पंतप्रधान कार्यालय
जर्मनीमध्ये म्युनिक येथे भारतीय समुदायाने आयोजित स्वागत समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
26 JUN 2022 11:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2022
नमस्कार!
आपण सगळे कसे आहात ?
आपल्यापैकी अनेक लोक आज खूप दूर-दूरवरून अगदी लांबचा प्रवास करून आले आहात, असे मला सांगण्यात आले आहे. आपल्या सर्वांमध्ये मला भारताची संस्कृती दिसत आहे तसेच एकतेची आणि बंधुत्वाची भावना दिसून येत आहे. तुमच्याकडून मिळत असलेला स्नेह मी कधीच विसरू शकणार नाही. तुमच्या या प्रेमावर, या उत्साहावर आणि उल्हासावर माझा पूर्ण विश्वास आहे. हिंदुस्तानातले जे लोक या सर्व बातम्या पहात आहेत, त्यांचाही ऊर अभिमानाने भरून आला असेल.
मित्रांनो,
आजचा दिवस आणखी एका कारणाने ओळखला जातो. आज 26 जून आहे. जी लोकशाही आपला गौरव आहे, जी लोकशाही भारतीयांच्या गुणसूत्रामध्ये आहे. 47 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच त्या लोकशाहीला बंधनात अडकवण्याचा, लोकशाही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणीबाणीचा काळ म्हणजे भारताच्या सळसळत्या लोकशाहीच्या इतिहासाला लागलेल्या एका काळ्या डागाप्रमाणे आहे. मात्र या काळ्या डागावर अनेक युगांपासून चालत आलेल्या लोकशाही परंपरांच्या श्रेष्ठतेच्या शक्तीने विजय मिळवला. लोकशाहीच्या परंपरा अशा कृत्यांपेक्षा वरचढ ठरली.
लोकशाहीला पायदळी तुडविण्यासाठी जी कारस्थाने केली होती, त्याला लोकांनी लोकशाही पद्धतीनेच उत्तर दिले. आपण भारतीय कुठेही वास्तव्य करीत असू, आपल्या लोकशाहीचा प्रत्येकाला अभिमान वाटतो. प्रत्येक हिंदुस्तानी अभिमानाने सांगू शकतो की, लोकशाहीची जननी भारत आहे. हजारो वर्षांचा लोकशाही इतिहास आजही भारताच्या काना-कोपऱ्यात जीवंत आहे. इतक्या सर्व भाषा, इतक्या प्रकरच्या बोली, वेशभूषेच्या, राहण्याच्या इतक्या वेगवेगळ्या पद्धती यामुळेच भारताची लोकशाही सळसळती आहे. प्रत्येक नागरिकाला विश्वास आहे, आशा आहे आणि प्रत्येक नागरिकाचे जीवन लोकशाही सशक्त करीत आहे.
भारताने दाखवून दिले आहे की, इतक्या विशाल आणि इतकी विविधता असलेल्या देशामध्ये लोकशाही किती उत्तम रितीने नांदते. ज्याप्रमाणे कोट्यवधी भारतीयांनी मिळून मोठ-मोठी लक्ष्यं साध्य केली आहेत, हे कार्य अभूतपूर्व आहे. आज भारतातले प्रत्येक गाव खुल्यावरील शौचापासून मुक्त आहे. आज भारतातल्या प्रत्येक गावापर्यंत वीज पोहोचली आहे. आज भारतातील जवळपास सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली गेली आहेत. आज भारतातले 99 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे स्वच्छ स्वयंपाकासाठी गॅस जोडणी आहे. आज भारतातले प्रत्येक कुटुंब बँकिंग व्यवस्थेबरोबर जोडले गेले आहे. आज भारतातल्या प्रत्येक गरीबाला पाच लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
कोरोनाच्या काळात भारतात गेल्या दोन वर्षात 80 कोटी गरीबांना मोफत अन्नधान्य पुरवठा सुनिश्चित केला आहे. इतकेच नाही, आज भारतामध्ये सरासरी प्रत्येक दहा दिवसांमध्ये एक युनिकॉर्न बनत आहे. आज स्टार्टअपच्या दुनियेमध्ये हे युनिकॉर्न बनत आहेत. आज भारतामध्ये प्रत्येक महिन्याला सरासरी पाच हजार पेटेंट म्हणजे बौद्धिक स्वामित्व घेण्यासाठी अर्ज दाखल होत आहेत. आज भारत प्रत्येक महिन्याला सरासरी 500 पेक्षा जास्त आधुनिक रेल्वेचे डबे बनवित आहे. आज भारत प्रत्येक महिन्याला सरासरी 18 लाख लोकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम करीत आहे. प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पाणी पुरविण्यासाठी ‘नल से जल’ अभियान देशामध्ये सुरू आहे. भारतीयांनी केलेल्या संकल्पांची ही पूर्ततेची यादी खूप लांब आहे. मी जर याविषयी बोलत राहिलो तर, तुम्हा मंडळींची रात्रीच्या भोजनाची वेळ होईल.
