पंतप्रधान कार्यालय
स्वामी आत्मस्थानंद यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचे संबोधन
स्वामीजींचे कार्य जनसामान्यांपर्यंत घेऊन चाणाऱ्या छायाचित्र, चरित्र आणि माहितीपटाच्या प्रकाशनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
“आपल्या स्वत्त्वाच्या पलीकडे स्वतःला उंचावणे आणि समाजासाठी जीवन जगणे हा संन्यासाचा अर्थ आहे.”
“स्वामी विवेकानंदांनी संन्यस्थाच्या महान परंपरेला आधुनिक स्वरुपात साकारले
“मोहिमेच्या स्वरुपात काम करणे, नव्या संस्था उभारणे आणि या संस्थांना बळकट करणे ही रामकृष्ण मिशनची मूल्ये आहेत”
“भारताच्या संत परंपरेने नेहमीच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ची घोषणा केली आहे”
“रामकृष्ण मिशनचे संत देशातील राष्ट्रीय एकतेचे वाहक होते याची सर्वांनाच कल्पना आहे”
“स्वामी रामकृष्ण परमहंस एक असे संत होते ज्यांच्याकडे मां कालीची स्पष्ट दृष्टी होती”
“भारत डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला आला आहे”
Posted On:
10 JUL 2022 11:27AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वामी आत्मस्थानंद जन्मशताब्दी सोहळ्याला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले.
स्वामीजींसोबत व्यतीत केलेल्या कालखंडाचे स्मरण करून पंतप्रधानांनी स्वामी आत्मस्थानंदांना अभिवादन केले. या सोहळ्यातील उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, अनेक भावना आणि आठवणींनी भरलेला हा कार्यक्रम आहे. मला नेहमीच त्यांचा आशीर्वाद लाभला. त्यांच्यासोबत राहण्याची मला संधी मिळाली. अखेरपर्यंत त्यांच्या संपर्कात मी राहिलो हे माझे सौभाग्य म्हणावे लागेल.
स्वामीजींचे कार्य जनसामान्यांपर्यंत घेऊन चाणाऱ्या छायाचित्र चरित्र आणि माहितीपटाचे प्रकाशन झाल्याबद्दल पंतप्रधानांनी यावेळी आनंद व्यक्त केला. रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष पूज्य स्वामी स्मरणानंदजी महाराज यांच्या कार्याबद्दल मोदी यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य पूज्य स्वामी विनयानंदजींकडून स्वामी आत्मस्थानंदांना मार्गदर्शन मिळाले असे मोदी यांनी अधोरेखित केले. स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आध्यात्मिक उर्जा आणि जागृतावस्था त्यांच्यात अगदी स्पष्ट दिसून येत होती, असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या त्यागाच्या महान परंपरेकडे देखील पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
वानप्रस्थ आश्रम हे देखील संन्यासाच्या दिशेचे एक पाऊल आहे. आपल्या स्वत्त्वाच्या पलीकडे स्वतःला उंचावणे आणि समाजासाठी जीवन जगणे हा संन्यासाचा अर्थ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. समाजापर्यंत स्वतःचा विस्तार करावा लागतो. एका संन्याशासाठी सर्व प्राणीमात्रांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा असते. सर्व जीवांमध्ये शिवाची अनुभूती होणे म्हणजे परमोच्च अनुभूती आहे. स्वामी विवेकानंद यांनी संन्यस्थाच्या महान परंपरेला आधुनिक स्वरुपात साकारले, असे पंतप्रधानांनी सांगितले. स्वामी आत्मस्थानंदजी देखील याच स्वरुपात विलिन झाले आणि जगले आणि आपल्या आयुष्यात त्याचा अवलंब केला.
स्वामीजींच्या निर्देशानुसार बेलूर मठ आणि रामकृष्ण मिशन द्वारे केवळ भारतातच नव्हे, तर नेपाळ आणि बांग्लादेश मध्ये मोठ्या प्रमाणात केलेली मदत आणि बचाव कार्याचा पंतप्रधान मोदी यांनी विशेष उल्लेख केला. ग्रामीण भागातील जनतेच्या कल्याणासाठी स्वामीजींनी केलेल्या अथक कार्याचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी गरिबांना रोजगार आणि उपजीविकेसाठी मदत करणाऱ्या स्वामीजींनी निर्माण केलेल्या संस्थांवर देखील भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की स्वामीजींनी गरिबांची सेवा, ज्ञानाचा प्रसार आणि त्याचे कार्य हीच उपासना मानली. नवीन संस्थांची निर्मिती आणि त्यांच्या बळकटीकरणासाठी रामकृष्ण मिशनच्या संकल्पना अभियान म्हणून राबवल्या जायला हव्यात ही गोष्ट पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली. असे संत जेथे आहेत, तेथे मानवतेची सेवा देणाऱ्या संस्था अपोआप निर्माण होतात, ही गोष्ट स्वामीजींनी आपल्या संन्यस्त जीवनामधून सिध्द केल्याचं पंतप्रधान म्हणाले. शेकडो वर्षांपूर्वीचे आदी शंकराचार्य असोत, की आधुनिक काळातील स्वामी विवेकानंद, भारतीय संत परंपरेने नेहमीच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही घोषणा दिल्याचं मोदी म्हणाले. रामकृष्ण मिशनची स्थापना देखील ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेशी निगडीत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या योगदानावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की ते आपला संकल्प अभियानाच्या रुपात जगले. त्यांचा प्रभाव देशाच्या सर्व भागांमध्ये दिसून येतो, तसेच त्यांनी केलेल्या प्रवासामुळे देशाला गुलामगिरीच्या काळात आपल्या प्राचीन राष्ट्रीयत्वाची जाणीव झाली आणि नवा आत्मविश्वास गवसला. रामकृष्ण मिशनची ही परंपरा स्वामी आत्मस्थानंदजी यांनी जीवनभर पुढे नेली.
स्वामीजींबरोबर घालवलेल्या वेळेची आठवण काढताना पंतप्रधान मोदी म्हणाले, त्यांच्याशी गुजराती मधून संवाद साधण्याचे भाग्य आपल्याला लाभले. कच्छ येथील भूकंपाच्या वेळी स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मदत कार्याबाबत देखील पंतप्रधानांनी भाष्य केले. मोदी म्हणाले, ‘रामकृष्ण मिशनच्या संतांना देशातील राष्ट्रीय एकात्मतेचे वाहक म्हणून प्रत्येक जण ओळखतो आणि जेव्हा ते परदेशी जातात तेव्हा तेथे भारतीयत्वाचे प्रतिनिधित्व करतात.’
पंतप्रधान मोदी म्हणाले, की स्वामी रामकृष्ण परमहंस हे असे एक संत होते, ज्यांना मां कालीचे स्पष्ट दर्शन होते आणि त्यांनी आपले संपूर्ण अस्तित्व मां कालीच्या चरणी अर्पण केले होते. हे जग, परिवर्तनशील आणि स्थिर, सर्व काही मातेच्या चैतन्याने व्यापले आहे. ही जाणीव बंगालमधील काली पूजनामधून दिसून येते. या चेतनेचा आणि शक्तीचा एक किरण स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद या युगपुरुषाच्या रुपात प्रकाशित केला असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वामी विवेकानंद यांना मां कालीबद्दल वाटणाऱ्या अध्यात्मिक दृष्टीने त्यांच्यामध्ये असामान्य ऊर्जा आणि शक्ती भिनवली. जगन्माता कालीच्या स्मरणाने स्वामी विवेकानंद यांच्या सारखे उत्तुंग व्यक्तिमत्व लहान मुलाप्रमाणे भक्तिभावाने उत्साहित होत असे. स्वामी आत्मस्थानंदजी यांच्यामध्ये आपल्याला हाच प्रामाणिक भक्तीभाव आणि शक्ती साधनेचे बळ दिसल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
जेव्हा आपण व्यापकपणे विचार करतो,तेव्हा प्रयत्न करताना आपण कधीही एकटे नसतो,असे आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दाखवून आहे,असे स्वामी आत्मस्थानंदजी यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान श्री मोदी म्हणाले.या भारतवर्षाच्या भूमीवर अशा कितीतरी संतांचा जीवनप्रवास आपणास पहायला मिळेल, ज्यांनी कोणतीही साधने नसताना आपले शिखरासारखे संकल्प पूर्ण केले. श्री मोदी यांनी आत्मस्थानंदजींच्या जीवनात हेच श्रद्धा आणि समर्पण पाहिले.जेव्हा भारतातील एखादे ऋषी जर इतकं काही करू शकतात, तर 130 कोटी देशवासीयांच्या सामूहिक संकल्पाने साध्य होणार नाही असे कोणतेही ध्येय नाही,असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
डिजिटल इंडियाचे उदाहरण देताना, पंतप्रधान श्री मोदी म्हणाले, की डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारत जगात अग्रेसर रीतीने उदयास आला आहे.
भारतातील जनतेला एकूण 200 कोटी लसींच्या मात्रा देणे साध्य करण्याच्या यशावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. विचार शुद्ध असले की प्रयत्न पूर्ण व्हायला वेळ लागत नाही आणि अडथळ्यांतूनही आपल्याला मार्ग दिसतो,याची देखील ही उदाहरणे द्योतक आहेत.
पूज्य संतांच्या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे बांधली जात आहेत. लोकांना प्रेरणा द्यावी आणि मानवसेवेच्या उदात्त कार्यात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन श्री मोदींनी यावेळी सर्वाना केले. हे शतक अमृत महोत्सवी वर्ष हे नवीन उर्जेचा आणि नवीन प्रेरणेचा वर्ष ठरत असल्याचे श्री मोदी यांनी अधोरेखित केले आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात कर्तव्याची भावना जागृत करण्यात यशस्वी होवो अशा शुभेच्छा दिल्या. आपल्या सर्वांच्या सामूहिक योगदानामुळे मोठा बदल घडू शकतो, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
***
Jaydevi PS/S.Patil/R.Agashe/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840549)
Visitor Counter : 217
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada