पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत झालेल्या पीएम किसान सन्मान संमेलन 2022 च्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 17 OCT 2022 4:36PM by PIB Mumbai

भारत माता की– जय
भारत माता की– जय
भारत माता की– जय

सर्व दिशांनी उत्सवांची लगबग, जल्लोश ऐकू येतो आहे. दिवाळी उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. आणि एक असा प्रसंग आहे, की या एकाच परिसरात, एकाच ठिकाणी, एकाच व्यासपीठावर स्टार्ट अप्स देखील आहेत आणि देशातील लाखो शेतकरीही आहेत. एका अर्थाने हा समारंभ म्हणजे, ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ या मंत्राचं एक चालतंबोलतं जिवंत रूपच आहे.  

मित्रांनो, 

भारताच्या कृषव्यवस्थेशी संबंधित सर्व भागधारक आज प्रत्यक्षात आणि आभासी पद्धतीने देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अशा अतिशय महत्त्वाच्या व्यासपीठावरुन आज शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक सुलभ करण्यासाठी, शेतकऱ्यांना अधिक समृद्ध करण्यासाठी आणि आपल्या कृषीव्यवस्था अधिक आधुनिक बनवण्यासाठी अनेक मोठी पावलं उचलली जात आहेत. आज देशात 600 पेक्षा जास्त प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे सुरू होत आहेत. आणि मी आता इथे जे प्रदर्शन लावले आहे, ते बघत होतो. एकापेक्षा एक अशा अनेक तंत्रज्ञानाचे अभिनव प्रकल्प तिथे आहेत. माझी इच्छा होती, तिथे आणखी थोडा वेळ थांबून सगळं नीट बघायची, पण सध्या सणावाराचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्हालाही जास्त काळ थांबवून ठेवणं योग्य  नाही, म्हणून मी व्यासपीठावर आलो. मात्र आज मी तिथे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राची रचनाही बघितली. त्याचं जे मॉडेल इथे उभे केले आहे, त्याबद्दल मी मनसुख भाई आणि त्यांच्या संघाचं अभिनंदन करतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी केवळ शेतकऱ्यांसाठी केवळ खत खरेदी - विक्री केंद्र तयार केले नाही, शेतकऱ्यांनाही सर्वांगीण दृष्ट्या घनिष्ट नातं जोडणारे, त्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणारे, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करणारं हे शेतकरी समृद्धी केंद्र बनवलं आहे. 

मित्रांनो,

थोड्या वेळापूर्वीच, देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या रूपाने 16 हजार कोटी रुपयांचा आणखी एक हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. तुमच्यापैकी जे शेतकरी आता इथे बसले आहेत, त्यांनी जर मोबाइल बघितला, त्यांना मोबाईलवर बातमी आली असेल की 2000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. कोणी दलाल, मध्यस्थ नाही, कुठलीच कंपनी नाही, सरळ - सरळ माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जातात.  या दिवाळी पूर्वी हे पैसे पोहोचणं, शेतीच्या अनेक महत्वाच्या कामांच्या वेळी पैसे उपलब्ध असणं( गरजेचे असते), मी आपल्या सगळ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या प्रसंगी अनेक अनेक शुभेच्छा देतो. 

जे कृषी स्टार्टअप्स इथे आले आहेत, या कार्यक्रमात आले आहेत, या कार्यक्रमात जे सामील झाले आहेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी जे नवोन्मेश केले आहेत,  शेतकऱ्यांचे श्रम कमी कसे होतील, त्यांच्या पैशांची बचत कशी होईल, त्यांच्या कामाचा वेग कसा वाढेल, त्यांच्या मर्यादित जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल, अशी अनेक  कामं, आपले हे स्टार्टअपवाल्या नवयुवकांनी केली आहेत. मी ते देखील बघत होतो. एका पेक्षा एक वरचढ नवोन्मेश दिसत आहेत. मी अशा सर्व तरुणांना देखील, जे शेतकऱ्यांशी जोडले जात आहेत, अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या भागीदारीसाठी त्यांचे मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो. 
आज एक देश, एक खत, या रूपाने शेतकऱ्यांना स्वस्त आणि उच्च गुणवत्ता असलेले खत भारत ब्रांड अंतर्गत उपलब्ध करून देण्याची जी योजना आहे, ती सुरु झाली आहे आज. 2014 पूर्वी खतांच्या क्षेत्रात किती मोठी संकटं होती, युरिया कसा काळ्या बाजारात विकला जात होता, शेतकऱ्यांच्या हक्क कसा मारला जात होता, आणि त्या बदल्यात शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागत होत्या, हे आपले शेतकरी बंधू - भगिनी 2014 पूर्वीचे ते दिवस विसरू शकत नाहीत. देशात युरियाचे मोठमोठे कारखाने अनेक वर्षांपूर्वीच बंद पडले आहेत. कारण एक नवीन व्यवस्था तयार झाली होती, आयात करून अनेक लोकांची घरं भरली जात होती, खिसे भरले जात होते, म्हणून इथले कारखाने बंद झाले तर त्यांना आनंद होत असे. आम्ही युरियाला शंभर टक्के नीम आवरण करून त्याची काळ्या बाजारातली  विक्री थांबवली. आम्ही अनेक वर्षांपासून बंद असलेले देशातले सर्वात मोठे 6 कारखाने पुन्हा सुरु व्हावे म्हणून मेहनत घेतली. 

मित्रानो, 

आता तर युरिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी भारत आता वेगानं तरल नॅनो युरिया, प्रवाही नॅनो युरियाच्या दिशेने जात आहे. नॅनो युरिया, कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याचे एक मध्यम आहे. एक पोतं युरिया, तुम्ही विचार करा, एक पोतं युरिया, ज्या ठिकाणी लागायचं, तिथे हे काम आता नॅनो युरियाच्या लहानशा बाटलीने होऊ शकतं. ही विज्ञानाची कमाल आहे, तंत्रज्ञानाची कमाल आहे. आणि यामुळे, शेतकऱ्यांना युरियाच्या पोत्यांची ने आण, त्यांची मेहनत, वाहतुकीचा खर्च, आणि घरात पण ठेवायला जागा, या सगळ्या अडचणींपासून मुक्ती. आता तुम्ही बाजारात आले आहात, दहा गोष्टी घेत आहात, एक बाटली खिशात टाकली, तुमचं काम झालं.
खतांच्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आमच्या आतापर्यंतच्या प्रयत्नांत आज आणखी दोन प्रमुख सुधारणा, मोठे बदल जोडले जात आहेत. पहिला बदल हा आहे, की आज पासून देशभरात सव्वा 3 लाखांहून जास्त खतांची दुकाने पंतप्रधान शेतकरी समृद्धी केंद्र म्हणून विकसित करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ होत आहे. ही अशी केंद्रे असतील जिथे केवळ खतच मिळणार नाहीत, तर बियाणे, उपकरणे, मृदा चाचणी असो, सर्व प्रकारची माहिती, जे काही शेतकरी मागेल ते या केंद्रांवर एकाच छताखाली उपलब्ध असेल. 

आपल्या शेतकरी बंधू - भगिनींना आता कधी इथे जा, मग तिथे जा, इथे चकरा मारा, तिथे चकरा मारा, या सगळ्या जंजाळातून माझ्या शेतकरी बंधू - भगिनींना मुक्ती. आणखी एक महत्वाचा बदल केला आहे, आताच नरेंद्र सिंहजी तोमर त्याचं अगदी सविस्तर वर्णन करत होते, तो बदल आहे, खतांच्या ब्रांडच्या संबंधातला, त्यांच्या नावाच्या संबंधातला, उत्पादनाच्या समान गुणवत्तेच्या संबंधातला. आतापर्यंत या कंपन्यांच्या प्रचार मोहिमांमुळे आणि तिथे जे खत विक्रेते असतात, ज्याला जास्त कमिशन मिळते तो ब्रांड जास्त विकतो, कमिशन कमी मिळते तो ब्रांड विकत नाही. आणि यामुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार जे गुणवत्ता पूर्ण खत आहे, ते या स्पर्धेमुळे, वेगवेगळ्या नावांमुळे आणि ते विकणाऱ्या एजंटच्या मनमानी मुळे शेतकरी त्रस्त असायचा. आणि त्यांच्यात अनेक भ्रम देखील होते. शेजारी म्हणायचा की, मी हे आणलं आहे, तर त्याला देखील वाटायचं की मी हे घेऊन आलो, ती चूक झाली, ठीक आहे काही हरकत नाही. हे ठेऊन देऊ, मी ते नवीन घेऊन येतो. कधी कधी शेतकरी या द्विधा मनःस्थितीत दुप्पट खर्च करत असत. 

DAP असो, MOP असो, NPK असो, हे कुठल्या कंपनीचे विकत घ्यायचे. हाच शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असायचा. जास्त प्रसिद्ध खताच्या आग्रहामुळे अनेकदा जास्त पैसे देखील द्यावे लागायचे. आता, समजा, त्याच्या डोक्यात एक ब्रांड बसला असेल आणि जर दुसरा घ्यावा लागला, तर तो विचार करतो, चला यातलं आधी एक किलो वापरात होतो, आता दोन किलो वापरू, कारण ब्रांड दुसरा आहे, काय माहित कसा आहे, म्हणजे त्याचा खर्च देखील वाढत होता.

या सर्व समस्यांचा एकत्रितपणे विचार करण्यात आला आहे.  आता वन नेशन, वन फर्टिलायझरमुळे (एक देश एक खत) शेतकऱ्याची सर्व प्रकारच्या संभ्रमातून मुक्तता होणार आहे आणि चांगलं खतही उपलब्ध होणार आहे.  आता भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तेच नाव, तोच ब्रँड, आणि त्याच दर्जाचा युरिया विकला जाईल आणि हा ब्रँड आहे भारत!  आता फक्त भारत ब्रँडचा युरिया देशात उपलब्ध होणार आहे.  खताचा ब्रँड संपूर्ण देशात एकच असला, तर कंपनीच्या नावावर होणारे खतांचे वादही  संपतील. त्यामुळे खतांची किंमतही  कमी होईल, सोबत खतं पुरेशा प्रमाणात त्वरीत उपलब्ध होतील.

मित्रहो,

आज आपल्या देशातील सुमारे ८५ टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत.  त्यांच्याकडे एक हेक्टर, दीड हेक्टरपेक्षा जास्त जमीन नाही.  त्यातही  काळाच्या ओघात जेव्हा कुटुंब विस्तारतं, कुटुंब वाढतं,एकाचे दोन होतात तेव्हा शेताच्या या एवढ्या लहान एका तुकड्याचे आणखी तुकडे होत राहतात.  जमीन आणखी लहान तुकड्यांमध्ये विभागली जाते आणि आपण हल्ली हवामान बदल पाहतो.  दिवाळी आली तरी, पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही.  नैसर्गिक आपत्तीही सुरूच राहतात.

मित्रांनो,

अशाच प्रकारे  जर मातीची गुणवत्ता ढासळली, आपल्या धरणी मातेचं आरोग्य बिघडलं, आपली धरणी माताच जर आजारी पडली, तर आपल्या या धरणी मातेची सुपीकताच कमी होईल, सहाजिकच पीक कमी निघेल आणि सोबतच पाण्याचा दर्जाही जर बिघडला तर आणखी समस्या निर्माण होतील. शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन आयुष्यात नेहमी अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतीचं उत्पन्न वाढवायचं असेल, चांगल्या उत्पादनासाठी शेतीच्या नवीन पद्धती निर्माण कराव्या लागतील, जास्तीत जास्त शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब करावा लागेल, अधिकाधिक तंत्रज्ञानाचा स्वीकार मोकळ्या मनानं स्वीकार करावा लागेल.

हाच विचार करून आम्ही शेतीमध्ये वैज्ञानिक पद्धतींचा वापर वाढवणं, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर यावर भर दिला आहे.  आज देशातील शेतकऱ्यांना २२ कोटी मृदा आरोग्य पत्रिका देण्यात आल्या आहेत जेणेकरून त्यांना जमिनीच्या आरोग्याबाबत अचूक माहिती मिळावी.  शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं यासाठी आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत.  गेल्या ७-८ वर्षात अशा सतराशेहून जास्त बियाण्यांच्या जाती शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही बियाणं हवामान बदलाशी जुळवून घेतात, शेतकऱ्यांना हवं तसं पीक मिळवून देतात.  

पारंपरिक भरड धान्याच्या बियाण्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आज देशात अनेक केंद्र तयार केली जात आहेत.  भारताच्या भरडधान्याची जगभरात ओळख निर्माण व्हावी, त्यातून जागतिक बाजारपेठेत मागणी वाढावी या उद्देशानं सरकारनं केलेल्या प्रयत्नांमुळे, पुढील वर्ष हे जगभरात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे.  आपल्या भरडधान्याची आता जगभर चर्चा होणार आहे. तेव्हा जगभरात पोहोचण्याची संधी आता चालून आली आहे, कसं पोहोचायचं हे तुमच्या हातात आहे.  

सिंचन आणि सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी  गेल्या आठ वर्षांपासून सरकारनं किती काम केलं आहे हे आपल्या सर्वांना चांगलच माहीत आहे. आपल्याकडे जोपर्यंत खाचर पाण्यानं खच्चून  भरत नाही, शेतकऱ्याला शेतातलं आपलं पीक पाण्यात पूर्णपणे बुडलेलं दिसत नाही, एका रोपाचं डोकं जरी पाण्याबाहेर डोकावलं,  तर त्याला वाटतं पाणी कमी आहे आणि मग तो शेतामध्ये पाणी भरतच राहतो, जणू काही आपल्या पूर्ण शेताचा तो तलावच बनवून टाकतो. त्यामुळे काय होतं की पाण्याचा अपव्यय तर होतोच, सोबत मातीचा पोत बिघडतो आणि पीकही खराब होतं. अशा प्रकारच्या परिस्थितीतूनही  शेतकऱ्यांची सुटका करण्याचं काम आम्ही केलं आहे. पर ड्रॉप मोअर क्रॉप म्हणजे एका थेंबात जास्त पीक,  सूक्ष्म सिंचन यावर  आम्ही जास्त भर देत आहोत. ठिबक सिंचन सुद्धा वाढवत आहोत आणि तुषार सिंचनाचं प्रमाणही  वाढवत आहोत.

पूर्वी आमचा ऊस उत्पादक शेतकरी हे मानायलाच तयार नव्हता की कमी पाणी वापरुनही उसाची शेती होऊ शकते. आता हे सिद्ध झालंय की तुषार सिंचनानं सुद्धा उसाची शेती खूप उत्तम प्रकारे होऊ शकते आणि पाण्याची बचत करता येते. त्याच्या तर डोक्यात हेच भिनलय  की जसं प्राण्याला जास्त पाणी पाजलं तर जास्त दूध मिळेल, तसच उसाच्या शेताला जास्त पाणी दिलं तर उसाचा रसही भरपूर मिळेल. हे असेच हिशेब ठिशेब आपल्याकडे पूर्वापार चालत आले आहेत. गेल्या सात-आठ वर्षात, सरकारनं देशातलं सुमारे ७० लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणलं आहे.

मित्रांनो,

भविष्यातील कृषी विषयक आव्हानांवर नैसर्गिक शेती हा सुद्धा एक उत्तम मार्ग आहे. नैसर्गिक शेती बाबतही देशभरात आज मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली आहे, आणि याचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशा सोबतच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग करत आहेत. गुजरातमध्ये तर जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा नैसर्गिक शेतीसाठी योजना तयार केल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक शेतीच्या उत्पादनांना ज्या प्रकारे नवनवीन बाजारपेठा मिळाल्या आहेत, ज्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं आहे त्यामुळे उत्पादनांमध्ये सुद्धा  कैकपटीनं वाढ झाली आहे.

मित्रहो,

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे छोट्या शेतकऱ्यांना कसा लाभ होतो याचं एक उदाहरण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुद्धा आहे. ही योजना सुरू केल्यापासून एकूण दोन लाख कोटी रुपयांहून जास्त रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आली आहे. बियाणं खरेदी वेळी, खत खरेदी वेळी, ही मदत बरोब्बर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते.

बियाणं खरेदी, खत खरेदीचा खर्च, देशातल्या ८५ टक्क्यांहून जास्त छोट्या शेतकऱ्यांसाठी ऐपतीपेक्षा जास्त असतो.  आज देशभरातले शेतकरी मला सांगत असतात की प्रधानमंत्री किसान निधीमुळे त्यांची खूप मोठी चिंता दूर झाली आहे.

मित्रहो,

आज आधुनिक आणि उपयुक्त तंत्रज्ञानामुळे शेत आणि शेतमालाची बाजारपेठ यामधलं अंतर कमी होत आहे, थोडक्यात या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पिकाला चांगली बाजारपेठ सहज उपलब्ध होत आहे. भाजी, फळं, दूध, मासे, यासारखं नाशिवंत उत्पादन घेणाऱ्या छोट्या शेतकऱ्याला याचा सगळ्यात मोठा लाभ मिळत आहे. छोट्या शेतकऱ्यांना, किसान रेल्वे आणि कृषी उडान हवाई सेवा योजनेमुळे सुद्धा खूप लाभ मिळाला आहे. या आधुनिक सुविधांमुळे आज छोट्या शेतकऱ्यांना आपलं कृषी उत्पादन, देशभरातल्या मोठ्या शहरांमध्ये, तसच परदेशातल्याही बाजारपेठांमध्ये पाठवता येणं,  विकता येणं शक्य झालं आहे. 

त्याचा एक परिणाम असाही झाला आहे की पूर्वी कुणी कल्पनाही केली नसेल अशा देशांमध्ये आता आपली कृषी निर्यात होत आहे. कृषी निर्यातीच्या बाबतीत भारत देशातल्या १० प्रमुख देशांपैकी एक आहे. कोरोना काळात अडथळे येऊनही, तब्बल दोन वर्ष संकटात गेली तरीही आपल्या कृषी निर्यातीत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गुजरात मधून आज मोठ्या प्रमाणावर कमलम फळाची, ज्याला आपण पर्वतीय प्रदेशातील भाषेत ड्रॅगन फ्रुट म्हणतो, मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू आहे. हिमाचल प्रदेशातून पहिल्यांदाच काळ्या लसणाची निर्यात झाली आहे. आसाम मधली ब्रम्हदेशी द्राक्षं, जळगावची केळी, लडाख मधली कच्चे जर्दाळू किंवा भागलपुरी जरदारी आंबे अशा अनेक फळांना आज  मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळत  आहे.  एक जिल्हा एक उत्पादन यासारख्या योजनांद्वारे अशा प्रकारच्या कृषी उत्पादनांना आज मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. आज जिल्हास्तरावर मोठी निर्यात केंद्र सुद्धा निर्माण केली जात आहेत आणि त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.

मित्रांनो,

आज प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या निर्मितीमध्ये  आपला वाटा खूप वाढत आहे.यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उत्तराखंडचे भरड धान्य पहिल्यांदाच डेन्मार्कला गेले.त्याचप्रमाणे कर्नाटकातील सेंद्रिय फणस  भुकटीही  नवीन बाजारपेठांमध्ये  पोहोचत आहे. आता त्रिपुराही यादृष्टीने  तयारी करत आहे.  आम्ही गेल्या 8 वर्षांत जे बीज पेरले आहेत, त्याचे  पीक आता येऊ लागले आहे.


मित्रांनो,

तुम्ही विचार करा , मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो. ही आकडेवारी ऐकून तुम्हाला वाटेल की प्रगती आणि बदल कशाप्रकारे होतो.8 वर्षांपूर्वी जिथे देशात केवळ 2 मोठे फूड पार्क होते, आज ही संख्या 23 वर गेली आहे. शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच एफपीओ  आणि भगिनींच्या बचत गटांना या क्षेत्राशी जास्तीत जास्त कसे जोडता येईल, हा आता आमचा प्रयत्न आहे. शीतगृह असो, अन्न प्रक्रिया असो की निर्यात असो ,अशा प्रत्येक कामात छोटे शेतकरी जोडले जावेत   त्यासाठी सरकार आज सातत्याने प्रयत्न करत आहे.

मित्रांनो,

तंत्रज्ञानाचा हा वापर बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंतच्या संपूर्ण व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणत आहे. आपल्या ज्या शेतीमालाच्या बाजारपेठा आहेत त्याही आधुनिक केल्या जात आहेत. तर  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या आपला माल देशातील कोणत्याही बाजारपेठेत विकू शकतात, हे देखील  ई-नामच्या माध्यमातून केले जात आहे.आतापर्यंत देशातील अडीच कोटींहून अधिक शेतकरी आणि अडीच लाखांहून अधिक व्यापारी ई-नामशी जोडले गेले आहेत.तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, आतापर्यंत या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाले आहेत.आज देशातील खेड्यापाड्यात जमिनी आणि घरांचे नकाशे बनवून शेतकऱ्यांना मालमत्ता पत्र  दिले जात असल्याचे तुम्ही पाहिले असेल.या सर्व कामांसाठी ड्रोनसारखे तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

मित्रांनो,

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला अधिक फायदेशीर बनवण्यासाठी आपले  स्टार्ट-अप्स नवीन युगात घेऊन जाऊ शकतात.गेल्या 7-8 वर्षात कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या, हा देखील आकडा ऐका, पूर्वी 100 होती  ,आज 3 हजारांहून अधिक स्टार्टअप्स कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानावर काम करत आहेत.हे स्टार्टअप्स, हे नवोन्मेषी तरुण, भारतातील ही प्रतिभा, भारतीय कृषी, भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भविष्य पुन्हा लिहित आहेत. खर्चापासून ते वाहतुकीपर्यंत, आमच्या स्टार्ट अप्सकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहेत.

आता बघा शेतकरी ड्रोनमुळे शेतकऱ्याचे आयुष्य किती सुसह्य होणार आहे. माती कोणत्या प्रकराची आहे, मातीला कोणत्या खताची गरज आहे, किती सिंचन आवश्यक आहे? कोणता रोग आहे , कोणत्या औषधाची गरज आहे, ड्रोन याचा अंदाज घेऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू  शकतो. औषधाची फवारणी करायची असेल, तर ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी आवश्यक तेवढ्याच भागात केली जाते.यामुळे फवारणी आणि खताची होणारी नासाडीही थांबेल आणि शेतकऱ्यांच्या अंगावर जे रसायन उडते त्यापासून माझ्या   शेतकरी बंधू भगिनींचा बचावही होऊ शकेल.
 
बंधु आणि भगिनींनो,

आज आणखी एक मोठे आव्हान आहे, ज्याचा उल्लेख मला  तुम्हा सर्व शेतकरी मित्रांसमोर, आपल्या नवोन्मेषींसमोर  करायला नक्कीच आवडेल. मी आत्मनिर्भरता आणि शेतीवर इतका भर का देत आहे, आणि शेतीची आणि  शेतकऱ्यांची भूमिका यात काय आहे, हे आपण सर्वानी समजून घेऊन  मिशन मोडमध्ये काम करण्याची गरज आहे. आज आपण ज्या गोष्टींची आयात करण्यासाठी सर्वाधिक खर्च करतो त्या गोष्टी  म्हणजे खाद्यतेल, खते, कच्चे तेल आहे. हे खरेदी करण्यासाठी दरवर्षी लाखो कोटी रुपये  आपल्या इतर देशांना द्यावे लागतात. परदेशात कोणतीही अडचण आली की त्याचा पूर्ण परिणाम आपल्यावरही होतो.

आता जसे की, पहिल्यांदा  कोरोना आला  तसतसे आपण अडचणींना तोंड देत,  दिवस काढत होतो. मार्ग शोधत होतो . कोरोना अद्याप  पूर्ण गेलेला नसताना याच दरम्यान युद्ध पुकारले गेले. आणि ही अशी जागा आहे जिथून आपण अनेक वस्तू खरेदी करायचो.  जिथून  आपल्या  जास्त गरजा पूर्ण व्हायच्या  ते देश युद्धात अडकले आहेत.अशा देशांवर युद्धाचा परिणामही अधिक झाला आहे.

आता खताचेच घ्या. युरिया असो, डीएपी असो वा इतर खते, ती जागतिक  बाजारात दिवसेंदिवस महाग होत आहेत, त्याचा इतका आर्थिक भार आपल्या देशावर पडत आहे.आज आपण परदेशातून 75-80 रुपये किलोने युरिया खरेदी करतो.पण आपल्या देशातील शेतकऱ्यांवर बोजा पडू नये, आपल्या शेतकऱ्यांना नवीन संकटाचा सामना करावा लागू नये,   यासाठी आपण जो  युरिया बाहेरून 70-80 रुपयांना आणतो , तो आम्ही शेतकऱ्यांना 5 किंवा 6 रुपयांना उपलब्ध करून देतो  बंधूंनो,जेणेकरून माझ्या शेतकरी बंधू भगिनींना त्रास होऊ नये.शेतकऱ्यांना कमी दरात खते मिळावीत, यासाठी यंदा आता सरकारी तिजोरीवर बोजा पडत असल्याने अनेक कामे करण्यात अडथळे येत आहेत.केंद्र सरकारला  या युरियाच्या खरेदीसाठी  यंदा सुमारे अडीच लाख कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत.
 
बंधु आणि भगिनींनो,

आयातीवर होणारा  खर्च कमी करण्यासाठी , देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी , आपल्याला सगळ्यांना मिळून संकल्प करायलाच लागेल , त्या दिशेने सर्वांनी मिळून वाटचाल करावीच  आहे,   परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या खाण्याच्या वस्तू , शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू यांच्या आयातीपासून मुक्तीचा संकल्प आपल्या सगळ्यांना मिळून करावाच लागेल. कच्चे तेल आणि वायूवरील परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी आज देशात जैवइंधन, इथेनॉलवर बरेच काम सुरू आहे.या कामाशी शेतकरी थेट  जोडलेला आहे, आपली शेती जोडलेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनातून तयार होणाऱ्या इथेनॉलवर गाड्या चालाव्यात  आणि कचऱ्यापासून, शेणापासून बायोगॅस बनवून बायो-सीएनजी तयार करण्याचे  , हे काम आज केले जात आहे. खाद्यतेलाच्या आत्मनिर्भरतेसाठी  आम्ही पाम तेल अभियान  देखील सुरू केले आहे.

आज मी तुम्हा सर्व शेतकरी मित्रांना आवाहन करतो की, या अभियानाचा  जास्तीत जास्त लाभ घ्यावा.तेलबियांचे उत्पादन वाढवून आपण खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. यासाठी देशातील शेतकरी पूर्णपणे सक्षम आहेत.2015 मध्ये जेव्हा मी तुम्हाला  डाळींच्या बाबतीत,आवाहन केले होते , तुम्ही माझे हे आवाहन मनावर घेतले आणि तुम्ही ते करून दाखवलेत. नाहीतर पूर्वी काय परिस्थिती होती, आपल्याला  परदेशातून डाळही आणून खायला लागत होती.  जेव्हा आपल्या  शेतकऱ्यांनी निर्धार केला तेव्हा त्यांनी डाळींचे उत्पादन जवळपास 70 टक्क्यांनी वाढवले. अशाच  इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला पुढे जायचे आहे, भारताची शेती अधिक आधुनिक बनवायची आहे, नवीन उंची गाठायची आहे.स्वातंत्र्याच्या अमृत काळात  आपण शेतीला सुंदर  आणि समृद्ध करू, या निर्धाराने मी माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना, स्टार्ट अप्सशी संबंधित सर्व तरुणांना माझ्याकडून खूप  खूप  शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद  !

****

Gopal CRadhika/Ashutosh/Sonal/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1868722) Visitor Counter : 414