मित्रांनो,
जर एखाद्या देशाने योग्य निर्णय घेवून, चांगल्या भावनेने, सर्वांना बरोबर घेऊन कार्य केले तर निश्चितच वेगाने विकास होणार आहे. आपल्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की, गेल्या शतकामध्ये जन्मलेल्या तिस-या औद्योगिक क्रांतीचा जर्मनी आणि इतर देशांनी किती लाभ उठवला. त्याकाळी भारत गुलामगिरीमध्ये होता. आणि म्हणूनच तो या स्पर्धेमध्ये खूप मागे राहिला. मात्र आज 21 व्या शतकातल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारत काही मागे राहणार नाही. उलट या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करणा-यापैकी भारत एक असणार आहे.
माहिती तंत्रज्ञानामध्ये, डिजिटल तंत्रज्ञानामध्ये भारत आपला ध्वज उंचावत आहे. जगातील रिअल टाइम डिजिटल पेमेंटमध्ये होत असलेल्या व्यवहारांपैकी 40 टक्के व्यवहार भारतामध्ये होत आहेत. आज भारत ‘डेटा कन्झमशन’मध्ये नवे विक्रम बनवित आहे. ज्या देशांमध्ये डेटा सर्वात स्वस्त आहे, त्या देशांमध्ये भारत आहे. 21 व्या शतकामध्ये नव्या भारतामध्ये लोक जितक्या वेगाने नवीन तंत्रज्ञान स्वीकारत आहेत, हा वेग सर्वांना आश्चर्यकारक वाटतो.
कोरोना लस लावून घेणे, लसीचे प्रमाणपत्र घेणे यासाठी बनविण्यात आलेल्या कोविन पोर्टलवर जवळपास 110 कोटी नोंदी झाल्या आहेत. कोरोना संक्रमणाचे ‘ट्रॅकिंग’ करण्यासाठी बनविण्यात आलेल्या एक विशेष अॅप ‘आरोग्य सेतू’ बरोबर आज जवळपास 22 कोटी भारतीय जोडले गेले आहेत. सरकारच्या वतीने खरेदी करण्यासाठी बनविण्यात आलेल्या ‘गव्हर्नमेंट ई -मार्केट प्लेस‘ म्हणजेच ‘जेम’बरोबर जवळपास 50 लाख विक्रेते जोडले गेले आहेत.
आज भारतामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा ज्या पद्धतीने उपयोग केला जात आहे, तो अभूतपूर्व आहे. आता देशामध्ये अनेक भागांत शेतामध्ये ड्रोनच्या मदतीने खतांची, औषधांची फवारणी केली जात आहे, हे जाणून तुम्हाला नवल वाटेल. भारतामध्ये सरकारने एक योजना सुरू केली आहे- स्वामित्व योजना. या योजनेअंतर्गत देशातल्या लाखों गावांमध्ये जमिनीची मोजणी, घरांच्या क्षेत्रफळाच्या मोजणीचे काम ड्रोनने केले जात आहे. या मोहिमेद्वारे कोट्यवधी नागरिकांना मालमत्ता प्रमाणपत्र दिले जात आहे. नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये नागरिकांना वाचविण्यासाठी, त्यांना सुरक्षित स्थानी पोहोचविण्यासाठी, त्यांना मदत देण्यासाठीही ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर भारतामध्ये सातत्याने वाढत आहे.
मित्रांनो,
आजचा भारत - होईल हो, चालेल हो, असेच होत राहणार - या मानसिकतेतून बाहेर आला आहे, मित्रांनो!! आजच्या भारताची ओळख म्हणजे - अमूक एक गोष्ट करायची आहे म्हणजे केलीच जाणार आहे आणि ती गोष्ट अगदी वेळेत केली जाणार आहे. या संकल्पाने हिंदुस्तान पुढे जात आहे. भारत आता तत्पर आहे, आतूर आहे. भारत प्रगती करण्यासाठी अधीर आहे, विकासासाठी भारत अधीर आहे. आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी, आपल्या संकल्पांची स्वप्ने सिद्धीस नेण्यासाठी भारत अधीर आहे. भारताला आज आपल्या सामर्थ्यावर भरवसा आहे. आपल्या स्वतःवरही भरवसा आहे.
म्हणूनच आज आम्ही जुने विक्रम मोडीत काढत आहोत आणि नवीन लक्ष्यांची प्राप्ती करीत आहोत. आपण कोणत्याही क्षेत्राकडे पहा! आपल्याला मी एक उदाहरण देतो. भारताने 2016 मध्ये संकल्प केला होता की, 2030 पर्यंत आमच्या एकूण वीज उत्पादनाच्या क्षमतेपैकी 40 टक्के अजिवाश्म इंधन असेल. अजून 2030 हे आठ वर्ष दूर आहे. मात्र भारताने हे लक्ष्य आधीच गाठले आहे. आम्ही पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल ब्लेडिंग करण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. हे लक्ष्यही देशाने नियोजित वेळेपूर्वी पाच महिने आधीच गाठले आहे.
भारतामध्ये कोविड लसीकरणाचा वेग आणि प्रमाण हे आपल्याला खूप चांगले माहिती आहे. आज भारतामध्ये 90 टक्के प्रौढांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. 95 टक्के प्रौढांनी कमीत कमी एक मात्रा तरी घेतली आहे. हा तोच भारत आहे, ज्याविषयी काही लोक म्हणत होते की, सव्वा अब्ज लोकसंख्येला लस देण्यासाठी 10-15 वर्ष तरी लागतील. आज ज्यावेळी मी आपल्याशी संवाद साधत आहे, त्यावेळी भारतामध्ये लसीकरणाचा आकडा 196 कोटी म्हणजेच 1.96 अब्जाचा टप्पा ओलांडला आहे. ‘मेड इन इंडिया’ लसीने भारताबरोबरच दुनियेतल्या कोट्यवधी लोकांचे प्राण वाचविले आहेत.
मित्रांनो,
मला चांगले आठवतेय की, वर्ष 2015 मध्ये ज्यावेळी मी जर्मनीमध्ये आलो होतो, त्यावेळी स्टार्टअप इंडिया अभियान फक्त एका कल्पनेच्या स्तरावर होते. नव्यानेच हे शब्द कानावर पडत होते. त्यावेळी स्टार्टअप क्षेत्रामध्ये भारताचे नामोनिशाण नव्हते. कोणालाच याविषयी काही माहिती नव्हते. आज भारतामध्ये जगातली सर्वात मोठी तिसरी स्टार्टअप परिसंस्था आहे. एक काळ असा होता की, भारत सामान्यातला सामान्य स्मार्टफोन बाहेरून मागवत होता. आज भारत मोबाइल फोन निर्माण करणारा सर्वात मोठा दुसरा देश आहे. आणि आता भारतामध्ये बनविण्यात आलेले मोबाइल संपूर्ण जगामध्ये जात आहेत. सात-आठ वर्ष आधी ज्यावेळी आपल्यासारख्या मित्रमंडळींबरोबर मी चर्चा करीत असे, त्यावेळी आमची जैवतंत्रज्ञान अर्थव्यवस्था 10 अब्ज डॉलर म्हणजेच 75 हजार कोटी रूपयांची होती. आज यामध्ये आठपट वाढ झाली असून ती 80 अब्ज डॉलर म्हणजेच 6 लाख कोटी रूपयांचा टप्पा आम्ही ओलांडला आहे.
मित्रांनो,
कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये भारतातल्या लोकांनी दाखवलेले धैर्य ही आमची सर्वांत मोठी ताकद आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी आम्ही आत्तापर्यंतची सर्वाधिक निर्यात केली आहे. या गोष्टीची साक्ष म्हणजे एकीकडे आम्ही उत्पादनामध्ये नवीन संधी निर्माण करण्यासाठी सिद्ध झालो आहोत. तसचे जगही आमच्याकडे अपेक्षेने आणि विश्वासाने पहात आहे. गेल्याच वर्षी भारताने 111 अब्ज डॉलर्स म्हणजे 8 लाख 30 हजार कोटी रूपयांचे अभियांत्रिकी मालाची निर्यात केली आहे. भारताच्या सुती आणि हातमागाच्या उत्पादनाची निर्यातही 55 टक्क्यांनी वाढली आहे.
भारतामध्ये उत्पादनाच्या वृद्धीसाठी सरकारने जवळपास 2 लाख कोटी रूपयांची पीएलआय म्हणजेच प्रोत्साहन संलग्न सवलत योजना सुरू केली आहे. पुढच्या वर्षी आम्ही आपले निर्यातीचे लक्ष्य अधिक वाढवू इच्छितो. आणि त्यासाठी तुम्ही लोकही खूप काही मदत करू शकता. याच पद्धतीने आपल्या ‘एफडीआय इनफ्लो’, विदेशी गुंतवणूक यामध्येही दरवर्षी नव नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी कोणत्याही देशाचे नागरिक ‘सबका प्रयास’ या भावनेने, लोकांच्या सहभागितेच्या भावनेबरोबरच राष्ट्रीय संकल्प सिद्ध करण्यासाठी कार्यरत होतात, त्यावेळी दुनियेतल्या मोठ-मोठ्या शक्तीसुद्धा त्या देशाला मदत करायला पुढे येतात. आज आपण पहात आहोत की, कशा पद्धतीने दुनियेतल्या मोठ्या शक्ती भारताच्या खांद्याला खांदा लावून पुढे वाटचाल करू इच्छित आहेत. आपल्या देशवासियांच्या संकल्प शक्तीमुळे आज भारत प्रगतीपथावर सातत्याने पुढे मार्गक्रमण करीत आहे. आमच्या लोकांच्या संकल्पांमुळे, त्यांच्या भागीदारीमुळे भारताच्या प्रयत्नांचे आज लोक-आंदोलन बनत आहे. हीच गोष्ट मला देशाच्या उज्ज्वल भविष्याविषयी आश्वस्त करते आणि भरवसा देत असते.
याच्या उदाहरणादाखल, जगामध्ये ‘नैसर्गिक- सेंद्रीय शेती’ सारखे शब्द चर्चेचा विषय बनले आहेत. मात्र भारताचे शेतकरी स्वतःहून पुढे येवून नैसर्गिक शेती प्रयोग प्रत्यक्षात आणत आहेत. याचप्रमाणे हवामान बदल, आज हा भारतामध्ये केवळ सरकारी धोरणाचा मुद्दा आहे असे नाही. भारतातली युवामंडळी ईव्ही आणि अशाच इतर पर्यावरणपुरक, पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करीत आहेत. शाश्वत पर्यावरणासाठी भारतातल्या समान्यातल्या सामान्य माणसाने ही गोष्ट आपल्या जीवनाचा भाग बनवली आहे.
2014 पर्यंत भारतामध्ये उघड्यावर शौच ही एक मोठी समस्या होती. मात्र आम्ही देशामध्ये 10 कोटींपेक्षा जास्त शौचालये बनविली. आज स्वच्छता ही भारतामध्ये जीवनशैली बनत आहे. भारताचे लोक, भारतातली युवा मंडळी देशाला स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य मानत आहेत. आज भारतातल्या लोकांना भरवसा आहे की, त्यांचा पैसा प्रामाणिकपणे देशाच्या कार्यासाठी वापरला जात आहे, भ्रष्टाचाराला भेट म्हणून दिला जात नाही. आणि म्हणूनच देशामध्ये रोखीचे अनुपालन वेगाने वाढत आहे. मित्रांनो, हे काही केवळ कायद्यांच्या प्रक्रियेमुळे होतेय असे नाही तर स्वयंस्फूर्तीने जागरण होत आहे.
मित्रांनो,
आपण सर्व भारतीय यावर्षी आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन साजरा करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये लोकांचा अभूतपूर्व सहभाग, उत्साह आणि त्याच्या प्रभावामुळे कोट्यवधी आकांक्षितांचे साक्षीदार हा सोहळा बनत आहे. भारत आज अभूतपूर्व शक्यतांनी भरलेला देश आहे. भारत एका मजबूत सरकारच्या नेतृत्वाखाली, एका स्थिर सरकारच्या नेतृत्वाखाली, एका निर्णायक सरकारच्या नेतृत्वाखाली नवीन स्वप्न पहात आहे. नवीन संकल्पही करीत आहे, आणि संकल्पांचे परिवर्तन सिद्धीमध्ये व्हावे यासाठी कटिबद्ध आहे. पाच वर्षांनी आपल्याला कुठे पोहोचायचे आहे, हेही निश्चित झाले आहे आणि आगामी 25 वर्षांनी, ज्यावेळी देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल, त्यावेळी- 25 वर्षांनंतर आपल्याला कुठे पोहोचायचे आहे, यासाठी 25 वर्षांचा आत्मनिर्भरतेचा पथदर्शक कार्यक्रमही तयार आहे.
मित्रांनो,
दुनियेमध्ये काही घडले तर आम्ही रडत होतो, हे दिवस आता गेले आहेत. भारत आज वैश्विक आव्हानांमुळे रडणारा देश राहिला नाही. उलट आज भारत पुढे जावून या आव्हानांवर तोडगा, उपाय शोधणारा देश झाला आहे. ‘सीडीआरआय’च्या माध्यमातून आम्ही संपूर्ण दुनियेला संकटाशी लढा देण्यासाठी सक्षम बनवू इच्छितो. आज आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून दुनियेतल्या सर्व देशांना एका व्यासपीठावर आणत आहोत. यामुळे स्वस्त आणि पर्यावरण स्नेही ऊर्जेचा लाभ संपूर्ण जगाला मिळू शकेल. ‘वन सन-वन ग्रीड’ चे स्वप्न आम्ही दुनियेसमोर ठेवले आहे. याचे लाभ भारताने गेल्या आठ वर्षांमध्ये स्वतः अनुभवले आहेत. भारतामध्ये सौर ऊर्जेची विक्रमी क्षमता निर्माण केली आहे. ही ऊर्जा दोन-अडीच रूपये प्रतियुनिट हिशेबाने उपलब्ध आहे.
हरित हायड्रोजनविषयीही भारत काम करीत आहे, त्यामध्ये जर्मनीसारखी मित्र देश सहाकार्य आणि भागीदारीत कार्यरत आहेत. या कार्यामध्येही मानवाचे हित आहे. भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषध केंद्र स्थापन झाल्यामुळे भारत दुनियेचे प्राचीन औषधोपचार पद्धतीचे वैश्विक केंद्रही बनत आहे.
मित्रांनो,
योगची ताकद किती आहे, हे तर तुम्हीही खूप चांगले जाणून आहात. संपूर्ण दुनियेला जणू नाक धरायला लावले आहे.
मित्रांनो,
आगामी पिढीसाठी आजचा नवा भारत नवीन वारसा तयार करण्याचे काम करत आहे. नवा वारसा बनविण्याच्या या मोहिमेमध्ये सर्वात मोठी ताकद आपले नवयुवक आहेत. आपली युवामंडळी आहे. भारतातल्या युवकांना सशक्त करण्यासाठी 21 व्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आम्ही आणले आहे. पहिल्यांदाच भारतामध्ये मातृभाषेतून वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण देण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे.
जर्मनीमध्ये राहणा-या तुम्हा सर्व लोकांना माहिती आहेच की, मातृभाषेतून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतले तर किती लाभ होवू शकतो. आता हाच लाभ भारतातल्या युवा मंडळींना मिळेल. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षण आणि संशोधन यासाठी वैश्विक भागीदारीवरही अधिक भर देण्यात आला आहे. याचा उल्लेख मी आज यासाठी करत आहे, याचे कारण म्हणजे जर्मनीतल्या संस्थांसाठीही भरपूर संधी निर्माण होत आहेत.
मित्रांनो, गेल्या दशकामध्ये आपल्या परिश्रमाने, आपल्या कामाने भारताची सशक्त प्रतिमा तुम्ही इथे तयार केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये आगामी 25 वर्षांमध्ये आपल्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. तुम्ही भारताची यशोगाथा ही आहात. आणि भारताच्या यशोगाथेचे ब्रॅंड अॅम्बेसेडर आहात. आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना, संपूर्ण विश्वामध्ये विखुरलेल्या माझ्या भारतीय बंधू-भगिनींना नेहमीच सांगतो की, तुम्ही देशाचे राष्ट्रदूत आहात. सरकारी व्यवस्थेमध्ये एक-दोन राजदूत असतात. माझे तर कोट्यवधी राष्ट्रदूत आहेत, तेच माझ्या देशाला पुढे नेत आहेत.
मित्रांनो, आपण सर्वांनी जे प्रेम दिले, जे आशीर्वाद दिले, जो उत्साह दाखवला, आत्मियतेने इतका मोठा, देखणा कार्यक्रम केलात, तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मला मिळाली. यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यवत करतो. आपण सर्वजण आरोग्यदायी, आनंदी रहावे.
भारत माता की - जय!
भारत माता की - जय!
भारत माता की - जय!
खूप - खूप धन्यवाद !!
* * *
S.Thakur/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1847932)
Visitor Counter : 229
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam