पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी कर्नाटकमधील मैसुरू येथे विकास उपक्रमांचे उद्‌घाटन केले


पंतप्रधानांनी मैसुरू मधील नागनहल्ली रेल्वे स्थानकावर उप-नगरीय वाहतुकीसाठी कोचिंग टर्मिनलची पायाभरणी केली

एआयआयएसएच मैसुरु येथे ‘संवाद विकार असलेल्या व्यक्तींसाठी उत्कृष्टता केंद्र’चे केले लोकार्पण

"आपली प्राचीन संस्कृती समृद्ध करून 21 व्या शतकातील संकल्प आपण कसे साकार करू शकतो याचे कर्नाटक हे एक उत्तम उदाहरण आहे"

"'डबल-इंजिन' सरकार सामान्य लोकांना मूलभूत सुविधा आणि सन्मानपूर्वक जीवनाशी जोडण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करत आहे"

"गेल्या 8 वर्षांत, सरकारने शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रभावी वितरणाद्वारे सामाजिक न्यायाचे अधिकार दिले आहेत"

"आम्ही दिव्यांग लोकांसाठी सन्मान आणि संधी सुनिश्चित करत आहोत आणि दिव्यांग मनुष्यबळाला देशाच्या प्रगतीचा प्रमुख भागीदार बनवण्यासाठी सक्षम करण्याच्या दिशेने काम करत आहोत"

Posted On: 20 JUN 2022 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2022

मैसुरू येथील महाराजा विद्यापीठाच्या मैदानावर  आज एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांनी नागनहल्ली रेल्वे स्थानक येथे उप-नगरीय वाहतुकीसाठी कोचिंग टर्मिनलची पायाभरणी केली.  480 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून हे टर्मिनल विकसित केले जाईल. कोचिंग टर्मिनलमध्ये एक मेमू शेड देखील असेल आणि यामुळे सध्याच्या मैसुरु  यार्डची गर्दी कमी करेल, मैसुरुहून अधिक मेमू रेल्वे  सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जातील , परिणामी या क्षेत्राची कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन संधीत वाढ होईल. याचा फायदा दैनंदिन प्रवाशांना तसेच लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांना  होणार आहे.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी अखिल भारतीय भाषण आणि  श्रवण संस्था (AIISH) येथे ‘संवाद विकार असलेल्या व्यक्तींसाठी उत्कृष्टता केंद्रा’चे लोकार्पण केले. संवाद साधण्यासंबंधी  विकार असलेल्या व्यक्तींचे निदान, मूल्यांकन आणि पुनर्वसन यासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि सुविधांनी हे सुसज्ज आहे.

यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री  प्रल्हाद जोशी उपस्थित होते.

उपस्थितांना  संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, कर्नाटक हे असे राज्य आहे जिथे देशाच्या आर्थिक आणि आध्यात्मिक समृद्धीचे एकाच वेळी दर्शन घडते.   "आपली प्राचीन संस्कृती समृद्ध करून 21 व्या शतकातील संकल्प आपण कसे साकार करू शकतो याचे कर्नाटक हे एक उत्तम उदाहरण आहे", असे ते म्हणाले.

या भूमीने नलवाडी कृष्ण वाडियार, सर एम विश्वेश्वरय्या आणि राष्ट्रकवी कुवेंपू यांच्यासारखी अनेक महान व्यक्तिमत्वे देशाला दिली आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या वारसा आणि विकासात या  व्यक्तिमत्त्वांचे उल्लेखनीय  योगदान आहे. पंतप्रधान म्हणाले की, ‘डबल इंजिन’ सरकार सामान्य लोकांना मूलभूत सुविधा आणि सन्माननीय जीवनाशी जोडण्यासाठी आणि या महान व्यक्तिमत्त्वांचे स्वप्न पूर्णत्वाला  नेण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करत आहे.

पंतप्रधानांनी आठवण सांगितली की पूर्वी कल्याणासाठीचे प्रयत्न अत्यंत निवडक भागापुरते मर्यादित होते. गेल्या 8 वर्षात त्यांच्या सरकारने आखलेल्या  योजनांमध्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत आणि सर्व क्षेत्रांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत  या भावनेला प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

एकीकडे आम्ही तरुणांना स्टार्ट-अप धोरणांतर्गत प्रोत्साहन दिले आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी मधून पैसे देत आहोत (कर्नाटकातील 56 लाख छोट्या शेतकर्‍यांच्या खात्यात 10000 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत), ते म्हणाले. वन नेशन वन रेशन कार्ड सारख्या उपक्रमांद्वारे, या योजना आता संपूर्ण भारत व्यापत आहेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ कर्नाटकातील 4.25 कोटीहून अधिक गरीब लोकांना मोफत रेशन मिळत आहे. आयुष्मान अंतर्गत, राज्यातील 29 लाखांहून अधिक गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळाले. कार्यक्रमापूर्वी लाभार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या पंतप्रधानांनी सरकारचा प्रत्येक पैसा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत सरकारने शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रभावी वितरणाद्वारे सामाजिक न्यायाला सक्षम केले आहे. कल्याणकारी योजनांच्या पूर्ततेच्या प्रयत्नांमुळे, भेदभाव आणि गळतीशिवाय लाभ मिळण्याचा विश्वास भारतातील सामान्य नागरिकांमध्ये दृढ झाला आहे. ते म्हणाले की, त्यांचे सरकार आपल्या दिव्यांग साथीदारांचे इतरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपल्या चलनात, नाण्यांमध्ये दिव्यांगांच्या सोयीसाठी नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. देशभरात दिव्यांगांच्या शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम विकसित केले जात आहेत. सुगम्य भारत त्यांच्यासाठी वाहतूक आणि कार्यालये सुलभ करत आहे. दिव्यांग लोकांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांनी स्टार्टअप परिसंस्थेला काम करण्यासाठी आमंत्रित केले. दिव्यांग मानव संसाधनांना देशाच्या प्रगतीत प्रमुख भागीदार बनवण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग (AIISH) ला मदत करण्यासाठी, ‘श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी उत्कृष्टता केंद्र’ आज राष्ट्राला समर्पित करण्यात आले आहे.

गेल्या 8 वर्षांत केंद्र सरकारने कर्नाटकातील 5000 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांसाठी सुमारे 70 हजार कोटी रुपये मंजूर केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आज बंगळुरूमध्ये 7,000 कोटींहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी झाली. ते म्हणाले की, लोकांच्या सुलभ राहणीमानासाठी दुहेरी इंजिन असलेले सरकार प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचे काम करत आहे.

2014 पूर्वी कर्नाटकात रेल्वेसाठी सरासरी 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्या तुलनेत यंदा यासाठी 7000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यात 34000 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. 2014 च्या आधी 10 वर्षात फक्त 16 किमी रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाच्या तुलनेत, गेल्या 8 वर्षात 1600 किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले असल्याचे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. कर्नाटकच्या जनतेचा आशीर्वाद डबल-इंजिन सरकारला राज्याच्या विकासासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी समारोप प्रसंगी संगितले.

 

S.Patil/ S.Kane/ V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1835705) Visitor Counter : 150