरातील 43 ठिकाणे मेळाव्याशी जोडली गेली होती.

राष्ट्रीय रोजगार मेळावा ही सध्याच्या सरकारची नवीन ओळख बनली आहे कारण आज 70,000 हून अधिक लोकांना नियुक्ती पत्रे दिली जात आहेत असे मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले. भाजपा आणि रालोआशासित राज्ये देखील अशाच प्रकारचे रोजगार मेळावे नियमितपणे आयोजित करत आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृत काळाची नुकतीच सुरुवात झाली आहे असे नमूद करून  मोदी म्हणाले की, जे सरकारी सेवेत सामील होत आहेत त्यांच्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे कारण त्यांना पुढील 25 वर्षांत भारताला विकसित देश बनवण्यात योगदान देण्याची संधी आहे.  "वर्तमानासह, देशाच्या भविष्यासाठी तुम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजेत", असे पंतप्रधान म्हणाले. नव्याने भरती झालेल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोदी यांनी यावेळी  अभिनंदन केले.


अर्थव्यवस्थेतील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली.  मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया यासारख्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला.  हे तरुण आता रोजगार निर्मिती करणारे होत आहेत असे ते  म्हणाले.  तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम अभूतपूर्व आहे.  एसएससी , यूपीएससी  आणि आरआरबी  सारख्या संस्था नवीन प्रणालींसह अधिक नोकऱ्या देत आहेत.  या संस्था भरती प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देत आहेत.  त्यांनी भरतीचा कालावधी 1-2 वर्षांवरून काही महिन्यांपर्यंत कमी केला आहे, असेही ते म्हणाले.


भारत आणि त्याच्या अर्थव्यवस्थेवर जगाचा विश्वास अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, “संपूर्ण जग आज भारताच्या विकासाच्या प्रवासात भागीदार होण्यास उत्सुक आहे”. आर्थिक मंदी, जागतिक महामारी आणि सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा साखळीतील व्यत्यय यासह आजच्या आव्हानांकडे त्यांनी लक्ष वेधले. अशा स्थितीत भारत आपली अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  उत्पादन आणि देशाच्या वाढत्या गंगाजळीच्या पार्श्वभूमीवर विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारताकडे मोहरा वळवल्याची उदाहरणे पंतप्रधानांनी दिली. देशात केलेल्या परदेशी गुंतवणुकीमुळे उत्पादन, विस्तार आणि नवीन उद्योग उभारणीला तसेच निर्यातीला चालना मिळते, त्यामुळे रोजगाराच्या संधींना जोमदार गती मिळते, असे मोदींनी स्पष्ट केले.

सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे खाजगी क्षेत्रात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, याकडे लक्ष वेधत  पंतप्रधानांनी वाहन उद्योग  क्षेत्राचे उदाहरण दिले. या क्षेत्राने  देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात  6.5 टक्क्यांहून अधिक योगदान दिले आहे.  विविध देशांमध्ये प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि तीनचाकी आणि दुचाकी वाहनांची निर्यात वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. दहा वर्षांपूर्वी 5 लाख कोटींचा असलेला वाहन  उद्योग आज 12 लाख कोटींहून अधिक आहे, अशी माहिती त्यांनी दिली. “इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विस्तार भारतातही होत आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन  योजना वाहन  उद्योगालाही साहाय्यकारी ठरत आहे.आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. अशा क्षेत्रांमुळे भारतातील लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

दशकभरापूर्वीच्या तुलनेत भारत  अधिक स्थिर, सुरक्षित आणि बलशाली  देश आहे, असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले.   राजकीय  घोटाळे आणि जनतेच्या निधीचा  गैरवापर ही  पूर्वीच्या काळातली सरकारची ओळख होती असे  सांगून त्यांनी  गतकाळाची आठवण करून दिली.  “आज, भारत त्याच्या राजकीय स्थिरतेसाठी ओळखला जातो जे आजच्या जगात अत्यंत महत्वाचे आहे. आज भारत सरकार हे निर्णायक सरकार म्हणून ओळखले जाते. आज सरकार प्रगतीशील आर्थिक आणि सामाजिक निर्णयांसाठी ओळखले जाते,” असे ते म्हणाले. जीवनमान  सुलभता, पायाभूत सुविधांची निर्मिती  आणि व्यवसाय सुलभता  यासंदर्भातल्या कामांचे कौतुक जागतिक संस्था करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताने भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी  केला. पंतप्रधानांनी सामाजिक पायाभूत सुविधांबद्दल बोलताना जल जीवन अभियानाच्या  माध्यमातून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित केली जात असल्याचे उदाहरण दिले. जलजीवन अभियानावर  सुमारे चार लाख कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली. या अभियानाची सुरुवात झाली तेव्हा  सरासरी100 ग्रामीण घरांपैकी 15घरांमध्ये  पाईपने पाणी होते, आता ही संख्या वाढून प्रत्येक 100 पैकी 62 वर पोहोचली  आहे आणि हे काम वेगाने सुरू आहे. आज देशात असे  130 जिल्हे आहेत जिथे  प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवण्याची सुविधा आहे. यामुळे वेळेची बचत होत आहे आणि अनेक जलजन्य आजारांपासून मुक्तता होत आहे. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्वच्छ पाण्यामुळे अतिसाराशी संबंधित सुमारे 4 लाख मृत्यू रोखले गेले आहेत आणि लोकांची  8 लाख कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बचत झाली, जी पाण्याचे व्यवस्थापन आणि रोगांवर उपचार करण्यासाठी खर्च करावी लागत असे. त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना  सरकारी योजनांचे बहुआयामी परिणाम  समजून घेण्यास सांगितले.

 भर्ती  प्रक्रियेतील घराणेशाहीचे राजकारण आणि वशिलेबाजीबाबतही पंतप्रधान बोलले.  पंतप्रधानांनी एका राज्यात उघडकीस आलेल्या ‘नोकऱ्यांसाठी पैसे मागण्याबाबतच्या ''कॅश फॉर जॉब'  घोटाळ्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले  आणि युवा वर्गाला अशा बाबींबद्दल सावध केले.  याबाबत समोर आलेले तपशील सांगत  उपहारगृहातील खाद्य दरपत्रिकेप्रमाणे  प्रत्येक नोकरीसाठी दरपत्रिका कशी तयार केली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.   देशाच्या तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी नोकरीच्या बदल्यात केलेले  भूसंपादन  ‘नोकऱ्यांसाठी जमीन’ या घोटाळ्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले आणि या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी सुरू असून न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले. 

घराणेशाहीचे राजकारण करणा-या आणि नोकरीच्या नावाखाली देशातील तरुणांची लूट करणाऱ्या  राजकीय पक्षांपासून  तरुणांना सावध राहिले पाहिजे, असा इशारा  पंतप्रधानांनी दिला. “एकीकडे  असे राजकीय पक्ष आहेत जे नोकरी देण्‍यासाठी तरूणांच्या हातामध्‍ये दरपत्रक (रेट कार्ड ) देतात, तर दुसरीकडे सध्याचे सरकार तरुणांचे भविष्य सुरक्षित करत आहे. आता देश ठरवेल की तरुणांचे भविष्य अशा दरपत्रकाने  चालवायचे की सर्व प्रकारची  सुरक्षितता देण्‍या-यांना चालवू द्यायचे ,  असे पंतप्रधान म्हणाले.

इतर राजकीय पक्ष भाषेच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर आपले सरकार भाषेला रोजगाराचे सशक्त माध्यम बनवत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नोकर भर्ती  परीक्षांसाठी मातृभाषेवर  भर दिल्याने तरुणांना फायदा होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी  सांगितले.

आजच्या वेगवान भारतामध्ये सरकारी यंत्रणा आणि सरकारी कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत झपाट्याने बदलत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. एकेकाळी देशातील सर्वसामान्य नागरिक सरकारी कार्यालयात जायचे,  आज  मात्र   सरकार आपल्या सेवा अगदी  नागरिकांच्या घरापर्यंत  पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात सरकारी कार्यालये आणि विभाग काम करत आहेत त्या भागातील जनतेच्या अपेक्षा आणि गरजा समजून घेण्याचे काम जनतेविषयी  संवेदनशील राहून केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी  मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून मिळणा-या डिजिटल सेवांचे उदाहरण दिले. यामुळे आता  सरकारी सुविधांचा लाभ घेणे सोपे झाले आहे आणि  सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली  सातत्याने बळकट केली जात आहे.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,  की ज्या उमेदवारांची भर्ती   झाली आहे, त्यांनी  देशातील जनतेविषयाी  पूर्ण संवेदनशीलता दाखवून  काम केले पाहिजे. “या सुधारणा तुम्हाला पुढे घेवून जायच्या आहेत.  त्याचबरोबर  या सगळ्यासह तुम्ही आपल्यामधील  शिकण्याची प्रवृत्ती कायम राखाल”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या पोर्टलने  अलीकडेच 1 दशलक्ष वापरकर्ता संख्या ओलांडली आहे अशा  ’आयगॉट’  या ऑनलाइन पोर्टलचा  त्यांनी उल्लेख  केला. याविषयी सांगताना त्यांनी युवकांना,  ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांचा पूर्ण लाभ घेण्याचे आवाहन केले. “अमृत काळातील आगामी 25 वर्षांच्या प्रवासात, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकत्रितपणे पुढे जाऊया”, असे  पंतप्रधानांनी समारोपप्रसंगी आवाहन केले.

पार्श्‍वभूमी –--

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजे  रोजगार मेळावा  आहे. रोजगार निर्मिती आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून  काम करेल अशी अपेक्षा आहे.

नव नियुक्त उमेदवारांना  आयगॉट कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल कर्मयोगी ‘प्रारंभ’द्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधीही  मिळत आहे.  या पोर्टलवर  400 हून अधिक ई-लर्निंग अभ्‍यासक्रम आहेत. हे सर्व अभ्‍यासक्रम  ‘कुठेही कोणत्याही साधनांवर’ ‘लर्निंग फॉरमॅट’ मध्‍ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

***

Sushama K/Vinayak/Sonali K/Suvarna/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931926) Visitor Counter : 163