पंतप्रधान कार्यालय

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 30 MAY 2022 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

 

नमस्कार !

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या देशाच्या महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी जी, देशभरात विविध ठिकाणाहून उपस्थित मंत्रीमंडळाचे सर्व सदस्य,त्यांच्या सह तिथे उपस्थित ज्येष्ठ नागरिक, आणि ज्यांच्यासाठी आजचा हा दिवस आहे तो उपस्थित प्रिय बाल वर्ग, आदरणीय मुख्यमंत्री गण, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय देशबांधवानो !  

आज मी पंतप्रधान म्हणून नव्हे तर आपल्या कुटुंबाचा सदस्य या  नात्याने आपल्याशी संवाद साधत आहे.आज आपणा सर्व मुलांशी संवाद साधताना मला  आगळेच  समाधान लाभले आहे.

मित्रहो,

आयुष्य अनेकदा आपल्याला अनपेक्षित वळणावर आणून उभे करते.अशी परिस्थिती ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. हसत्या-खेळत्या जीवनात अचानक  काळोख दाटतो, क्षणार्धात  सगळे चित्र पालटते. कोरोनामुळे अनेकांच्या आयुष्यात, अनेक कुटुंबात असेच घडले आहे. कोरोनामुळे ज्यांनी आपले आप्त-स्वकीय गमावले आहेत,त्यांच्या जीवनात झालेला हा बदल किती कठीण आहे, किती अवघड आहे हे मी समजू शकतो. दररोज  संघर्ष,क्षणो-क्षणी संघर्ष, नव-नवी आव्हाने, प्रत्येक दिवस जणू काही कठोर तपासारखा.

आज जी मुले आपल्यासमवेत आहेत, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, त्यांचे दुःख शब्दात व्यक्त करणे अतिशय कठीण आहे. आपल्यातून निघून जाणाऱ्या  व्यक्तीच्या, आपल्याजवळ उरतात त्या फक्त आठवणी.मात्र जो राहिला आहे त्याच्या समोर अडचणीचे डोंगर उभे राहतात. अशा आव्हानात्मक परिस्थितीत पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन  म्हणजे कोरोनामुळे ज्यांनी आई-वडील गमावले  अशा मुलांच्या, अडचणी कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.

मित्रहो, देशातला प्रत्येक जण तुमच्या वेदना समजून घेत तुमच्यासमवेत आहे याचेच प्रतिबिंब म्हणजे पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन आहे. या मुलांचे चांगले आणि अखंडित शिक्षण यासाठी त्यांच्या घराजवळच्या सरकारी किंवा खाजगी शाळांमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. पीएम केअर्स द्वारे या मुलांची पुस्तके आणि युनीफॉर्म यांचा खर्चही   उचलण्यात येईल. व्यावसायिक अभ्यासक्रम, उच्च शिक्षण यासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्यामध्येही पीएम केअर्स मदत करेल. दैनंदिन जीवनातल्या दुसऱ्या आवश्यकता भागवण्यासाठी इतर योजनांच्या माध्यमातून त्यासाठी दरमहा 4 हजार  रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मित्रहो,

 ही मुले आपले शालेय शिक्षण पूर्ण करतील तेव्हा त्यांना भविष्यातली स्वप्ने साकार करण्यासाठी पैशांची आणखी गरज भासेल. यासाठी 18 वर्षापासून ते 23 वर्षापर्यंत या  युवकांना दर महा विद्यावेतन मिळेल.  जेव्हा त्यांच्या वयाची 23 वर्षे पूर्ण होतील तेव्हा एकरकमी 10 लाख रुपये प्राप्त होतील.

मित्रहो

आणखी एक मोठी चिंता निगडीत असते ती म्हणजे आरोग्याशी. एखादा आजार झाला तर त्यावरच्या उपचारासाठी पैशांची गरज भासते. मात्र कोणत्याही मुलाला, त्याच्या पालकांना यासाठी काळजी करण्याची गरज नाही. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेनच्या माध्यमातून आपल्याला आयुष्मान भारत आरोग्य कार्ड देण्यात येत आहे. या द्वारे पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधाही या मुलांना मिळेल.

मित्रहो,

हे सर्व प्रयत्न करताना आम्हाला याचीही जाणीव आहे की अनेकदा मुलांना भावनिक आणि मानसिक मार्गदर्शनाचीही गरज भासू शकते. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्ती तर आहेतच मात्र सरकारनेही एक प्रयत्न केला आहे. यासाठी एक विशेष ‘संवाद’ सेवाही सुरु केली आहे. ‘संवाद  हेल्पलाईन’ वर मुले, मानसशास्त्राशी निगडीत बाबींवर तज्ञांचा सल्ला घेऊ शकतात, त्यांच्याशी चर्चा करू शकतात.

मित्रहो,

कोरोन जागतिक महामारीची झळ अवघ्या मानव जगताने झेलली आहे. शतकातल्या या सर्वात मोठ्या महामारीने, कायमचा स्मरणात राहील असा आघात केला नाही अशी व्यक्ती जगात क्वचितच असेल !  आपण ज्या धैर्याने आणि धडाडीने या संकटाला तोंड दिले त्यासाठी मी आपणा सर्वाना सलाम करतो. देशाच्या भावना आपणासमवेत आहेत आणि त्याचबरोबर आपली स्वप्ने साकारण्यासाठी अवघा देश आपल्यासमवेत आहे. आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो, कोणताही प्रयत्न, कोणतेही सहकार्य आपल्या आई-वडिलांच्या मायेची भरपाई करू शकत नाही हे मी जाणतो. मात्र आपले वडील, आपली आई आपल्याला सोडून गेली असताना संकटाच्या या काळात भारत माता आपणा सर्व मुलांच्या पाठीशी आहे.पीएम केअर्स  फॉर चिल्ड्रेन च्या माध्यमातून देश आपल्या या जबाबदारीचे दायित्व निभावण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न केवळ एखादी व्यक्ती, एखादी संस्था किंवा सरकार यांचाच आहे असे नव्हे तर पीएम केअर्स मध्ये आपल्या कोट्यवधी देशबांधवांनी आपले कष्ट, आपल्या मेहनतीच्या कमाईचे योगदान दिले आहे.

आपण आठवून बघा, सेवा आणि त्याग यांची कितीतरी उदाहरणे आपल्यासमोर आली आहेत. कोणी आपली आयुष्यभराची कमाई दान केली, तर कोणी आपली स्वप्ने साकारण्यासाठी साठवलेली रक्कम यासाठी दिली. या फंडातून कोरोना काळात  रुग्णालये उभारण्यासाठी, व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यासाठी,ऑक्सिजन सयंत्रासाठी मोठी मदत झाली. यामुळे किती लोकांचे प्राण वाचवता आले, किती कुटुंबांचे भविष्य सावरता आले. आपल्याला अकाली सोडून गेलेल्या अशा व्यक्तींच्या मुलांसाठी, आपणा सर्वांच्या भविष्यासाठी हा फंड उपयोगी ठरत आहे.

मित्रहो

आपणा सर्वाना आयुष्याचा  दीर्घ प्रवास करायचा आहे. आयुष्यात आलेल्या या परिस्थितीला आपण धैर्याने तोंड देत आहात.आपल्या देशातल्या, जगभरातल्या थोर व्यक्तींनी आपल्या जीवनात कधी ना कधीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या खडतर प्रसंगाना तोंड दिले आहे. मात्र हार न मानता ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले. अपयशानंतरही त्यांनी निराशेला थारा दिला नाही. यशाचा हाच मंत्र आपल्याला जीवनात मोलाचे मार्गदर्शन करेल, मदत करेल. हा मंत्र सदैव स्मरणात ठेवा. नेहमी आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवा,की चांगले-वाईट, योग्य-अयोग्य यातला फरक सांगण्यासाठी आपले नातेवाईक आणि शिक्षक आहेत. 

यासाठी तुमचे दायित्व आहे की, त्यांचे ऐकून घ्यावे, त्यांचे म्हणणे मान्य करावे. 

अशा आव्हानात्मक जीवनात तुमचा एक विश्वासू मित्र खूप मदत करु शकतो. तो चांगली पुस्तकेही असू शकतो. चांगली पुस्तके केवळ मनोरंजनच करत नाहीत तर ते तुम्हाला मार्गदर्शनही करतात. मी तुम्हाला आणखी एक सल्ला देेईन.

मित्रांनो,

आजारी पडल्यावर उपचाराची गरज तर असतेच, पण जीवन उपचाराशी नाही तर आरोग्याशी जोडलेले असायला हवे. देशात आज बालकांसाठी फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियान सुरु आहेत. तुम्ही या सर्व अभियानांमधे सहभागी व्हायला हवे. त्यांचे नेतृत्व करायला हवे. आता काही दिवसातच योग दिवसही येतोय. तुमच्या अभ्यासाबरोबरच योग देखील तुमच्या जीवनाचा भाग बनणे, हे पण खूप गरजेचे आहे.

मित्रांनो,

निराशेच्या कितीही खोल गर्तेत असलो तरी स्वतःवर विश्वास ठेवला तर प्रकाशाचा किरण नक्कीच दिसतो. आपला देश हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आपण सध्या आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत, स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ लढ्यात आपली सर्वात मोठी ताकद कोणती होती? आपली ताकद होती कधीही हार न मानण्याची आपली सवय! आपली ताकद होती- आपल्या वैयक्तिक स्वार्थांच्या पलिकडे जात देशासाठी, मानवतेसाठी विचार करण्याची आणि जगण्याचे आपले संस्कार! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात याच भावनेने आपण पुढे जात आहोत. कोरोनाविरुद्धच्या एवढ्या मोठ्या लढ्यात याच भावनेने देश जगला आहे आणि देशाने जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. तुम्ही बघा, अडीच वर्षांपूर्वी जगात कुणालाही कोरोना विषाणूबद्दल नीट माहिती नव्हती. जगातील मोठ्या देशांकडे सर्व आशेने बघत होते. भारताबद्दल सकारात्मक बोलायला कोणी तयार नव्हते. उलट अशा परिस्थितीत झालेल्या विध्वंसक इतिहासामुळे लोक भारताकडे मोठ्या साशंकतेने बघत होते. पण, त्या नकारात्मकतेच्या वातावरणात भारताने आपल्या ताकदीवर भरवसा ठेवला. आपण आपल्या शास्त्रज्ञांवर, आपल्या डॉक्टरांवर, आपल्या तरुणांवर विश्वास ठेवला. आणि, आम्ही जगासाठी चिंतेचा विषय नसून आशेचा किरण म्हणून पुढे आलो. आपण समस्या नाही, तर तोडगा देणारे बनलो. आपण जगभरातील देशांमध्ये औषधे, लस पाठवली. एवढ्या मोठ्या देशात आपण प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचवली. आज देशात सुमारे 200 कोटी लसीच्या मात्रा दिल्या आहेत. या आपत्तीच्या काळातही आपण ‘आत्मनिर्भर भारत’ सारखा संकल्प सुरू केला आणि आज हा संकल्प झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळेच आज आपण कोरोनाच्या दुष्परिणामातून बाहेर पडून वेगाने वाढणारी जागतिक अर्थव्यवस्था बनलो आहोत. जग आज आपल्याकडे एका नव्या आशेने, नव्या विश्वासाने पाहत आहे.

मित्रांनो,

आपले सरकार आज 8 वर्षे पूर्ण करत असताना देशाचा आत्मविश्वास, देशवासीयांचा स्वत:वरचा विश्वासही अभूतपूर्व आहे. भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, घराणेशाही, देशभर पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव, 2014 पूर्वी देश ज्या दुष्टचक्रात अडकला होता, त्यातून आता बाहेर येत आहे. हे देखील तुम्हा सर्व मुलांसाठी एक उदाहरण आहे की सर्वात कठीण दिवस देखील निघून जातात. सबका साथ - सबका विकास, सबका विश्वास - सबका प्रयास या मंत्राचा अवलंब करत भारत आता वेगाने विकसित होत आहे. स्वच्छ भारत मिशन असो, जन धन योजना असो, उज्ज्वला योजना असो किंवा हर घर जल अभियान असो, गेली 8 वर्षे गरिबांच्या सेवेसाठी, गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. एका कुटुंबातील सदस्य या नात्याने आम्ही गरिबांच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात, त्यांचे जीवन सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. देशवासियांसाठी कोणत्याही प्रकारे कृतीशीलपणे काही करता आले ते केले, त्यात कोणतीही कसर ठेवली नाही. तंत्रज्ञान वापरण्यास आधीची सरकारेही घाबरली होती, लोकांना त्याची सवय नव्हती, त्याच तंत्रज्ञानाचा वापर वाढवून आपल्या सरकारने गरिबांचे हक्क मिळवून दिले आहेत.

आता सरकारच्या योजनांचा लाभ आपल्याला मिळेल, तो सातत्याने मिळेल, असा विश्वास गरीबातील गरीबांना आहे. हा विश्वास वाढवण्यासाठी आमचे सरकार आता 100 टक्के सक्षमीकरणाची मोहीम राबवत आहे. कोणताही गरीब सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, प्रत्येक गरीबाला त्याचा हक्क मिळावा, ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गेल्या आठ वर्षांत भारताने जी उंची गाठली आहे, त्याची आधी कोणी कल्पनाही करु शकला नसता. जगात आज भारताची प्रतिष्ठा-मान-सन्मान वाढला आहे, जागतिक मंचावर आपल्या भारताची ताकद वाढली आहे. आणि मला आनंद आहे की भारताच्या या प्रवासाचे नेतृत्व

युवा शक्ती करत आहे. मला खात्री आहे की तुम्ही, आपली मुले, आपले तरुण याच धैर्याने आणि मानवी संवेदनशीलतेने देश आणि जगाला मार्ग दाखवाल. तुम्ही असेच पुढे जात राहा. संकल्प घेऊन मार्गक्रमण करा, संकल्पासाठी जीवन समर्पित करण्याची तयारी ठेवा, स्वप्ने साकार झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला ज्या शिखरावर  पोहोचायचे आहे तिथे जाण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. तुमच्यात ध्यास, जिद्द आणि संकल्प पूर्ण करण्याची ताकद असेल, तर तुम्हाला कधीही थांबण्याची गरज नाही. तसे तर मी सुरुवातीला म्हटले होते की एक कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मी आज बोलत आहे. आज, एक कुटुंब सदस्य म्हणून, मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. मला आशीर्वाद देण्याचा अधिकार आहे की नाही माहीत नाही, पण मला तुमच्यात सामर्थ्य दिसते आहे, मला तुम्हा मुलांमधे सामर्थ्य दिसते आहे. म्हणूनच मी आशीर्वाद देत आहे. तुम्ही खूप मोठे व्हा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद!

 

 

 

 

JPS/ST/NC/VG/PM

 सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1829607) Visitor Counter : 271