पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अयोध्येत दिपोत्सवानिमित्त केलेले भाषण
Posted On:
23 OCT 2022 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2022
सियावर रामचंद्र की जय!
सियावर रामचंद्र की जय!
सियावर रामचंद्र की जय!
मंचावर उपस्थित उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सर्व देवतुल्य अवधनिवासी, देश विदेशातील रामभक्त, भारतभक्त, बंधू आणि भगिनींनो.
आज अयोध्या नगरी जी दीपांनी दिव्य आणि भावनांनी भव्य आहे. आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्ण अध्यायाचे प्रतिबिंब आहे. मी राम अभिषेकानंतर जेंव्हा इथे येत होतो तेंव्हा माझ्या मनात भाव भावनांचे अनेक तरंग निर्माण झाले. मी विचार करत होतो, जेंव्हा १४ वर्षांचा वनवास संपवून प्रभू राम अयोध्येत परतले असतील तेंव्हा अयोध्या कशी सजली असेल, कशी नटली असेल? आपण त्रेतायुगातील त्या अयोध्येचे दर्शन केलेले नाही, पण प्रभू रामाच्या आशिर्वादाने आज अमृत काळात आपण अमर अयोध्येच्या अलौकिकतेचे साक्षीदार बनत आहोत.
मित्रांनो,
आपण अशा संस्कृती आणि सभ्यतेचे वाहक आहोत जिथे सण आणि उत्सव हे जीवनाचे सहज स्वाभाविक अंग आहेत. आपल्या येथे जेंव्हा जेंव्हा समाजाने नवीन काहीतरी केले आहे तेंव्हा नवीन उत्सव अस्तित्वात आला आहे. सत्याच्या प्रत्येक विजयाचा, असत्याच्या प्रत्येक अंताचा मानवी संदेश आपण ज्या प्रकारे जिवंत ठेवला आहे त्यात कोणीही भारताची बरोबरी करू शकत नाही. हजारो वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामांनी रावणाच्या अत्याचाराचा अंत केला होता. पण, आज हजारो वर्षांनंतरही त्या घटनेचा एक एक मानवी संदेश, आध्यात्मिक संदेश एक एक दिव्याच्या रुपात सतत प्रकाशमान होत असतो.
मित्रांनो,
दिवाळीचे दिवे आपल्यासाठी केवळ एक वस्तू नाहीत. ते भारताचे आदर्श, मूल्य, आणि तत्वज्ञानाचे जिवंत उर्जापुंज आहेत. तुम्हीच पहा, जिथवर तुमची नजर जाईल तिथवर ज्योतींचा प्रकाश , प्रकाशाचा प्रभाव, निशेच्या ललाटावर हा किरणांचा विस्तार हे सर्व भारताचा मूल मंत्र ' सत्यमेव जयते ' ची उद्घोषणा आहे. ही उद्घोषणा आहे आपल्या उपनिषद वाक्यांची “सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः” म्हणजेच जय सत्याचाच होतो, असत्याचा नाही. ही उद्घोषणा आहे आपल्या ऋषी वाक्यांची “रामो राजमणि: सदा विजयते”, म्हणजेच रामरुपी सदाचाराचाच नेहमी विजय होतो, रावणरुपी दुराचाराचा नाही. तेंव्हाच तर आपल्या ऋषीमुनींनी भौतिक दीपकातही चैतन्य उर्जेचे दर्शन करत म्हटले आहे - दीपो ज्योतिः परब्रहम दीपो ज्योतिः जनार्दन" म्हणजेच दीप-ज्योती ब्रम्हाचेच स्वरूप आहेत. हा अध्यात्मिक प्रकाश भारताच्या प्रगतीचा पथप्रदर्शक ठरेल, भारताच्या पुनरुत्थानाचा मार्गदर्शक ठरेल याचा मला पूर्ण विश्वास आहे.
