पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदान एकात्मिक वाहतूक कॉरिडॉरच्या उद्‌घाटन प्रसंगी केलेले भाषण

Posted On: 19 JUN 2022 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19  जून 2022

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयल जी, हरदीप सिंह पुरी जी, सोमप्रकाश जी, अनुप्रिया पटेल जी, अन्य लोकप्रतिनिधि, अतिथिगण, महिला आणि पुरुषहो...

मी दिल्लीच्या नागरिकांनानोएडा-गाजियाबादच्या जनतेला, एनसीआरच्या लोकांना आणि देशभरातून ज्यांना दिल्लीला येण्याची संधी मिळते त्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो. आज दिल्लीला केंद्र सरकारच्या वतीने आधुनिक पायाभूत सुविधांची एक अतिशय सुंदर भेट मिळाली आहे.

आता जेव्हा मी बोगद्यातून येत होतो, तेव्हा मनात अनेक गोष्टी येत होत्या. एवढ्या कमी वेळेत हा एकात्मिक वाहतूक मार्गिका (कॉरिडॉर) बांधणे अजिबात सोपे नव्हते.  ज्या रस्त्यांच्या आजूबाजूला ही मार्गिका बांधण्यात आली आहे, ते दिल्लीतील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक आहेत. दररोज लाखो गाड्या त्यावरून धावतात. हा जो बोगदा बांधला आहे, त्याच्यावरून तर सात रेल्वे मार्ग जातात. या सर्व अडचणीत कोरोना येऊन धडकला, त्यामुळे नवीन परिस्थिती निर्माण झाली. आणि आपल्या देशात असे कुठलेही काम करा, न्यायव्यवस्थेचे दरवाजे ठोठावणाऱ्या लोकांची कमतरता नाही. प्रत्येक गोष्टीत पाय मागे खेचणारे असतातच.

देशाला पुढे नेताना अनेक संकटे उभी ठाकतात. या प्रकल्पाला देखील तशाच अडचणींचा सामना करावा लागला. परंतु हा नवा भारत आहे. समस्यांवर उपायही शोधतो, नवे संकल्‍प देखील करतो, आणि ते संकल्‍प तडीस नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो. आपले अभियंते, मजूर त्या सर्वांचे देखील मी अभिनंदन करतो. त्यांनी ज्या तन्मयतेने, मेहनतीने आणि समन्वित प्रयत्नांद्वारे प्रकल्प व्यवस्थापनाचे उत्‍तम उदाहरण सादर करत हा प्रकल्प पूर्ण केला आहे. माझ्या ज्या मजूर बंधू-भगिनींनी घाम गाळला आहे, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो, त्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो.

मित्रांनो,

हा एकात्मिक वाहतूक कॉरिडोर, प्रगती मैदान प्रदर्शन स्थळाचा 21 व्या शतकाच्या गरजांनुसार कायापालट करण्याच्या अभियानाचा भाग आहे. अनेक दशकांपूर्वी भारताची प्रगतीभारतीयांचे  सामर्थ्य, भारताची उत्पादने, आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रगती मैदान बांधण्यात आले होते. मात्र त्यानंतर  भारत खूप बदलला आहे, भारताचे सामर्थ्य बदलले आहे, आपल्या गरजा देखील अनेक पटींनी वाढल्या आहेत, मात्र हे दुर्भाग्‍य आहे की प्रगती मैदानाची आणखी प्रगती झाली नाही, खरे तर या प्रगती मैदानाची सर्वात आधी प्रगती व्हायला हवी होती, तेच झाले नाही. दीड दशकांपूर्वी इथल्या सुविधांचा विस्तार करण्याची योजना तयार करण्यात आली होती आणि तीही केवळ कागदावर, आता ही फॅशनच झाली आहेघोषणा करा, कागदोपत्री दाखवा, दीपप्रज्वलन करा, फीत कापा, वृत्तपत्रात मथळे छापा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामात, मी माझ्या कामातहेच चालत आले आहे.

देशाच्या राजधानीत जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांसाठी अत्याधुनिक सुविधा असाव्यात, प्रदर्शन हॉल असावा, याकडे लक्ष देऊन आज देशातील अनेक भागांमध्ये भारत सरकार निरंतर काम करत आहे. आपल्या या दिल्‍लीतही  द्वारका इथे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन आणि प्रदर्शन केंद्र आणि प्रगती मैदानात पुनर्विकास प्रकल्प, हे एक उदाहरण ठरणार आहेत.

गेल्या वर्षी मला इथे 4 प्रदर्शन हॉलचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळाली होती, आणि आज कनेक्टिविटीच्या या आधुनिक सुविधेचे लोकार्पण झाले आहे. केंद्र सरकार द्वारा राबवण्यात येत असलेले हे आधुनिक सुविधा प्रकल्प देशाच्या  राजधानीचे चित्र पालटत आहेत, तिला आणखी आधुनिक बनवत आहेत. हे केवळ चेहरामोहरा बदलण्यासाठी नाही, हा कायापालट यासाठी करण्यात येत आहे कारण तो नशीब पालटून टाकणारे एक माध्‍यम असू शकते.

मित्रांनो,

दिल्लीमध्ये केंद्र सरकारचा जेवढा भर आधुनिक पायाभूत विकासावर आहे, आधुनिकीकरणावर आहे, त्याचा थेट परिणाम आणि त्यामागचा स्‍पष्‍ट उद्देश जीवन सुखकर करणे हा आहे.  सामान्‍य माणसाच्या अडचणी कमी व्हाव्यात, त्याला आयुष्यात आणखी सोयी- सुविधा मिळाव्यात, व्यवस्थांच्या माध्यमातून त्याला सहजता, सरलता, सुलभता उपलब्‍ध व्हावी, आणि त्याचबरोबर आता आपण जी विकासकामे करू त्यात पर्यावरण-स्नेही नियोजन असायला हवे. पर्यावरणाप्रती संवेदनशीलता असायला हवी. हवामान बदलाची चिंता करणारे असायला हवेत, या सर्व गोष्टी केंद्रस्थानी ठेवून पुढे वाटचाल करत आहोत.

गेल्या वर्षी मला संरक्षण संकुलाचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभले होते. आपल्या देशाचे दुर्भाग्‍य आहे की अनेक चांगल्या गोष्टी, चांगल्या उद्देशाने केलेल्या गोष्टी अशा राजकारणात अडकतात आणि प्रसारमाध्यमांचा देखील नाईलाज असतो, टीआरपीमुळे त्यांनाही त्यात फरफटत जावे लागते. मी हे  उदाहरण तुम्हाला देतो, त्यामुळे तुम्हाला समजेल की काय झाले. जे दिल्‍लीशी  परिचित आहेत त्यांना चांगले ठाऊक आहे की संरक्षण खात्याशी संबंधित सर्व महत्वाची कामे, दुसऱ्या महायुद्धानंतर, म्हणजे किती वर्षे झाली याचा तुम्ही  अंदाज बांधू शकता. आपल्याकडे इथे राष्‍ट्रपती भवनाच्या त्या परिसरात काही झोपड्या उभ्या केल्या होत्या. छोट्या-छोट्या झोपड्यांप्रमाणे वाटत होत्या, तुम्ही पाहिले असेल. तिथेच सर्व कामे होत होती, त्या जीर्ण झाल्या होत्या आणि खूप मोठ्या जमिनीवर त्या विस्तारल्या होत्या. त्यानंतर खूप सरकारे झाली. काय झाले तुम्हाला माहित आहे, माझी सांगायची इच्छा नाही.

आमच्या सरकारने केजी मार्ग आणि आफ्रिका एवेन्यूमध्ये पर्यावरण-स्नेही इमारती बांधल्या आणि झोपड्यांसारख्या जागेत संरक्षण खात्याचे कामकाज 80 वर्षे चालले, आता त्यांना तिथून हलवून चांगल्या ठिकाणी आम्ही व्‍यवस्‍था केली आहे. अनेक दशके जुने कार्यालय हलवल्यामुळे एक तर त्यांना उत्तम वातावरण मिळाले आहे, सैन्यातील लोकांना कामाच्या ठिकाणी सुविधा मिळाल्या आहेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ज्याप्रकारच्या पायाभूत सुविधा आवश्यक असतात, ते ध्यानात घेऊन  त्याचे बांधकाम करण्यात आले आहे, आणि संपूर्ण बांधकाम पर्यावरण-स्नेही आहे.

आणि याचा परिणाम काय झाला, या सर्व कार्यालयांना काम करण्यासाठी पोषक वातावरण असेल तर त्यातून चांगले साध्य होते. मात्र ही कार्यालये हलवल्यामुळे अनेक एकर भूमी, एवढी मोठी मौल्यवान भूमी मोकळी झाली आहेआणि त्याठिकाणी लोकांसाठी सोयीसुविधा उभारणीचे काम देखील सुरु आहे. मला आनंद आहे की सेंट्रल विस्टा आणि देशाच्या नवीन संसद इमारतीचे काम वेगाने सुरु आहे. आगामी काळात भारताच्या राजधानीची चर्चा होईल, प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटेल हा मला पक्का विश्‍वास आहे.

मित्रांनो,

आमच्या सरकारने हा जो एकात्मिक वाहतूक कॉरिडोर बांधला आहे, त्यातही आधुनिक पायाभूत विकास आणि पर्यावरणाचा हाच दृष्टिकोन आहे, हाच ताळमेळ आहे. प्रगती मैदानाच्या आसपासचा संपूर्ण परिसर दिल्लीच्या सर्वात व्यस्त परिसरांपैकी एक आहे. वर्षानुवर्षे इथल्या लोकांना वाहतूक कोंडीच्या  गंभीर समस्येचा सामना करावा लागला आहे. आयटीओ चौकात किती अडचणी येतात, त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे.

जेव्हा माझे कार्यक्रम ठरतात, मी 50 वेळा विचार करतो, माझे एसपीजी वगैरेना सांगतो की, एकतर सकाळी 5 वाजता मला तिथून बाहेर काढा जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही किंवा रात्री उशिरा तिथून बाहेर काढा, मेहरबानी करून दिवसा मला त्या रस्त्याने नेऊ नका, लोकांची गैरसोय होते. यातून जेवढे वाचणे शक्य आहे तेवढे प्रयत्न मी स्वतः करतो. मात्र कधी-कधी नाईलाज असतो.

आज या रचनेमुळे हा जो दीड किलोमीटरपेक्षा अधिक बोगदा बांधला आहे, यामुळे पूर्व दिल्ली, नोएडा आणि गाजियाबाद दिशेकडून दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या हजारो लोकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. या एकात्मिक वाहतूक कॉरिडोरमुळे दिल्लीकरांच्या वेळेची बचत होईल, गाड्यांचे इंधन वाचेल.  आता मला सादरीकरण केले गेले त्यात सांगितले होते, 55 लाख लीटर पेट्रोलची  बचत होणार आहे, म्हणजे ही नागरिकांच्या खिशात बचत होणार आहे.

जर मी कुणाला 100 रुपये देण्याची घोषणा केली तर माझ्या देशात ठळक बातमी बनते. मात्र जर मी अशी व्‍यवस्‍था केली ज्यामुळे एखाद्याचे दोनशे रुपये वाचत असतील तर त्याची बातमी होत नाही. त्याचे महत्वच नाही कारण त्यात राजकीय लाभ नाही. मात्र जर देशाचे कल्याण करायचे असेल, तर आम्ही स्थायी व्‍यवस्‍था विकसित करून सामान्य जनतेची सोय आणि त्याचा भार कमी करण्याच्या दिशेने काम करत आहोत.

आता वाहतूक कोंडी दूर होईल, दिल्लीचे पर्यावरण सुधारेल. आपण सहजपणे  म्हणतो वेळ मोलाचा आहे - Time is Money. आता हा बोगदा बांधल्यामुळे वेळेची बचत होईल म्हणजे किती पैसे वाचतील याचाही विचार व्हायला हवा. नुसता वाक्प्रचार  Time is Money ठीक आहे, मात्र इथे भारत सरकारच्या सुविधांमुळे वेळेची बचत झाली, ते सांगायला कुणी तयार नाही. म्हणजे आपण आपल्या विचार करण्याच्या जुन्या सवयी, पद्धतीवापरून पाहण्याऐवजी बाहेर पडण्याची गरज आहे.

