पंतप्रधान कार्यालय
वाराणसी इथे अखिल भारतीय शिक्षण समागमच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
07 JUL 2022 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2022
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेन्द्र प्रधान जी, राष्ट्रीय शिक्षण धोरण आखणाऱ्या समितीचे अध्यक्ष के. कस्तूरीरंगन जी, सरकारमधला इतर मंत्रीवर्ग, या संमेलनात सहभागी कुलगुरू,शिक्षण संस्थांचे संचालक,सर्व शिक्षकगण,शिक्षण तज्ञ आणि उपस्थित पुरुष आणि महिला वर्ग,
‘अखिल भारतीय शिक्षा समागम’चे हे आयोजन अशा पवित्र धरतीवर होत आहे जिथे स्वातंत्र्य प्राप्तीपुर्वी इतक्या महत्वपूर्ण विद्यापीठाची स्थापना झाली होती. देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच्या काळात हा समागम होत आहे. अमृतकाळात देशाचे अमृत संकल्प साकार करण्याची मोठी जबाबदारी आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आहे, आपल्या युवा पिढीवर आहे. आपल्या उपनिषदात म्हटले आहे- विद्यया अमृतम् अश्नुते। अर्थात्, विद्या ही अमरत्व आणि अमृतापर्यंत घेऊन जाते. काशीलाही मोक्ष नगरी म्हटले जाते कारण आपल्याकडे ज्ञान, विद्या हाच एकमेव मुक्तीचा मार्ग मानला गेला आहे.म्हणूनच शिक्षा आणि शोध, विद्या आणि बोध यांचे इतके मोठे मंथन सर्व विद्येचे प्रमुख केंद्र असलेल्या काशीमध्ये होत असताना यातून निघणारे अमृत देशाला नक्कीच नवी दिशा देईल. या प्रसंगी महामना मालवीय जी यांच्या चरणी नमन करत या आयोजनासाठी आपणा सर्वाना मी शुभेच्छा देतो. मी काशीचा खासदार आहे. माझ्या काशीनगरीमध्ये आपण सर्वजण आला आहात तर एका प्रकारे मी आपला यजमानही आहे. या सर्वांच्या बरोबरीने आपण माझेही पाहुणे आहात. आपली व्यवस्था चोख राखण्यासाठी सर्वांनी भरपूर प्रयत्न केले असतीलच त्यामुळे व्यवस्थेत आपल्याला उणीव भासणार नाही. मात्र तरीही काही उणीव राहिली असेल तर त्याचा दोष माझा असेल आणि आपल्याला काही तसदी झाल्यास यजमान या नात्याने मी आधीच आपली क्षमा मागतो.
मित्रहो,
मी आताच एका कार्यक्रमावरून आलो आहे. माध्यान्ह भोजनासाठी एक मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचे काम होते. तिथे मला माझ्या काशी नगरीच्या सरकारी शाळेमधल्या 10-12 वर्षांच्या मुलांशी गप्पागोष्टी करण्याची संधी मिळाली आणि तिथून इथे आलो आहे, त्यांच्या गप्पागोष्टी ऐकून आलो आहे आणि आपल्याला सांगण्यासाठी आलो आहे. पुढच्या वेळी मी येईन तेव्हा ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मी भेटलो आहे त्यांच्या शिक्षकांना भेटण्याची माझी इच्छा आहे. असा विचार माझ्या मनात का आला असेल याची कल्पना आपण करू शकता.माझ्या मनावर इतका प्रभाव पडला,10-15 मिनिटेच वेळ असेल माझ्याकडे मात्र त्या मुलांमध्ये जी प्रतिभा होती,जो आत्मविश्वास होता,जे वैविध्य होते आणि तेही सरकारी शाळेतल्या आपल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांकडे. ती मुले जी प्रतिभा, जे कौशल्य सादर करत होती,आपल्या कुटुंबातही आपला नातू-नात आपल्यासमोर असे कौशल्य सादर करत असतील तर आपणही आपल्याकडे पाहुणे आल्यावर त्यांच्यासमोर त्यांना उभे करून सांगू, पाहुणे आले आहेत तर त्यांनाही जरा तुझे कौशल्य, प्रतिभा दाखव.माझ्या सांगण्याचे तात्पर्य हे आहे की वर्तमान पिढीचे हे सामर्थ्य, त्यांची क्षमता, आपण जिथे आहात तिथे, म्हणजे पदावर नव्हे तर संस्थेत ते जेव्हा पोहोचतील तेव्हा आपण तर तिथे नसू, आपण अशी संस्था घडवून जाऊ जिथे अशी प्रतिभा लाभलेली मुले येत्या काळात दाखल होणार आहेत.त्यांना तिथे काही उणीव भासू नये याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि येते तीन दिवस इथे ज्या चर्चा होतील, जे मंथन होईल त्यातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला प्रभावी दिशा मिळेल याचा मला विश्वास आहे.
मित्रहो,
संकुचित विचारांच्या कक्षेतून शिक्षण मोकळे करत 21 व्या शतकाच्या आधुनिक विचारांसमवेत त्याची सांगड घालणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे हे आपण सर्व जाणताच. आपल्या देशात प्रतिभेची कमतरता कधीच नव्हती.मात्र दुर्दैवाने आपल्या इथे अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे की शिक्षणाचा अर्थ फक्त आणि फक्त नोकरी इतकाच मानला जाऊ लागला होता. गुलामीच्या काळात इंग्रजांनी, आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, आपल्यासाठी सेवक वर्ग तयार करण्यासाठी शिक्षणाचे हे स्वरूप ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर यात थोडा फार बदल झाला मात्र मोठे बदल राहूनच गेले. इंग्रजांनी केलेली व्यवस्था भारताच्या संस्कृती मुल्यांचा कधीच भाग नव्हती आणि होऊही शकत नाही. आपण आपल्या जुन्या कालखंडाकडे नजर टाकली, तर आपल्याकडे शिक्षणात वेगवेगळ्या कलांची संकल्पना होती.बनारस, माझी काशी नगरी तर याचे जिवंत उदाहरण आहे. इथे केवळ चांगली गुरुकुले आणि शिक्षण संस्था आहेत म्हणून बनारस ज्ञानाचे केंद्र नव्हते.बनारस ज्ञानाचे केंद्र यासाठी होते कारण इथे ज्ञान आणि शिक्षण बहु आयामी होते. शिक्षणातले हे वैविध्य आपल्या शिक्षण व्यवस्थेचेही प्रेरणास्त्रोत असले पाहिजे. केवळ पदवीधारक युवक निर्माण न करता आपल्या देशाची घोडदौड होण्यासाठी ज्या मनुष्यबळाची आवश्यकता असेल ते मनुष्यबळ आपली शिक्षण व्यवस्था उपलब्ध करेल, देशासाठी उपलब्ध करेल. या संकल्पाचे नेतृत्व आपले शिक्षक आणि शिक्षण संस्थाना करायचे आहे. आपला शिक्षकवर्ग जितक्या वेगाने ही भावना आत्मसात करेल तितकाच जास्त लाभ विद्यार्थी- विद्यार्थीनीना, देशाच्या युवकांना, देशाच्या भविष्याला होईल.
मित्रहो,
नव भारत घडवण्यासाठी, नव्या व्यवस्था निर्मिती,आधुनिक व्यवस्थांचा समावेश तितकाच आवश्यक आहे. जे यापूर्वी कधीच घडले नव्हते, जी उद्दिष्टे साध्य करण्याचे देशाने कधी कल्पनाही केली नव्हती ती आज भारतात वास्तवात आपल्यासमोर घडत आहेत. आपण पहा ना, कोरोना सारख्या इतक्या मोठ्या महामारीतून आपण वेगाने सावरलोच त्याचबरोबर जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक आहे.आज आपण जगातली सर्वात मोठी तिसरी स्टार्ट अप परिसंस्था आहोत. अंतराळ तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात जिथे सरकारच सर्व काही करत असे तिथे आता खाजगी क्षेत्राद्वारे युवकांसाठी नवे जग निर्माण होत आहे, अवघे अंतराळ त्यांच्या खुपच जवळ येत आहे मित्रहो. देशाच्या कन्यांसाठी, महिलांसाठी ज्या क्षेत्राची कवाडे पूर्वी बंद होती, आज ती क्षेत्रे या कन्यांच्या प्रतिभेची साक्ष देत आहेत.
मित्रहो,
देशातले वातावरण जेव्हा असे असेल, देशाचा वेग जेव्हा असा असेल तेव्हा आपल्या युवा वर्गालाही उंच भरारी घेण्यासाठी नवी उर्जा देणे आवश्यक आहे. आतापर्यंत शाळा, महाविद्यालये,पुस्तके हे निश्चित करत आली की मुलांना कोणत्या दिशेला जायचे आहे. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर युवकांवरची जबाबदारी वाढली आहे. त्याच्या बरोबरीने, युवकांची स्वप्ने आणि भरारी यासाठी सातत्याने प्रोत्साहन देण्याची, त्यांचे मन जाणून घेण्याची, त्यांच्या आकांक्षा समजून घेण्याची आपल्यावरची जबाबदारीही वाढली आहे. तेव्हाच त्याला खत-पाणी मिळेल. युवकांना जाणून न घेता त्यांच्यावर काहीही लादण्याचा काळ आता गेला मित्रहो. आपल्याला ही बाब सदैव लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला तसेच शिक्षण,संस्थाची व्यवस्था,तसेच मनुष्यबळ विकास, आपल्याला स्वतःला सज्ज व्हावेच लागेल. मुलांची प्रतिभा, त्यांनी निवडलेल्या पर्यायाच्या अनुषंगाने त्यांना कौशल्य प्रदान करण्यावर नव्या धोरणात संपूर्ण भर देण्यात आला आहे. आपले युवा कौशल्यप्राप्त असावेत,आत्मविश्वास पूर्ण असावेत, व्यवहार चतुर असावेत यासाठी शैक्षणिक धोरण पाया घालत आहे.
मित्रहो,
देशात होणाऱ्या वेगवान परिवर्तनात शिक्षण व्यवस्था आणि त्याच्याशी संबंधित आपणा सर्व विद्वत जनांची भूमिका किती महत्वाची आहे याचे एक उदाहरण, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना सुरवातीच्या कालखंडातला एक अनुभव सांगतो. मी नव्यानेच मुख्यमंत्री झालो होतो, सरकारी कामकाजाच्या अनुभवापासून दूर होतो,अचानक काम आले होते. मी एक कार्यक्रम साजरा केला होता. सर्व सचिवांना मी सांगितले की आपणच आपल्या विभागाचे मुख्यमंत्री आहात. मला सांगा पाच वर्षात आपण आपला विभाग कुठवर न्याल ? कसा न्याल ? काय साध्य कराल ?त्यातून गुजराथच्या सर्वसामान्य जनतेला काय लाभ होईल ? त्याचा दृष्टीकोन आणि तपशीलवार सादरीकरण माझ्यासमोर करा. सर्व विभागाच्या सचिवांना मी हे सांगितले आणि दर दिवशी संध्याकाळी पाच वाजता माझ्या मंत्री मंडळातले सर्व मंत्री आणि सर्व सचिव आम्ही एकत्र येत असत आणि एक सचिव येऊन आपल्या विभागाचे संपूर्ण सादरीकरण करत असे, त्यावर चर्चा होत असे. सर्व सचिव,आधी कृषी सचिवपदी राहिलेला मात्र आता दुसरा विभाग सांभाळणारा सचिवही इथे उपस्थित असे. सर्वजण आपले विचार मांडत.त्यावर चर्चा होई.आमचे मंत्रीही चर्चा करत.मी ऐकत असे. शिकण्याचा प्रयत्न करत होतो. साधारणपणे महिनाभर हा कार्यक्रम सुरु राहिला.संध्याकाळी 5 वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम इतका वेळ सुरु असे की रात्री दहा वाजता मोठ्या मुश्किलीने घरी जायला मिळत असे. अतिशय तळमळीने हा कार्यक्रम चालला. कदाचित हिंदुस्तानच्या इतिहासात प्रथमच असे घडले असेल. उद्योग जगताशी एक सादरीकरण झाले. येत्या काळात उद्योग जगताचा चेहरा-मोहरा, या काळात औद्योगिक विकास कसा राहील असे सर्व ते सांगत होते.कार्यक्रम संपल्यानंतर शिक्षण सचिव माझ्याकडे आले. कारण दुसऱ्या दिवशी शिक्षण सचिवांचा कार्यक्रम होता. त्यांनी सांगितले साहेब मी उद्या सादरीकरण करू शकणार नाही. मी विचारले असे का ? एक महिना आधीपासून आपल्याला तयारी करायला सांगितले होते आणि आता शेवटच्या क्षणाला आपण सांगत आहात की शक्य नाही म्हणून. ते म्हणाले तयार तर आहे,मी करूही शकतो पण औद्योगिक विकासाचे आज जे सादरीकरण झाले ते पाहिल्यावर मला असे वाटते की आमचा त्यांच्याशी काही मेळच नाही. आम्ही डावीकडे जात आहोत तर ते उजवीकडे जात आहेत.त्यांच्या सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर माझ्या सादरीकरणात सुधारणा करण्यासाठी मला वेळ हवा आहे, तेव्हाच आपण समावेशी विकासाच्या दिशेने शिक्षण आणि उद्योग जगत एकत्र येऊन वाटचाल करू शकतो. आपल्यालाही आता तर संपूर्ण जगाची माहिती असली पाहिजे,प्रत्येक विद्यापीठाची माहिती असली पाहिजे की जग कुठे चालले आहे, कसे चालले आहे. त्यामध्ये आपला देश कुठे आहे. त्यात आपला युवा कुठे आहे. येत्या 15-20 वर्षात ज्यांच्या हाती भारत असेल त्यांना मी कशा रीतीने घडवू. ही आपली मोठी जबाबदारी आहे मित्रानो.याच धर्तीवर आपल्या सर्व शिक्षण संस्थांनी स्वतःला हे विचारण्याची आवश्यकता आहे की आपण भविष्यासाठी सज्ज आहोत का ? मी आज परीक्षा देत आहे, पदवीदान समारंभ करत आहे,मी ज्या पदावर आहे, हेच माझे काम आहे का, माझे काम हे आहे का की मी एक अशी संस्था उभी करून जाईन की आज जी मुले माझ्या शाळा, महाविद्यालयात येतील, स्वातंत्र्याची जेव्हा 100 वर्षे होतील तेव्हा मोठी जबाबदारी ही मुले निभावत असतील,तेव्हा माझा देश तिथे पोहोचेल, मी आज अशी व्यवस्था उभी करेन.
तुम्हा सर्वांना वर्तमानाचा सांभाळ करायचा आहे, तुमच्या आधी जे करून गेले आहेत, त्याला पुढे न्यायचे आहे. पण आज जे काम करत आहेत, त्यांना भविष्याचा विचार करावाच लागेल आणि व्यवस्था भविष्यासाठी विकसित करावी लागतील. कारण आज बालकांच्या मनात अशा प्रकारच्या जिज्ञासा असतात ज्यांची उत्तरे आताच मी सांगितले. ज्या बालकांना भेटून मी आलो आहे. तुमच्या घरात देखील तुम्हाला कळतच असेल, तुम्हाला तुमच्या घरातील लहान लहान नातू- नाती प्रश्न विचारत असतील. तुम्ही विचारात पडत असाल की अरे देवा हा कुठे माझे डोके खातो आहे. तो तुमचे डोके खात नाही आहे पण तुमचे डोके त्याचे उत्तर देऊ शकत नाही आहे. हे सर्व आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरी हा अनुभव आला असेलच, आजची पिढी ज्या गोष्टींविषयी विचारायला येत असते ती गुगलवर तर 10 गोष्टींविषयी प्रश्न विचारत राहते. ते म्हणतात तुम्ही काय करत आहात, गुगलवर तर हे सांगितले आहे. तुम्हाला उलट प्रश्न विचारत राहतात तुमच्याकडची लहान मुले. आता ही बालके 10 वर्षांनी तुमच्या विद्यापीठात येतील, त्यावेळी तुमचे काय होईल? त्यामुळे आपल्याला आतापासूनच स्वतःला सज्ज केले पाहिजे. तुम्हाला घरी देखील तुमच्याकडच्या लहान मुलांसोबत मिसमॅचचा अनुभव येऊ लागला असेल. ज्यावेळी शाळा, महाविद्यालये यांच्या संकुलात युवा पिढी असेल. अशा प्रकारे नवी विचारसरणी घेऊन आलेली असेल आणि आपण त्यांच्या विचारांना अनुरुप नसलो तर हा त्यांच्यावर किती मोठा अन्याय होईल, मित्रांनो आणि म्हणूनच आपण भविष्याचा विचार केला पाहिजे, त्याला जाणून व्यवस्था विकसित केल्या पाहिजेत. अगदी काही दिवसांपूर्वीच मी Digital India अभियाना अंतर्गत गांधीनगर मध्ये एक exhibition पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे सरकारी शाळांमधील विद्यार्थी होते. बारावी, दहावी,eleventh चे विद्यार्थी होते. तेथील विद्यार्थ्यांनी जे प्रोजेक्ट्स तयार केले होते, ज्या ideas मांडल्या होत्या. मी त्यांना बराच वेळ समजून घेण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करत होतो आणि या लहान मुलांच्या कामाने मी प्रभावित झालो होतो. संशोधनाची इतकी क्षमता, इतक्या लहान वयात अशा एकेक गोष्टी ऐकून मी थक्क झालो. तिथे अनेक विद्यार्थ्यांना बायोटेक आणि जेनेटिक्स मध्ये रस होता. त्यांच्या वर्गात जेव्हा सायन्स चे फंडामेंटल्स शिकवले जात होते तेव्हा ते जीन मैपिंग, Affinity chromatography (एफिनिटी क्रोमॅटोग्राफी) जेनेटिक लाइब्रेरी बेस्ड टूल्स या विषयांविषयी बोलत होते. आता तुम्ही कल्पना करू शकता की केवढा मोठा फरक आहे. मी त्यांचे काम पाहून विचार करत होतो की जेव्हा हे उच्च शिक्षणाच्या टप्प्यापर्यंत पोहोचतील त्यावेळी आपल्या institutes इतक्या आधुनिक विचारांअनुसार तयार असतील का? जर आपण या बालकांसाठी ते उच्च शिक्षणाच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची वाट पाहत राहिलो तर तोपर्यंत जग खूपच पुढे गेलेले असेल मित्रांनो. म्हणूनच आपल्याला याचा आतापासूनच विचार करावा लागेल की ज्या वयात बालकांच्या मनात प्रेरणा निर्माण झालेल्या असतात, त्याच वयात त्यांना मार्गदर्शन आणि साधने उपलब्ध झाली पाहिजेत, याची व्यवस्था करण्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आपल्या संस्थांमध्ये अशी व्यवस्था निर्माण करण्यावर आपल्याला काम केले पाहिजे.
मित्रांनो,
या महिन्याच्या शेवटी, 29 जुलैला राष्ट्रीय शिक्षण धोरणाला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत आणि आताच धर्मेंद्र जी सांगत होते की व्यापक मंथनानंतर हे शिक्षण धोरण तयार करण्यात आले आहे. कस्तुरीरंगनजींनी खूप चांगले नेतृत्व केले, त्यामुळेच हे शक्य झाले आहे आणि इतकी विविधता असलेला देश आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे अशा प्रकारे स्वागत झाले पाहिजे. ही खरोखरच एक खूप मोठी सिद्धि आहे, खूप मोठी सिद्धी आहे. पण याचे वैशिष्ट्य पहा हे तयार करण्यासाठी मंथन तर झाले, साधारणपण सरकारचा स्वभाव असतो, एक document तयार केले जाते आणि काळाच्या भरवशावर ते document सोडून दिले जाते, काही व्यक्तींच्या भरवशावर सोडून दिले जाते.तुमच्या टेबलावर देखील काही दिवस पडून राहत ते document शोभा वाढवत राहते. नंतर ते देखील टेबलावरून हटवले जाते आणि त्या जागी कोणते तरी नवीन document येते, त्याची जागा घेते. गोष्ट इथेच समाप्त होते. याचा अनुभव तुम्हाला देखील आहे, या ठिकाणी बसलेल्या लोकांना देखील आहे. पण आम्ही असे होऊ दिले नाही. आम्ही प्रत्येक क्षणाला राष्ट्रीय शिक्षण धोरण जिवंत ठेवले आहे. इतक्या कमी काळात मी स्वतः देखील कमीत कमी 25 सेमिनार मध्ये सहभागी झालो आहे. कदाचित 25 पेक्षा जास्त आणि याच विषयावर मी बोलत असतो. हा अहवाल दिल्यानंतर स्वतः कस्तुरीरंगन जी सातत्याने संवाद साधत आहेत, प्रत्येक क्षेत्रातील लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांचे clarification हवे असेल तर समजावत आहेत, त्यामागे कोणती vision आहे, background information विषयी ते समजावत आहेत. संपूर्ण सरकारचे सर्व विभाग सातत्याने प्रयत्न करत आहेत कारण हे 30 वर्षांनंतर आलेले document केवळ कागदाचा ढिगारा म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवून चालणार नाही. तुम्ही देखील या ठिकाणी ज्यावेळी तीन दिवस मंथन कराल, त्याचे अनेक बारकावे आहेत जे कदाचित तुम्ही संपूर्ण पानेच्या पाने वाचली असतील पण आता नव्या पद्धतीने तुमच्या समोर उघड होऊ लागतील. म्हणून तुमच्या university मध्ये सुद्धा अशाच प्रकारे सतत मंथन करण्याची योजना तयार करून येथून जायचे आहे. केवळ येथे ऐकून तुम्ही जाऊ नका. तुमच्यासोबत संबंध येणारे जे इतर सहकारी आहेत त्यांनी देखील अशाच प्रकारे मंथन केले पाहिजे. त्यातून आणखी मंथन बाहेर काढले पाहिजे तेव्हा कुठे याचा लाभ मिळू शकेल. आणि त्याचे Implementation करण्यामध्ये जी आव्हाने आहेत त्याच्या तपशीलावर आपण सातत्याने लक्ष ठेवले पाहिजे.
मित्रांनो,
आज जेव्हा आपण कोणतेही काम आपल्या हाती घेतो त्यावेळी समस्यांवरचे तोडगे देखील वेगाने मिळू लागतात. समस्या विचारात घेऊन की अरे बाबा मी कुठे यामध्ये पडू, यातून तर काही तोडगा देखील निघत नाही आहे. मित्रांनो, या दोन वर्षात देशाने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्याच्या दिशेने अनेक भक्कम पावले उचलली आहेत. या काळात Access, Quality आणि Future Readiness सारख्या महत्त्वाच्या विषयांवर झालेल्या कार्यशाळांनी खूप मदत केली आहे. देश विदेशातील academicians सोबत ज्या चर्चा झाल्या, माझी देखील देशाच्या शिक्षणमंत्र्यांसोबत, शिक्षण तज्ञांसोबत जो संवाद झाला आहे, त्याने देखील याची गती आणखी वाढवली आहे आणि काही दिवसांपूर्वीच आपल्या धर्मेंद्र जींनी देशभरातील शिक्षणमंत्र्यांना देखील बोलावले आहे. जशी तुमच्यासोबत चर्चा करत आहोत, तशीच चर्चा त्यांच्या सोबत देखील केली होती. या गोष्टी आम्हाला शंभर टक्के कशा करता येतील, याचे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्य सरकारानी देखील आपापल्या स्तरावर देखील याच दिशेने अनेक महत्वपूर्ण पावले उचलली आहेत आणि आज सर्वांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे की देश आणि विशेषतः देशाचा युवा वर्ग या मोठ्या बदलाचा भागीदार बनत आहे.
मित्रांनो,
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी देशाच्या शिक्षण क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या एका मोठ्या overhaul वर देखील काम झाले आहे. आज देशात मोठ्या संख्येने नवी महाविद्यालये सुरू होत आहेत, नवी विद्यापीठे सुरू होत आहेत. नवीन IIT आणि IIM ची स्थापना होत आहे. 2014 नंतर, देशात वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाली आहे. युवा वर्गाला चांगल्या संधी देण्यासाठी विद्यापीठांमध्ये समान मानकांसाठी या वर्षापासून Common University Entrance Test (CUET) देखील लागू करण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या आणखी Reforms देखील करण्यात आल्या आहेत. देशाच्या याच प्रयत्नांचा परिणाम आहे की World University Rankings मध्ये भारतीय संस्थाच्या संख्येत हळू हळू वाढ होऊ लागली आहे. हा बदल केवळ एक सुरुवात आहे. आपल्याला या दिशेने खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
मित्रांनो,
मला याचा देखील आनंद वाटत आहे की राष्ट्रीय शिक्षण धोरण आता मातृभाषेतील शिक्षणाचे दरवाजे उघडू लागले आहे. याच मालिकेत , संस्कृत सारख्या प्राचीन भारतीय भाषांना देखील पुढे नेण्यात येत आहे. मी या ठिकाणी पाहात आहे की या आयोजनात देखील संस्कृतशी संबंधित लोकांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. काशीच्या धरती वरून झालेली ही सुरुवात नक्कीच भारतीय भाषा आणि भारतीय संकल्पना यांना नवी उर्जा देण्याचे काम करेल.
मित्रांनो,
मला पूर्ण खात्री आहे, आगामी काळात भारत जगात जागतिक शिक्षणाचे एक मोठे केंद्र बनून उदयाला येऊ शकतो. भारत केवळ जगातील युवा वर्गासाठीच शिक्षणाचे केंद्र बनून उदयाला येणार नसून जगातील विविध देशांमध्ये आपल्या युवा वर्गाला नव्या संधी देखील निर्माण करू शकेल. म्हणूनच आपल्या शिक्षण प्रणालीला आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनवण्याची गरज आहे. उच्च शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हिशोबाने तयार करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
सुमारे 180 उच्च शिक्षण संस्थामध्ये आंतरराष्ट्रीय प्रकरणांसाठी विशेष कार्यालये देखील स्थापन करण्यात आली आहेत. मला असे वाटते की तुम्ही सर्वांनी या संदर्भात विचारविनिमय केला पाहिजे. किंबहुना भारताच्या बाहेरच्या व्यवस्थाशी परिचित होण्याचा देखील प्रयत्न करा. ही नवी व्यवस्था, भारताच्या शिक्षण व्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अनुभवांचासोबत जोडण्यामध्ये ती मदत करेल.
मित्रांनो,
सध्याच्या काळात तुम्ही लोक वेगवेगळ्या सत्रांमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहात. मला असे वाटते की तुमच्या या चर्चेमुळे देशासाठी विविध प्रकारच्या क्षेत्रातील नवे मार्ग खुले व्हावेत. युवा पिढीला मार्गदर्शन मिळावे. जगातील अनेक देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जो वेग प्राप्त केला आहे त्यामध्ये तेथील विद्यापीठांचे देखील मोठे योगदान आहे. विद्यापीठे सातत्याने सामाजिक, आर्थिक आणि वैज्ञानिक विषयांवर संशोधन करत राहतात आणि सरकारला शिफारशी करतात. हीच संस्कृती, हीच कार्यपद्धती आपल्या देशात देखील विकसित करण्याची गरज आहे. यामुळे तरुण पिढीला देश आणि देशाच्या धोरणांची जाणीव होऊ लागते आणि त्याच्या शक्यतांसोबत ते परिचित होतात. मला नेहमीच असे वाटत राहिले आहे की देशातील युवा वर्गाची नवोन्मेषी विचारसरणी आणि नव्या कल्पनांसोबत नव्या व्यवस्थांनी देखील जास्तीत जास्त प्रमाणात जोडले पाहिजे. यामुळे अतिशय ताजी गुणवत्ता येते, ताज्या संकल्पना निर्माण होतात. यावर देखील आपण सर्वांनी चर्चा करावी, एखादा आराखडा तयार करावा, असे मला वाटते. विद्यापीठे कशा प्रकारे सरकारसोबत विविध क्षेत्रात भागीदारी करू शकतात, याविषयी विचारमंथन झाले पाहिजे. तुमची प्रावीण्याची क्षेत्रे तुम्हालाच निर्धारित करायची आहेत. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्याविषयी सर्वेक्षण करा आणि अध्ययन करा. तुमच्या विद्यापीठाची जी काही 50-100 किलोमीटरची कक्षा असेल, त्या क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांच्या समस्या कोणत्या आहेत? त्यावर उपाय काय आहेत? Resources कोणते आहेत? त्या Resources साठी काय करता येऊ शकते? तिथल्या सामान्य व्यक्तींची वृत्ति प्रवृत्ती कशी आहे? तुमच्या विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्ट मिळेल. स्थानिक दृष्टीकोनात एक खूपच चांगला अहवाल तयार होईल. सरकार ची एखादी योजना राबवली जात असेल तर तिच्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, कोणत्या त्रुटी आहेत, सुधारणा करण्यासाठी कुठे वाव आहे. एक चांगला अहवाल तयार होईल. या सर्व गोष्टी सरकारमध्ये गांभीर्याने विचारात घेतल्या गेल्या तर त्याचा खूप मोठा परिणाम मिळू शकतो.
माझ्या स्मरणात आहे की गुजराथमध्ये असताना एकदा सरदार पटेल विद्यापीठात माझा कार्यक्रम होता. सरदार पटेल विद्यापीठातील लोकांनी ग्रामीण विकास या विषयाच्या संदर्भात भरपूर संशोधन करून काही पुस्तके तयार केली होती. त्यानी मला ती भेट म्हणून त्या दिवशी दिली. मी ती अगदी बारकाईने पाहिली तर मला काही तथ्यांश आहे असे वाटले. मी डिपार्टमेंटला काम दिले, म्हटले भाऊ, हे काम जे विद्यार्थ्यांनी केले आहे ते जरा बघा. सरकार जे करत आहे आणि ही मुले जे म्हणत आहेत त्यात किती अंतर आहे ते बघा. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल त्यामधील अनेक बाबी मला ग्रामीण विकासाच्या कामाला एवढ्या उपयोगी पडल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं केलेलं ते काम. ज्याबाबतीत सरकारला वातानुकुलीत जागेत बसूनही निर्णय घेणे कठीण जाते. आमची ही पीढी ज्या क्षेत्रात जाते त्या क्षेत्रातील सार अतिशय उत्तमपणे घेऊन बाहेर पडते. आणि काही गोष्टींचा कल्पनातीत लाभ झाल्याचंही लक्षात येतं, आणि माझा तसा विश्वासही आहे. आता जसे आपल्याकडे हे कृषी विद्यापीठ आहे. आता कृषी विद्यापीठच्या प्रयोगशाळेत जे करतात ते कितीही उत्कृष्ट काम असो, अगदी त्याला प्रमाणपत्रही मिळेल, आंतरराष्ट्रीय मासिकात त्याबद्दल लेखही छापला जाईल त्याला पदवीही मिळेल पण ती गोष्ट प्रयोगशाळेतच राहील. आपल्याकडे प्रयोगशाळेतून जमिनीवर जाणारा मार्गसुद्धा असायला हवा ना. जे प्रयोगशाळेत खरं ते जमिनीवरही खरं व्हायला हवं. आणि जसं प्रयोगशाळेतून जमिनीवर येणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे ज्यांनी कधी विद्यापीठाचं तोंडही पाहिलेलं नाही अश्या लोकांकडेही बराच अनुभव असतो. हा जो जमिनीवरचा अनुभव आहे त्याला प्रयोगशाळेत आणायला हवं. आणि तो प्रयोगशाळेत कसा येईल?
संशोधन समृद्ध कसे कराल, परंपरागत अनुभव कसा समृद्ध होईल याचा विचार करून आपण पावले उचलली पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे परंपरागत औषधोपचाराचे आपले आयुर्वेदाचे ज्ञान आहे त्याला तुम्ही आव्हान देणार नाही की मी आव्हान देणार नाही. पण जगात अनेक देश आहेत जे पारंपरिक औषधोपचारात आपल्यापुढे निघून गेले आहेत. असे का, तर आताच्या काळात परिणाम आणि प्रमाण दोन्ही आवश्यक आहे. आम्ही म्हणू की भावा, या वनस्पतीच्या वापराने हा लाभ होतो, परिणाम होतो. पण आपण नुसतेच असे मानले की, सर्व विद्यापीठाचे विद्यार्थी माझं काहीही इथून न ऐकता जातील तरी चालेल, माझे दोन शब्द ऐकून जा आणि त्यावर मंथन होऊ द्या. तर, आपल्याला परिणाम मिळतात पण प्रमाण नसते आणि म्हणूनच आपल्याकडे परिणामांसोबत प्रमाणही असायला हवे. आपल्यापाशी डेटाबेस असायला हवा. आपल्याकडे त्याची सविस्तर नोंद असायला हवी, की कुठून बदल झाला आहे. आपण भावनेचा आधार घेऊन जग बदलू शकत नाही. भावना ही जगासमोर एक नमूना म्हणून दाखवू शकत नाही. आणि म्हणूनच परिणाम साधूनही प्रमाणाची आवश्यकता आज जगाला जाणवते आहे. आणि म्हणून आपल्या प्रमाणाच्या पूर्ततेसाठी यंत्रणा कामाला लावणे , व्यवस्थापन विकसित करणे परंपरा विकसित करणे ही कामे करायची झाल्यास ते सर्व आपल्या मदतीशिवाय होणार नाही. पुराव्याधारित पारंपरिक औषधांवरिल संशोधनाचे हे काम आपली विद्यापीठे फार उतत्म प्रकारे करू शकतील
मित्रहो,
आपल्या देशातील लोकसंख्याविषयक लाभांश (डेमोग्राफिक डिव्हिडंड) ही आपली मोठी ताकद आहे. चर्चा होत रहाते पण अखेर हे लोकसंख्याविषयक लाभांश म्हणजे काय आहे यावर कोणत्या विद्यापीठाने अभ्यास केला आहे का. जेव्हा जगात लोकसंख्याशास्त्रीय लाभांशावर विचार करण्याची वेळ आली तेव्हा त्या जगाने कोणते लक्ष्य ठेवून, कोणती पावले उचलली होती. तेथील विद्यापीठे कशी व्यवहार करत होती आणि त्याचा फायदा कसा घेतला. खूप वेळा आपण हे बोलतो, पुन्हा पुन्हा बोलत रहातो. पण लोकसंख्याविषयक लाभांशाच्या सर्व शक्यतांवर आपण का काम करू नये, या शक्तीचा उपयोग आपण येणाऱ्या 20,25,30 वर्षांमध्ये देशाला कसा करून देऊ शकतो. तसंही, आता जगातील देशांची स्थिती आपण बघतो आहोत तर एकापेक्षा एक समृद्ध देश तेथील लोकांचे आयुष्यमान वाढत असल्यामुळे चिंतेने त्रस्त आहेत. वृद्धत्व ही एक समस्या होऊन बसली आहे आणि तरुण वर्ग जवळ जवळ नाहीच. वृद्धांची मोठी संख्या आहे. आणि जग चालवायला लागते, जे चालवणे त्यांना शक्य होत नसते.
हे चक्र अश्या प्रकारचे आहे की प्रत्येकाला याचा भाग व्हावेच लागणार आहे. आज आपला देश तरुण आहे कधी तरी आपलाही देश त्याच वळणावर जाणार आहे. त्यावेळी तरुणांची संख्या कमी आणि वृद्धांची जास्त असेल, असेही दिवस येणार आहेत. अश्या प्रकारे वृद्धत्वामुळे देशाची जी परिस्थिती होते त्यावरील तोडग्यांसाठी आतापासून त्यावर काही मार्ग शोधणारे कोणीतरी या जगात आहेत का? तरुणवर्गाच्या कमी संख्येमुळे येणाऱ्या समस्य़ांना ते कशाप्रकारे तोंड देत आहेत. सर्व काही सुरळीत चालावे यासाठी कोणते व्यवस्थापन ते राबवतात, या सर्वांचा विचार करणे हा माझ्या विद्यापीठांचा स्वाभाविक स्वभाव हवा. आपणा सर्वांना संशोधन व काम करण्यासाठी विद्यापीठांमधून चांगला वाव असतो, असे मला वाटते. आणि त्यामुळेच ज्या मुलांना अश्या प्रकारचे प्रकल्प दिले जातात त्यातून त्यांची एक दृष्टी तयार होते.
त्यांनाही नवनवीन बाबी समजून घेण्याची संधी मिळते. आता हवामान बदलावर मोठमोठ्या चर्चा होत आहेत. हवामानाच्या या क्षेत्रातही जर आपली माणसे कामे करतील तर आपल्याकडे अगणित शक्यता आपल्यापाशी आहेतच. आता आपल्या देशात एक योजना तयार केली आहे, CDRIची. हवामानाच्या संदर्भात आपल्या पायाभूत संसाधने अशी असायला हवीत की ती अशा हवामानाला तोंड देऊ शकतील. ती लवचिक असायला हवी. आता त्यावरील संशोधनाखेरीज आपण ते कसे साध्य करणार. पूर्वी जी बांधकामे केली जात तेव्हा एवढे पूर येत नसत की एवढा पाऊस होत नसे. निसर्ग आपल्या बरोबरीने वाटचाल करत होता आणि आपणही निसर्गासोबतच वाटचाल करत होतो. आता निसर्ग आपल्या विरुद्ध दिशेने वाटचाल करतो आहे आणि आपण त्याच्या विरुद्ध दिशेने आणि म्हणूनच या नव्या संकटाला तोंड देत आपल्याला जगता कसे येईल ते शिकण्याची आपण तयारी करायला हवी. आज संपूर्ण जग सौरउर्जेकडे वळते आहे. भारतापाशी सूर्याचा प्रदीप्त गोळा आहे हे भारताचे सौभाग्य आहे. त्या प्रदीप्त सूर्याचा आपण कसा वापर करुन घ्यायचा. त्याच्या सामर्थ्याला आपल्या जीवनाचा भाग बनवणे कसे साध्य करता येईल. सौर उर्जेला आपल्याकडे अतिशय महत्व दिले गेले आहे. सरकारच्या धोरणात दिले गेले आहे. परंतू त्या उर्जेचा उपयोग संशोधनामार्फत, नवनव्या शोधांमधून, आज नव्या युगाच्या हिशेबाने नवीन वैज्ञानिक संसाधनांच्या मदतीने करता यावा म्हणून आपल्याला बरेच काम करण्याची गरज आहे.
मित्रहो, याच प्रकारे स्वच्छ भारत मोहिमेने आता प्रत्येक माणसाच्या काळजात घर केलं आहे. हां भाऊ, स्वच्छ भारत या विषयात काही तडजोड नको. पण ही गोष्ट तेवढ्यावर थांबत नाही. जोपर्यंत आपण कचऱ्यातून संपत्ती अश्या प्रकारच्या योजना तयार करत नाही, तोपर्यंत हा जो कचरा निर्माण होतो त्याची चक्राकार अर्थव्यवस्था काय असू शकणार, त्यापासून सर्वोत्तम उत्पादन काय घेता येऊ शकते याचे संशोधन विद्यापीठ स्तरावर करुन घेता येऊ शकेल. नवनवीन माणसांना आपापले प्रयोग करून बघता येईल. आपण कचऱ्यातून सर्वोत्तम काय आणि कसे निर्माण करू. आपल्या चक्राकार अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे मजबूती आणता येईल आणि विशेषतः स्थानिक पातळीवर चक्राकार अर्थव्यवस्था कशी राबवावी अशी अनेक क्षेत्रे आपल्या विद्यार्थ्यांसाठी आज खुली आहेत. आज आपला देश क्रीडाक्षेत्रात नव्या आत्मविश्वासाने नवनवे यश संपादन करत आहे. आमची विद्यापीठे अशी नकोत की, चला इथे वेगळे क्रीडाविद्यापीठ उभारले जात आहे तर इतर विद्यापीठांमधील तरुणांना खेळाशी काही देणं घेणं नाही. असे होता कामा नये. आमच्या विद्यापीठाचे मैदान संध्याकाळी भरलेले हवे. मोठ्या मुश्किलीने मुलांना घरी पाठवायला लागावे, असे वातावरण प्रत्येक विद्यापीठाच्या मैदानात असायला हवे. आपले विद्यापीठ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर बाळगू शकते. प्रत्येक विद्यापीठ हा निर्धार करू शकते की येणाऱ्या काळात माझे विद्यापीठ किती सुवर्णपदके मिळवेल, माझे किती विद्यार्थी, माझ्या महाविद्यालयातील किती विद्यार्थी आगेकूच करतील, ही विद्यापीठांची उद्दिष्टे का असू नयेत मित्रहो. माझ्या विद्यापीठातील मुले जगातील किती देशांमध्ये खेळांसाठी जातील, मी त्यांची तयारी कशी करून घेऊ. त्यांना जो वाव मिळेल ती बाब माझ्यासाठी एक ठेव असेल. मित्रहो, मी यासाठी हे विचार आपल्यापुढे मांडत आहेत की अगणित शक्यता आहेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आपल्या हातात अश्या संधी आणून दिल्या आहेत ज्या पूर्वीच्या काळात आपल्यापाशी नव्हत्या. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शक्य झाले आहे. आणि त्याला पुढे नेणे हे आपले काम आहे.
मित्रहो,
आपणा सर्वांना लक्षात ठेवावे लागेल की देशाच्या भविष्याची उभारणी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे नेतृत्व आपणा सर्व साथीदारांच्या हातात आहे. अखिल भारतीय शिक्षण बैठकीतील विचारमंथनातून निघालेले हे अमृत, आपल्या सूचना देशाला एक नवी दिशा देतील. ज्या नवतरूणांबरोबर आपण बराच काळ वावरता त्या तरुणांना वर्तमानासाठी नाही तर येणाऱ्या भावी काळासाठी तयार करायचे आहे. जर त्यांना आगामी काळासाठी तयार करायचे असेल तर प्रथम आपल्याला आगामी वर्षासाठी तयार व्हावे लागेल. जर आपण आगामी वर्षांसाठी तयार असाल तर आपल्या संस्थेला येणाऱ्या 100 वर्षांसाठी तयार करायचे आहे, तेव्हा कुठे हे काम पुर्ण करू शकाल आणि त्याच भावनेतून आपण सर्वजण या काशीच्या पवित्र धरणीवर आला आहात. माता गंगेच्या तटावर विराजमान आहात. संपूर्ण सांस्कृतिक परंपरा ही आपल्याला नवी चेतना आणि प्रेरणा देणारी परंपरा आहे. या परंपरेतील काही ना काही अमृतकण आपल्या नशीबात असतील ते अमृतकण बरोबर घेऊन जाल. गेल्यावर ते जेथे ठेवाल तेथील युवक युवतींच्या उपयोगी पडतील आणि पर्यायाने भारताच्या उज्वल भविष्याच्या पायाभरणीसाठी कामी येतील. या कार्यक्रमाच्या आखणीबद्दल मी पुन्हा एकदा विभागाला धन्यवाद देतो. आपण सर्वजण उत्साहाने आणि उल्हासाने यात सहभागी झाला आहात. मला विश्वास आहे की तीन दिवसात आपण काही दमणार नाही, मी बसून कार्यक्रम बघत होतो . महा असेही वाटतेय की तीन दिवसांनी आपले काय होईल. परंतू आपण शैक्षणिक दुनियेतील आहात तेव्हा या गोष्टी जरुर पुढे न्याल. माझ्या आपल्याला अनेकानेक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद.
* * *
JPS/Nilima/Vijaya/Shailesh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840102)
अभ्यागत कक्ष : 405
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam