पंतप्रधान कार्यालय

श्री विजय वल्लभ सुरेश्वरजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दूरदृष्‍य प्रणालीद्वारे संबोधन

Posted On: 26 OCT 2022 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2022

"अपरिग्रह म्हणजे केवळ संन्यास-सर्वसंगपरित्यागच नाही, तर सर्व प्रकारच्या आसक्तींवर नियंत्रण ठेवणं होय"

"'स्टॅच्यू ऑफ पीस' आणि 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हे केवळ उंच पुतळे नाहीत, तर ते एक भारत, श्रेष्ठ भारताची महान प्रतीकं आहेत"

"एखाद्या देशाची भरभराट ही त्याच्या आर्थिक समृद्धीवर अवलंबून असते आणि स्वदेशी उत्पादनं वापरुन आपण भारताची कला-संस्कृती अबाधित राखू शकतो, नागरी व्यवस्था बळकट करु शकतो"

"स्वदेशी आणि स्वावलंबनाचा संदेश स्वातंत्र्याच्या अमृत काळासाठी अत्यंत समर्पक आहे"

"स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहोत"

"नागरी कर्तव्यं सक्षमतेनं पार पाडण्यासाठी संतांचं मार्गदर्शन नेहमीच महत्त्वाचं असतं"

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री विजय वल्लभ सुरीश्‍वरजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त उपस्थितांना दूरदृष्‍य प्रणाली द्वारे संबोधित केलं.

या मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतीय संत परंपरेतले सर्व संत  आणि जगभरातील जैन धर्मियांसमोर नतमस्तक होत वंदन केलं.  असंख्य संतांचा सहवास लाभण्याची आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाल्याबद्दल  मोदींनी आनंद व्यक्त केला.  वडोदरा आणि छोटा उदयपूरच्या कानवट गावात संतवाणी ऐकण्याची संधी मिळत असे तो गुजरातमधला काळ आठवत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्‍वरजी यांच्या 150 व्या जयंती उत्सवाच्या आरंभाचं स्मरण करून पंतप्रधानांनी आचार्यजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं सद्भाग्य  आपल्याला लाभल्याचं  नम्रपणे सांगितलं.  “संतसज्जनहो, आज पुन्हा एकदा मी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं (दूरदृष्‍य प्रणाली) तुमच्यात  उपस्थित आहे”, असं ते म्हणाले. आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्‍वर महाराज साहेब यांचं  जीवन विषयक तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव-मार्गक्रमणा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं, आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्‍वरजी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणं आज जारी करण्यात आलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान पुढे असंही म्हणाले की, दोन वर्षं साजऱ्या होत असलेल्या या उत्सवाचा आता समारोप होत आहे आणि श्रद्धा, अध्यात्म, देशभक्ती तसच राष्ट्र सामर्थ्य वाढवण्यासाठी सुरू केलेली ही मोहीम अत्यंत प्रशंसनीय आहे.

जगाच्या सध्याच्या भूराजकीय स्थितीचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, "आज युद्धाचे संकट, दहशतवाद आणि हिंसा जगाच्या अनुभवास येत आहे. आणि या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा तसेच धैर्य याचा शोध जग घेत आहे."

या अशा परिस्थितीत भारतातील पुरातन परंपरा आणि तत्त्वज्ञान तसेच आधुनिक भारताची शक्ती यांचा मेळ ही जगासाठीची मोठी आशा आहे. असे मोदींनी अधोरेखित केले. आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वर यांनी दाखवलेला मार्ग आणि जैन गुरूंची शिकवण ही सध्याच्या जागतिक संकटावर एक उत्तर आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

"आचार्यजींनी अहिंसा, एकांतवास आणि त्याग यांनी समृद्ध जीवन व्यतीत केले. तसेच या कल्पनांवर आपल्या लोकांचा विश्वास वाढीला लागावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले", असे मोदी म्हणाले आचार्यजींचा शांती आणि सुसंवादासाठीचा आग्रह हा फाळणीच्या भयकारी वातावरणातही स्वच्छपणे उमजत होता. असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यामुळेच आचार्यांना चातुर्मासाचा उपवासही मोडावा लागला होता. पंतप्रधानांनी त्याचप्रमाणे महात्मा गांधींचाही उल्लेख केला ‌. महात्मा गांधींनी वातंत्र्य चळवळीत आचार्यांनी निर्माण केलेला अपरिग्रहाचा मार्ग स्वीकारला. "अपरिग्रह म्हणजेच फक्त त्याग नाही तर सर्व प्रकारच्या आसक्ती ताब्यात ठेवणे होय", असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी गचाधिपती जैनाचार्य विजय नित्यानंद सुरेश्वरजी यांनी केलेल्या उल्लेखाचा उच्चार करून पंतप्रधान म्हणाले, गुजरातने देशाला दोन वल्लभ दिले.

योगायोग म्हणजे आज आचार्यजींचा दीडशेवा जयंती सोहळा आहे आणि काही दिवसानी आपण सरदार पटेल यांची जयंतीसुद्धा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करणार आहोत. स्टॅच्यू ऑफ पीस हा संतांच्या सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

"हे पुतळे फक्त उंचच नाहीत तर ती एक भारत श्रेष्ठ भारताची सर्वोत्कृष्ट प्रतीकं आहेत.", असे मोदी म्हणाले.

दोन्ही वल्लभांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की सरदार साहेबांनी वेगवेगळ्या संस्थानांमध्ये विभागलेल्या भारताला एकत्रित ठेवले तर आचार्यजींनी देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करून देशाची एकात्मता ,अखंडता आणि परंपरा मजबूत केली.

धार्मिक परंपरा आणि स्वदेशी उत्पादनांचा एकाच वेळी कशा प्रकारे प्रचार करता येईल यावर प्रकाश टाकून पंतप्रधानांनी आचार्यजींना उद्धृत केले आणि ते म्हणाले, “देशाची समृद्धी ही त्याच्या आर्थिक समृद्धीवर अवलंबून असते आणि स्वदेशी उत्पादनांचा अवलंब करून कोणीही भारताची कला, संस्कृती आणि सभ्यता जिवंत ठेवू शकतो.  त्यांनी पुढे सांगितले की, आचार्यजी नेहमी पांढरे कपडे वापरत असायचे आणि  ते नेहमी खादीचे बनलेले असायचे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात स्वदेशी आणि स्वावलंबनाचा हा संदेश अत्यंत समर्पक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, “हा आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीचा मंत्र आहे. त्यामुळे आचार्य विजय वल्लभ सुरीश्‍वरजींपासून ते सध्याचे गचाधिपती आचार्य श्री नित्यानंद सुरीश्‍वर जी यांच्यापर्यंत हा मार्ग दृढ झाला आहे, तो आपल्याला आणखी बळकट करायचा आहे.

समाजकल्याण, मानवसेवा, शिक्षण आणि जनचेतना या आचार्यांनी भूतकाळात विकसित केलेल्या समृद्ध परंपरांचा विस्तार होत राहायला हवा, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. "आझादी का अमृतकाल अर्थात स्वातंत्र्याच्या अमृतकाळात, आपण विकसित भारताच्या निर्मितीकडे वाटचाल करत आहोत.", असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले आणि पुढे म्हणाले की, "यासाठी देशाने पाच प्रतिज्ञा घेतल्या आहेत आणि हे 'पाच प्रण' पूर्ण करण्यासाठी संतांची भूमिका अग्रेसर राहील.” नागरी कर्तव्ये सक्षम करण्यासाठी संतांचे मार्गदर्शन नेहमीच महत्त्वाचे असते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी ‘वोकल फॉर लोकल’ च्या प्रचारात आचार्यांच्या भूमिकेवर जोर दिला आणि त्यांच्याकडून ही देशाची मोठी सेवा असेल अशी टिप्पणी केली. "तुमचे बहुतेक अनुयायी व्यवसायाशी संबंधित आहेत," असे सांगून पंतप्रधानांनी आवाहन केले की, त्यांनी केवळ भारतात बनवलेल्या वस्तूंचा व्यापार करण्याचे व्रत घ्यावे आणि म्हणाले की,महाराज साहेबांना ही एक मोठी आदरांजली ठरेल. "आचार्य श्रींनी आम्हाला प्रगतीचा हा मार्ग दाखवला आहे आणि आम्ही भविष्यासाठी त्याचे सदैव पालन करत राहू", असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

श्री विजय वल्लभ सुरीश्‍वरजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

 

* * *

S.Patil/Ashutosh/Vijaya/Vikas/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871107) Visitor Counter : 176