पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी साधला जपानी मान्यवरांसोबत संवाद

Posted On: 20 MAY 2023 12:06PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर परिषदेसाठीच्या हिरोशिमा भेटीदरम्यान जपानी मान्यवर  टोमियो मिझोकामी आणि  हिरोको ताकायामा यांची भेट घेतली. या मान्यवरांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

टोमियो मिझोकामी, ओसाका विद्यापीठात  प्राध्यापक आहेत. प्रसिद्ध लेखक आणि भाषाशास्त्रज्ञही असून हिंदी आणि पंजाबी भाषांमध्ये ते निपुण आहेत. परराष्ट्र अभ्यास हा त्यांच्या अध्यापनाचा विषय आहे.  जपानमध्ये भारतीय साहित्य आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  त्यांचे "ज्वालामुखी" हे पुस्तक प्रसिद्ध आहे - जपानमध्ये हिंदी शिक्षणाचा पाया घातलेल्या 1980 च्या दशकातील जपानी विद्वानांनी  लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे हे संकलन आहे. 

हिरोशिमा येथे जन्मलेल्या हिरोको ताकायामा या पाश्चात्य शैलीतील चित्रकार आहेत. भारतासोबत दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या त्यांच्या दृढ संबंधाचा त्यांच्या कलाकृतींवर  खूप प्रभाव आहे.  त्यांनी भारतात अनेक कार्यशाळा आणि प्रदर्शने आयोजित केली आहेत.  विश्व भारती विद्यापीठ, शांती निकेतन येथे काही काळ त्या अतिथी प्राध्यापकही होत्या. ताकायामा यांनी  यावेळी पंतप्रधानांना त्यांच्या प्रमुख कामांपैकी असलेले - 2022 मध्ये तयार केलेले भगवान बुद्धांचे तैलचित्र भेट दिले.

अशा संवादांमुळे परस्पर सामंजस्य, आदर वाढतो आणि उभय देशांमधे मजबूत बंध निर्माण होतात असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी संबंध अधिक दृढ करण्याचा मार्ग मोकळा करणार्‍या अशा समृद्ध देवाणघेवाणीसाठी अशा आणखी संधी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


*******


Jaydevi PS/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1925814) Visitor Counter : 154