पंतप्रधान कार्यालय
बेंगळुरूमधील बॉश स्मार्ट कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
Posted On:
30 JUN 2022 5:23PM by PIB Mumbai
बॉश इंडिया संघाचे सर्व सदस्य,
आणि प्रिय मित्र हो, नमस्कार!
बॉश इंडियाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.भारत आणि बॉश इंडिया या दोघांसाठी हे वर्ष खास आहे. आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि, तुम्ही भारतात शतक साजरे करत आहात.बॉश स्मार्ट कॅम्पसचे उदघाटन करताना मला आनंद होत आहे. हे कॅम्पस भारतासाठी आणि जगासाठी भविष्यात विविध उत्पादने आणि उपाय विकसित करण्यात नक्कीच अग्रेसर राहील. ऑक्टोबर 2015 मध्ये, मला चान्सलर मर्केल यांच्यासोबत बंगळुरूमधील बॉशच्या दालनाला भेट देण्याची संधी मिळाली.तिथे तयार होत असलेले नाविन्यपूर्ण काम प्रथम, मला पहायला मिळाले. बॉशचा, तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी दुहेरी शिक्षणाचा दृष्टिकोनही तितकाच आनंददायी आहे.
मित्रांनो,
हे तंत्रज्ञानाचे युग आहे. गेल्या दोन वर्षांपासून जेव्हा जग एका शतकातील सर्वात मोठ्या महामारीशी झुंज देत आहे; तेव्हा तंत्रज्ञानाचे लाभ आपण सर्वजण पहात आलो आहोत.त्यामुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेषशाली संकल्पना क्षेत्रात आणखी गुंतवणूक करणे हे महत्त्वाचे आहे. मला आनंद वाटत आहे, की बॉश इंडियाने केवळ नवसंकल्पनांवर काम केले इतकेच नाही तर त्याला व्यापक करण्याचेही काम केले आहे.शाश्वतता हा यातील महत्त्वाचा आधारस्तंभ. गेल्या 8 वर्षांत सौर ऊर्जेची स्थापित क्षमता जवळपास 20 पट वाढल्याने भारताचा विकास अधिक पर्यावरण पूरक पध्दतीने होत आहे. मला सांगण्यात आले, की बॉशने भारतात आणि बाहेरही कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त केली आहे; हे खूपच प्रेरणादायी आहे.
मित्रांनो,
आज भारत, सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.गेल्या दोन वर्षांत गुंतवणूक वाढत चालली आहे. आमची स्टार्ट-अप परीसंस्था, ही जगातल्या सर्वात मोठ्या परिसंस्थेपैकी एक आहे. यासाठी आमच्या युवाशक्तीला धन्यवाद! तंत्रज्ञानाच्या जगातच अनेक संधी आहेत. भारत सरकार प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट उपलब्ध करण्यासाठी कार्यरत आहे.डिजिटल इंडिया या आमच्या उद्दिष्टामध्ये सरकारच्या प्रत्येक पैलूंसोबत तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण हे समाविष्ट आहे. या संधींचा उपयोग करून घेत, आमच्या देशात गुंतवणूक करावी,असे आवाहन मी जगाला करत आहे.
मित्रांनो,
प्रमुख टप्पे महत्त्वाचे असतात.ते साजरे करण्याचे आणि आगेकूच करण्याचे प्रसंग असतात. मी बॉशला भारतात अधिक काही करण्याचा विचार करण्याचे आवाहन करतो. तुमचा चमू पुढील 25 वर्षांत काय करू शकतो, याची निश्चित योजना तयार करा.100 वर्षांपूर्वी बॉश एक जर्मन कंपनी म्हणून भारतात आली होती.पण आज ती जितकी जर्मन आहे, तितकीच ती भारतीयही आहे. जर्मन अभियांत्रिकी आणि भारतीय ऊर्जेचे ते उत्कृष्ट उदाहरण आहे. हे नाते अधिकाधिक दृढ होत राहील. पुन्हा एकदा, मी बॉश इंडियाच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.
धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1838248)
Visitor Counter : 162
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam