पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपतमध्ये 2G इथेनॉल संयंत्राचे केले राष्ट्रार्पण


"जैवइंधन हे निसर्गाच्या संरक्षणासाठीचा पर्याय आहे - जैवइंधन हे आपल्यासाठी हरित आणि पर्यावरण वाचवणारे इंधन आहे"

“राजकीय स्वार्थ आणि अल्पकालीन लाभाचा विचार कधीच प्रश्न कायमचे सोडवू शकत नाही”

"लोकांना मोफत गोष्टी देण्यासाठीच्या स्वार्थी घोषणा देशाला स्वावलंबी होण्यापासून रोखतील, प्रामाणिक करदात्यांवर भार वाढवतील आणि नवीन तंत्रज्ञानातील गुंतवणूक रोखतील"

"पुढील काही वर्षांत देशातील 75 टक्क्यांहून अधिक घरांना पाइपद्वारे गॅस मिळेल"

Posted On: 10 AUG 2022 9:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022

 

जागतिक जैवइंधन दिनानिमित्त, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे हरियाणातील पानिपत इथला 2G इथेनॉल संयंत्र राष्ट्राला समर्पित केले. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि नरेंद्रसिंग तोमरहरदीपसिंग पुरीरामेश्वर तेली आदी केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

जागतिक जैवइंधन दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. इथेनॉल संयंत्र  ही फक्त सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले.  या संयंत्रामुळे  दिल्ली, हरियाणा आणि  राष्ट्रीय राजधानी क्षेत्र -एनसीआरमधील प्रदूषण कमी होईल, असे ते म्हणाले. 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये हरियाणाच्या मुला मुलींनी केलेल्या शानदार कामगिरीबद्दल त्यांनी हरियाणाचे अभिनंदन केले.

निसर्गाची पूजा करणाऱ्या आपल्यासारख्या देशात जैवइंधन हा निसर्गाच्या  संरक्षणासाठी पर्याय  आहे. आपल्या शेतकरी बंधू भगिनींना हे चांगले समजते. जैवइंधन म्हणजे हरित इंधन, पर्यावरण वाचवणारे इंधन, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. हरियाणात तांदूळ आणि गहू मुबलक प्रमाणात पिकवले जातात. तिथल्या शेतकऱ्यांना पेंढा किंवा पिकांच्या अवशेषांच्या माध्यमातून  आणखी एक फायदेशीर साधन मिळेल.

कापणीनंतर राहिलेले पिकांचे अवशेष   न जाळता पानिपतचा जैव-इंधन प्रकल्प त्यांची विल्हेवाट लावू शकेल, यामुळे अनेक फायदे होतील, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. पहिला फायदा असा होईल की खुंटे जाळल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून पृथ्वी मातेला मुक्तता मिळेल, दुसरा फायदा असा होईल की, खुंट  कापणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन यंत्रणा, वाहतुकीसाठी नवीन सुविधा आणि नवीन जैवइंधन संयंत्रे यामुळे या सर्व गावांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तिसरा फायदा असा होईल की, शेतकऱ्यांसाठी ओझे आणि चिंतेचे कारण बनलेला पेंढा  त्यांच्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन होईल. चौथा फायदा म्हणजे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरण रक्षणात शेतकऱ्यांचे योगदान आणखी वाढेल. पाचवा फायदा असा होईल की देशाला पर्यायी इंधनही मिळेल. देशाच्या विविध भागात असे प्रकल्प निर्माण होत असल्याबद्दल  पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

राजकीय स्वार्थासाठी शॉर्टकटचा अवलंब करून समस्या टाळण्याकडे कल असणारे लोक कधीच प्रश्न कायमस्वरूपी सोडवू शकत नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. शॉर्टकटचा अवलंब करणार्‍यांना काही काळ टाळ्या मिळू शकतात आणि राजकीय फायदा मिळू शकतो, पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही. शॉर्टकटचा अवलंब केल्याने निश्चितच शॉर्ट सर्किट होईल. शॉर्टकटचा अवलंब करण्याऐवजी आपले सरकार समस्यांवर कायमस्वरूपी उपाय करण्यात गुंतले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पिकांच्या अवशेषांमुळे  उत्पन्न समस्यांबद्दल बरेच काही सांगितले जात आहे, पण शॉर्ट कटची  मानसिकता असलेल्यांना ते सोडवता आले नाही, असे ते म्हणाले.

सर्वसमावेशक पद्धतीने समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने उचलण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. 'पराली' किंवा पिकांच्या अवशेषासाठी  कृषी उत्पादक संघटनांना आधुनिक यंत्रांवर 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देऊन साहाय्य दिले जात आहे आणि आता हा आधुनिक प्रकल्प या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा ठरेल.  पेंढा  जाळण्याच्या सक्तीमुळे बदनाम झालेल्या शेतकऱ्यांना आता जैवइंधन निर्मितीत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाचा  अभिमान वाटेल, असे पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून पंतप्रधानांनी गोबरधन  योजनेचाही उल्लेख केला.

देशाच्या समस्यांवर कायमस्वरूपी आणि चिरस्थायी उपाय सुरू ठेवण्याची गरज अधोरेखित करत पंतप्रधानांनी नवीन खत प्रकल्प, नॅनो खते, खाद्यतेलासाठी नवीन मोहिमांबद्दलही माहिती दिली.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे गेल्या 7-8 वर्षांत देशाचे सुमारे 50 हजार कोटी रुपये परदेशात जाण्यापासून वाचले आहेत आणि तेवढीच रक्कम इथेनॉल मिश्रणामुळे आपल्या देशातील शेतकर्‍यांना मिळाली आहेयाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 8 वर्षांपूर्वीपर्यंत देशात केवळ 40 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होते; आता हे उत्पादन सुमारे 400 कोटी लिटर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

2014 पर्यंत देशात फक्त 14 कोटी एलपीजी गॅस जोडणी होत्या. देशाची निम्मी लोकसंख्या, माता-भगिनी, स्वयंपाकघरातील  धुरात बुडाल्या होत्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि  गैरसोयीमुळे भगिनी आणि मुलींना होणाऱ्या अपायांची  दखल यापूर्वी  घेतली गेली नाही, असे ते म्हणाले.  एकट्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना 9 कोटींहून अधिक गॅस जोडणी दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.आता आपण देशात जवळपास 100% एलपीजी व्याप्तीचे उद्दिष्ट गाठले आहे. 14 कोटींवरून वाढून आज देशात सुमारे 31 कोटी गॅस जोडण्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

आठ वर्षांपूर्वी असलेल्या 800 सीएनजी  स्टेशन्सवरून ही संख्या आता साडेचार हजारांहून अधिक झाली आहे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. "आज, जेव्हा आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत  असताना   येत्या काही वर्षांत देशातील 75 टक्क्यांहून अधिक घरांना पाइपद्वारे गॅस पुरवठा होईल या उद्दिष्टाच्या दिशेनेही  देश कार्यरत आहे," असे ते त्यांनी सांगितले.

राजकारणात स्वार्थ असेल तर कोणीही येऊन विनामूल्य  पेट्रोल-डिझेल देण्याची घोषणा करू शकतो.मात्र अशा प्रकारची पावले  आपल्या मुलांचे हक्क हिरावून घेतील आणि देशाला आत्मनिर्भर  होण्यापासून रोखतील, असे पंतप्रधान म्हणाले. अशा स्वार्थी धोरणांमुळे देशातील प्रामाणिक करदात्यांवरही बोजा वाढेल अशी टीका पंतप्रधानांनी केली. देशासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी  हेतू स्पष्ट हवा आणि वचनबद्धता असायला हवी. त्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम, धोरण आणि मोठी  गुंतवणूक आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

जर सरकारकडे पैसा नसेल तर इथेनॉल, बायोगॅस आणि सौर प्रकल्प यांसारखे प्रकल्पही  बंद होतील. असे पंतप्रधान म्हणाले. ''आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की , आपण नसलो तरी हा देश कायम राहील., तेथे राहणारी मुले नेहमीच  तेथे असतील.या चिरंतन भावनेने स्वातंत्र्यासाठी   प्राणांची आहुती देणाऱ्यांनी कार्य  केले आहे…...एक देश म्हणून आपण  स्वार्थी प्रवृत्तींना  वाढू देणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे.ही देशाची सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान म्हणाले की, अमृत महोत्सवादरम्यान संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात रंगला असताना, जे काही घडले आहे त्याकडे मी देशाचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो.या पवित्र सोहळ्याला बदनाम करण्याचा, आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.अशा लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशातही असे काही लोक आहेत जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडालेले आहेत.सरकारच्या विरोधात खोटे बोलूनही जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. अशा नैराश्यात,हे लोक काळ्या जादूकडे वळतानाही दिसत आहेत असे पंतप्रधान म्हणाले. काळ्या जादूची मानसिकता पसरवण्याचा प्रयत्न होत असतानाच्या  5 ऑगस्टच्या घटनांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.ज्यांना असे वाटते की काळे कपडे परिधान केल्याने निराशेचा काळ संपेल, पण त्यांना हे माहित नाही की काळ्या जादूवर  आणि अंधश्रद्धेवर  त्यांचा विश्वास असला तरी जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास कधीच परत येणार नाही. , असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले.''

पार्श्वभूमी

या संयंत्राचे लोकार्पण हा देशातील जैवइंधनाचे उत्पादन आणि वापर वाढवण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांत उचललेल्या अनेक पावलांच्या मालिकेचा  एक भाग आहे.ऊर्जा क्षेत्राला अधिक किफायतशीर, प्रवेश सुलभ, कार्यक्षम आणि शाश्वत बनविण्याच्या पंतप्रधानांच्या निरंतर  प्रयत्नांच्या अनुषंगाने हे संयंत्र उभारण्यात आले आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने  (आयोसीएल )   900 कोटीं रुपयांहून  अधिक खर्च करून  हे 2G इथेनॉल संयंत्र उभारले आहे आणि ते पानिपत शुद्धीकरण प्रकल्पाच्या  जवळ आहे.अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित,  हा प्रकल्प  दरवर्षी सुमारे 3 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी सुमारे 2 लाख टन भाताचा  पेंढा (पराली ) वापरून भारताच्या कचऱ्यातून संपत्ती  निर्माण प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय सुरु  करेल.

या प्रकल्पात  कृषी-पिकांच्या अवशेषांचा  वापर  केल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी  मिळवून देण्यासह त्यांना सक्षम करेलया प्रकल्पामुळे संयंत्र कार्यान्वयनामध्ये  सहभागी असलेल्या लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल आणि भात  पेंढा कापणी , हाताळणी, साठवणूक इत्यादीसाठी पुरवठा साखळीमध्ये अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल.

या प्रकल्पात शून्य द्रव विसर्जन असणार आहे. भाताचा पेंढा (पराली ) जाळण्याचे प्रमाण कमी करून,या  प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे 3 लाख टन कार्बन डायऑक्साइड  उत्सर्जनाच्या समतुल्य उत्सर्जित होणारे  हरितगृह वायूंचे प्रमाण कमी होईल. हे प्रमाण दरवर्षी देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या  सुमारे 63,000 गाड्या हटवण्याइतके समजले जाऊ शकते.

 

 

S.Kulkarni/P.Jambhekar/S.Chavan/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850668) Visitor Counter : 213