आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि सामाजिक न्याय तसेच सक्षमीकरण मंत्रालय यांच्यातील नव्या सामंजस्य कराराद्वारे केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत तृतीयपंथी व्यक्तींना आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत संयुक्त आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या


केंद्र सरकारच्या या निर्णायक कृतीने आजच्या दिवसाला मुलभूत सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त करून दिले आहे: केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय

शिक्षण, सन्माननीय जीवन, आरोग्यविषयक सुविधा, उपजीविकेच्या संधी आणि कौशल्य वर्धन या पाच बाबींची हमी मिळण्यासाठी पावले उचलून समाजात बदल घडवून आणण्याच्या उद्दिष्टाप्रती भारत सरकार समर्पित आहे : केंद्रीय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार

Posted On: 24 AUG 2022 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्‍ट 2022

 

देशातील तृतीयपंथी व्यक्तींना आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत समावेशक तसेच संयुक्त आरोग्य सुविधाविषयक पॅकेज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत, केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्यातील  सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय तसेच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत प्राधिकरणाचे प्रमुख डॉ.आर.एस.शर्मा आणि सामाजिक न्याय तसेच सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव आर.सुब्रमण्यम यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

    

आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे असे सांगत, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की, हा सामंजस्य करार देशातील अशा प्रकारचा पहिलाच करार असून त्यातून देशातील तृतीयपंथी समुदायाला आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना या समाजात हक्काच्या आणि सन्माननीय जागेची सुनिश्चिती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. “या सामंजस्य करारामुळे, समाजात महत्त्वाच्या परिवर्तनवादी सुधारणेचा पाया घातला गेला आहे. देशभरातील सर्व घटकांमध्ये समानता असलेल्या समावेशक समाजाचा पुरस्कार करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असलेल्या आंतरराष्ट्रीय केंद्रात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होणे हे देखील अगदीच समर्पक आहे,” असे डॉ.मांडवीय म्हणाले.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि सामाजिक न्याय तसेच सक्षमीकरण विभाग यांच्यादरम्यान आज झालेल्या सामंजस्य करारामुळे तृतीयपंथीयांच्या राष्ट्रीय पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र मिळविलेल्या देशभरातील सर्व तृतीयपंथी व्यक्तींना केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य सुविधांचे लाभ मिळतील असे केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे प्रत्येक तृतीयपंथी लाभार्थी व्यक्तीसाठी दरवर्षी 5 लाखाचा निधी देण्यात येणार आहे. तृतीयपंथी व्यक्तींसाठी आता देण्यात आलेल्या एबीपीएम-जेएवाय पॅकेज तसेच लिंग पुनर्नियुक्ती शस्त्रक्रियेकरिता देण्यात येणाऱ्या विशेष पॅकेजसह तृतीयपंथी श्रेणीसाठी व्यापक महापॅकेजची रचना करण्यात येत आहे. देशभरातील एबीपीएम-जेएवाय योजनेच्या अंतर्गत कार्यरत कोणत्याही रुग्णालयात तृतीयपंथी लाभार्थ्यांना उपचार घेता येतील. केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे  पुरस्कृत अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तींनाच या योजनेतून लाभ घेता येईल.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार म्हणाले की, असे बदल लागू करण्याची तीव्र राजकीय इच्छाशक्ती असलेल्या देशात हा समाजपरिवर्तन घडवून आणणारा बदल घडून येतो आहे. शिक्षण, सन्माननीय जीवन, आरोग्यविषयक सुविधा, उपजीविकेच्या संधी आणि कौशल्य वर्धन या पाच बाबींची हमी मिळण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने उचललेल्या अनेक पावलांचा त्यांनी उल्लेख केला. 

समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांना सन्माननीय जीवन जगण्याची आणि उपजीविकेची संधी देऊन त्यांना समाज नियमांच्या जोखडातून मुक्त करण्याची सुनिश्चिती करण्यासाठी हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत असे ते म्हणाले.   

दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी आणि तृतीयपंथी समुदायाचे सदस्य देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1854114) Visitor Counter : 233