पंतप्रधान कार्यालय
गुजरातच्या मेहसाणाजवळ मोढेरा येथे पंतप्रधानांच्या हस्ते एकूण 3900 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी
मोढेरा हे देशातील पहिले 24x7 सौर ऊर्जेवर चालणारे गाव ठरल्याची पंतप्रधानांची घोषणा
“आज मोढेरा, मेहसाणा आणि एकूणच उत्तर गुजरातच्या विकासाच्या क्षेत्रात ऊर्जासंपन्न अशी नवी सुरुवात होत आहे"
"जगात कुठेही सौर ऊर्जेवर चर्चा झाली, तर त्यात यापुढे मोढेराचा उल्लेख नक्कीच होईल"
"तुम्हाला हवी तेवढी वीज वापरा आणि उरलेली वीज सरकारला विका"
"दुहेरी इंजिनचे नरेंद्र आणि भुपेंद्र यांचे सरकार एकभावनेने काम करत आहे"
"जसा सूर्याचा प्रकाश कुठलाही भेदभाव करत नाही, त्याचप्रमाणे विकासाचा हा प्रकाशही प्रत्येक घर आणि झोपडीपर्यंत समानतेने पोहचेल"
Posted On:
09 OCT 2022 11:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातच्या मेहसाणाजवळच्या मोढेरा, इथे 3900 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. तसेच मोढेरा हे गाव 24x7 सौर ऊर्जेवर चालणारे देशातले पहिले गाव ठरल्याची घोषणा देखील पंतप्रधानांनी केली.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना पंतप्रधान म्हणाले की आज मोढेरा, मेहसाणा आणि संपूर्ण उत्तर गुजरातसाठी विकासाच्या नव्या ऊर्जेची सुरुवात होत आहे. आज विजेपासून ते पाण्यापर्यंत, रेल्वेपासून ते रस्तेवाहतूक, डेअरी ते कौशल्य विकास, आणि आरोग्यासह विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणी झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या सर्व विकासप्रकल्पांचे लाभ सांगतांना पंतप्रधान म्हणाले की यामुळे या प्रदेशात मोठा रोजगार येईल आणि शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढेल. त्याशिवाय, या प्रकल्पामुळे ह्या भागातील वारसा पर्यटनालाही चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी देशबांधवांना शरद पौर्णिमा आणि वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. महर्षी वाल्मिकी यांनी प्रभू रामचंद्र यांचे समरस जीवन आपल्यासमोर मांडले आणि समानतेची शिकवण दिली, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, पूर्वी मोढेरा सूर्यमंदिरासाठी ओळखले जायचे. मात्र आता सूर्यमंदिरातून सौर ग्रामची प्रेरणा मिळाली आहे यामुळे जगाच्या पर्यावरण आणि उर्जा नकाशावर स्थान मिळवले आहे. गेली अनेक शतके मोढेरा उध्वस्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र आता मोढेरा प्राचीन आणि आधुनिकतेच्या संगमाचे उदाहरण बनले आहे. “जगात कुठेही सौर उर्जेवर चर्चा झाली तर त्यात मोढेराचा उल्लेख जरूर केला जाईल,” असे ते म्हणाले. या भागातील सौर उर्जा निर्मिती आणि वीज पुरवठा याचे सगळे श्रेय पंतप्रधानांनी गुजरात आणि केंद्र सरकारशी संबंधित लोकांना दिले. ते म्हणले की समर्पित आणि दूरगामी विचार आणि स्वच्छ नियत असेल तर काहीही अशक्य नाही.
पंतप्रधान म्हणाले की सौर ऊर्जेमुळे मोढेराच्या घराघरात उजेड पोहोचेल, शेतीच्या गरजा भागवल्या जातील आणि तसेच वाहने देखील चार्ज होतील. “21व्या शतकातील आत्मनिर्भर भारतासाठी आपल्याल्या उर्जेची गरज पूर्ण करण्याचे प्रयत्न वाढवावे लागतील,” असे मोदी म्हणाले. ते म्हणाले की विजेचे निर्माते आणि वापरकर्ते हे लोकच असतील, या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. “तुम्हाला हवी तेवढी वीज तुम्ही वापरा आणि जास्तीची वीज सरकारला विका,” ते म्हणाले. यामुळे वीज बिलांपासून देखील सुटका होईल आणि त्यातून अधिकचे उत्पन्न देखील सुरु होईल असे मोदी म्हणाले. आजपर्यंत असा शिरस्ता होता, की सरकार वीज निर्मिती करत असे आणि लोक ती सरकारकडून विकत घेत असत, मात्र आज लोकांनी आपल्या घरांवर आणि शेतात सौर उर्जा निर्मिती करून त्या विजेचा वापर घरात आणि सिंचनासाठी सौर पंपासाठी करावा यासाठी केंद्र सरकार धोरण आखत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कठीण काळ आठवत पंतप्रधान म्हणाले की विजेच्या अभावी सर्वात जास्त कुठल्या गोष्टीवर परिणाम झाला असेल तर ते आहे मुलींचे शिक्षण. ते असेही म्हणाले की मेहसाणाचे लोक उपजतच गणित आणि विज्ञान या विषयात हुशार असतात. “जर तुम्ही अमेरिकेला गेलात, तर तिथे गणिताच्या क्षेत्रात उत्तर गुजरातचा चमत्कार दिसून येईल. जर तुम्ही संपूर्ण कच्छ फिरलात, तुम्हाला मेहसाणा जिल्ह्यातले शिक्षक दिसतील. विजेच्या अभावामुळे इथले लोक ते पात्र असलेल्या उंचीपर्यंत पोहोचू शकले नाहीत,” असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या दोन दशकात इथे असलेल्या सरकारवर लोकांनी विश्वास दाखवला म्हणूनच गुजरातने देशात आपला ठसा उमटवला आहे.
पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केले होते, त्या काळाचे स्मरण करून ते म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पात पाण्यासाठी मोठी तरतूद करावी लागत होती, कारण गुजरात दहापैकी सात वर्षे दुष्काळाने ग्रासला होता. म्हणूनच गुजरातमधील जलसंकटावर पंचामृत योजना आम्ही आणली. प्रत्येक गावाला चोवीस तास वीज पुरवण्यासाठी उंझा येथे सुरू केलेल्या ज्योतिग्राम योजनेच्या यशाचे स्मरण पंतप्रधानांनी केले. हे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने एक हजार दिवसांचा कालावधी दिला होता. सुजलाम सुफलाम योजनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी, उत्तर गुजरातमधल्या शेतांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठीच्या सुजलाम सुफलाम कालव्याकरिता आपल्या जमिनी देणार्या शेतकर्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आज पाण्याशी संबंधित योजनांच्या उद्घाटनाचा लाभ कुटुंब, माता आणि भगिनींच्या आरोग्याला होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
गेल्या दोन दशकांमध्ये सरकारने कनेक्टिव्हिटीवर भर दिला असल्याचे आणि दुहेरी इंजिन असलेल्या सरकारसह नरेंद्र आणि भूपेंद्र एकभावनेने काम करत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. 1930 मध्ये ब्रिटीशांनी मेहसाणा-अंबाजी-तरंगा-आबुरोड रेल्वे मार्गाच्या विकासाचा आराखडा तयार केला होता, परंतु त्यानंतरच्या सरकारांनी त्याकडे लक्ष दिले नाही, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. “आम्ही हे काम केले , सर्व योजना आखल्या आणि त्यातून किती आर्थिक सुबत्ता येणार आहे याची तुम्ही कल्पना करू शकता”, असे ते म्हणाले.
सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. आपली औषधे या जनऔषधी केंद्रांवरून खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. जनऔषधी केंद्रावर जेनेरिक औषधांची किंमत 100-200 रुपये आहे, जी पूर्वी 1000 रुपयांना मिळत असत.पर्यटन उद्योग लोकांसाठी रोजगाराचा मोठा स्रोत आहे, असे मत पंतप्रधानांनी या उद्योगावर बोलताना व्यक्त केले. “वडनगरमध्ये केलेले उत्खनन बघा!”, येथे हजारो वर्ष जुने अवशेष सापडले आहेत.” असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या दोन दशकांत गुजरातमधील मंदिरे आणि शक्तीपीठांच्या जीर्णोद्धारासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. "सोमनाथ, चोटीला आणि पावागढ़ येथील सुधारलेली परिस्थिती ही त्याची उदाहरणे आहेत'', ते पुढे म्हणाले, "पावागढ़ने 500 वर्षे ध्वज फडकावला नव्हता, मी आलो आणि 500 वर्षांनंतर ध्वज फडकवला."
दुहेरी इंजिन सरकारचा पाया असलेल्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ या तत्त्वाबाबत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना भाष्य केले. सूर्याचा प्रकाश ज्याप्रमाणे भेदभाव न करता सर्वत्र पोहोचतो त्याप्रमाणे विकासाचा प्रकाशही प्रत्येक घरात आणि झोपडीपर्यंत पोहोचतो, असे पंतप्रधानांनी शेवटी सांगितले.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, भरतसिंह डाभी, शारदाबेन पटेल आणि जुगलजी लोखंडवाला आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांकडून राष्ट्राला समर्पित प्रकल्पांमध्ये अहमदाबाद-मेहसाणा गेज रूपांतर प्रकल्पाच्या साबरमती-जगुदान विभागाचे गेज रूपांतर समाविष्ट आहे; ओएनजीसीचा नंदसन भूवैज्ञानिक तेल उत्पादन प्रकल्प; खेरावा ते शिंगोडा तलावापर्यंत सुजलाम सुफलाम कालवा; धरोई धरण स्थित वडनगर खेरालू आणि धरोई गट सुधार योजना; बेचाराजी मोढेरा- चनास्मा राज्य महामार्गाच्या भागाचे चौपदरीकरण प्रकल्प; उंझा-दसज उपेरा लाडोल (भांखर एप्रोच रोड) च्या एका खंडाचा विस्तार करण्याचा प्रकल्प; प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राची नवीन इमारत, सरदार पटेल लोक प्रशासन संस्था (SPIPA), मेहसाणा; आणि मोढेरा येथील सूर्य मंदिरातील प्रोजेक्शन मॅपिंग, इत्यादींचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणीही केली. पाटन ते गोजरियापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग -68 च्या एका खंडाच्या चौपदरीकरण मेहसाणा जिल्ह्यातील जोताना तालुक्यातील चलसन गावात जलशुद्धीकरण संयंत्र ; दूधसागर डेअरीमध्ये नवीन स्वयंचलित दूध पावडर संयंत्र आणि यूएचटी दूध खोके संयंत्र ; मेहसाणा सामान्य रुग्णालयाचा पुनर्विकास आणि पुनर्बांधणी; आणि मेहसाणा व उत्तर गुजरातमधील इतर जिल्ह्यांसाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना यांचा यात समावेश आहे .
पंतप्रधानांनी मोढेरा गावाला भारतातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले; अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प असून मोढेरा या सूर्यमंदिर असलेल्या शहराचे सौर विद्युतीकरण पंतप्रधानांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारे आहे. यामध्ये ग्राउंड माउंटेड सोलर पॉवर प्लांट आणि निवासी आणि सरकारी इमारतींवर 1300 हून अधिक रूफटॉप सोलर सिस्टीम विकसित करणे समाविष्ट आहे, ज्यात सर्व बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (बीईएसएस ) सह एकत्रित केल्या आहेत. भारताचे अक्षय ऊर्जा कौशल्य उतरंडीपर्यंतच्या लोकांना कसे सक्षम करू शकते हे या प्रकल्पातून दिसून येईल.
* * *
S.Kane/R.Aghor/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866486)
Visitor Counter : 988
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam