पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत सिगरा इथे विविध विकास उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी केलेले भाषण

Posted On: 07 JUL 2022 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2022

 

हर हर महादेव!

काशी में कहल जाला की इहवां सात वार और नौ त्यौहार होला। कहले का मतलब इ हौ, की इहवां रोज-रोज नया-नया त्यौहार मनावल जाला। आज के एही प्रसंग में यहां जुटल आप सब लोगन के प्रणाम ह!

उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, यशस्वी मुख्यमंत्री आदित्यनाथ जी, व्यासपीठावर उपस्थित उत्तरप्रदेश सरकारचे मंत्री, खासदार, सर्व आमदार आणि बनारसचे माझे बंधू-भगिनी,

मी सर्वप्रथम आपल्या सगळयांचे मनापासून आभार मानतो. विधानसभा निवडणुकींच्या वेळी मी आपल्याला भेटायला आलो होतो आणि उत्तर प्रदेशात दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी आपली मदत मागितली होती. तुम्ही, उत्तर प्रदेशच्या लोकांनी आणि माझ्या काशीच्या लोकांनी जे समर्थन दिलं, ज्या आनंद आणि उत्साहात मला साथ दिलीत, त्यामुळे आज निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आपल्यामध्ये आलो आहे, मी आदरपूर्वक काशीवासियांचे, उत्तर प्रदेशवासियांचे मनापासून आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो.

दिव्य, भव्य, नव्य काशीत गेल्या आठ वर्षांपासून विकासाचा जो उत्सव सुरु आहे, आज त्याला आम्ही पुन्हा एकदा गती देत आहोत. काशी कायमच चैतन्यपूर्ण आणि निरंतर प्रवाही राहिली आहे. आता काशीने एक चित्र संपूर्ण देशाला दाखवलं आहे, ज्यात वारसा देखील आहे आणि विकास देखील आहे. असा वारसा, जो अधिक भव्य, दिव्य आणि नव्य बनविण्याचं काम सातत्यानं सुरु आहे. असा विकास जो काशीचे रस्ते, गल्ल्या, कुंड - तलाव, घाट आणि पाट, रेल्वे स्टेशन पासून तर विमानतळापर्यंत निरंतर गतिमान आहे.

काशीत एक प्रकल्प पूर्ण झाला की चार नवे प्रकल्प सुरु होतात. आज सुद्धा इथे 1700 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे डझनावारी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले आहे. काशीत रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सुशोभीकरण याच्याशी निगडीत हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प, त्यांच्यावर इथे सातत्यानं काम सुरु आहे.

बंधू आणि भगिनींनो,

काशीचा आत्मा अजरामर आहे, मात्र काया सातत्यानं नवीन ठेवण्याच्या कामात आम्ही जीव ओतून उतरलो आहोत. आमचा विकास काशी अधिक गतिशील, प्रगतीशील आणि संवेदनशील बनविणारा आहे. काशीतील आधुनिक पायाभूत सुविधा गतिशीलता वाढवत आहेत. शिक्षण, कौशल्य, पर्यावरण, स्वच्छता, व्यापारासाठी जेव्हा प्रोत्साहन मिळतं, नव्या संस्था तयार होतात, आस्था आणि अध्यात्माशी निगडीत पवित्र स्थळांची दिव्यता आणि आधुनिक भव्यता यांचा मेळ होतो, तेव्हा विकास प्रगतीशील होतो. जेव्हा गरिबांच्या घरी वीज, पाणी, गॅस, शौचालय यासारख्या सुविधा मिळतात, नावाडी, विणकर - हस्ताशिल्पी, हातगाडी - टपरी वाल्यांपासून बेघरांना देखील लाभ मिळतात, तेव्हा विकास संवेदनशील होतो.

आज या कार्यक्रमात जे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले, त्यात गतिशीलता, प्रगतीशीलता आणि संवेदनशीलता, या तिन्हीची झलक आहे. माझी काशी, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि  सबका प्रयास, याचं सर्वोत्तम उदाहरण आहे.

बंधू आणि भगिनींनो,

तुम्ही मला तुमचा खासदार बनवून सेवा करण्याची संधी दिली आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही लोक कुठलं चांगलं काम करता, तर मला दुप्पट आनंद होतो, माझा आनंद आणखी वाढतो. काशीच्या जागरूक नागरिकांनी संपूर्ण देशाला एक संदेश दिला आहे की शॉर्ट-कट मुळे देशाचं भलं होऊ शकत नाही. काही नेत्यांचं भलं होईल कदाचित, पण न देशाचं भलं होईल, न जनतेचं भलं होईल.

मला आठवतं 2014 मध्ये आल्यानंतर, काशीच्या बाहेरून येणारे लोक विचारत असत की इथे इतकी अव्यवस्था आहे, हे सगळं ठीक कसं होणार, हेच लोक विचारत ना? त्यांची काळजी योग्य देखील होती. बनारसमध्ये जिकडे बघावं तिकडे सुधारणेची, परिवर्तनाची शक्यता दिसत असे. हे स्पष्टपणे लक्षात येत असे, की बनारसची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक दशकं काहीच काम झालेलं नाही. आता अशा परिस्थितीत कुणालाही शॉर्ट-कट घेणं खूप सोपं होतं. लोकांना हे देऊन टाका, ते देऊन टाका याच्यापुढे त्यांचा विचार जातच नसे. कोण इतकी मेहनत करेल, कोण डोक्याला त्रास करून घेईल, कोण घाम गाळेल.

मात्र मी बनारसच्या लोकांना दाद देईन, की त्यांनी योग्य मार्ग दाखवला, योग्य रस्ता निवडला. त्यांनी सरळ सांगितलं की, कामं अशी करा, की ज्यांच्यामुळे वर्तमानकाळ तर सुधारेलच, भविष्यकाळात सुद्धा येणारी अनेक दशकं बनारसला त्याचा लाभ मिळत राहतील.

माझ्या प्रिय काशीवासी बंधू आणि भगिनींनो,

मला सांगा, जी कामं होत आहेत, ती भविष्यात उपयोगी पडणार आहेत नं? येणाऱ्या पिढ्यांना देखील काम मिळणार आहे नं? इथल्या युवकाचं भविष्य उज्ज्वल बनणार आहे नं? सगळा हिंदुस्तान काशीकडे ओढला जाणार आहे की नाही? सगळा हिंदुस्तान काशी बघायला येणार की नाही येणार?

मित्रांनो,

आज आपण बघतो की जेव्हा दूरगामी नियोजन असतं, तेव्हा कुठल्या प्रकारचं परिवर्तन देखील होतं. गेल्या आठ वर्षात काशीतल्या पायाभूत सुविधा कुठल्या कुठे पोचल्या आहेत. याचा लाभ शेतकरी असोत, कामगार असोत, व्यापारी असोत, सर्वांना मिळत आहे. व्यापार वाढतो आहे, व्यवसाय वाढतो आहे, पर्यटन वाढत आहे.

रिक्षावाला सुद्धा म्हणायला लागला आहे, साहेब, दिवसभरात इतकं काम मिळत आहे. व्यापारी म्हणतात साहेब, सहा सहा महिन्याचा माल एका महिन्यात विकला जातो आहे. होतं आहे की नाही? तेजी आली आहे कि नाही? आणि हे जे रस्ते बनत आहेत, ही जी गरिबांसाठी घरे बांधली जात आहेत, जी पाईपलाईन टाकली जाते आहे, त्यात सिमेंट, स्टील आणि बांधकामाशी संबंधित इतर उद्योगाचा, लहान लहान दुकानदारांचा त्यांचा पण व्यवसाय वाढतो आहे. म्हणजे वाराणसी आणि या पूर्ण क्षेत्रात रोजगाराचं एक खूप मोठं मध्यम बनत आहे.

बनारसच्या लोकांनी जी दूरदृष्टी दाखवली, त्याचा लाभ आज पूर्ण क्षेत्राला होत आहे. आज काशीच्या चहु बाजूंना बघितलं तर रिंग रोड, रुंद राष्ट्रीय महामार्ग असोत, बाबतपूर सिटी जोड रस्ता असो, आशापुर पूल, चौकाघाट - लहरतारा फ्लायओव्हर, महमूररगंज - मंडवाडी फ्लायओव्हर, हे सर्व बनारसच्या लोकांचे आयुष्य किती सुखकर बनवत आहेत. रेल ओव्हर ब्रिज, वरुणा वरचा पूल जेव्हा बांधून तयार होतील, त्या नंतर सुविधा आणखी वाढणार आहेत.

आज काशीच्या आणखी तीन रस्त्याचं रुंदीकरण सुरु झालं आहे. यामुळे मऊ, आजमगड, गाजीपूर, बलिया, भदोही, मिर्झापूर सारख्या अनेक जिल्ह्यांत प्रवास सोपा होईल आणि काशीची वाहतूक कोंडी देखील कमी होईल.

बंधू आणि भगिनींनो,

शहरातले हे रुंद रस्ते आसपासच्या खेड्यांपर्यंत नेण्यासाठी जिल्ह्यातील 9 रस्त्यांचे भूमिपूजन देखील झाले आहे. या रस्त्यांमुळे आसपासच्या शेतकऱ्यांना, तरुणांना पावसाळ्यात शहरत येताना जो त्रास व्हायचा तो आता संपेल.

योगीजींचे सरकार तालुका आणि ब्लॉक मुख्यालयांना जिल्हा मुख्यालयाशी जोडण्यासाठी रुंद रस्त्यांवर जे काम करत आहे ते काम खूपच कौतुकास्पद आहे. आज सेवापुरी आणि बनारस यांना जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण सुरु झाले आहे. जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा बाराणसी जिल्ह्यातील सर्व तालुके आणि ब्लॉक मुख्यालये 7 मीटर रुंद रस्त्यानं जोडले जातील.

बंधू आणि भगिनींनो,

आज श्रावण दारापर्यंत आला आहे, जवळ आला आहे. दार ठोठावतो आहे श्रावण, श्रावण आता दूर नाही. देश आणि जगातून बाबाचे भक्त मोठ्या संख्येनं काशीला येणार आहेत. विश्वनाथधाम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा पहिलाच श्रावण उत्सव असेल. विश्वनाथधाम बद्दल पूर्ण जगात किती उत्साह आहे, याचा तुम्ही स्वतः गेल्या काही महिन्यांत अनुभव घेतला आहे.

मला सांगण्यात आलं आहे की उन्हाळा असूनसुद्धा या वेळी रोज... आणि आत्ता योगिजी सांगत होते, रोज लाखो भाविकांनी काशी विश्वनाथधामचे दर्शन घेतले आहे. श्रावणात देखील इथे बाबाच्या भक्तांना दिव्य आणि भव्य आणि नव्या काशीचा अनुभव मिळेल.

बंधू आणि भगिनींनो,

जगभरातल्या भाविकांना, पर्यटकांना काशीत आस्था आणि अध्यात्म याचे अनेक अनुभव मिळावेत, यासाठी आपण सर्व समर्पित आहोत. आपल्याकडे पूर्वी जेव्हा कुणी यात्रेकरू येत असे, तेव्हा गावातले लोक त्याला आपल्या घरी बोलावून जेवू घालत असत, सर्व प्रकारे सेवा करत असत.

आपल्या काशीमध्ये आधीच्या काळात अशी परंपरा होती की, जे कोणी बाहेरून येत होते, त्यांचे यजमान या बाहेरून येणा-या लोकांना आपल्याच घरामध्ये ठेवून घेत होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करीत होते. श्रद्धावंतांची कोणतीही गैरसोय होऊ नये, अशी यामागे भावना यजमानांची असायची.

याच भावनेनुसार आमच्या सरकारचेही काम सुरू आहे. काशी भैरव यात्रा, नव-गौरी यात्रा, नवदुर्गा यात्रा, अष्टविनायक यात्रा, श्रद्धा, आस्था असलेल्या प्रत्येक स्थानाची यात्रा सुगम व्हावी, यासाठी सरकार सुविधा निर्माण करीत आहे. पंचकोशी परिक्रमेच्या मार्गावर अनेक ठिकाणी विश्रांती घेता यावी, पूजा-पाठ करणे सुलभ व्हावे यासाठी व्यवस्था तयार करण्यात येत आहे. काशीची ओळख म्हणजे इथल्या गल्ल्या आणि घाट आहे. हा भाग स्वच्छ आणि सुव्यवस्थित बनविण्याची आवश्यकता आहे. तसेच गंगामातेला निर्मळ बनविण्याचा संकल्पाचे काम असो, यासंबंधीही वेगाने काम सुरू आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आमच्यासाठी विकासाचा अर्थ केवळ चमक-धमक नाही. आमच्यासाठी विकासाचा अर्थ आहे, गरीब,दलित, वंचित, मागास, आदिवासी माता-भगिनी या सर्वांचे सशक्तीकरण. आज प्रधानमंत्री घरकुल योजनेतून वाराणसीच्या 600 पेक्षा जास्त गरीब कुटुंबांना स्वतःचे हक्काचे पक्के घरकुल मिळाले आहे. याचा अर्थ 600 नवे लखपती बनले. ज्या मित्रांचे स्वतःच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे, त्यांचे खूप-खूप अभिनंदन. आणि त्यांच्या परिवारातल्या माता-भगिनींचे तर विशेष अभिनंदन. कारण आमचा प्रयत्न असतो की, घर तयार झाले, तर त्यावर माता-भगिनींचे नाव असले पाहिजे. आणि म्हणूनच त्यांचे विशेष अभिनंदन.

प्रत्येक गरीब कुटुंबाला पक्के घर देणे आणि प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळांतून पाणी पुरवणे, या संकल्पांवर आम्ही वेगाने काम करीत आहोत. जल जीवन मोहिमेअंतर्गत डझनभर पाणी प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे हजारो कुटुंबांची, विशेषतः आमच्या भगिनींची खूप चांगली सोय होणार आहे. निराश्रित माता, भगिनी, कन्यांसाठी बनविण्यात आलेल्या आश्रय गृहामधूनही ‘सबका विकास’ ही भावना अधिक सशक्त होईल.

बंधू आणि भगिनींनो,

अशा प्रकारे सर्वस्पर्शी, सर्वहितकारी विकास साध्य करणे, म्हणजेच तर सुशासन आहे. आता तुम्हीच पहा, पथारी विक्रेते, हातगाडीवरून माल विक्री करणारे, लहान-लहान व्यवसाय करणा-या मित्रांना आधी किती अडचणी येत होत्या. आता गोदौलिया ते दशाश्वमेध या दरम्यान गौरव पथ तयार करण्यात आला आहे. तसेच आता तिथे दशाश्वमेध संकुलही तयार करण्यात येत आहे. हा संकुलामुळे पथारीवाल्यांना इतर  सुविधांसह आपली दुकानदारी करण्याची संधी मिळणार आहे. चौकाघाट- लहरतारा उड्डाण पुलाच्या खालच्या भागात जवळपास दोन किलोमीटर लांबीचा विशेष ‘व्हेंडिंग झोन’ विकसित केला जात आहे. सारनाथमध्येही बुद्धिस्ट-वर्तुळाकार चक्र निर्माण  करण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. तिथेही पदपथावरील विक्रेत्या मित्रांसाठी विशेष सुविधा निर्माण केल्या जातील.

मित्रांनो,

तुम्ही विशेष आर्थिक क्षेत्र (एसईजेड), इकॉनॉमिक कॉरिडॉर, यासारख्या व्यवस्थांविषयी अनेक गोष्टी ऐकल्या असतील. परंतु पदपथ विक्रेत्यांसाठी विशेष पट्टा, राखीव स्थान तुम्ही काशीमध्ये तयार केला जात असल्याचे पाहणार आहे. सुविधाच नाही तर पीएम स्वनिधी योजनेतून पहिल्यांदाच पदपथ विक्रेत्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यास प्रारंभ झाला आहे. आत्तापर्यंत देशभरामध्ये जवळपास 33 लाख मित्रांना या योजनेतून अगदी सहजतेने कर्ज मिळालेही आहे. यामध्ये माझ्या काशीचे हजारो मित्र आहेत.

मित्रांनो,

आमच्या सरकारने नेहमीच गरीबांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सुख-दुःखामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाची लस मोफत देण्यापासून ते गरीबांना मोफत धान्य देण्याची व्यवस्था करण्यापर्यंत, सरकारने आपली सेवा करण्याची एकही संधी सोडली नाही. गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे डिजिटल व्यवहारांसाठी पायाभूत सुविधांचा विकासा झाला आहे, त्याचाही खूप मोठा लाभ गरीब आणि मध्यम वर्गाला झाला आहे.

आज बनारसची तुम्ही मंडळी साक्षीदार आहात की, कशा पद्धतीने मोबाइल फोन स्वस्त झाले, फोन करणे तर जवळ-जवळ मोफत झाले आहे. आता इंटरनेट खूप स्वस्त झाले आहे. एकूणच जीवन सुकर होत आहे. उत्पन्नाचे नवीन साधने उपलब्ध होत आहेत. देशामध्ये फोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच या संबंधित व्यवसायही विस्तारत आहे.

कमी गुंतवणुकीमध्ये युवकाना यासंबंधित सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी मिळत आहेत. अशाच प्रकारे पाच लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचार करण्याची सेवा आम्ही सुरू केल्यामुळे गरीबांची खूप मोठी चिंता दूर झाली आहे. या योजनेमुळे तर गरीबही आता मोठ्या रूग्णालयामध्ये जाण्याचे हिंमत दाखवत आहे. याआधी पैशाअभावी गरीब लोक औषधोपचारच करून घेत नव्हते. याचा अर्थ आता रूग्णालयांचीही मागणी वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची मागणी वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही उत्तर प्रदेशाच डझनभर नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. इथे काशीमध्येच कर्करोगासहीत इतर सर्व रोगांवर आधुनिक औषधोपचार करण्याचे मोठे नेटवर्कच तयार करण्यात आले आहे.

मित्रांनो,

एकीकडे आम्ही देशातल्या शहरांना धूरमुक्त करण्यासाठी सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी सुविधांचा विस्तार करीत आहोत. तर दुसरीकडे आम्ही गंगामातेची काळजी घेणाऱ्या नाविक बांधवांसाठी डिजेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या नावांना सीएनजीने जोडण्याचा पर्यायही उपलब्ध करून देत आहोत. घाटावर उभारण्यात आलेले देशातले पहिले सीएनजी इंधन स्थानक काशीमध्ये आहे. आणि या गोष्टीचा काशीला अभिमान वाटला पाहिजे. डिजेल- पेट्रोलवर चालणाऱ्या 650 नावांपैकी 500 नावांना सीएनजी सुविधेने जोडण्यात आले आहे.

या सुविधेमुळे पर्यटकांना अगदी शांतपणे गंगेचे दर्शन करण्याचा आनंद मिळेल. पर्यावरणालाही त्याचा लाभ होईल. तसेच नावाड्यांचा इंधनावर होणारा खर्च खूप कमी होईल. याचाच अर्थ कमी खर्चात अधिक कमाईचे मार्ग मुक्त होणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

काशी ज्ञान, आस्था, अध्यात्माची नगरी तर आहेच. त्याचबरोबर खेळाच्या विविध प्रकारांचीही एक समृद्ध परंपरा या नगरीला आहे. आणि आज विमानतळावरून इथपर्यंत येताना सर्व खेळाडूंना भेटण्याची संधी मला मिळाली. सर्व खेळाडू मित्र माझ्यासमोरच बसले आहेत. याबाजूलाही खेळाडूंची चांगलीच दाटीवाटी झाली आहे. आज मी त्यांच्यामध्ये असलेला उत्साह, उमंग, चैतन्य पहात आहे. मला वाटते की, काशीमध्ये हे क्रीडा मैदान तयार होत आहे, ते काशीला नव्या उंचीवर घेवून जाणार आहे. इथल्या आखाड्यांमध्ये चालू असलेल्या सरावाला आणि कुस्तीमध्ये आवश्यक असणा-या तंदुरूस्तीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. आजच्या काळातही दरवर्षी नागपंचमीच्या दिनी आपण या आखाड्यांमध्ये जुन्या काळाची झलक पाहू शकता.

परंतु क्रीडा प्रकार, खेळ म्हणजे फक्त तंदुरूस्ती आणि मनोरंजनची गोष्ट नाही. तर राष्ट्राचा अभिमान वाढविण्यासाठी आणि एक चांगले करियर करण्याचे उत्तम माध्यम आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाराणसीसहित, पूर्वांचलच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगले कौशल्य  दाखवले आहे. सरकारचा सातत्याने प्रयत्न असतो की, ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांशी संबंधित प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी आधुनिक सुविधा आपल्या काशीमध्ये उपलब्ध व्हाव्यात. 

आज ज्या स्टेडियमवर आपण ही सार्वजनिक सभा होत आहे, ते लवकरच विश्वस्तरीय सुविधांनीयुक्त बनणार आहे. सहा दशकांपूर्वी बनविण्यात आलेल्या या स्टेडियममध्ये 21 व्या शतकातल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. इथे 20 पेक्षा जास्त क्रीडाप्रकारांसाठी अत्याधुनिक सुविधा करण्यात येतील. तसेच उत्कृष्ट प्रशिक्षणाची सुविधा, तंदुरूस्तीसाठी केंद्र, खेळाडूंसाठी वसतिगृह यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मुलांसाठी स्वतंत्र वेगळा विभागही तयार करण्यात येणार आहे. मुलांना खेळण्यासाठी  आणि तंदुरूस्तीसाठी उत्साह वाटला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातील. लहान वयातच त्यांना व्यावसायिक क्रीडा प्रकारांकडे कल निर्माण व्हावा, यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. हे संपूर्ण संकूल आधुनिका सुविधांबरोबरच ‘पॅरागेम्स’साठी उपयुक्त ठरेल, असे बनविण्यात येणार आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर क्रीडा संकुलामध्ये अॅथलेटिक्स आणि बास्केटबॉलच्या आधुनिक सुविधांमुळे युवा खेळाडूंना खूप मोठी मदत मिळेल.

बंधू आणि भगिनींनो,

काशीच्या अनवरत विकासाची ही धारा गंगामातेप्रमाणे अविरल प्रवाहित रहावी, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायचे आहेत. होय, काशीच्या गंगेला स्वच्छ करण्याचा आम्ही जो संकल्प केला आहे, तो आपण कोणीही कधीच विसरायचा नाही. लक्षात ठेवणार ना? नक्की राहील ना लक्षात? जरा दोन्ही हात वर करून सर्वांनी उच्चरवामध्ये घोष करावा. चला म्हणा- ‘‘लक्षात ठेवणार ना? आपली काशी स्वच्छ ठेवणार ना? आपली काशी स्वच्छ ठेवली जाणार ना? आपली गंगामाता स्वच्छ राहील ना? इथे कोणत्याही प्रकारची घाण करणार नाही ना? इथे कोणत्याही प्रकारची घाण केली जावू देणार नाही ना? ही आपली काशी आहे, या काशीला आपल्यालाच वाचवायचे आहे. या काशीला आपल्यालाच सुंदर बनवायचे आहे. आणि आपण सर्वजण मिळून काशी शहर छान बनवणार आहोत.

इथले रस्ते, इथले घाट, व्यापारी-बाजारपेठा सर्व काही स्वच्छ ठेवायचे आहे. ही आपली सर्वांची, सर्व काशीवासियांची जबाबदारी आहे. काशीवासियांचा विश्वास, बाबा विश्वनाथांचे आशीर्वाद, यांमुळे आपले प्रत्येक संकल्प सिद्धीस  जाणार आहेत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन!!

हर -हर महादेव ! धन्यवाद!

 

* * *

S.Thakur/R.Aghor/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1840081) Visitor Counter : 176