गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी हरियाणातील सूरजकुंड येथे दोन दिवसीय ‘चिंतन शिबिराला’ संबोधित केले

Posted On: 27 OCT 2022 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज हरियाणा मध्ये सूरजकुंड इथे आयोजित दोन दिवसीय ‘चिंतन शिबिराच्या’ पहिल्या दिवशी उपस्थितांना संबोधित केले. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, गृह मंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि प्रशासक या  चिंतन शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन हे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले असून, ते सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा प्रसार आणि सीमा-पार दहशतवाद यासारख्या देशापुढील आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध करेल. ते म्हणाले की आज गुन्हेगारीचं स्वरूप बदलत आहे आणि त्यांना सीमेचं बंधन राहिलं नाही, म्हणूनच सर्व राज्यांना सामायिक धोरण आखून त्यांचा सामना करावा लागेल. हे सामायिक धोरण आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘सहकारी संघराज्यवाद’, ‘संपूर्ण सरकार’ आणि ‘टीम इंडिया’ या दृष्टीकोनातून 3C ना प्रोत्साहन देत आहे, ते म्हणजे, केंद्र आणि राज्यांमधील सहकार्य (Cooperation), समन्वय (Coordination) आणि सहयोग (Collaboration) हे आहेत.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेले प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच ईशान्येकडील भाग, जे एकेकाळी हिंसाचार आणि अशांततेची केंद्र (हॉट स्पॉट) होती, तीच आता विकासाची केंद्र बनत आहेत. ते म्हणाले की, 2014 पासून गेल्या आठ वर्षांत ईशान्येकडेच्या राज्यांमध्ये सुरक्षेच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून, त्या ठिकाणी बंडखोरीच्या घटनांमध्ये 74 टक्के घट झाली आहे, सुरक्षा दलांमधील मृत्यूमध्ये 60 टक्के आणि नागरिकांच्या मृत्यूमध्ये सुमारे 90 टक्के घट झाली आहे.

ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवाद विरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबले आहे आणि दहशतवादा विरोधात निर्णायक विजय मिळवण्यासाठी एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) आणि अन्य संस्थांचे बळकटीकरण केले जात आहे. शाह यांनी सांगितले की 2024 पूर्वी सर्व राज्यांमध्ये एनआयएच्या शाखा स्थापन करून दहशतवादविरोधी जाळे उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शाह म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत निर्णायक विजय मिळवण्यासाठी, कायद्याची चौकट मजबूत केली जात आहे, ज्या अंतर्गत, एनआयए आणि युएपीए कायद्यात सुधारणा करून, ‘वैयक्तिक दहशतवादी’ घोषित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री  अमित शाह म्हणाले की, आज देशाला आणि संपूर्ण जगाला सायबर-गुन्ह्यांमुळे मोठा धोका निर्माण आहे आणि गृह मंत्रालय त्याविरुद्ध लढण्यासाठी सज्ज आहे. ते म्हणाले की, गृह मंत्रालय सीआरपीसी, आपीसी  आणि एफसीआरए यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्‍यासाठी निरंतर काम करत आहे आणि  लवकरच त्यांची सुधारित ‘ब्लू प्रिंट’  संसदेच्या पटलावर मांडण्‍यात येईल. शाह यावेळी  म्हणाले की, राज्यांनी आरोप सिद्ध करण्‍याचे प्रमाण वाढवण्यासाठी न्यायवैद्यक शास्त्राचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि केंद्र सरकारने एनएफएसयू स्थापन करून सर्वतोपरी मदत केली आहे. सीमा सुरक्षा आणि किनारपट्टी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमावर्ती राज्यांनाही केंद्रीय दले आणि सुरक्षा दलांसोबत अधिक चांगला समन्वय साधण्‍याचे प्रयत्न करावे लागतील यावर  त्यांनी भर दिला.

देशासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी  अंतर्गत सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या  स्त्रोतांचा योग्य वापर करण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. ते म्हणाले, यासाठी स्त्रोतांचा कमाल आणि तर्कसंगत वापर  आणि स्तोतांचे  एकत्रीकरण करणे आवश्यक आहे.  यामुळे  राज्यांमध्‍ये अधिक समन्वय निर्माण होईल. शाह म्हणाले की, सरकार "एक डेटा, एक एंट्री" या तत्त्वावर काम करत आहे आणि या अंतर्गत, एनआयएला दहशतवादी प्रकरणांशी संबंधित राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्‍याचे काम दिले आहे.  एनसीबीकडे  अंमली पदार्थांच्या प्रकरणांशी संबंधित राष्ट्रीय डेटाबेस आहे, ईडीकडे आर्थिक गुन्हे  संबंधित डेटाबेस आहे आणि एनसीआरबीकडे  तसेच फिंगरप्रिंट डेटाबेस  -  एनएएफआयएस  आणि ‘नॅशनल डेटाबेस ऑफ सेक्स ऑफेंडर्स’  (एनडीएसओ) ची जबाबदारी देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  म्हणाले,  देशाच्या विकासासाठी, स्थैर्यासाठी आणि सुशासनासाठी अंतर्गत सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही  आपल्या सर्वांची समान जबाबदारी आहे.  ते म्हणाले, राष्ट्र उभारणीत केंद्र आणि राज्य यांची समान जबाबदारी आहे. सर्व यंत्रणांमध्ये चांगले, मजबूत सहकार्य असेल त्याचवेळी  देशाची  प्रगती होऊ  शकते. अमृतकाळात सहकारी संघराज्यवादाची भावना हीच आपली प्रेरक शक्ती असायला हवी, असे सांगून; अशा प्रकारच्या  चिंतन शिबिरामुळे प्रादेशिक सहकार्याचा आणखी विस्तार होईल, असा विश्वास गृहमंत्री शाह यांनी व्यक्त केला.

 

* * *

S.Kane/Rajshree/Suvarna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1871376) Visitor Counter : 205