पंतप्रधान कार्यालय
दिवाळीनिमित्त जवानांशी संवाद साधतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
24 OCT 2022 11:23PM by PIB Mumbai
भारत माता चिरायू हो!
भारत माता चिरायू हो!
पराक्रम आणि शौर्याने भिजलेल्या कारगिलच्या या मातीसमोर नतमस्तक होण्याची भावना मला माझ्या शूर मुला-मुलींमध्ये पुन्हा पुन्हा खेचून घेऊन येते. माझ्यासाठी, तुम्हीच वर्षानुवर्षे माझं कुटुंब आहात. माझ्या दिवाळीचा गोडवा तुमच्यामध्ये आणखी वाढतो, माझ्या दिवाळीचा प्रकाश तुमच्यामध्ये आहे आणि हा प्रकाश पुढच्या दिवाळीपर्यंत माझा मार्ग प्रशस्त करतो. माझा दिवाळीचा आनंद तुमच्या सानिध्यातच आहे, माझा उत्साह तुमच्या सोबतच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीमेवर तुमच्या भेटीला येऊन दिवाळी साजरी करण्याची संधी मला मिळत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. एकीकडे देशाची सार्वभौम सीमा आणि दुसरीकडे समर्पित सैनिक! एकीकडे मातृभूमीची प्रेमळ माती आणि दुसरीकडे चंदनाची माळ कपाळाला लावणाऱ्या माझ्या तमाम तरुण साथीदारांनो, शूर वीरांनो! यापेक्षा चांगली दिवाळी माझ्या नशिबात कुठे मिळाली असती? आम्हा सामान्य नागरिकांची दिवाळी, आमचे फटाके आणि तुमचे फटाके यांची तुलनाच होऊ शकत नाही. तुमचे फटाके पण वेगळे आहेत आणि तुमचे स्फोट देखील वेगळे आहेत.
मित्रांनो,
शौर्याच्या गाथांबरोबरच आपली परंपरा गोडीची आणि गोडव्याचीही आहे. म्हणूनच भारत आपले सण प्रेमाने साजरे करतो, संपूर्ण जगाला त्यात सहभागी करून साजरे करतो. आज कारगिलच्या या विजय भूमीवरून, तुम्हा सर्व जवानांकडून, मी सर्व देशवासियांना आणि संपूर्ण जगाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पाकिस्तानशी अशी एकही लढाई झालेली नाही जिथे कारगिलने विजयाचा झेंडा फडकवला नसेल. आजच्या जागतिक परिस्थितीत हा प्रकाशोत्सव संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवो, हीच भारताची इच्छा आहे.
मित्रांनो,
दिवाळी म्हणजे दहशतवाद संपवणारा उत्सव! दहशतवाद संपल्याचा उत्सव! कारगिलनेही तेच केले. कारगिलमध्ये आपल्या सैन्याने दहशतवादरूपी नागाचा फणा चिरडला आणि देशात विजयाची अशी दिवाळी साजरी केली गेली, अशी साजरी केली गेली की आजही लोकांना ती दिवाळी आठवते. हे माझे भाग्य आहे, की त्या विजयाचा मी साक्षीदार सुद्धा होतो आणि ते युद्ध मी जवळून पाहिले सुद्धा होते. मी आमच्या अधिकार्यांचं आभार व्यक्त करतो की मी येथे येताच, मला तुमच्यासोबत घालवलेली माझी अनेक वर्षे जुनी छायाचित्रे दाखवली गेली.जेव्हा मी ती छायाचित्रे पाहत होतो,तेंव्हाचे ते क्षण माझ्यासाठी खूप भावूक होते.
मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला माझ्या शूर सैनिकांच्या मध्ये घालवलेल्या क्षणांची पुन्हा आठवण करून दिली. मी तुमचा खूप आभारी आहे,कारण कारगिल युद्धात जेव्हा आमचे जवान शत्रूला चोख प्रत्युत्तर देत होते, तेव्हा मला त्यांच्यामध्ये असण्याचा बहुमान मिळाला होता. देशाचा एक सामान्य नागरिक म्हणून माझ्या कर्तव्याच्या मार्गाने मला या रणांगणावर खेचून आणले होते. देशाने आपल्या सैनिकांच्या सेवेसाठी जी काही छोटी-मोठी सहायता सामग्री पाठवली होती, आम्ही ते घेऊन इथे आलो होतो.आम्ही फक्त त्यामार्फत पुण्य कमवत होतो,कारण माझ्यासाठी तो क्षण देव भक्तीचा होता, तो क्षण माझ्यासाठी तुमच्या पूजेचा क्षण होता. देशभक्तीच्या रंगांनी रंगलेले असे ते क्षण होते. त्यावेळच्या अशा अनेक आठवणी आहेत, ज्या मी कधीच विसरू शकत नाही. असं वाटायचं की चारही दिशांना विजयाचा जयघोष आहे, जयघोष आहे, जयघोष आहे. प्रत्येक मनाची हाक होती - मन समर्पित , तन समर्पित आणि हे जीवन समर्पित. देशाच्या भूमीला आणखी काहीतरी वेगळं द्यावं असं खूप वाटतं !
