पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पहिल्या अरुण जेटली स्मृती व्याख्यानात पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 08 JUL 2022 11:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2022

 

नमस्कार ! 

आजचा दिवस माझ्यासाठी मोठ्या हानीचा आणि अतिशय वेदनादायी आहे. माझे घनिष्ट मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आपल्याला सोडून परलोकात गेले. आबे जी माझे मित्र तर होतेच, ते भारताचेही तितकेच विश्वासाचे मित्र होते. त्यांच्या कार्यकाळात, भारत जपान राजनैतिक संबंधाना नवी उंची तर प्राप्त झाली. दोन्ही देशांमध्ये सामायिक वारसा असलेले संबंधही आम्ही अधिक दृढ केले. आज भारताच्या विकासाचा जो वेग आहे, जपानच्या सहकार्याने आपल्या इथे जे काम होत आहे त्याद्वारे शिंजो आबे जी भारतीय जनतेच्या स्मरणात वर्षानुवर्षे कायम राहतील. अतिशय जड अंतःकरणाने माझ्या या मित्राला मी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रहो,

आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन माझे आणखी एक घनिष्ट मित्र अरुण जेटली जी यांना समर्पित आहे. मागचे दिवस स्मरताना, त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी, अनेक प्रसंग मला आठवतात, त्यांचे अनेक जुने मित्र मला इथे दिसत आहेत. त्यांच्या वक्तृत्वाचे आपण सर्वजण चाहते होतो. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते आणि ते जगन्मित्र स्वभावाचे होते. इथे जमलेला प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातला आहे मात्र हे सर्वजण अरुणजींचे मित्र होते. त्यांच्या जगन्मित्र स्वभावाचे हे वैशिष्ट्य होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू आपण सर्वजण आजही स्मरतो आणि प्रत्येकाला त्यांची उणीव आजही भासते आहे. अरुण जेटली यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रहो,

अरुण जी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ व्याख्यानाचा जो विषय आहे – ‘समावेशकतेद्वारे विकास, विकासाद्वारे समावेशकता’ हा सरकारच्या विकास धोरणाचा मूलमंत्र आहे. थर्मन जी यांचा मी आभारी आहे, त्यांनी  आमचे निमंत्रण स्वीकारले, मी अनेकदा त्यांचे व्याख्यान ऐकले आहे, वाचतही असतो. त्यांच्या वक्तव्यात, अध्ययनात, केवळ भारतात बोलतानाच नव्हे तर इतर देशातही ते जेव्हा जातात तेव्हा संशोधन करतात, स्थानिक संदर्भ त्यांच्या विचारातून, तत्वज्ञानातून अतिशय अचूक आणि मुद्देसूद पद्धतीने सांगतात, आजही आपण हे अनुभवले. अतिशय ओघवत्या वाणीने जागतिक परिस्थितीपासून आपल्या देशातल्या मुलांपर्यंत त्यांनी मांडणी केली. त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

मित्रहो

ज्या विषयावर ही चर्चा होत आहे, जो विषय घेऊन आज अरुण जेटली व्याख्यानाचा प्रारंभ झाला आहे तो सोप्या भाषेत सांगायचा झाला तर  मी सांगेन, सबका साथ-सबका विकास. मात्र याबरोबरच या व्याख्यानाची संकल्पना आज धोरण कर्त्यांच्या समोर येणारी आव्हाने आणि द्विधावस्था यांनाही स्पर्श करते.

मी आपणा सर्वाना एक प्रश्न विचारू इच्छितो. सर्वसमावेशकतेवाचून वृद्धी शक्य आहे का ?आपण स्वतःलाच विचारा. विकासावाचून, वृद्धीवाचून समावेशकतेचा विचार केला जाऊ शकतो का ? सरकारचा प्रमुख या नात्याने मला 20 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करण्याची संधी मिळाली आहे आणि माझ्या अनुभवाचे तात्पर्य हेच आहे की समावेशकतेविना वास्तव विकास शक्यच नाही आणि विकासा वाचून सर्वसमावेशकतेचे उद्दिष्ट पूर्ण करता येऊ शकत नाही. म्हणूनच समावेशकतेद्वारे विकासाचा मार्ग आम्ही निवडला आहे. गेल्या 8 वर्षात भारताने सर्वसमावेशकतेसाठी, ज्या वेगाने काम केले आहे, ज्या व्याप्तीने काम केले आहे, असे उदाहरण आपल्याला संपूर्ण जगात आढळणार नाही. गेल्या आठ वर्षात भारताने 9 कोटीहून जास्त महिलांना मोफत गॅस जोडण्या दिल्या आहेत. ही संख्या दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि न्युझीलंड मधल्या लोकसंख्येची बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त आहे. आपण याची व्याप्ती, प्रमाण लक्षात घ्या, गेल्या आठ वर्षात भारताने, गरिबांना 10 कोटीपेक्षा जास्त स्वच्छतागृहे दिली आहेत. थर्मन जी यांनी याचा उत्कटतेने उल्लेख केला. ही संख्या दक्षिण कोरियाच्या एकूण लोकसंख्येच्या दुपटीपेक्षाही जास्त आहे. गेल्या आठ वर्षात भारताने 45 कोटीपेक्षा जास्त जनधन बँक खाती उघडली आहेत. ही संख्याही जपान, जर्मनी, ब्रिटन, इटली, मेक्सिको यांच्या एकूण लोकसंख्येइतकी होते. गेल्या आठ वर्षात भारताने गरिबांना 3 कोटी पक्की घरे दिली आहेत. मला आठवतेय, एकदा सिंगापूर मंत्रीमंडळातले ईश्वरन यांच्याशी मी चर्चा करत असताना मी त्यांना याची व्याप्ती सांगत होतो तेव्हा ईश्वरण मला म्हणाले की तुम्हाला तर दर महिन्याला एक नवे सिंगापूर निर्माण करावे लागेल.

सर्वसमावेशकतेतून विकास आणि विकासातून सर्वसमावेशकता यांचे आणखी एक उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो. काही वर्षापूर्वी भारतात आम्ही आयुष्मान भारत योजना सुरु केली. ज्याचा उल्लेख थर्मन जी यांनी केला आणि येत्या प्रमुख क्षेत्रात त्यांनी आरोग्य क्षेत्राचीही चर्चा केली. या योजनेमुळे 50 कोटीपेक्षा जास्त गरिबांना उत्तम रुग्णालये आणि हिंदुस्तानमध्ये कुठेही 5 लाखापर्यंत मोफत उपचार सुनिश्चित झाले. 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार. गेल्या चार वर्षात आयुष्मान भारत योजनेमुळे देशात साडेतीन कोटी पेक्षा जास्त लोकांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. या योजनेत आम्ही समावेशकतेवर लक्ष केंद्रित केले आहे. गरीबातल्या गरिबाला, समाजातल्या तळाशी असलेल्या व्यक्तीला आरोग्य विषयक उत्तम सुविधा मिळावी यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले, काळाच्या ओघात आम्ही पाहिले समावेशकतेचा पैलू तर आहेच  त्याचबरोबर काळाच्या ओघात यातून विकासाचा मार्गही निर्माण होऊ लागला. जे आधी वंचित होते ते विकासाच्या मुख्य धारेशी जोडले गेले, यातून मागणीही वाढली आणि विकासासाठी संधीचाही विस्तार झाला. भारताची एक तृतीयांश लोकसंख्या, जी पूर्वी उत्तम आरोग्य सुविधेपासून दूर होती, त्यांना उपचाराची सुविधा मिळाल्यानंतर त्याचा थेट परिणाम असा झाला की आरोग्य सुविधा क्षमताही त्या प्रमाणात बळकट कराव्या लागल्या. आयुष्मान भारत योजनेने संपूर्ण आरोग्य क्षेत्रात कसे परिवर्तन घडवले आहे ते मी आपल्याला सांगतो. 2014 च्या पूर्वी आपल्या देशात साधारणपणे 10 वर्षात 50 वैद्यकीय महाविद्यालये निर्माण होत असत. गेल्या 7-8 वर्षात, आधीच्या तुलनेत चौपट म्हणजे सुमारे 209 नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण होऊ लागली आहेत. आपण कल्पना करू शकता, 50 कुठे आणि 209 कुठे,आणि 10 वर्षांचा हिशोब धरला तर ही संख्या आणखी वाढणार आहे, ही संख्या 400 पर्यंत पोहोचेल. गेल्या 7-8 वर्षात भारतात पदवीपूर्व वैद्यकीय जागांमध्ये 75 टक्के वाढ झाली आहे. भारतात आता वार्षिक एकूण वैद्यकीय जागांची संख्या वाढून जवळजवळ दुप्पट झाली आहे. म्हणजेच देशात आता जास्त डॉक्टर निर्माण होत आहेत, देशात झपाट्याने आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. समावेशकतेसाठी आणलेल्या एका योजनेचा वास्तव विकासाच्या दृष्टीनेही इतका मोठा प्रभाव आपण नक्कीच पाहू शकता. आपण त्याचा अंदाज लावू शकतो. अशा डझनावारी योजना मी आपल्याला सांगू शकतो.

भारताचे डिजिटल भारत अभियान, ज्याचा उल्लेख आत्ता थर्मन जी यांनी केला, सुमारे 5 लाख सामायिक सेवा केंद्रांनी, गावात राहणाऱ्या गरीबांपर्यंतही इंटरनेटची ताकद पोहोचवली आहे. भारताच्या भीम-युपीआयने कोट्यवधी गरिबांना डिजिटल पेमेंट सुविधेशी जोडले आहे. भारताच्या स्वनिधी योजनेने फेरीवाल्या मित्रांना बँकिंग व्यवस्थेशी जोडले जाण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. आपल्याकडे नगर पालिका, महानगर पालिका क्षेत्रात जे फेरीवाले असतात, जे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग असतात. बँक मॅनेजर असेल, त्याच्या घरी फेरीवाला रोज सामान पोहोचवत असेल, मात्र बँकिंग व्यवस्थेत त्याला स्थान नव्हते अशी परिस्थिती होती.आज आम्ही या वर्गाला बँकिंग व्यवस्थेशी जोडले आहे. अशा प्रकारे भारताने मोठे काम केले आहे, जगातले अर्थतज्ञ यावर खूप लिहितही आहेत, मोठ-मोठ्या एजन्सी त्याचे रेटिंगही करत आहेत. 

भारताचा आणखी एक उपक्रम आहे, आकांक्षी जिल्हा कार्यक्रम, देशातल्या 100 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी मित्रांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करत आहे. हिंदुस्तानमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जे जिल्हे मागास राहिले आहेत, त्यांच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करूया, ही या आकांक्षी जिल्ह्यांमागची कल्पना आहे. त्यांना त्या राज्याच्या सर्वोच्च स्थानाच्या बरोबरीने आणि नंतर हळू-हळू राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थानाच्या बरोबरीने आणण्याचा संकल्प आहे.

मित्रहो,

याचा इतका सकारात्मक परिणाम झाला आहे आणि एका प्रकारे या 100 जिल्ह्यांचा विकासाच्या जगात समावेश होत आहे. भारताचे शैक्षणिक धोरण आणि हे मोठे परिवर्तन आहे. थर्मन जी यांनी आपल्या चर्चेदरम्यान शिक्षणावरही मोठा भर दिला. भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक  धोरण, मातृभाषेत शिक्षणावर भर देत आहे. इंग्रजीचे ज्ञान नसल्यामुळे जो बाहेर राहत होता त्याला आता मातृभाषेत शिक्षण घेऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. भारताची उडान योजना, या योजनेद्वारे आम्ही विमान तळावरच्या अनेक धावपट्या सुरु करत पुन्हा वापरात आणल्या, नवे विमानतळ उभारले, श्रेणी 2, श्रेणी 3 शहरातही आम्ही यासाठी पोहोचलो. ठराविक रकमेत हवाई प्रवास अशी आखणीही केली. भारताच्या उडान योजनेने देशाच्या वेगवेगळ्या भागांना हवाई मार्गे जोडले आहे. गरीबानाही विमान प्रवासाची उमेद दिली आहे. हवाई चप्पल वापरणारी व्यक्तीही आता विमानात बसेल असे मी म्हटले होते. म्हणजेच समावेशकताही  साध्य होत आहे आणि विकासही होत आहे. याचाच परिणाम म्हणजे भारतात आज हवाई वाहतूक क्षेत्रात इतका विकास होत आहे. भारतासाठी एक हजारपेक्षा जास्त नव्या विमानांची नोंदणी झाली आहे. या देशात एक हजाराहून जास्त विमानांची खरेदीसाठी नोंदणी हे प्रवाश्यांच्या समावेशकतेचा आमचा जो दृष्टीकोन होता त्याचेच फलित आहे.

आताच थर्मन जी यांनी उल्लेख केला त्या जल जीवन अभियानावर मी गुजरातमध्ये प्रामुख्याने बरेच काम केले, देशाच्या प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यासाठीचे हे जल जीवन अभियान. नळाद्वारे पाणी आणि हे केवळ पाणीच नव्हे तर यामुळे वेळेची बचत होते, कष्ट वाचतात, निरोगी राहण्यात पाण्याची मोठी भूमिका असते. या साऱ्या दृष्टीकोनातून हे अभियान सामाजिक जीवनात परिवर्तन आणणारे तसेच ज्यांनी मुलांच्या पोषणाविषयी उल्लेख केला त्याचाही पाण्याशी संबंध आहे. पिण्याचे शुद्ध पाणीही पोषणाच्या दृष्टीने मुलांसाठी महत्वाचे आहे. या प्रश्नाची दखल घेण्याचा, नळाद्वारे पाणी पुरवठा हा एक भाग आहे. फक्त तीन वर्षात या अभियानाने 6 कोटीहून अधिक घरांना नळ जोडण्या दिल्या आहेत. भारतात सुमारे 25 ते 27 कोटी घरे आहेत, त्यापैकी 6 कोटी घरांना नळाद्वारे पाणी पोहोचवण्यात आले आहे. ही समावेशकता आज सामान्य जनतेचे जीवन सुखकर करत आहे. त्यांना पुढे वाटचाल करण्याची उमेद देत आहे. कोणत्याही देशाच्या विकासात याचे किती महत्व आहे हे इथे उपस्थित अर्थ जगतातले लोक उत्तम जाणतात.

मी आपल्याला आणखी एक उदाहरण देतो. आपणही जाणता आणि मी तर पाहिले आहे, संयुक्त राष्ट्रांतही याची चर्चा होते. शाश्वत विकास उद्दिष्टातही विकास उद्दिष्टात या मुद्य्यांवर चर्चा होते आणि ते काय आहे, तर दशकांपासून अनेक देशांमध्ये स्वामित्व हक्क हा एक मोठा मुद्दा बनला आहे. 

 आणि जेव्हा मालमत्तेच्या अधिकारांवर बोलले जाते तेव्हा आपल्या विचारापलीकडील जे  शेवटचे लोक असतात ते सर्वात असुरक्षित असतात.त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसतात. त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. पण तुम्हाला हे जाणून आनंद होईल की भारताने या दिशेने ज्या वेगाने काम केले आहे ते अभूतपूर्व आहे.मला वाटते  की, जगातील शिक्षणतज्ज्ञ, जगातील  अर्थतज्ज्ञ या विषयाचा अभ्यास करून हा विषय जगासमोर मांडतील. स्वामीत्व योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागातील घरे आणि इमारतींचे मॅपिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.आत्तापर्यंत आपण  भारतातील दीड लाख गावांमध्ये ड्रोनच्या मदतीने हे काम केले आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाते आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला जातो आणि जेव्हा ही सर्व प्रक्रिया केली जाते तेव्हा संपूर्ण गाव तेथे उपस्थित असते,दीड लाखांहून अधिक गावांमध्ये ड्रोनद्वारे हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आणि 37 हजार चौरस किलोमीटर जमिनीच्या मॅपिंगचे काम झाले आहे, म्हणजे संबंधित घरांशी निगडीत जमिनीची  आणि 80 लाखांहून अधिक लोकांची मालमत्ता पत्र बनवण्यात आली आहेत. आणि हे काम  मालकाच्या संमतीने केले जाते. त्याच्याशी चर्चा केली जाते, त्याच्या शेजारच्या लोकांशी चर्चा केली जाते, ही एक दीर्घ  प्रक्रिया आहे,आणि याचा परिणाम असा झाला की, यामुळे गावातील लोकांना बँकेचे कर्ज मिळणे सोपे झाले आहे, त्यांची जमीन आता कायदेविषयक  वादातूनही मुक्त झाली आहे.

मित्रांनो,

आजचा भारत असहाय्य्यतेतून  सुधारणा करण्याऐवजी  दृढनिश्चयाने सुधारणा करून येत्या 25 वर्षांचा मार्गदर्शक आराखडा  तयार करत आहे. देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी  करत असताना देश कुठे असेल या ध्येयाने आज आपण मार्गदर्शक आराखडा तयार करत पुढे वाटचाल करत आहोत. अनेक दशकांपूर्वी, देशाने पाहिले आहे की, जेव्हा एखादी सुधारणा असहाय्य्यतेतून होत  असते तेव्हा ती संस्थात्मक होण्याची फारशी आशा नसते.

असहाय्य्यतेतून बाहेर आल्यावर  सुधारणेचाही विसर पडतो.सुधारणा जितक्या महत्त्वाच्या आहेत, तितकेच महत्वाचे त्यासाठीचे वातावरण , प्रेरणा आहे.

पूर्वीच्या सरकारांना दुसरा कोणताच पर्याय उरला नव्हता तेव्हाच भारतात मोठ्या सुधारणा झाल्या आम्ही सुधारणांना आवश्यक कुकर्म  मानत नाही तर सर्वांसाठी अनुकूल पर्याय  मानतो,ज्यामध्ये राष्ट्रहित आहे तसेच जनहित देखील आहे. त्यामुळे गेल्या 8 वर्षात आपण ज्या काही सुधारणा केल्या आहेत त्यामुळे नवीन सुधारणांचा मार्ग मोकळा झाला आहे.

अरुणजी आज जिथे कुठे असतील तिथे ते समाधानी असतील कारण ज्या मोहिमेमध्ये ते सहभागी होते त्याचा लाभ देशाला मिळत आहे.जीएसटी असो की आयबीसी, ज्याच्याबद्दल वर्षानुवर्षे चर्चा होती, आज त्याचे यश आपल्यासमोर आहे.कंपनी कायदा त्रुटींमुक्त करणे असो, कॉर्पोरेट कर स्पर्धात्मक बनवणे असो,अंतराळ, कोळसा खाण आणि आण्विक क्षेत्रे खुली करणे असो  अशा अनेक सुधारणा हे आजच्या 21 व्या शतकातील भारताचे वास्तव आहे.

मित्रांनो,

आमचे धोरण जनतेच्या आकांक्षांवर  आधारित आहे.आम्ही  अधिकाधिक लोकांचे ऐकतो, त्यांची गरज, त्यांची आकांक्षा समजून घेतो.म्हणूनच लोकप्रियतेच्या लाटेच्या दबावाखाली आम्ही धोरण येऊ दिले नाही.लोकांच्या आकांक्षांनुसार  निर्णय घेणे आणि लोकप्रियतेसमोर हात टेकण्यात काय फरक आहे  , हे कोविड काळात भारताने पाहिले आहे,आणि केवळ पाहिलेच नाही तर जगालाही दाखवून दिले आहे. महामारीच्या काळात मोठ मोठे  अर्थतज्ञ काय म्हणत होते,जेव्हा महामारी आली तेव्हा संपूर्ण जगात मोठ्या बेल आउट पॅकेजसाठी, मागणीनुसार  पुन्हा रुळावर येण्यासाठी लोकप्रियतेच्या  लाटेचा  आमच्यावरही दबाव होता आणि आमच्यावर टीका होत होती. हे काही करत नाहीत, त्यांना काही दिसत नाही, माहीत नाही आमच्याबद्दल काय काय बोलले गेले. असेही सांगण्यात आले की, लोकांना हे हवे आहे, तज्ञांना हे हवे आहे, महान विद्वानांना हे हवे आहे. पण भारताने दबावाला बळी न पडता वेगळा दृष्टीकोन स्वीकारला आणि शांत मनाने खूप समजूतदारपणाने तो अवलंबला. आपण   ' लोक प्रथम' हा दृष्टिकोन ठेवून गरीबांना संरक्षण दिले, महिला, शेतकरी, एमएसएमईवर लक्ष केंद्रित केले.आपण  जगापेक्षा  वेगळे करू  शकलो कारण, आम्हाला जनतेची नाडी, म्हणजेच जनतेला काय हवे आहे, त्यांची  चिंता काय आहे याची जाणीव आहे. त्यामुळे  भारताचे पूर्वपदावर येणे आणि उर्वरित जगाचे पूर्वपदावर येणे  यातील फरक आपण स्पष्टपणे पाहू शकतो.

मित्रांनो,

मी बऱ्याचदा किमान शासन आणि कमाल प्रशासनाचा आग्रह करत आलो आहे.  लोकांच्या जीवनात विनाकारण दखल देणारे दीड हजार कायदे आमच्या सरकारने रद्द केले आहेत . आणि मला आठवते 2013 मध्ये, जेव्हा भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवले, 2014 मध्ये निवडणुका होणार होत्या, तेव्हा दिल्लीतच व्यापार जगतातील लोकांनी मला कार्यक्रमासाठी बोलावले होते आणि खूप तापलेले  वातावरण होते. काय करणार , हे करणार की  ते करणार, सगळे विचारात होते, हा कायदा बनवणार की नवीन कायदा बनवणार, इतका मोठा दबाव होता. उमेदवार समोर होता  निवडणुकीचे दिवस होते, त्यामुळे मी देखील जरा. मी म्हणालो बघा, तुम्हाला कायदा करायचा आहे, मी तुम्हाला वचन देतो, मी रोज एक कायदा रद्द करीन, मी नवीन बनवण्याची हमी देत नाही, पण रद्द करेन आणि पहिल्या 5 वर्षात   दीड हजार कायदे रद्द करण्याचे काम केले, ज्या कायद्यांच्या अनुपालनाचे  सर्वसामान्यांवर ओझे झाले होते.

मित्रांनो,

तुम्हाला जाणून आनंद होईल की , आमच्या सरकारने  30 हजारांहून अधिक म्हणजे आकडा पाहून तुम्हाला धक्का बसेल, व्यवसाय सुलभतेत आणि जीवनमान सुलभतेत अडथळा आणणारी 30 हजारांहून अधिक अनुपालने  देखील कमी करण्यात आली आहेत. 30,000 अनुपालन रद्द केले म्हणजे जनता जनार्दनवरील अभूतपूर्व विश्वासाचे युग आले आहे. परिणामी, आम्ही जनतेला अनुपालनाच्या ओझ्यातून मुक्त करत आहोत.आणि मी लाल किल्ल्यावरून सांगितले होते  की, मला वाटतेसरकार जितके लोकांच्या जीवनातून बाहेर निघेल तितके आपल्याला  बाहेर काढावे लागेल. लोकांच्या जीवनात सरकार आणि  सरकारचा प्रभाव कमीत कमी असला पाहिजे, परंतु ज्यांना सरकारची गरज आहे त्यांना सरकारची कमतरता भासू नये, या दोन विषयांवर आम्ही वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आहे.आज मला तुम्हाला कळवताना अतिशय समाधान होत आहे की, किमान सरकारचा दृष्टीकोन देखील कमाल फलित  आणि परिणाम देत आहे.आपण आपली  क्षमता खूप वेगाने वाढवत आहोत आणि त्याचे परिणाम तुमच्या समोर आहेत. कोविड प्रतिबंधक लसींचे उदाहरण घ्या. आपल्या देशातील खासगी कंपन्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्यांच्यामागे प्रगतीतील भागीदारीच्या रूपाने सरकारची पूर्ण ताकद उभी होती. विषाणू अलगीकरणापासून  ते जलद चाचणीपर्यंत, निधीपासून ते जलद अंमलबजावणीपर्यंत , लस तयार करणाऱ्या कंपन्यांना सरकारकडून पूर्ण सहकार्य  मिळाले. दुसरे उदाहरण आपल्या अंतराळ कार्यक्षेत्राचे  आहे. आज भारत संपूर्ण जगात सर्वात विश्वासार्ह आणि अत्याधुनिक अंतराळ सेवा प्रदात्यांपैकी एक आहे.आपली  खाजगी क्षेत्रातील व्यवस्था  या क्षेत्रातही उत्तम काम करत आहे.पण त्यांच्या मागे देखील प्रगतीतील  भागीदाराच्या रूपात सरकारची पूर्ण ताकद आहे, जी त्यांना प्रत्येक सुविधा आणि माहिती पुरवण्यात मदत करत आहे.जेव्हा आपण भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेचे  उदाहरण घेतो, तेव्हा आपल्याकडे फिनटेक तसेच डिजिटल पेमेंटशी संबंधित अनेक मोठ्या कंपन्या  आहेत. पण जर इथेही बघितले तर त्यांच्या मागे जेएएम त्रिसूत्री , रूपे  , युपीआय आणि सहाय्यक धोरणांचा  भक्कम आधार आहे.इथे मी केवळ  काही उदाहरणे तुमच्यासमोर ठेवली आहेत.मात्र  मी त्यांना जगासाठी संशोधनाचा विषय मानतो, मी शैक्षणिक जगताला  सखोल अभ्यासासाठी उदाहरण  देतो, मी जगभरातील अर्थशास्त्रज्ञांना आमंत्रित करतो, चला त्यातील बारकावे पहा. इतक्या मोठ्या देशाच्या विविध गरजा असूनही आपण प्रगती कशी करत आहोत.एकप्रकारे, आता केवळ खाजगी क्षेत्र किंवा सरकारचे वर्चस्व असलेल्या मॉडेल्सची  चर्चा कालबाह्य झाली आहे. आता वेळ आली आहे की सरकारने खाजगी क्षेत्राला प्रगतीतील भागीदार म्हणून प्रोत्साहन द्यावे आणि आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत.

मित्रांनो,

देशातील सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांवर विश्वास ठेवून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या या भावनेमुळेच आज भारतात  विकासासाठी कमालीचा उत्साह दिसत आहे. आज आपली निर्यात नवे विक्रम करत आहे. सेवा क्षेत्राचीही वेगाने प्रगती होत आहे.उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनांचा परिणाम उत्पादन क्षेत्रावर दिसू लागला आहे.मोबाईल फोनसह संपूर्ण इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राची  अनेक पटींनी प्रगती झाली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ,या कोरोनाच्या काळात खेळण्यांबद्दल मी एक परिषद घेतली होती, खेळणी तेव्हा अनेकांना वाटले असेल की, पंतप्रधान कधी झाडू मारण्याबद्दल बोलतात, स्वच्छतेबद्दल बोलतात, शौचालयाबद्दल  बोलतात आणि आता ते खेळण्यांबद्दल बोलत आहेत.अनेकांना, कारण आजपर्यंत  ते त्या मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकलेले होते  त्यामुळे माझे शब्द त्यांना पटत नव्हते. मी केवळ  खेळण्यांवर लक्ष दिले  मी खेळणी बनवणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले.तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले, नवोन्मेषावर  लक्ष केंद्रित केले, आर्थिक क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले, अजून  2 वर्षही पूर्ण झालेली नाहीत , माझ्या देशबांधवांना अभिमान वाटेल की, इतक्या कमी वेळात खेळण्यांची आयात खूप कमी झाली, नाहीतर आपल्या   घरात  परदेशी खेळणी असायची.आयात इतकी  कमी झाली आहे की, इतकेच नाही तर भारतातील खेळणी पूर्वी जी आयात होत होती त्यापेक्षा जास्त निर्यात होऊ लागली आहे.म्हणजेच, अप्रयुक्त क्षमता किती मोठी आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे पर्यटन, मी तुमच्याशी सहमत आहे, भारतात  पर्यटनाची क्षमता खूप अफाट आहे पण आपण एका जागी अडकलो होतो माहीत नाही पण  आपली मानसिकताही तशी झाली होती. भारताचे पूर्ण रूप जगासमोर आणण्याचे आम्ही ठरवले आहे.आणि   भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पाहुण्यांना माझा आग्रह आहे की,त्यांनी भारतातील कोणत्या ना कोणत्या ठिकाणाला भेट द्यावी. कदाचित माझ्या  पर्यटनाला, आपल्या इथे पर्यटनाची अशी अशी ठिकाणे आहेत हे माहिती करून देण्यासाठी यावेळी आम्ही 75 प्रतिष्ठित ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम केला. तुम्ही पर्यटनाच्या शक्यता बरोबरच सांगितल्या आहेत, भारत संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनू शकतो.

मित्रांनो,

आपली डिजिटल अर्थव्यवस्थाही वेगाने पुढे जात  आहे. भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक केली जात आहे. म्हणजेच आपल्या विकासाच्या  इंजिनाशी संबंधित प्रत्येक क्षेत्र आज पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्याचा हा  अमृत काळभारतासाठी अपार  नवीन संधी घेऊन येत आहे. आमचा निर्धार पक्का आहे, आमचा हेतू अढळ  आहे. मला विश्वास  आहे की, आपण आपले  संकल्प पूर्ण करू, 21व्या शतकात भारत ज्या उंचीला पात्र आहे ती उंची गाठू. आणि  थर्मन  जी काही आव्हानाविषयी  सांगत होते, मला मान्य आहे की आव्हाने आहेत पण जर आव्हाने असतील तर 130 कोटी उपाय देखील आहेत,हा माझा विश्वास आहे.आणि त्या विश्वासासह  आव्हानांनाच  आव्हान देऊन  पुढे जाण्याचा संकल्प घेऊन वाटचाल सुरु आहे.  आणि म्हणून आपण समावेशनाचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्या मार्गानेही आपण विकास साधण्याचे प्रयोजन ठेवले आहे.पुन्हा एकदा अरुणजींचे स्मरण  करून मी माझे बोलणे थांबवतो.  थर्मन जी यांना  विशेष शुभेच्छा देतो.  मी तुम्हा सर्वांचेही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.

धन्यवाद !

JPS/ST/Nilima/Sonal C./PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1840735) Visitor Counter : 214