पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अहमदाबादमधील नवभारत साहित्य मंदिर द्वारा आयोजित ‘कलम नो कार्निव्हल’पुस्तक मेळ्याच्या उद्‌घाटन समारंभाला पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित


"हा पुस्तक मेळा नवोदित आणि युवा लेखकांसाठी एक व्यासपीठ ठरले असून गुजरातचे साहित्य आणि ज्ञान विस्तारण्यातही मदत करत आहे"

“"पुस्तके आणि ग्रंथ ही दोन्ही आपल्या विद्या उपासनेची मूळ तत्वे आहेत"

"स्वातंत्र्य संग्रामातील विस्मृतीत गेलेल्या गौरवशाली गोष्टी आम्ही देशासमोर आणत आहोत"

"तंत्रज्ञान हा आपल्यासाठी निश्चितच माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, मात्र तो पुस्तके आणि पुस्तकांचा अभ्यास यांची जागा घेऊ शकत नाही"

“जेव्हा माहिती आपल्या मेंदूमध्ये असते, तेव्हा मेंदू त्या माहितीचे सखोल विश्लेषण करतो आणि यातून नवीन आयाम उदयाला येतात . यामुळे नवीन संशोधन आणि नवोन्मेषचा मार्ग सुकर होतो. यामध्ये पुस्तके हे आपले सर्वोत्तम मित्र बनतात”

Posted On: 08 SEP 2022 8:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मधील नवभारत साहित्य मंदिराने आयोजित केलेल्या ‘कलम नो कार्निव्हल’ पुस्तक मेळ्याच्या  उद्‌घाटन समारंभाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

या मेळ्याला  संबोधित करताना, पंतप्रधानांनी ‘कलम नो कार्निव्हल’ च्या  भव्य कार्यक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन केले. अहमदाबादमधील 'नव भारत साहित्य मंदिर'ने सुरू केलेल्या पुस्तक मेळ्याची परंपरा वर्षागणिक अधिक समृद्ध होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हा पुस्तक मेळा नवोदित  आणि युवा लेखकांसाठी एक व्यासपीठ बनला असून  गुजरातचे साहित्य आणि ज्ञान विस्तारण्यास मदत करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद  केले. या समृद्ध परंपरेबद्दल पंतप्रधानांनी नवभारत साहित्य मंदिर आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

'कलम नो कार्निव्हल' हे हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमधील पुस्तकांचे एक मोठे संमेलन आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्यात '‘वांचे गुजरात’ अभियान ' सुरू केले होते आणि आज 'कलम नो कार्निव्हल' सारखे अभियान गुजरातचा तो संकल्प पुढे नेत आहे, असे  मोदी म्हणाले. पुस्तक  आणि ग्रंथ ही दोन्ही आपल्या विद्या उपासनेची मूळ तत्वे आहेत. "गुजरातमध्ये ग्रंथालयांची खूप जुनी परंपरा आहे." प्रांतातील  सर्व गावांमध्ये ग्रंथालये स्थापन करणारे वडोदराचे  महाराजा सयाजीराव गायकवाड, 'भागवत गोमंडल' या विशाल कोशाची निर्मिती करणारे गोंडलचे महाराज भागवत सिंह जी आणि 'नर्म कोश' संपादित करणारे कवी नर्मद यांच्या योगदानाचा  पंतप्रधानांनी उल्लेख केला. पुस्तक, लेखक, साहित्य निर्मितीच्या बाबतीत गुजरातचा इतिहास खूप समृद्ध आहे असे ते म्हणाले.  अशा प्रकारचे पुस्तक मेळावे गुजरातच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत विशेषत: तरुणांपर्यंत पोहोचावेतजेणेकरून त्यांना समृद्ध इतिहासाबाबत जाणून घेता येईल आणि यातून त्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दरम्यान हा पुस्तक मेळा होत असल्याकडे पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले. ते  म्हणाले की, आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे पुनरुज्जीवन करणे हा अमृत महोत्सवाचा प्रमुख पैलूंपैकी एक  आहे. स्वातंत्र्य संग्रामातील विस्मृतीत गेलेल्या  गौरवशाली गोष्टी  आम्ही देशासमोर आणत आहोत . 'कलम नो कार्निव्हल' सारख्या कार्यक्रमांमुळे देशात या अभियानाला चालना मिळेल , असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित पुस्तकांना विशेष महत्त्व दिले जावे तसेच अशा लेखकांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे  यावर त्यांनी भर दिला.  "मला खात्री आहे की हा कार्यक्रम या दिशेने एक सकारात्मक माध्यम ठरेल ." असे पंतप्रधान  म्हणाले.

पवित्र ग्रंथ, संहिता आणि पुस्तके प्रभावी आणि उपयोगी रहावी यासाठी त्यांचा वारंवार  अभ्यास केला पाहिजे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार  केला. ते म्हणाले की आजच्या काळात  आणि युगात जिथे लोक इंटरनेटची मदत घेतात, तिथे  ते अधिक महत्वाचे ठरते.  "तंत्रज्ञान हा  आपल्यासाठी निश्चितच माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, मात्र तो पुस्तके आणि पुस्तकांचा अभ्यास यांची जागा घेऊ  शकत नाही" असे ते म्हणाले. जेव्हा माहिती आपल्या मेंदूमध्ये असते, तेव्हा मेंदू त्या माहितीचे सखोल विश्लेषण करतो आणि यातून नवीन आयाम उदयाला येतात . यामुळे नवीन संशोधन आणि नवोन्मेषचा मार्ग सुकर होतो. यामध्ये पुस्तके हे आपले सर्वोत्तम मित्र  बनतात असे पंतप्रधानांनी नमूद केले.

सध्याच्या  झपाट्याने बदलत चाललेल्या  जगात पुस्तक वाचनाची सवय लावून घेणे  अत्यंत महत्त्वाचे आहे यावर भर देत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. "पुस्तके प्रत्यक्ष हातात  असोत किंवा डिजिटल स्वरुपात!",  "मला विश्वास आहे की, अशा कार्यक्रमांमुळे युवकांमध्ये पुस्तकांबद्दल आवश्यक ओढ निर्माण करण्यात आणि त्यांना त्यांचे महत्त्व समजण्यास मदत होईल." असे ते म्हणाले.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1857880) Visitor Counter : 134