मित्रांनो,
आपण ज्या राष्ट्राची पूजा करतो, तो आपला भारत हा केवळ भौगोलिक भूखंड नाही. आपला भारत एक जिवंत अस्तित्व आहे, एक शाश्वत चेतना आहे, एक चिरंतन अस्तित्व आहे. भारत म्हटल्यावर शाश्वत संस्कृतीचे एक चित्र समोर येते. भारत म्हटल्यावर शौर्याचा वारसा आपल्यासमोर उभा राहतो. भारत म्हटल्यावर पराक्रमाची परंपरा आपल्यासमोर उजळून निघते. हा असा न थांबणारा प्रवाह आहे, जो एका बाजूला गगनचुंबी हिमालयातून बाहेर पडतो आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागरात विलीन होतो. भूतकाळात अनंत ज्वाळा उठल्या, त्यामुळे जगातील अनेक जिवंत संस्कृती ओसाड झाल्या, पण भारताच्या अस्तित्वाचा हा सांस्कृतिक प्रवाह आजही अखंड, अमर आहे. आणि माझ्या जवानांनो, एक राष्ट्र कधी अमर होते? राष्ट्र तेंव्हा अमर होते जेव्हा तिची शूर मुलं आणि मुलींचा त्यांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या संसाधनांवर पूर्ण विश्वास असतो. एखादे राष्ट्र अमर असते जेव्हा त्यांच्या सैनिकांचे मस्तक हिमालयाच्या शिखरांइतके उंच असते. एखादे राष्ट्र अमर असते जेव्हा त्याच्या संततीबद्दल असे म्हणता येते की-
चलन्तु गिरायः काम युगांत पवनहताह. कृचेरपि न चालत्येव धीरणं निश्चलं मनः ॥
म्हणजे प्रलयकाळाच्या वादळांनी मोठे पर्वत उखडले जातील, पण तुमच्यासारख्या धैर्यशील आणि शूरांची मने खंबीर, अटल आणि स्थिर असतात. म्हणून, तुमच्या शस्त्रास्त्रांची शक्ती हिमालयातील अजिंक्य उंची मोजते. तुमचे मनस्वी मन वाळवंटातील अडचणींना यशाने सामोरे जाते. अनंत आकाश आणि अमर्याद समुद्र तुमच्या असीम शौर्यापुढे गुडघे टेकतो. कारगिलचे कुरुक्षेत्र भारतीय लष्कराच्या या पराक्रमाचे सशक्त साक्षीदार ठरले आहे. हे द्रास, हे बटालिक आणि हे टायगर हिल, हे साक्षी आहेत पर्वतांच्या उंचीवर बसलेला शत्रूही भारतीय सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमासमोर कसा खुजा ठरतो याचं. ज्या देशाच्या सैनिकांचे शौर्य एवढे अनंत आहे, त्या राष्ट्राचे अस्तित्व अमर आणि अपरिवर्तनीयच असते.
मित्रहो,
आपण सर्वजण, सीमांचे आपले पहारेदार, देशाच्या रक्षणाचे बळकट खांब आहात. आपण आहात म्हणूनच देशवासी, देशात निश्चिंत असतात. प्रत्येक भारतवासीयासाठी ही आनंदाची बाब आहे की देशाच्या सुरक्षा कवचाला पूर्णत्व देण्यासाठी प्रत्येक भारतवासी संपूर्ण ताकद लावत आहे. देश तेव्हाच सुरक्षित होतो जेव्हा सीमा सुरक्षित असतात,अर्थव्यवस्था सशक्त असेल आणि समाज आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल.आपणही आज सीमेवर देशाच्या सामर्थ्याच्या बातम्या ऐकता तेव्हा आपला उत्साह द्विगुणित होत असेल.जेव्हा देशाचे लोक स्वच्छता अभियानात सहभागी होतात,गरिबातल्या गरिबाला स्वतः चे पक्के घर, पिण्याचे पाणी,वीज - गॅस यासारख्या सुविधा विक्रमी वेळात प्राप्त होतात तेव्हा प्रत्येक जवानालाही अभिमान वाटतो. दूर वर त्याच्या घरात, त्याच्या गावात,त्याच्या शहरात सुविधा पोहोचतात तेव्हा सीमेवर त्याचीही मान अभिमानाने उंचावते,तोही सुखावतो. कनेक्टिव्हिटी उत्तम होत असल्याचे जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला घरच्यांशी संवाद साधणे सोपे होते आणि सुट्टीत घरी पोहोचणेही सुलभ होते.
मित्रहो,
जेव्हा 7- 8 वर्षातच देशाची अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर पोहोचते तेव्हा आपली मानही अभिमानाने ताठ होते हे मी जाणतो. जेव्हा एका बाजूला आपल्यासारखे युवक सीमांचे रक्षण करतात आणि दुसरीकडे आपलेच युवा मित्र 80 हजारपेक्षा अधिक स्टार्ट अप उभारतात, नव नवे शोध लावतात तेव्हा आपला आनंद द्विगुणित होतो.दोन दिवसापूर्वीच इस्रोने ब्रॉड बँड इंटरनेट विस्तारणारे 36 उपग्रह, एकाच वेळी प्रक्षेपित करून नवा विक्रम केला आहे.अंतराळ क्षेत्रात भारत आपला ठसा उमटवत असताना अभिमानाने ज्याचा उर भरून येणार नाही असा कोणता वीर जवान असेल.काही महिन्यांपूर्वी युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले तेव्हा आपला प्रिय तिरंगा, तिथे अडकलेल्या भारतीयांचे सुरक्षा कवच कसा ठरला हे आपण सर्वांनी पाहिले.जगभरात आज ज्या प्रकारे भारताचा मान-सन्मान वाढला आहे, जागतिक पटलावर भारताचा वाढता दबदबा आज आपणा सर्वांसमोर आहे.
मित्रानो,
आज हे सर्व घडत आहे कारण भारताने आपल्या बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शत्रूंविरोधात यशस्वी आघाडी उघडली आहे. आपण सीमेवर ढाल बनून उभे आहात, तर देशामधल्या अंतर्गत शत्रूंविरोधात कठोरातली कठोर कारवाई होत आहे. दहशतवाद,नक्षलवाद,कट्टरतावाद या सर्वांची मागील काही दशकांमध्ये फोफावलेली मुळे उखडून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न देश निरंतर करत आहे. मागील काळात देशाचा मोठा भाग नक्षलवादाने ग्रस्त होता. मात्र आज त्याची व्याप्ती सातत्याने कमी होऊ लागली आहे. आज देश भ्रष्टाचाराविरोधात निर्णायक युद्ध करत आहे. भ्रष्टाचारी कितीही ताकदवान असला तरी आता तो कायद्यापासून पळू शकणार नाही. कुशासनाने दीर्घ काळ देशाचे सामर्थ्य सीमित ठेवले, आपल्या विकासाच्या वाटेत अडथळे आणले होते. आज सबका, साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र घेऊन आम्ही या जुन्या त्रुटी झपाट्याने दूर करत आहोत.राष्ट्रहितासाठी मोठे-मोठे निर्णय झपाट्याने घेण्यात येत आहेत,वेगाने अमलात आणले जात आहेत.
मित्रहो,
झपाट्याने बदलणाऱ्या या काळात, तंत्रज्ञानाच्या या युगात भविष्यातल्या युद्धाचे स्वरूप बदलत चालले आहे.नव्या काळातली नवी आव्हाने, नव्या पद्धती आणि राष्ट्राच्या संरक्षण विषयक बदलत्या गरजांनुसार आज आम्ही देशाचे सैन्य सामर्थ्य सज्ज करत आहोत. लष्करात दशकांपासून आवश्यक असलेल्या मोठ्या सुधारणा आज आम्ही वास्तवात आणत आहोत. आपल्या सैन्यदलांमध्ये उत्तम ताळमेळ राहावा,प्रत्येक आव्हानाविरोधात आपण वेगाने आणि त्वरित कारवाई करू शकू यासाठी सर्वतोपरी पाऊले उचलण्यात येत आहेत. यासाठी सीडीएस सारखे पद निर्माण करण्यात आले आहे. सीमांवर आधुनिक पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे, ज्यायोगे आपणासारख्या आमच्या मित्रांना आपले कर्तव्य बजावताना अधिक सुलभ राहावे. आज देशात अनेक सैनिकी शाळा उघडण्यात येत आहेत.सैनिकी शाळा, सैनिकी प्रशिक्षण संस्था मुलींसाठीही खुल्या करण्यात आल्या आहेत आणि मला अभिमान आहे , आत्ता समोर अनेक कन्या मला दिसत आहेत. भारताच्या सैन्यात मुली आल्याने आपल्या सामर्थ्यात वाढ होईल हा विश्वास आहे. आपले सामर्थ्य वृद्धिगत होणार आहे.
मित्रहो,
देशाच्या सुरक्षेसंदर्भातला सर्वात महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे आत्मनिर्भर भारत, भारतीय सैन्याकडे आधुनिक स्वदेशी शस्त्रास्त्रे.परदेशी शस्त्रास्त्रे, परदेशी प्रणालीवरचे आपले अवलंबित्व कमीत कमी रहावे यासाठी देशाच्या तिन्ही सैन्यदलांनी आत्मनिर्भरतेचा संकल्प घेतला आहे. आपल्या तिन्ही सैन्यदलांनी, निर्धार केला आहे की संरक्षण विषयक 400 पेक्षा अधिक बाबी आता परदेशातून खरेदी केल्या जाणार नाहीत. आता ही 400 शस्त्रात्रे भारतातच तयार होतील, भारताचे 400 प्रकारचे सामर्थ्य वाढवतील. याचा एक आणखी सर्वात मोठा फायदा होईल. जेव्हा भारताचे जवान, आपल्याच देशात उत्पादित झालेल्या शस्त्रास्त्रासह लढेल तेव्हा त्याचा विश्वास सर्वोच्च पातळीवर असेल. त्याच्या हल्यात शत्रूला चकित करणारे आणि शत्रूचे मनोबल खच्ची करणारे सामर्थ्य असेल. आज आपली सैन्यदले मेड इन इंडिया शस्त्रास्त्रांचा जास्तीत जास्त वापर करत आहेत त्याच बरोबर सामान्य जनताही स्थानिक वस्तूंसाठी आग्रही होऊ लागली आहे आणि स्थानिक उत्पादने जागतिक व्हावीत या दिशेने प्रयत्न करू लागली आहे याचा मला आनंद आहे.
मित्रांनो,
आज ब्रह्मोस सुपर सॉनिक क्षेपणास्त्रापासून ते ‘प्रचंड’ या हलक्या वजनाच्या लढावू हेलिकॉप्टर्स आणि तेजस लढावू विमानांसह संरक्षण विषयक उपकरणे, भारताच्या सामर्थ्याची पर्यायी ओळख ठरले आहेत. आज भारताकडे, विशाल समुद्रात तैनात असलेली युद्धनौका, विक्रांत आहे. जर खोल समुद्रात युद्ध झालं तर अरि चा अंत अरिहंत आहे. भारताकडे पृथ्वी आहे, आकाश आहे. जर विनाशाचं तांडव आहे, तर शिवाचं त्रिशूल आहे, पिनाका आहे. कितीही मोठं कुरुक्षेत्र असु द्या, लक्ष्यभेद भारताचा अर्जुनच करेल. आज भारत आपल्या सैन्याच्या गरजाच पूर्ण करत नाही, तर संरक्षण उपकरणांचा एक मोठा निर्यातक देखील बनत आहे. आज भारत आपली क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली सशक्त करत आहे, तर दुसरीकडे ड्रोन सारख्या आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञानावर वेगाने काम करत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आपण त्या परंपरेचे पाईक आहोत, जी युद्ध, आपण युद्ध हा पहिला पर्याय मनात नाही. आपण नेहमी, हे आपल्या वीरतेचे देखील कारण आहे, आपल्या संस्कारांचे देखील कारण आहे की आपण युद्ध हा नेहमीच शेवटचा पर्याय समजला आहे. युद्ध लंकेत झाले असो अथवा कुरुक्षेत्रावर, शेवटपर्यंत ते टाळण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. म्हणूनच आपण जागतिक शांततेचे पुरस्कर्ते आहोत. आपण युद्धाच्या विरोधात आहोत. मात्र शांतता देखील सामर्थ्याशिवाय शक्य नाही. आपल्या सैन्यांकडे सामर्थ्य देखील आहे, रणनीती देखील आहे. जर कोणी डोळे वर करून आपल्याकडे बघणार असेल तर आपली तिन्ही सैन्ये शत्रूला त्याच्याच भाषेत सडेतोड उत्तर द्यायला समर्थ आहे.
मित्रांनो,
देशासमोर, आपल्या सैन्यासामोर, आणखी एक मानसिकता अडथळा म्हणून उभी होती. ही मानसिकता आहे गुलामगिरीची. आज देश या मानसिकतेतून बाहेर पडत आहे. गेली अनेक वर्ष राजधानीतला राजपथ गुलामगिरीचं प्रतीक होता. आज तो कर्तव्यपथ बनून भारताला नवा विश्वास देत आहे. इंडिया गेट जवळ जिथे एके काळी गुलामगिरीचं प्रतीक होतं, तिथे आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य - विशाल पुतळा आपल्याला मार्ग दाखवत आहे, आपल्याला मार्गदर्शन करत आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारक असो, राष्ट्रीय पोलीस स्मारक असो, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी काहीही करण्याची प्रेरणा देणारी ही तीर्थ क्षेत्रं नव्या भारताची ओळख आहेत. काही काळापूर्वीच देशाने भारतीय नौसेनेला देखील गुलामगिरीच्या प्रतीकातून मुक्त केले आहे. नौसेनेच्या ध्वजाशी आता वीर शिवाजी महाराजांच्या नौसेनेच्या शौर्याची प्रेरणा जोडली गेली आहे.
मित्रांनो,
आज संपूर्ण जगाचे डोळे भारताकडे लागले आहेत, भारताच्या वाढत्या सामर्थ्यावर आहेत. एकीकडे भारताचे सामर्थ्य वाढत आहे, तर दुसरीकडे शांततेची अपेक्षा देखील वादात आहे. जेव्हा भारताची ताकद वाढते, तेव्हा समृद्धीच्या शक्यता वाढतात. जेव्हा भारताची ताकद वाढते, तेव्हा जगात एक संतुलन येतं. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ भारताच्या याच सामर्थ्याचा साक्षीदार बनणार आहे. यात आपली भूमिका, तुम्हा सर्व वीर जवानांची खूप मोठी भूमिका आहे, कारण तुम्ही ‘भारताच्या अभिमानाची शान’ आहात. तन तिरंगा, मन तिरंगा, प्रेम तिरंगा, मार्ग तिरंगा. विजयाचा खात्रीची गर्जना, सीमेपेक्षा विशाल छाती, संकल्प पूर्तीचे स्वप्न, पावला पावलावर शक्ती दाखवणारा, भारताच्या अभिमानाची शान, तुम्हाला बघून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलून जाते. वीर गाथा घरा घरात गायली जावी, सर्वांनी मान तुकवावी, सागरापेक्षा खोल आमचं प्रेम, तुम्ही आमचे आहात, आणि स्वप्नं देखील आहात. जवानांना कुटुंब देखील असतेच, आपले देखील कुटुंब असते. तुमची स्वप्नं देखील आहेत, देशासाठी तुम्ही सर्वस्व पणाला लावलं आहे. शत्रूने देखील तुमची शक्ती ओळखली आहे. भारताच्या अभिमानाची शान, तुम्हाला बघून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलून जाते. प्रेमाने बोललं तर तुम्ही शांत समुद्राप्रमाणे आहात. मात्र देशाकडे वाकड्या नजरेने बघितलं तर मग वीर ‘वज्र’ ‘विक्रांत’ आहात, एक निर्भय ‘अग्नी’, एक आग आहात ‘निर्भय’ ‘प्रचंड’ आणि ‘नाग’ आहात तुम्ही ‘अर्जुन’ ‘पृथ्वी’ ‘अरिहंत’ आहात, अंधःकाराचा अंत आहात, तुम्ही इथे तपस्या करता तेव्हा देश धन्य होतो, भारताच्या अभिमानाची शान, तुम्हाला बघून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलून जाते. स्वाभिमानाने उंच असलेले मस्तक आहात तुम्ही, आसमंतात ‘तेजस’ची हुंकार आहात तुम्ही, शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून जो बोलतो ‘ब्राह्मोस’ ची अजेय आरोळी आहात तुम्ही, आम्ही तुमचे ऋणी आहोत, हे सत्य देश वारंवार सांगतो. भारताच्या अभिमानाची शान, तुम्हाला बघून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानानं फुलून जाते.
पुन्हा एकदा आपणा सर्वांना आणि कारगिलच्या वीरांच्या तीर्थक्षेत्राच्या हिमालयाच्या कुशीतून मी देश आणि जगात असलेल्या सर्व भारतीयांना माझ्या वीर जवानांच्या वतीनं, माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यासोबत पूर्ण शक्तीनिशी बोला, संपूर्ण हिमालय दुमदुमला पाहिजे.
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
वंदे मातरम!
***
Jaydevi PS/N.Chitale/R.Aghor/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1870794)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam