पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल लोक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केल्यानंतर जाहीर कार्यक्रमाला संबोधित केले


महाकालची पूजा, आरती केली आणि दर्शन घेतले

"उज्जैनने हजारो वर्षांपासून भारताची संपत्ती आणि समृद्धी, ज्ञान आणि सन्मान , संस्कृती आणि साहित्याचे नेतृत्व केले आहे"

"उज्जैनचा प्रत्येक कण अध्यात्मात गुंतला आहे, आणि तो कानाकोपऱ्यात दिव्य ऊर्जेचा संचार करतो"

"यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, राष्ट्राने आपला सांस्कृतिक उत्कर्ष साध्य करणे आणि अभिमानाने आपली ओळख जपणे आवश्यक आहे"

स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये, भारताने 'गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती' आणि 'आपल्या वारशाचा अभिमान' यासारख्या पंचप्रणांसाठी आवाहन केले

“माझे असे मत आहे, आपल्या ज्योतिर्लिंगांचा विकास हा भारताच्या आध्यात्मिक प्रकाशाचा विकास आहे , भारताचे ज्ञान आणि तत्त्वज्ञानाचा विकास आहे”

"भारताचे सांस्कृतिक तत्वज्ञान पुन्हा एकदा सर्वोच्च ठरत आहे आणि जगाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज होत आहे"

"भारत आध्यात्मिक विश्वासामुळे हजारो वर्षांपासून अमर आहे"

"भारतासाठी धर्म म्हणजे आपल्या कर्तव्यांचा सामूहिक दृढनिश्चय "

"आजचा नवा भारत आपल्या प्राचीन मूल्यांसह पुढे जाताना श्रद्धेबरोबरच विज्ञान आणि संशोधनाच्या परंपरेचे पुनरुज्जीवन करत आहे"

"भारत आपले वैभव आणि समृद्धी पुनर्स्थापित करत आहे, संपूर्ण जगाला आणि संपूर्ण मानवतेला याचा फायदा होईल"

"भारताचे दिव्यत्व शांततामय जगासाठी मार्ग सुकर करेल"

Posted On: 11 OCT 2022 11:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11  ऑक्टोबर  2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकाल लोक प्रकल्पाचा पहिला टप्पा राष्ट्राला समर्पित केला आणि मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरातील गर्भगृहात पूजा आणि आरती केली तसेच  एका जाहीर  कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर  त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध गायक  कैलाश खेर यांनी श्री महाकालचे स्तुती गान सादर केले . लाईट, साउंड शो देखील आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात भगवान महाकालच्या  जयजयकाराने केली. ते म्हणाले, जय महाकाल! उज्जैनची ही ऊर्जा, हा उत्साह!  अवंतिकेचे तेज, ही  अद्भुतता, हा आनंद !  महाकालचा हा महिमा ! 'महाकाल लोक'मध्ये लौकिक काहीही नाही. भगवान शंकराच्या सहवासात काहीही  सामान्य नाही. सर्व काही अलौकिक आणि विलक्षण आहे. हे सगळे अविस्मरणीय आणि अविश्वसनीय आहे. पंतप्रधान म्हणाले की, जर एखाद्याला महाकालचा आशीर्वाद मिळाला तर कालचे अस्तित्व नाहीसे होते, काळाच्या सीमा मिटवल्या  आणि शून्यातून अनंताकडे प्रवास सुरू होतो.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार उज्जैन हे केवळ भारताचे केंद्र नसून ते भारताच्या आत्म्याचेही केंद्र आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सात पवित्र शहरांमध्ये उज्जैनची गणना केली जाते. आणि हे एक असे ठिकाण आहे जिथे भगवान कृष्ण स्वतः शिक्षणासाठी आले होते. उज्जैनने राजा विक्रमादित्याचे वैभव आणि भारताच्या सुवर्णयुगाचा प्रारंभ पाहिला आहे. उज्जैनने स्वतःमध्ये इतिहास सामावून घेतला  आहे, असे  पंतप्रधानांनी नमूद केले. "उज्जैनचा प्रत्येक कण न कण अध्यात्मात गुंतला आहे आणि तो काना-कोपऱ्यात दिव्य ऊर्जेचा संचार करत आहे ". पंतप्रधान  म्हणाले, "उज्जैनने हजारो वर्षांपासून भारताची संपत्ती आणि समृद्धी, ज्ञान आणि सन्मान , संस्कृती आणि साहित्याचे नेतृत्व केले आहे."

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, राष्ट्राने आपला सांस्कृतिक उत्कर्ष साध्य करणे आणि अभिमानाने आपली ओळख जपणे आवश्यक आहे" असे पंतप्रधान म्हणाले.  सांस्कृतिक आत्मविश्‍वासाचे महत्त्व अधोरेखित करत  पंतप्रधान म्हणाले, एखाद्या राष्ट्राचे सांस्कृतिक वैभव अफाट असते , जेव्हा त्याच्या यशाचा ध्वज जागतिक पटलावर फडकत असतो. आणि, यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी, राष्ट्राने आपला सांस्कृतिक उत्कर्ष गाठणे  आणि अभिमानाने आपली ओळख जपणे हे  देखील आवश्यक आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये, भारताने 'गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती' आणि 'आपल्या वारशाचा अभिमान' यासारख्या पंचप्रणांचे आवाहन केले. त्याच उद्देशाने अयोध्येत भव्य राममंदिराचे विकास कार्य जलद गतीने सुरू आहे. काशीमधील विश्वनाथ धाम भारताच्या सांस्कृतिक राजधानीचा अभिमान अधिक वृद्धिंगत करत आहे. --- सोमनाथमध्ये विकासकामांचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. उत्तराखंडमध्ये बाबा केदार यांच्या आशीर्वादाने केदारनाथ-बद्रीनाथ तीर्थक्षेत्र स्थळी  विकासाचे नवे अध्याय लिहिले जात आहेत.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ,आपले चार धामही चारधाम प्रकल्पाद्वारे कोणत्याही हवामानाशी सुसंगत अशा 

रस्त्यांशी जोडले जाणार आहेत", असे पंतप्रधान म्हणाले.स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेच्या साहाय्याने  देशभरात आपल्या आध्यात्मिक चेतनेच्या अशा अनेक केंद्रांचा अभिमान पुनरुज्जीवित केला जात आहे. आणि आता याच  मालिकेत, हे भव्य 'महाकाल लोक' भूतकाळाच्या वैभवाने भविष्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी ज्योतिर्लिंगाच्या महत्त्वासंदर्भात  त्यांची संकल्पना स्पष्ट केली. माझा विश्वास आहे, आपल्या ज्योतिर्लिंगांचा हा विकास म्हणजे भारताच्या आध्यात्मिक तेजाचा , भारताच्या ज्ञानाचा आणि तत्त्वज्ञानाचा विकास आहे. भारताचे हे सांस्कृतिक तत्वज्ञान पुन्हा एकदा शिखरावर पोहोचत आहे आणि जगाला मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज होत आहे., असे ते म्हणाले. भगवान महाकाल हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे आणि ही अशी शिवाची रूपे आहेत ज्यांची भस्म आरती जगभर प्रसिद्ध आहे.प्रत्येक भाविकाला  त्याच्या आयुष्यात भस्म आरती एकदातरी नक्कीच पहायची असते. या परंपरेत मला आपल्या भारताचे  चैतन्य आणि चेतनाही  दिसते, , असे मोदी यांनी सांगितले.

भगवान शिवाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले कीसोयम् भूतिम विभूषणः म्हणजेच जो भस्म धारण करतो तो देखील 'सर्वाधिपः सर्वदा ' असतो. तो अनादी आणि अविनाशीही आहे.म्हणून, जिथे महाकाल आहे, तिथे कालखंडाच्या  सीमा नाहीत.महाकालाच्या शरणात, विषातही स्पंदन असते.महाकालच्या सान्निध्यात  अंतामधूनही संजीवनी मिळते, असेही ते म्हणाले.

हा आपल्या संस्कृतीचा  आध्यात्मिक आत्मविश्वास आहे, ज्यामुळे भारत हजारो वर्षांपासून चिरस्थायी आहे. जोपर्यंत आपल्या श्रद्धेची ही केंद्रे जागृत आहेत, तोपर्यंत भारताची चेतना जागृत आहे आणि भारताचा आत्मा जागृत आहे, , असे मोदी यांनी राष्ट्राच्या जीवनातील अध्यात्माची भूमिका  अधिक विशद करताना सांगितले.

,उज्जैनची ऊर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इल्तुतमिश सारख्या आक्रमकांबद्दल पंतप्रधानांनी इतिहासाचे स्मरण करून माहिती दिली. भारताचे शोषण करण्यासाठी भूतकाळात  केलेल्या प्रयत्नांचीही  मोदी यांनी आठवण करून दिली. आपल्या ऋषी-मुनींचा संदर्भ देत  मोदी म्हणाले की, महाकाल शिवाच्या आसऱ्यामध्ये  मृत्यू आपले काही  करू शकतो ? भारताचे पुनरुज्जीवन झाले, नंतर या श्रद्धेच्या या  प्रामाणिक केंद्रांच्या उर्जेतून पुन्हा उदय झाला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज पुन्हा एकदा अमर अवंतिका भारताच्या सांस्कृतिक चिरंतनाचा जयघोष  करत आहे'', असे त्यांनी सांगितले.

भारतासाठी  धर्म म्हणजे काय यावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी अधोरेखित केले कीधर्म म्हणजे आपल्या कर्तव्यांचा  सामूहिक निर्धार आहे." आपल्या संकल्पांचे ध्येय जगाचे कल्याण आणि मानवजातीची सेवा आहे."  आपण भगवान शिवाची आराधना करतो, आणि अनेक प्रकारे सर्व जगाचे कल्याण करणार्‍या विश्वपतीसमोर नतमस्तक होतो, याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. भारतातील तीर्थक्षेत्रे, मंदिरे, मठ आणि श्रद्धा केंद्रे यांचे हे चैतन्य  नेहमीच जागृत राहिले आहे, , असे त्यांनी सांगितले. "जगाच्या भल्यासाठी, जगाच्या हितासाठी  किती प्रेरणा इथून बाहेर येऊ शकतात?" असे उदगार मोदी यांनी काढले.---- अध्यात्म आणि शिक्षण याबद्दल बोलताना, काशीक्षेत्र हे धर्मासह ज्ञान, तत्वज्ञान आणि कला यांची राजधानी आहे तर उज्जैनसारखी स्थळे खगोलशास्त्राशी संबंधित संशोधनासाठी प्रसिध्द आहेत याकडे पंतप्रधानांनी निर्देश केला. आजचा नवा भारत त्याच्या प्राचीन मूल्यांसह प्रगती करत आहे आणि त्याचवेळी दृढ विश्वासासह विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परंपरेचे पुनरुज्जीवन देखील करत आहे असे स्पष्टीकरण पंतप्रधानांनी दिले. खगोलशास्त्राच्या क्षेत्रात आज आपण जगातील महासत्तांच्या बरोबरीला उभे आहोत. भारताच्या चांद्रयान आणि गगनयानासारख्या अंतराळ मोहिमांवर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले की आज भारत स्वतःसह इतर देशांचे उपग्रह देखील अवकाशात प्रक्षेपित करत आहे. भारत आता आकाशात झेप घेण्यासाठी सज्ज आहे, मोदी म्हणाले, संरक्षण क्षेत्रात, भारत संपूर्ण शक्तीनिशी स्वावलंबनाच्या दिशेने प्रवास करत आहे.क्रीडा क्षेत्रापासून स्टार्ट अप उद्योगांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारतातील युवा वर्ग जागतिक मंचावर आपली प्रतिभा सादर करत आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, जेथे नवोन्मेष असतो तेथे नूतनीकरण होते. गुलामगिरीच्या काळात झालेल्या नुकसानाबाबत टिप्पणी करताना, पंतप्रधान म्हणाले, भारतातील अभिमानाच्या, सन्मानाच्या आणि वारशाच्या जागांचे नूतनीकरण करून देश आपले वैभव पुन्हा प्राप्त करून घेत आहे. ते पुढे म्हणाले संपूर्ण देशासह सगळ्या मानवतेला याचा लाभ होणार आहे. भाषणाच्या शेवटी पंतप्रधान म्हणाले, महाकाल देवाच्या आशीर्वादाने, भारतीय उदात्तता जगभरात विकासाच्या नव्या संधी निर्माण करेल आणि भारताचे दिव्यत्व शांततामय जगासाठी पथ निर्माण करेल. 

पंतप्रधान मोदी यांनी आज या कार्यक्रमापूर्वी, उज्जैन येथे महाकाल लोक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्रार्पण केले. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, छत्तीसगडचे राज्यपाल अनुसुय्या उईके, झारखंडचे राज्यपाल रमेश बन्स, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, डॉ.वीरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंदिया आणि जी किशन रेड्डी तसेच केंद्रीय राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते आणि प्रल्हाद पटेल यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

S.Patil/Sushama/Sonal C/ Sanjana/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1866957) Visitor Counter : 214