Posted On:
11 FEB 2023 10:14AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 फेब्रुवारीला राजस्थान आणि 13 फेब्रुवारीला कर्नाटकचा दौरा करणार आहेत.
पंतप्रधान 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता दौसा इथे 18,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि ते राष्ट्राला समर्पित करतील.
पंतप्रधान 13 फेब्रुवारी रोजी, सकाळी 9:30 वाजता, बंगळुरूमधील येलाहंका येथील वायुसेना तळ येथे चौदाव्या एरो इंडिया 2023 चे उद्घाटन करतील.
पंतप्रधानांचा दौसा दौरा
नवीन भारतातील वृद्धी, विकास आणि संपर्क व्यवस्थेचे इंजिन म्हणून उत्कृष्ट रस्ते पायाभूत सुविधांच्या उभारणीवर पंतप्रधानांचा भर असून ते देशभरात सुरू असलेल्या अनेक जागतिक दर्जाच्या द्रुतगती मार्गांच्या बांधकामामुळे साकार होत आहे. असाच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग. त्याचा पूर्ण झालेला, दिल्ली – दौसा – लालसोट हा पहिला टप्पा पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील.
दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाचा 246 किमीचा दिल्ली – दौसा – लालसोट विभाग 12,150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला आहे. या विभागाच्या कार्यान्वयनामुळे दिल्ली ते जयपूर प्रवासाचा कालावधी 5 तासांवरून सुमारे साडेतीन तास इतका कमी होईल आणि संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.
दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल. त्याची लांबी 1,386 किमी आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे अंतर 12 टक्क्यांनी घटून 1,424 किमी वरून 1,242 किमी पर्यंत कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी घटून 24 तासांवरून 12 तासांपर्यंत कमी होईल. हा द्रुतगती मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाईल तसेच कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना जोडेल. तो पंतप्रधान गतीशक्ती बृहद आराखड्यातील 93 आर्थिक केन्द्र, 13 बंदरे, 8 प्रमुख विमानतळ आणि 8 बहुआयामी दळणवळण पार्क यांना सुविधा प्रदान करेल. तसेच जेवर विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदर यासह नवीन आगामी ग्रीनफिल्ड विमानतळांना देखील याचा फायदा होईल. द्रुतगती मार्गाच्या सर्व लगतच्या प्रदेशांच्या विकासाच्या मार्गावर सकारात्मक प्रभाव पडेल, त्यामुळे देशाच्या आर्थिक परिवर्तनास मोठा हातभार लागेल.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 5940 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 247 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये बांदीकुई ते जयपूर हा 67 किमी लांबीचा चार पदरी रस्ता 2000 कोटींहून अधिक खर्चून विकसित केला जाणार आहे, कोटपुतली ते बाराडोनियो हा सहा पदरी रस्ता सुमारे 3775 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे. आणि लालसोट-करोली विभागाचे दोन-पदरी पक्के सांधेमार्ग, सुमारे 150 कोटी रुपये खर्चून विकसित केले जात आहेत.
पंतप्रधानांचा बेंगळुरू दौरा
पंतप्रधान, येलाहंका इथल्या वायुसेना तळावर चौदाव्या एअरो इंडीया 2023 चे उद्घाटन करतील. "एक अब्ज संधींची धावपट्टी' ही यंदाच्या एरो इंडिया 2023 ची संकल्पना आहे.
‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून, हा कार्यक्रम स्वदेशी उपकरणे/तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यावर आणि परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करण्यावर भर देईल. भारतीय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरील पंतप्रधानांचा भर देखील प्रदर्शित केला जाईल. या कार्यक्रमात देशाची डिझाईन क्षेत्रातील प्रगती, युएव्ही क्षेत्रातील वाढ, संरक्षण अंतराळ आणि भविष्यातील तंत्रज्ञान आदी संदर्भातील कार्यक्रम प्रदर्शित केले जातील. या माध्यमातून लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए)-तेजस, एचटीटी-40, डॉर्नियर लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयुएच), लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आणि ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) सारख्या स्वदेशी हवाई संबंधित निर्यातीला प्रोत्साहन दिले जाईल. जागतिक पुरवठा साखळीमध्ये देशांतर्गत एमएसएमई आणि स्टार्ट-अप्सना एकत्रित करण्यात आणि सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी भागीदारीसह परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यातही या कार्यक्रमामुळे मदत होईल.
एरो इंडिया 2023 मध्ये 80 हून अधिक देशांचा सहभाग असेल. एरो इंडिया 2023 मध्ये सुमारे 30 देशांचे मंत्री आणि जागतिक आणि भारतीय ओईएमचे 65 मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे.
एरो इंडिया 2023 प्रदर्शनात सुमारे 100 परदेशी आणि 700 भारतीय कंपन्यांसह 800 हून अधिक संरक्षण कंपन्यांचा सहभाग असेल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या भारतीय कंपन्यांमध्ये एमएसएमई आणि स्टार्ट-अप यांचा समावेश आहे. विशिष्ट तंत्रज्ञानाची प्रगती, एरोस्पेसमधील वाढ आणि देशातील संरक्षण क्षमता यांचे ते प्रदर्शन करतील. एअरो इंडीया 2023 मधील प्रमुख प्रदर्शकांमध्ये एयरबस, बोइंग, डसॉल्ट एविएशन, लॉकहीड मार्टिन, इस्त्राईल एयरोस्पेस इंडस्ट्री, ब्रह्मोस एयरोस्पेस, आर्मी एविएशन, एचसी रोबोटिक्स, एसएएबी, सफरान, रोल्स रॉयस, लार्सन एंड टुब्रो, भारत फोर्ज ए लिमिटेड (लाइगर, भारत) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आणि बीईएमएल लिमिटेड यांचा समावेश आहे.
***
S.Tupe/V.Ghode/P.Kor