एक अंदाज आहे की या कॉरिडोरमुळे जेवढे प्रदूषण कमी होईल, ते करण्यासाठी जसे आपले पीयूष भाई म्हणाले5 लाख झाडांमुळे जी मदत होते तेवढी मदत या बोगद्यामुळे मिळणार आहे. याचा अर्थ असा नाही की आपण झाडे लावायचीच नाहीत. मला आनंद आहे की या प्रकल्पाबरोबरच झाडे लावण्याचा  कार्यक्रम देखील यमुना किनारी झाला आणि ते काम देखील पूर्ण केले म्हणजे दुहेरी लाभ घेतला. म्हणजे आमच्या  सरकार द्वारा नवी झाडे लावण्याबरोबरच, ज्या कारणांमुळे प्रदूषण वाढते, त्यापैकी किती कमी करू शकतो. तंत्रज्ञान वापरून कसे करू शकतो या दिशेने काम सुरु आहे.

आता अलिकडेच भारताने  पेट्रोलमध्ये  10 टक्के  इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. ही खूप मोठी कामगिरी आहे. भारताच्या गरजेचे 10 टक्के इथेनॉल उसापासून बनलेले, टाकाऊपासून बनवलेल्या इथेनॉलवर आज आपल्या गाड्या धावत आहेत. आपल्या गतीला बळ देत आहे. आणि हे कामही आपण आपल्या निर्धारित वेळेपूर्वी  करून दाखवले. पेट्रोलमध्ये  इथेनॉल मिसळण्याचे हे अभियान आपले  प्रदूषण कमी करतो, आपल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात देखील मदत करते कारण त्यांचा जो कचरा आहे, त्याचा इथे चांगला वापर केला जात आहे.

मित्रांनो ,

दिल्ली-एनसीआरच्या समस्या सोडवण्यासाठी गेल्या  8 वर्षांत आम्ही  अभूतपूर्व पावले उचलली आहेत. गेल्या 8 वर्षात दिल्ली-एनसीआरमध्ये मेट्रो सेवेची मर्यादा  193 किलोमीटर वरून सुमारे 400 किलोमीटर पर्यंत पोहचली आहे, दुपटीहूनही अधिक. जर काही नागरिकांनी संकल्प केला की मी प्रवासासाठी 10  टक्के माझ्या वाहनाचा जो वापर करतो, त्याऐवजी मी 10 टक्के  मेट्रोचा वापर करेन.  यामुळे मेट्रो मध्ये थोडी गर्दी वाढेल, मात्र एवढे छोटेसे कर्तव्‍य देखील आपल्या दिल्‍लीसाठी किती उपयुक्त ठरेल आणि एक नागरिक म्हणून या कर्तव्‍य भावनेचा आनंद किती मिळेल हा देखील एक अनुभवाचा विषय आहे.

कधी-कधी सामान्‍य लोकांमध्ये जाऊन प्रवास करण्याचा देखील एक वेगळाच आनंद असतो. त्यांचे आयुष्य जाणून घेण्याची संधी त्या पाच-दहा मिनटात मिळते. म्हणजेच अनेक लाभ आहेत. मेट्रोमध्ये जरी प्रवाशांची संख्या थोडी वाढली तरी ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल. आपण सर्वानी मिळून या गोष्टी केल्या तर किती मोठा  फायदा होईल. मात्र  दिल्ली-एनसीआरमध्ये  मेट्रोच्या वाढत्या  नेटवर्कमुळे आता हजारो गाड्या रस्त्यांवर कमी धावताना दिसतात, त्या वाढू शकतील. आणि यामुळे प्रदूषण कमी करण्यात मोठी मदत झाली आहे.

पूर्व आणि पश्चिम पेरिफेरल एक्सप्रेसवे मुळे देखील दिल्लीला मोठा दिलासा मिळाला आहे. हजारो ट्रक थेट बाहेरून जातात. दिल्लीच्या आंतरराज्य  कनेक्टिविटीचे हे अभूतपूर्व प्रमाण, अभूतपूर्व वेग आज कामाची ओळख बनला आहे. आता पाहा, दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेने दिल्ली-मेरठ दरम्यानचे अंतर केवळ एका तासावर आणले आहे. पूर्वी लोकांना  हरिद्वार, ऋषिकेशला जायचे असायचे आणि देहरादूनला जायचे असायचे तेव्हा आठ-आठ, नऊ -नऊ तास लागायचे. आज चार -साडेचार तासात दिल्लीहून तिथे पोहचता येते.

काळामध्ये पण काय ताकद असते, मी नुकताच काशी रेल्वे स्थानकावर गेलो होतो. मी तिथला खासदार आहे ना, तेंव्हा तेथील लोकांना त्रास होऊ नये यासाठी रात्री एक दिडच्या सुमारास मी तिथे जातो. तर मी काशी रेल्वे स्थानकावर गेलो, मी विचार केला नागरिकांसाठी कोण कोणत्या सुविधा आहेत ते पाहू. मी सगळ्याचे निरीक्षण करत होतो, नंतर मी तिथे रेल्वेचे कामकाज पाहणाऱ्या लोकांना वाहतुकी संबंधी आणि रेल्वे संबंधी विचारले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, साहेब, इथे वंदे भारत रेल्वेची खूप जास्त मागणी आहे. मी म्हणालो की ती थोडी महागडी आहे आणि….. नाही साहेब, आज गरीब व्यक्तीच सर्वात जास्त वंदे भारत रेल्वेतून प्रवास करू इच्छितो, मजूर वर्गातले लोक वंदे भारत रेल्वेतून प्रवास करू इच्छितात. मी विचारले, असे का.. या रेल्वेच्या तिकिटावर तर थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतात. तर ते म्हणाले की, साहेब, आम्हाला पण याचे आश्चर्य वाटले. मग मी विचारले की वंदे भारत रेल्वे गाडीचे इतके जास्त आरक्षण कसे होते, इतकी जास्त गर्दी कशी असते. तेव्हा त्यांनी प्रवाशांना विचारले…. त्यांनी सांगितले, हे पहा तुमच्या वंदे भारत रेल्वेत आम्हाला सामान ठेवायला मुबलक जागा आहे. आणि गरीब माणूस आपल्या गरजेचे सर्व सामान घरूनच घेऊन निघत असतो, ते ठेवायला त्याला जागा मिळते. आणि दुसरे म्हणजे, आम्ही तीन-चार तास लवकर पोहोचतो, तेंव्हा ताबडतोब कामाला लागून या तासांमध्ये आमची कमाई सुरू होऊ शकते.

आता पहा सामान्य माणसाची विचार करण्याची पद्धत किती बदलली आहे, आणि आम्ही जुन्याच विचारानुसार म्हणत राहतो की पहा वंदे भारत रेल्वे आणली आहे. जे सर्वसामान्यांच्या विचारांपासून दूर आहेत त्यांना माहीतच होत नाही की बदल कसे घडत आहेत. आणि माझ्यासाठी ही आनंदाची बाब होती की देशातला सामान्य नागरीक देखील या एका बदलाचा कसा स्वीकार करत आहे.

आता तुम्ही पहा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे, दिल्ली - देहराडून एक्सप्रेस वे, दिल्ली- अमृतसर एक्सप्रेस वे, दिल्ली -चंदीगड एक्सप्रेस वे, दिल्ली -जयपूर एक्सप्रेस वे यासारखे अनेक प्रकल्प पूर्ण होताच भारताच्या राजधानीला जगातील सर्वात जास्त संपर्क मार्गाने जोडलेल्या राजधान्यांपैकी एक बनवण्याचे सामर्थ्य आपल्यात असेल.

दिल्ली आणि मेरठ दरम्यान देशातील पहिली आणि स्वदेशी तंत्रज्ञानानुसार बनवण्यात आलेली रॅपिड रेल्वे सिस्टीम देखील वेगाने तयार होत आहे. हरियाणा आणि राजस्थान यांना दिल्लीशी जोडण्यासाठी देखील अशाच रॅपिड रेल्वे सिस्टीमवर काम सुरू आहे. हे प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा देशाची राजधानी म्हणून दिल्लीची विशिष्ट ओळख आणखी दृढ करतील.

याचा लाभ दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात राहणाऱ्या व्यवसायिकांना होईल, आपला तरुण वर्ग, आपले विद्यार्थी, शाळेत जाणारी मुले, ऑफिसमध्ये जाणारे लोक, टॅक्सी चालवणारे आपले सोबती, ऑटो रिक्षा चालवणारे आपले सोबती, आपले व्यापारी बंधू, आपले छोटे दुकानदार या सर्वांना म्हणजेच समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोकांना याचा भरपूर फायदा होईल.

मित्रांनो,

आज देश प्रधानमंत्री गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान नुसार मार्गक्रमण करत असल्यामुळे आधुनिक बहुपर्यायी संपर्क माध्यमांबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया जलद गतीने होत आहे. मी नुकताच धरमशाला येथे होतो, तिथे देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची भेट झाली. माझ्यासाठी हे सुखद आश्चर्य होते जेव्हा राज्यांचे मुख्य सचिव सांगत होते की, गती शक्ती योजनेचे महत्त्व त्यांनी ज्या प्रकारे जाणले आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी याचा उपयोग करून मोठमोठ्या प्रकल्पांच्या योजना आखल्या आहेत, ते सांगत होते की साहेब, ज्या कामासाठी 6-6 महिने लागत होते तिथे गती शक्ती योजनेचे तंत्रज्ञान, समन्वय आणि प्रोजेक्ट फॉर एंटर अप्रोचमुळे 6 महिन्यात होणारे काम 6 दिवसात होत आहे. गती शक्ती मास्टर प्लान सर्वांच्या विश्वासपूर्ण सोबतीचे आणि सहकार्याचे एक मोठे आणि सर्वोत्तम माध्यम बनला आहे.

कुठलाही प्रकल्प अडकून राहणार नाही, सर्व विभाग समन्वयाने काम करतील, प्रत्येक विभागाला इतर विभागांची संपूर्ण माहिती असावी, अंतिम परिणाम काय होणार आहे हे सगळ्यांना माहिती असावे या विचारानेच गती शक्ती योजनेची निर्मिती करण्यात आली आहे. सबका प्रयास ही भावना शहरी भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशातील महानगरांच्या व्याप्तीचा विस्तार करणे, टीअर -3 श्रेणीतील शहरांमध्ये योग्य नियोजनानुसार काम करणे आवश्यक झाले आहे. आगामी 25 वर्षात भारताच्या जलद विकासासाठी आपल्याला शहरे हरित, स्वच्छ आणि अनुकूल बनवावी लागतील. कामाची जागा आणि राहण्याची जागा शक्य तितक्या जवळ असाव्यात, दळण वळण सुविधेच्या आसपास असाव्यात, ही मनुष्य प्राण्याची प्राथमिक आवश्यकता आहे. शहर नियोजनाला प्रथमच एखादे सरकार इतक्या मोठ्या स्तरावर महत्त्व देत आहे. आणि आपण हे लक्षात घेऊन चालले पाहिजे की, शहरीकरणाला कोणीही रोखू शकणार नाही. शहरीकरणाला संकट मानण्याऐवजी शहरीकरणाला संधी मानून नियोजन केले तर देशाची ताकद अनेक पटीने वाढवण्याचे सामर्थ्य त्यामध्ये आहे. आणि आमचे लक्ष यावरच केंद्रित आहे की, आपण शहरीकरणाला संधी मानावे आणि शहरी भागात नियोजन सुरू करावे.

मित्रांनो,

शहरी भागातील गरिबांपासून शहरी भागातील मध्यम वर्गातील प्रत्येकाला चांगल्या सुविधा दिल्यामुळे आज जलद गतीने काम होत आहे. मागील 8 वर्षात 1 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त शहरी गरिबांना पक्की घरे देणे सुनिश्चित करण्यात आले. मध्यम वर्गातील लाखो परिवारांना देखील त्यांच्या घरासाठी मदत देण्यात आली आहे. शहरांमध्ये जसे आधुनिक सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित केले जात आहे त्या सोबतच सीएनजी आधारित आणि विद्युत आधारित दळणवळणाच्या पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. केंद्र सरकारची फेम (FAME) योजना याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. या योजनेअंतर्गत दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये नव्या इलेक्ट्रिक बस गाड्यांचा ताफा तयार केला जात आहे. काही दिवसापूर्वीच या योजनेअंतर्गत दिल्लीमध्ये काही नव्या बस धावण्यास सुरुवात झाली आहे. या बस गरीब आणि मध्यमवर्गीय दोघांनाही सुविधाजनक असून प्रदूषणाची समस्या कमी करणाऱ्या आहेत.

देशवासीयांचे जीवन सुकर बनवण्याचा हा संकल्प असाच मजबूत होत राहो. हा बोगदा पाहता यावा म्हणून माझ्यासाठी उघड्या जीपची व्यवस्था करण्यात आली होती. म्हणून, मीदेखील नियम, कायदे आणि शिस्त यांचे पालन करीत थोडावेळ त्या उघड्या जीपमधून प्रवास केला. मात्र, नंतर खाली उतरलो. इथे येण्यासाठी जो 10-15 मिनिटांचा विलंब झाला त्याचे कारण देखील मी चालणे पसंत केले हेच आहे. मी चालत यासाठी आलो की, रस्त्याच्या बाजूने जे कलात्मक काम करण्यात आले आहे ते आवडीने पाहण्याची मला इच्छा झाली. प्रत्येक कलात्मक काम मी पाहत गेलो. मी असे म्हणू शकतो की पियुषजींनी या कलात्मक कारागीरीमधल्या ऋतुंचे योग्य वर्णन केले होते. या कामाविषयी चर्चा करत असताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या होत्या. पण चर्चा करत असताना जितक्या गोष्टी सांगितल्या होत्या इथे त्यापेक्षाही जास्त मूल्यवर्धन झालेले मला आढळले, नाविन्य दिसले ते देखील चांगले वाटले.

मी हा बोगदा आतून पाहून आलो आहे त्यामुळे मी असे म्हणू शकतो की, एक भारत - श्रेष्ठ भारताचे हे उत्तम शिक्षण केंद्र आहे. मला माहित नाही की जगात काय होईल पण हे पाहिल्यानंतर मी असे म्हणू शकतो की कदाचित जगात कोणत्याही बोगद्यामध्ये इतके लांब कला दालन नसेल जितके या बोगद्यात बनवण्यात आले आहे.

भारताला जर एका दृष्टिक्षेपात समजून घ्यायचे असेल, भारताची विविधता, उमंग आणि उत्साही क्षण अनुभवायचे असतील तर त्याने या बोगद्यातून प्रवास करावा, कोणी परदेशी व्यक्ती असेल तरीही त्याला समजून येईल की, अच्छा.. नागालँड असा आहे, केरळ असा आहे, जम्मू-काश्मीर असा आहे, म्हणजेच, इतक्या विविधतेने हे कलादालन सजवण्यात आले आहे, आणि त्यातही हे सारे कलात्मक काम हाताने करण्यात आले आहे.

हे सर्व पाहिल्यानंतर मी आत्तापर्यंत जे भाषण दिले त्याच्या थोडे विपरीत आपल्याला सुचवू इच्छितो. मला माहित नाही की तज्ज्ञ मंडळी माझ्या सूचना अशा अर्थाने घेतील. माझी सूचना अशी आहे की, तसे पाहता रविवारी रस्त्यावर कमी वर्दळ असते तेव्हा रविवारी 4-6 तासांसाठी हा बोगदा ज्या कामासाठी बनवण्यात आला आहे त्याच्या विपरीत कामासाठी वापरण्याची सूचना मला द्यावीशी वाटते. रविवारी 4-6 तासांसाठी या बोगद्यात कुठल्याही वाहनाला प्रवेश न देता शक्य असल्यास शालेय विद्यार्थ्यांना हे कलादालन पायी फिरून पाहण्याची संधी देण्यात यावी, ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट ठरेल.

आणि मी तर म्हणतो की, परराष्ट्र मंत्रालयाने सर्वात आधी इथे जे इतर देशांचे राजदूत आहेत, इतर राष्ट्रांचे जे प्रकल्प सुरू आहेत त्यामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना या बोगद्याची पदयात्रा घडवावी. तेथे जाताच सर्वांना माहीत होईल की हे गांधीजी आहेत, ही श्री कृष्णासंबंधित गोष्ट आहे. इथे पाहूनच लक्षात येईल की, हे आसामचे लोक नृत्य दिसत आहे.

यासोबतच, उच्च तंत्रज्ञान युक्त फोटो पायलट तसेच फोन द्वारे गाईडची व्यवस्था देखील करता येऊ शकते. आणि कधीकधी नाममात्र का असेना, दहा पैसे का असेना पण प्रवेश शुल्क आकारून लोकांना प्रवेश दिला तर अनावश्यक लोकांच्या प्रवेशाला आळा बसेल आणि या कलादालनाचा योग्य पद्धतीने उपयोग होईल. याची मोजणीही केली जाईल.

मी खरे सांगत आहे मित्रांनो, कदाचित मला हे भाग्य लाभले नसते. कारण, हा बोगदा वाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात झाली की मला कोणीही जीप मधून खाली उतरू दिले नसते. पण, आज हा बोगदा रिकामा असल्यामुळे मी पदयात्रा करून आलो आहे. ज्यांना खरोखर कलेमध्ये रुची आहे, कलेच्या माध्यमातून जग समजून घेण्यामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी दिल्लीच्या हृदयात हे उत्तम संधी स्थळ तयार झाले आहे.

मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेंव्हा काही दिवसासाठी एक प्रयोग केला होता. अहमदाबादमध्ये एक खूप जास्त रहदारीचा रस्ता होता. तेव्हा मी ठरवले की महिन्यातल्या ठराविक दिवशी, आता कोणता दिवस ठरवला होता ते मी विसरलो आहे, त्या ठराविक दिवशी या रस्त्यावर कोणत्याही वाहनाला परवानगी दिली जाणार नाही. तो रस्ता फक्त मुलांसाठी असेल, प्रत्येक मूल महत्त्वपूर्ण आहे. मुले त्या दिवशी रस्त्यावर क्रिकेट खेळतील, तेव्हा त्यांना या शहरात आपल्यालाही किंमत आहे असे वाटेल. काही दिवस या प्रयोगाचे सगळ्यांना आकर्षण वाटले. जो रस्ता कायम रहदारीने व्यापलेला असे त्या रस्त्यावर खेळण्याची मुलांना संधी मिळाली हे पाहून त्यांचे मन भरून जात असे.

मला वाटते की आठवड्यात एक दिवस रहदारी कमी असते, कदाचित तो रविवार असेल, 4-6 तास फक्त चालणाऱ्यांसाठी रस्ता वापरण्याचे अभियानाच्या मोठ्या स्वरूपात राबवले जावे, या अभियानात अति महत्त्वाच्या लोकांनी देखील सहभागी व्हावे. मी तर म्हणतो की जेव्हा संसदेचे कामकाज सुरू असेल तेंव्हा मी सर्व संसद सदस्यांना सांगेन की हे अभियान सुरु झाल्यास सर्व सदस्यांनी आपल्या परिवारातील लोकांसह यामध्ये सहभागी व्हावे आणि जरा वेळ पायी चालावे. आणि याची सुरुवात करायची असेल तर प्रसार माध्यमांचे जे कला समीक्षक असतात त्यांना एक दिवस विशेष सहल काढून तेथे घेऊन जा. मला पक्की खात्री आहे की ते निश्चितच या उपक्रमाबद्दल चांगला लेख लिहितील. हा उपक्रम योग्य रीतीने सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले काम करण्यात आले आहे. त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे.

मित्रांनो,

दिल्लीच्या परिसरात ही जी संपर्क सेवा तयार होत आहे ती फक्त प्रवासाच्या सोयीसाठी आहे असा विचार करू नका. मित्रांनो, ही दिल्ली, नोएडा, गाजियाबाद येथील लोकांना चांगली सुविधा प्राप्त झाली आहे. याचा आणखी एक मोठा लाभ आहे, तो म्हणजे ही सुविधा शहरी भागावरील बोजा कमी करते. जर या लोकांना येण्या जाण्याची सुविधा मिळत असेल तर हे लोक विचार करतील की आता दिल्लीमध्ये इतके महागडे जीवन जगण्यापेक्षा मी गाजियाबादमध्ये राहीन, मेरठमध्ये राहीन आणि गरज भासल्यास दिल्लीला जाईन. पूर्वीच्या तुलनेत आता मी अर्ध्या तासात दिल्लीत पोहोचतो, म्हणजे दिल्लीवरील बोजा कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संपर्क सेवा करत आहे. या प्रकल्पासाठी भारत सरकार बरेच धन खर्च करत असून दिल्लीवरचा बोजा कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम हा प्रकल्प करत आहे.

मित्रांनो,

आज इथे उपस्थित असलेल्या लोकांना जर थोडी सवड मिळणार असेल तर आणि या मार्गावर वाहतूक सुरू झाली नसेल तर मी सर्वांना आग्रह करतो की त्यांनी थोडावेळ पायी चालत बोगद्यातील कलाकृती अवश्य पाहाव्यात. माझ्या बोलण्यात खरेपणा जाणवला तर हे दालन पाहण्यास इतरांनाही प्रोत्साहित करावे आणि मी विभागालाही सांगू इच्छितो की सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांनी यावर अवश्य विचार करावा.

खूप खूप धन्यवाद, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

S.Thakur/S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1835663) Visitor Counter : 189