पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधील केवडिया येथील एकता नगरमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पंतप्रधानांच्या हस्ते लाईफ (LiFE) मोहिमेचा शुभारंभ


संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्यासह द्विपक्षीय बैठकीला पंतप्रधान उपस्थित

या उपक्रमाबद्दल जागतिक नेत्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन आणि पाठिंबा देण्याचे वचन

पर्यावरणपूरक धोरणांच्या अंगिकारासाठी भारताची वचनबद्धता प्रोत्साहक: संयुक्त राष्ट्र सरचिटणीस

गुटेरेस यांचे गोव्याशी वारसासंबंधाने नाते आहे, त्यांचे गुजरातमध्ये स्वागत करणे म्हणजे कुटुंबातील सदस्याचे स्वागत करण्यासारखेच आहे: पंतप्रधान

"धोरण ठरवण्यापलीकडे जाऊन हवामानातील बदलांचा विचार करावा लागेल"

लाईफ (LiFE) मोहिमेमुळे हवामान बदलांविरूद्धचा लढा लोकशाहीप्रधान, प्रत्येकजण यात योगदान देऊ शकतो'

"लाईफ (LiFE) मोहीम आपणा सर्वांना पर्यावरणाचे विश्वस्त बनवते"

“लाईफ (LiFE) मोहीम पृथ्वीवरील रहिवाशांना ग्रह-स्नेही समूह म्हणून एकत्र आणते”

"'रिड्यूस, रियूज, रिसायकल' आणि चक्रीय अर्थव्यवस्था हा हजारो वर्षांपासून भारतीयांच्या जीवनशैलीचा भाग आहे"

"भारत म्हणजे प्रगती आणि निसर्ग यांची उत्तम सांगड घालणारा देश"

"भारत आणि संयुक्त राष्ट्रांनी ज्या-ज्या वेळी एकत्र काम केले आहे, त्या प्रत्येक वेळी, हे जग एक चांगले ठिकाण म्हणून विकसित करण्याचे नवे मार्ग सापडले आहेत"

Posted On: 20 OCT 2022 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2022

 

गुजरातमधील केवडिया येथील एकता नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह द्विपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले, तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पंतप्रधानांच्या हस्ते लाईफ (LiFE) मोहिमेचा शुभारंभ झाला. पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पहार अर्पण केला.  या प्रसंगी संयुक्त राष्ट्रांच्या सर्व क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 11 राष्ट्रांच्या प्रमुखांचे, लाईफ LiFE मोहिमेच्या शुभारंभाबद्दल अभिनंदन करणारे ध्वनिचित्रमुद्रित संदेश देखील प्रसारित करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासाठी भारत म्हणजे दुसऱ्या घरासारखा आहे आणि त्यांनी त्यांच्या तारुण्याच्या काळात अनेकदा भारतात प्रवास केला होता. भारतातील गोवा राज्याशी गुटेरेस यांचे वारसासंबंधाने नाते असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गुटेरेस यांनी भारताला भेट दिल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. गुजरातमध्ये त्यांचे स्वागत करणे म्हणजे कुटुंबातील सदस्याचे स्वागत करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.

लाईफ (LiFE) मोहीम हाती घेतल्याबद्दल भारताला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि या विशेष प्रसंगी अभिनंदनपर संदेश पाठवल्याबद्दल सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांचे आभार मानले. हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात एकतेचे महत्त्व अधोरेखित करताना, मोदी म्हणाले की भारताचा मानबिंदू असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासमोर, स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर या लाईफ (LiFE) मोहिमेचा शुभारंभ होत आहे. "निर्धारित लक्ष्य साध्य करण्यासाठी जगातील हा सर्वात मोठा पुतळा खचितच प्रेरणादायी ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

"जेव्हा निकष असाधारण असतात तेव्हा विक्रमही खूप मोठे असतात, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. गुजरातमध्ये या मोहिमेच्या शुभारंभाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की अक्षय ऊर्जा आणि हवामान संरक्षणाच्या दिशेने पावले उचलणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य आहे. कालव्यांवर सौर पॅनेल बसवणे असो किंवा राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी जलसंधारण प्रकल्प सुरू करणे असो, नेतृत्व करणारे आणि नवी वाट चोखाळणारे राज्य म्हणून गुजरात नेहमीच आघाडीवर राहिले आहे.

हवामानातील बदल हा केवळ धोरणाशी संबंधित मुद्दा आहे, ज्यावर विचार विनिमय केला जातो. असे सर्व-महत्त्वाचे मुद्दे केवळ सरकारवर किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांवर सोडले जातात, अशी आजवरची विचारसरणी होती, मात्र आपल्या सभोवतालच्या वातावरणातील बदलाचे परिणाम लोक अनुभवत आहेत आणि गेल्या काही दशकांमध्ये आपण अनपेक्षित आपत्तीही अनुभवल्या आहेत. त्यामुळे हवामानातील बदल ही निव्वळ धोरण ठरवण्यापलीकडची बाब आहे. या समस्य़ेवर मात करण्यासाठी एक व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून आणि समुदाय म्हणून आपण पर्यावरणासाठी योगदान दिले पाहिजे, असे लोकांना वाटू लागले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

“'पर्यावरणासाठी जीवनशैली' हा लाईफ (LiFE) मोहिमेचा मंत्र आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या मोहिमेच्या फायद्यांवर भर देताना पंतप्रधान म्हणाले की ही मोहीम पृथ्वीच्या संरक्षणासाठी जनशक्तीला परस्परांशी जोडते आणि या शक्तीचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करण्यास शिकवते. लाईफ (LiFE) मोहिमेमुळे हवामान बदलांविरूद्धचा लढा लोकशाहीप्रधान झाला आहे आणि या लढ्यात प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार योगदान देऊ शकतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याची प्रेरणा, ही लाईफ (LiFE) मोहीम देते. आपल्या जीवनशैलीत बदल करून पर्यावरणाचे रक्षण केले जाऊ शकते, असा विश्वास या मोहिमेमुळे वाटतो, असे पंतप्रधान म्हणाले. वीज बिल कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात एलईडी बल्बचा अवलंब केल्याचे उदाहरण त्यांनी दिले. यामुळे मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे आणि पर्यावरणीय फायदे झाले. हा खरे तर सातत्याने वाढत जाणारा कायमस्वरूपी लाभ आहे, असे मतही पंतप्रधानांनी व्यक्त केले.

गुजरात हे महात्मा गांधींचे जन्मस्थान असल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की पर्यावरण रक्षणाचे महत्त्व तसेच निसर्गाच्या सान्निध्यात जीवन जगण्याचे महत्त्व फार पूर्वीच ज्यांना समजले होते, अशा विचारवंतांपैकी गांधीजी होते. विश्वस्तपदाची संकल्पना त्यांनी विकसित केली. लाइफ (LiFE) मोहीम आपणा सर्वांनाच पर्यावरणाचे विश्वस्त बनवते. विश्वस्त ही अशी व्यक्ती असते जी स्रोतांचा गैरवापर करू देत नाही. विश्वस्त शोषक म्हणून नव्हे तर पोषक म्हणून काम करतो.

लाईफ (LiFE) मोहीम म्हणजे Pro Planet People असे P3 मॉडेल असून ते ग्रहसंवर्धनाच्या भावनेला प्रोत्साहन देते, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. लाईफ (LiFE) मोहीम पृथ्वीवरील लोकांना ग्रहस्नेही समूह म्हणून एकत्र आणते, वैचारिकदृष्ट्या त्यांना एकत्र आणते. 'ग्रहासाठी आणि ग्रहाद्वारे ग्रहाची जीवनशैली' या मूलभूत तत्त्वानुसार ही मोहीम काम करते. भूतकाळातील चुकांमधून धडा घेऊनच भविष्याचा मार्ग खुला होऊ शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. भारतात निसर्गाची पूजा करण्याची हजारो वर्षांची परंपरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या वेदांमध्ये जल, पृथ्वी, जमीन, अग्नी आणि पाणी या निसर्गातील घटकांचे महत्त्व स्पष्टपणे सांगितले आहे, असे सांगत पंतप्रधानांनी अथर्ववेदातील "माता भूमियः पुत्रोहम् पृथ्वीः" अर्थात पृथ्वी ही आपली माता आहे आणि आपण तिची मुले आहोत, हे वचन उद्धृत केले.

'रिड्यूस, रियूज आणि रिसायकल' या संकल्पनेबाबत आणि चक्रीय अर्थव्यवस्थेबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की ही संकल्पना हजारो वर्षांपासून भारतीयांच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. जगाच्या इतर भागांमध्येही अशा प्रथा प्रचलित आहेत, ज्यामुळे आपल्याला निसर्गाशी एकरूप होऊन चालण्याची प्रेरणा मिळते, असे पंतप्रधान म्हणाले. निसर्गाच्या संवर्धनाशी संबंधित असलेली, आपल्या पूर्वजांनी स्वीकारलेली आणि आपल्या जीवनशैलीशी सुसंगत अशी जीवनशैली, लाईफ (LiFE) मोहीम आत्मसात करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

हवामानातील बदलामुळे उद्भवणाऱ्या धोक्याशी दोन हात करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की कार्बन फूटप्रिंटची जागतिक सरासरी 4 टन प्रति वर्ष आहे तर भारतातील दरडोई कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण केवळ 1.5 टन आहे आणि तरीही हवामान बदलासारख्या जागतिक समस्या सोडवण्याच्या कामी भारत आघाडीवर आहे. उज्ज्वला योजना, प्रत्येक जिल्ह्यात 75 ‘अमृत सरोवरे’ अशा उपक्रमांवर तसेच टाकाऊ वस्तूंपासून संपत्ती निर्माण करण्यावर भारताने अभूतपूर्व भर दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आजघडीला भारत अक्षय ऊर्जेच्या बाबतीत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे, असे ते म्हणाले. आज आपण पवन ऊर्जेच्या बाबतीत चौथ्या आणि सौर ऊर्जेच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहोत. गेल्या 7-8 वर्षांत भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता सुमारे 290 टक्क्यांनी वाढली आहे.

जीवाश्मेतर इंधन स्रोतांमधून 40 टक्के विद्युत क्षमता साध्य करण्याचे उद्दिष्ट देखील आपण निर्धारित मुदतीच्या 9 वर्षे अगोदर गाठले आहे. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट देखील अंतिम मुदतीच्या 5 महिने आधीच आपण साध्य केले. राष्ट्रीय हायड्रोजन मोहिमेच्या माध्यमातून भारताने पर्यावरणाला अनुकूल ऊर्जा स्त्रोतांकडे वाटचाल सुरू केली आहे. यामुळे भारत आणि जगातील अनेक देशांना उर्जासंबंधी उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले. भारत म्हणजे प्रगती आणि निसर्ग यांची उत्तम सांगड घालणारा देश ठरला आहे. आता भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून, आपले वनक्षेत्रही वाढत आहे आणि वन्यजीवांची संख्याही वाढत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड अर्थात एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीड या जागतिक मोहिमेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारताला आता अशा उद्दिष्टांप्रति आपला संकल्प अधिक दृढ करत जगासोबतची भागीदारी आणखी वाढवायची आहे. आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधांसाठी जगातील इतर देशांसोबत हातमिळवणी करत या आघाडीचे नेतृत्व करून, भारताने आपली पर्यावरण संरक्षणाची संकल्पना जगासमोर मांडली आहे. लाईफ (LiFE) मोहीम हे या मालिकेतले पुढचे पाऊल आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत आणि संयुक्त राष्ट्रांनी जेव्हा-जेव्हा एकत्र काम केले आहे, तेव्हा जगाला एक चांगले ठिकाण म्हणून विकसित करण्याचे नवीन मार्ग सापडले आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारताने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता, त्याला संयुक्त राष्ट्रांनी पाठिंबा दिला. हा योग दिन आज जगभरातील लाखो लोकांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष उपक्रमाला संयुक्त राष्ट्रांनी मोठा पाठिंबा दिला आहे, हे उदाहरण नमूद करत पंतप्रधान म्हणाले की भारताला आपल्या पारंपरिक आणि पर्यावरणास अनुकूल अशा भरड धान्यांच्या वापराला जगभरात प्रोत्साहन द्यायचे आहे. पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाची जगभरात चर्चा होणार आहे, असेही ते म्हणाले. लाईफ (LiFE) मोहीम जगाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक देशात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकृति रक्षिती रक्षिता: अर्थात जे निसर्गाचे रक्षण करतात, निसर्ग त्यांचे रक्षण करतो, हा मंत्र आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, असे सांगत, आपल्या लाईफ मोहिमेची योग्य अंमलबजावणी करून आपण एक चांगले जग निर्माण करू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आणि आपल्या भाषणाचा समारोप केला.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की या धोकादायक काळात आपल्या ग्रहासाठी आपल्याला सर्व हातांची आवश्यकता आहे. Lifestyle For Environment - LiFE अर्थात पर्यावरणासाठी जीवनशैली ही मोहीम, आवश्यक आणि आशादायक सत्ये अधोरेखित करण्यासाठी हाती घेण्यात आली आहे. आपण सर्व, व्यक्ती आणि समुदाय, आपल्या ग्रहाचे आणि आपल्या सामूहिक भविष्याचे रक्षण करण्याच्या उपाययोजनांचा भाग असू शकतो आणि तसे असणे आवश्यक आहे. अति-उपभोग हे हवामानातील बदल, जैवविविधतेची हानी आणि प्रदूषण या तिन्ही समस्यांचे मूळ आहे. आपली जीवनशैली अबाधित राखण्यासाठी आपण पृथ्वी ग्रहाचा 1.6 भाग वापरत आहोत. मोठी असमानता या मोठ्या अतिरेकाच्या मुळाशी आहे, असे निरीक्षण त्यांनी नोदवले. लाईफ मोहिमेचे उपक्रम जगभर पसरावेत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारताने पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य धोरणे राबविण्यासाठी दाखवलेल्या वचनबद्धतेमुळे तसेच आंतरराष्ट्रीय सौर युतीचे अर्ध्वयू होऊन अक्षय ऊर्जेतील गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेमुळे आपल्याला खूप प्रोत्साहन मिळाले आहे, असे ते म्हणाले. आता अक्षय क्रांती आणण्याची गरज आहे आणि हा अजेंडा पुढे नेण्यासाठी आपण भारतासोबत काम करण्यास उत्सुक आहोत, असे त्यांनी सांगितले. इजिप्तमधील आगामी CoP- 27 बद्दल बोलताना गुटेरस म्हणाले की या परिषदेच्या निमित्ताने पॅरिस कराराच्या सर्व पैलूंवर विश्वास दाखवण्याची आणि कृतीला वेग देण्याची एक महत्त्वाची राजकीय संधी प्राप्त होणार आहे. हवामानावरील परिणामांबाबत संवेदनशीलता आणि मोठ्या अर्थव्यवस्थेमुळे, भारत या कामी मध्यस्थाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

महात्मा गांधीजींचा दाखला देत गुटेरस म्हणाले की प्रत्येकाच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने हे जग पुरेसे आहे पण प्रत्येकाची हाव पूर्ण करता येणार नाही. आपण पृथ्वीवरील स्रोतांच्या बाबतीत शहाणपणाने वागले पाहिजे आणि आदर भावना बाळगली पाहिजे, असे ते म्हणाले. पृथ्वीवरील स्रोतांचे विवेकी वाटप व्हावे आणि जे आवश्यक आहे तेच घेण्याची सवय लागावी यासाठी आपली अर्थव्यवस्था आणि जीवनशैलीत बदल करण्याचे वचन, गुटेरस यांनी दिले. इतिहास, संस्कृती आणि परंपरेशी पूर्णपणे सुसंगत, शाश्वततेच्या नवीन युगाची सुरुवात करण्यासाठी G20 अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या भारतावर विश्वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तसेच केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर हे मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

शाश्वततेच्या संदर्भात आपला सामूहिक दृष्टिकोन बदलण्यासाठी त्रि-आयामी धोरणाचा अवलंब करणे, हे लाईफ (LiFE) मोहिमेचे उद्दिष्ट आहे. लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सोप्या परंतु प्रभावी पर्यावरण-अनुकूल कृतींचा सराव करण्यास प्रवृत्त करणे, उद्योगांना आणि बाजारपेठांना बदलत्या मागणीला अनुसरून झटपट प्रतिसाद देण्यास सक्षम करणे; आणि शाश्वत उपभोग आणि उत्पादन अशा दोन्ही घटकांना सहाय्य करण्यासाठी सरकारी आणि औद्योगिक धोरणात आवश्यक ते बदल घडवून आणणे, असे हे तीन आयाम आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/M.Pange/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1869677) Visitor Counter : 278