पंतप्रधान कार्यालय

बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित


विधानसभेच्या या इमारतीत मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत

"लोकशाहीपासून सामाजिक जीवनापर्यंत समान सहभाग आणि समान अधिकार यांचा कसा पाठपुरावा केला जातो याचे उदाहरण ही विधानसभा आहे"

"भारतातील लोकशाहीची संकल्पना या देशाइतकी आणि आपल्या संस्कृतीइतकीच प्राचीन आहे"

"बिहार नेहमीच लोकशाही आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणाप्रति आपल्या वचनबद्धतेवर ठाम राहिले"

“बिहार जेवढा अधिक समृद्ध होईल तेवढीच भारताची लोकशाही देखील अधिक बलवान होईल. बिहार जितका मजबूत होईल तेवढाच भारत सक्षम होईल.

“पक्ष-राजकारणाच्या भेदापलिकडे जाऊन आपला आवाज देशासाठी एकजूट व्हायला पाहिजे.

"आपल्या देशाची लोकशाही परिपक्वता आपल्या आचरणातून दिसून येते"

"लोकशाहीचा विचार पुढे नेत देश निरंतर नवीन संकल्पांवर काम करत आहे"

"पुढील 25 वर्षे देशासाठी कर्तव्याच्या मार्गावर वाटचाल करण्याची वर्षे आहेत"

“आपण आपल्या कर्तव्यासाठी जितकी जास्त मेहनत घेऊ तेवढे आपले अधिकार अधिक मजबूत होतील. आपली कर्तव्यनिष्ठा हीच आपल्या अधिकारांची हमी आहे”

Posted On: 12 JUL 2022 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला संबोधित केले. बिहार विधानसभेच्या 100 वर्षांच्या स्मृतीप्रित्यर्थ  बांधण्यात आलेल्या शताब्दी स्मृती स्तंभाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. तसेच  विधानसभा संग्रहालयाची पायाभरणीही त्यांनी केली. संग्रहालयातील विविध गॅलरी बिहारमधील लोकशाहीचा इतिहास आणि सध्याच्या नागरी संरचनेची उत्क्रांती यांचे दर्शन घडवतील. इथे  250 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेले संमेलन सभागृह (कॉन्फरन्स  हॉल)  देखील असेल. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विधानसभा अतिथीगृहाचे भूमिपूजनही करण्यात आले.  यावेळी बिहारचे राज्यपाल  फागु चौहान आणि मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, बिहारचा हा स्वभाव आहे की जो बिहारवर प्रेम करतो, बिहार ते प्रेम अनेक पटींनी परत करतो. आज मला बिहार विधानसभा परिसराला  भेट देणारा देशाचा पहिला पंतप्रधान होण्याचा बहुमानही मिळाला आहे. या स्नेहाबद्दल  मी बिहारच्या जनतेला प्रणाम करतो, असे ते म्हणाले.  शताब्दी स्मृती स्तंभ बिहारच्या असंख्य आकांक्षांना प्रेरित करेल असे पंतप्रधान म्हणाले. 

बिहार विधानसभेच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करताना  पंतप्रधान म्हणाले कीविधानसभेच्या या इमारतीत एकापेक्षा  एक मोठे आणि धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. स्वातंत्र्यापूर्वी राज्यपाल सत्येंद्र प्रसन्न सिन्हा यांनी या विधानसभेतून स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन  देण्यासाठी स्वदेशी चरख्याचा अवलंब करण्याचे  आवाहन केले होते.

स्वातंत्र्यानंतर या विधानसभेत जमीनदारी निर्मूलन कायदा मंजूर करण्यात आला. ही परंपरा पुढे नेत, नितीशजींच्या सरकारने बिहार पंचायती राज सारखा कायदा पारित करून बिहार हे पंचायतींमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणारे पहिले राज्य बनवले याचे स्मरण त्यांनी करून दिले. 

"लोकशाहीपासून  सामाजिक जीवनापर्यंत समान सहभाग आणि समान अधिकार यांचा कसा पाठपुरावा केला जातो  याचे उदाहरण ही विधानसभा  आहे"असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी भारतीय लोकशाहीची प्राचीन परंपरा  अधोरेखित केली . ते  म्हणाले, परकीय राजवट आणि परकीय विचारसरणीमुळे भारताला लोकशाही मिळाली हे आपल्याला सांगण्याचा गेली अनेक दशके  प्रयत्न केला जात आहे. मात्र , जेव्हा एखादी व्यक्ती  असे म्हणते तेव्हा ती  बिहारचा इतिहास आणि बिहारचा वारसा लपवण्याचा प्रयत्न करते.  जेव्हा जगातले मोठे भूभाग सभ्यता आणि संस्कृतीच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकत होते , तेव्हा वैशालीमध्ये एक सुसंस्कृत  लोकशाही कार्यरत होती. जगातील इतर भागात  लोकशाही अधिकारांची समज विकसित होऊ लागली तेव्हा लिच्छवी आणि वज्जीसंघ सारखे प्रजासत्ताक परमोच्च  बिंदूवर होते.

भारतातील लोकशाहीची संकल्पना, आपल्या देशाइतकीच प्राचीन आहे, आपल्या संस्कृतीइतकी प्राचीन आहे. भारत लोकशाहीला समता आणि समानता निर्माण करण्याचे साधन मानतो. भारताचा सहअस्तित्व आणि सौहार्दाच्या कल्पनेवर विश्वास आहे. आमचा सत्यावर विश्वास आहे, आमचा सहकार्यावर विश्वास आहे, आमचा समरसतेवर विश्वास आहे आणि आमचा समाजाच्या एकसंध शक्तीवर विश्वास आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

भारत जगातील लोकशाहीची जननी असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. भारत लोकशाहीची जननी आहे आणि बिहारचा गौरवशाली वारसा आणि पाली येथील ऐतिहासिक कागदपत्रे याचा प्रत्यक्ष पुरावा आहेत, असे ते म्हणाले बिहारचे हे वैभव कोणीही पुसून टाकू शकत नाही, लपवू शकत नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले. या वास्तूने गेल्या शंभर वर्षांपासून भारतीय लोकशाहीला बळकटी दिली आहे, म्हणूनच ती आपल्यासाठी आदराचे स्थान आहे, पारतंत्र्याच्या काळातही लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होऊ दिला न देणाऱ्या आमच्या सदसद्विवेकबुद्धीशी या वास्तूचा संबंध आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

प्रशासनातील स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी आग्रही होते, असे स्मरण यावेळी पंतप्रधानांनी केले. लोकशाही आणि लोकशाहीच्या मूल्यांच्या रक्षणाची कटिबद्धता बिहारने कायम दृढनिश्चयाने पाळली आहे,असे त्यांनी सांगितले. डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या रूपाने बिहारने देशाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती दिल्याचे मोदी यांनी नमूद केले. लोकनायक जयप्रकाश, कर्पूरी ठाकूर, बाबू जगजीवन राम यांसारखे नेते याच भूमीवर  जन्माला आले. देशात संविधान पायदळी तुडवण्याचा प्रयत्न झाला तेव्हाही बिहारनेच आघाडी घेत त्याविरोधात रणशिंग फुंकले. बिहार जितका समृद्ध असेल तितकी भारताची लोकशाही अधिक मजबूत असेल. बिहार जितका मजबूत असेल तितका भारत अधिक सक्षम असेल, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बिहार विधानसभेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याचा हा ऐतिहासिक प्रसंग आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी आत्मपरीक्षण आणि आपल्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याचा संदेश देणारा  ठरला आहे. आपली लोकशाही जितकी मजबूत होईल, तेवढे स्वातंत्र्यासाठी आणि हक्कांसाठी आपल्याला अधिक बळ मिळेल."असे पंतप्रधान म्हणाले

21 व्या शतकातील बदलत्या गरजा आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात नव्या भारताच्या उभारणीचा संकल्पाबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, देशाचे खासदार, आमदार या नात्याने एकत्रितपणे लोकशाहीसमोर असलेल्या सर्व आव्हानांवर मात करणे ही आपलीही जबाबदारी आहे.  पक्षीय राजकारणाच्या भेदाच्या पलीकडे जात, आपला आवाज देश आणि देशहितासाठी एकवटला पाहिजे." असेही पंतप्रधान म्हणाले.

"आपल्या वर्तनातून, आचरणातूनच देशाच्या लोकशाहीची परिपक्वता आपल्याला दिसते, यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की "विधानसभा सभागृहांना जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर सकारात्मक संवादाचे केंद्र बनू द्या." संसदेच्या कामगिरीबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत संसदेत खासदारांची उपस्थिती आणि संसदीय कामकाजाच्या उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाली आहे.गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या कामकाजाची उत्पादकता 129 टक्के होती. तर राज्यसभेतही 99 टक्के उत्पादकता नोंदवली गेली. याचाच अर्थ, लोकशाहीतील चर्चात्मक तत्वाला पुढे नेत, देश सातत्याने नवनव्या संकल्पपूर्तीसाठी काम करत आहे. असे पंतप्रधान म्हणाले.

एकविसावे शतक, भारताचे शतक बनवूया, असे आवाहन करत, पंतप्रधान म्हणाले, भारतासाठी एकविसावे शतक हे कर्तव्यांचे शतक आहे. आपल्याला या शतकात, नव्या भारताच्या सुवर्णलक्ष्यापर्यंत पोहोचायचे आहे, पुढच्या 25 वर्षांत कर्तव्यपथावरुन वाटचाल करत आपल्याला हे  उद्दिष्ट गाठायचे आहे. आपण आपल्या कर्तव्यांना अधिकारांपेक्षा वेगळे समजू नये. आपण जेवढे आपले कर्तव्यपालन करू, तेवढे आपले अधिकार अधिकाधिक मजबूत होत जातील. कर्तव्यांप्रती आपली निष्ठा हीच आपल्या अधिकारांची हमी असेल.असे पंतप्रधान म्हणाले.

 

N.Chitale/S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1841047) Visitor Counter : 243