मित्रांनो,
आज या पावन प्रसंगी, लखलखणाऱ्या हजारो दिव्यांच्या प्रकाशात मी देशवासियांना आणखी एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो. रामचरितमानस मध्ये गोस्वामी तुलसीदास यांनी म्हटले आहे “जगत प्रकास्य प्रकासक रामू” म्हणजेच भगवान राम संपूर्ण विश्वाचे प्रकाश दाते आहेत, ते पूर्ण विश्वासाठी एका ज्योतिपुंज्याप्रमाणे आहेत. हा प्रकाश कोणता आहे? हा प्रकाश आहे दया आणि करूणेचा. हा प्रकाश आहे मानवता आणि मर्यादेचा. हा प्रकाश आहे समभाव आणि ममभावाचा. हा प्रकाश आहे सर्वांच्या सोबतीचा. हा प्रकाश आहे सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या संदेशाचा. मला आठवते अनेक वर्षापूर्वी बहुतेक माझ्या कुमार वयात मी गुजरातीमध्ये दिव्यावर एक कविता लिहिली होती. कवितेचे शीर्षक होते दिवा. गुजराती मध्ये म्हणतात - दीवो. त्याच्या काही ओळी आज मला आठवत आहेत. मी लिहिले होते - દીવા જેવી આશ ને દીવા જેવો તાપ, દીવા જેવી આગ ને દીવા થકી હાશ. ઊગતા સૂરજને હર કોઈ પૂજે, એ તો આથમતી સાંજે’ય આપે સાથ. જાતે બળે ને બાળે અંધાર, માનવના મનમાં ઊગે રખોપાનો ભાવ. म्हणजेच दिवा आशा देखील देतो आणि दिवा उष्मा देखील देतो. दिवा आगही देतो आणि आराम देखील देतो. उगवत्या सूर्याची सर्वच जण पूजा करतात पण दिवा अंधाऱ्या संध्याकाळी देखील साथ देत असतो. दिवा स्वतः जळतो आणि अंधारालाही जाळतो. दिवा मनुष्याच्या मनात समर्पण भाव निर्माण करतो. दिल्याप्रमाणे आपण स्वतः जळतो, तापतो आणि त्याग करतो. पण, जेंव्हा सिद्धीचा प्रकाश जन्माला येतो तेव्हा आपण त्या प्रकाशाला निष्काम भावाने संपूर्ण संसारात पसरवतो संपूर्ण जगाला समर्पित करतो.
बंधू आणि भगिनींनो,
जेंव्हा आपण स्वार्थ सोडून परमार्थाचा मार्ग स्वीकारतो, तेंव्हा त्यात सर्व समावेशाचा संकल्प आपोआप सामावला जातो. जेव्हा आपल्या संकल्पनांची सिध्दी होते तेव्हा आपण म्हणतो ‘इदम् न मम्’॥ म्हणजेच ही सिद्धी माझ्यासाठी नसून अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. दीपापासून दीपावलीपर्यंत हेच भारताचे तत्वज्ञान आहे, हेच भारताचे चिंतन आहे, हीच भारताची चिरंतन संस्कृती आहे. आपण सर्व जाणतो की मध्यकाळापासून आधुनिक काळापर्यंत भारताने अंधकाराने भरलेल्या कैक युगांचा सामना केला आहे. ज्या झंझावातात मोठमोठ्या सभ्यतांच्या सूर्याचा अस्त झाला, पण अशा काळातही आपले दीपक तेवत राहीले, प्रकाश देत राहिले, मग त्या तूफानांना शांत करत उद्दीप्त झाले. कारण आपण दिवे प्रज्वलित करणे कधीही सोडले नाही. आपला विश्वास कधीही डगमगला नाही. थोड्याच काळापूर्वी जेंव्हा कोरोनाच्या खडतर काळात याच भावनेने प्रत्येक भारतवासी एक एक दीपक हाती घेऊन उभा राहिला होता. आणि आज कोरोना विरोधी लढाईत भारत किती कणखरपणे उभा आहे हे संपूर्ण जग पाहतच आहे. अंधाराच्या प्रत्येक युगातून बाहेर पडून भारताने प्रगतीच्या प्रशस्त मार्गावर आपल्या पराक्रमाचा प्रकाश भूतकाळातही पसरवला होता आणि भविष्यातही पसरवेल, हे याचे प्रमाण आहे. जेंव्हा प्रकाश आपल्या कर्माचा साक्षीदार बनतो तेंव्हा अंध:काराचा अंत आपसूकच पक्का होऊन जातो. जेंव्हा दिवे आपल्या कर्माचे साक्षीदार बनतात तेंव्हा नव्या उष:कालाचा, नव्या प्रारंभाचा आत्मविश्वास आपोआप मजबूत होतो. याच विश्वासाने तुम्हा सर्वांना दिपोत्सवाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सोबत पूर्ण भक्तिभावाने म्हणा -
सियावर रामचंद्र की जय,
सियावर रामचंद्र की जय,
सियावर रामचंद्र की जय।
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1870613)
Visitor Counter : 201
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam