पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जर्मनीमध्ये बर्लिन येथे भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

Posted On: 02 MAY 2022 11:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2022

 

भारत माता की जय! नमस्कार!

आज मला जर्मनीत मां भारतीच्या बालकांना भेटण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद होत आहे. तुम्हाला भेटून खूप छान वाटले. तुमच्यापैकी बरेच जण आज जर्मनीच्या वेगवेगळ्या शहरांमधून बर्लिनला आले आहेत. भारतात सध्या खूप उष्ण वातावरण असताना, पहाटे साडेचार वाजता इथे बरीच लहान मुलं थंडीत बाहेर पडताना पाहून मला आश्चर्य वाटलं. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. माझ्या याआधीच्या जर्मनी दौऱ्यात मी तुमच्यापैकी अनेकांना भेटलो आहे. तुमच्या भारतभेटीत मला तुमच्यापैकी काहींना भेटण्याची संधीही मिळाली. मला या ठिकाणी खूप उत्साह असलेल्या तरुण पिढीतील लोकांची संख्या जास्त दिसत आहे. तुम्ही तुमच्या अतिशय व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आमचे राजदूत नुकतेच मला असे सांगत होते की, जर्मनीत भारतीयांची संख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे, पण तुमचा जिव्हाळा आणि उत्साह अजिबात कमी नाही आणि जेव्हा भारतातील लोक हे पाहतात तेव्हा त्यांनाही याचा अभिमान वाटतो.

मित्रांनो,

आज मी या ठिकाणी माझ्याबद्दल किंवा मोदी सरकारबद्दल बोलण्यासाठी आलो नाही, तर मला कोट्यवधी भारतीयांच्या क्षमतेबद्दल बोलायचे आहे आणि त्यांचे गुणगान करायचे आहे. मी जेव्हा कोट्यवधी भारतीयांविषयी बोलतो तेव्हा त्यात फक्त भारतात राहणारे लोकांचाच नाही तर येथे राहणाऱ्या लोकांचाही समावेश असतो. जगाच्या कानाकोपऱ्यात राहणार्‍या माँ भारतीच्या सर्व मुलांविषयी मी बोलतो. सर्वप्रथम मी जर्मनीत यशस्वी वाटचाल करत असल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो. मी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

21 व्या शतकाचा हा कालखंड भारतासाठी, भारतीयांसाठी आणि विशेषतः आपल्या युवा वर्गासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज भारताने आपल्या मनाचा निर्धार केला आहे आणि या निर्धाराने तो पुढे जात आहे. आज भारताला कुठे, कसे आणि किती दूर जायचे आहे हे माहीत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादा देश दृढनिश्चय करतो तेव्हा तो नवीन मार्ग निवडतो आणि आपले इच्छित स्थान गाठतो. आजच्या आकांक्षी भारताला आणि तरुणांना देशाचा विकास झपाट्याने हवा आहे. त्यासाठी राजकीय स्थैर्य आणि प्रबळ इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक असल्याची त्यांना जाणीव आहे. आजच्या भारताला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. भारतातील जनतेने गेल्या तीन दशकांतील राजकीय अस्थिरता एक बटण दाबून संपुष्टात आणली. गेल्या सात-आठ वर्षांत भारतातील मतदाराला आपल्या मताची ताकद आणि ते एक मत भारताला कसे बदलू शकते हे कळू लागले आहे. सकारात्मक बदल आणि जलद विकासाची आकांक्षा यामुळेच भारतातील जनतेने 2014 मध्ये पूर्ण बहुमताने सरकार निवडून दिले आणि 30 वर्षांनंतर हे घडले आहे.

हा भारतीय जनतेचा दृष्टीकोन आहे ज्यामुळे 2019 मध्ये या देशाचे सरकार पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनले. भारताला सर्वच क्षेत्रात पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेल्या निर्णयक्षम सरकारकडे भारताच्या जनतेने सत्ता सोपवली. मित्रांनो आमच्याकडून, माझ्याकडून तुम्हाला अनेक अपेक्षा आहेत याची मला जाणीव आहे पण मला हे देखील माहीत आहे की कठोर परिश्रम आणि कोट्यवधी भारतीयांचे पाठबळ आणि नेतृत्वाने भारत नवी शिखरे सर करू शकतो. भारत आता फार वेळ वाया घालवणार नाही. सध्याच्या काळाचे, त्यामध्ये असलेल्या क्षमतेचे महत्त्व भारत जाणून आहे आणि या कालखंडात काय साध्य करायचे आहे ते भारताला माहीत आहे.

मित्रांनो,

आपण या वर्षी आपल्या स्वातंत्र्याचे 75वे वर्ष साजरे करत आहोत. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे ज्याचा जन्म स्वतंत्र भारतात झाला होता. 25 वर्षांनी ज्यावेळी भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा भारत ज्या शिखरावर असेल, भक्कमपणे एकामागोमाग एक पावले टाकत असेल आणि आपल्या लक्ष्याच्या दिशेने सहजतेने वाटचाल करत असेल.

मित्रांनो,

भारतामध्ये साधनसंपत्तीची कधीही कमतरता राहिली नाही. देशाने स्वातंत्र्यानंतर आपल्या मार्गाची आणि दिशेची देशाने निवड केली. मात्र, या ना त्या कारणामुळे आपण अनेक व्यापक आणि तातडीने काळानुरुप जे बदल व्हायला हवे होते त्यामध्ये मागे पडत गेलो. भारतीयांच्या आत्मविश्वासावर केवळ एकच तोडगा होता आणि अनेक वर्षांच्या परकीय राजवटीमध्ये तो चिरडून टाकण्यात आला. सरकारवर जनतेचा विश्वास निर्माण व्हावा म्हणून भारताच्या जनतेमध्ये हा आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागृत करणे अतिशय गरजेचे होते. ब्रिटिश वारशामुळे सरकार आणि जनता यांच्यात  प्रचंड मोठी अविश्वासाची तफावत होती. संशयाचे ढग मोठ्या प्रमाणावर घोंघावत होते. ब्रिटिशांच्या काळात जे बदल होणे आवश्यक होते त्यांची गती अतिशय कमी होती. त्यामुळेच सामान्य माणसाच्या आयुष्यात सरकार कमी प्रमाणात असणे ही काळाची गरज होती. त्यामध्ये किमान सरकार कमाल सुशासन असायला हवे. जिथे गरज आहे तिथे सरकारची अनुपस्थिती चालणार नाही, पण जिथे गरजच नाही तिथे सरकारचा प्रभाव असणेही योग्य नाही.

मित्रांनो,

ज्या देशाचे लोक स्वतः विकासामध्ये पुढाकार घेतात, त्या देशाची प्रगती होते. जेव्हा लोक पुढे येतात आणि त्या देशाची दिशा ठरवतात तेव्हा त्या देशाची प्रगती होते. आजच्या भारतामध्ये सरकार नव्हे किंवा मोदी नव्हे तर कोट्यवधी भारतीय देशाला चालवणारे बळ आहेत. त्यामुळेच आम्ही देशातील जनतेच्या आयुष्यात सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप संपवत आहोत. आम्ही सुधारणांच्या माध्यमातून देशाचा कायापालट करत आहोत. आणि मी नेहमीच सांगतो की सुधारणांसाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे, कामगिरीसाठी सरकारी यंत्रणेच्या उभारणीची गरज आहे आणि परिवर्तनासाठी जनतेच्या सहभागाची गरज आहे. त्याचवेळी रिफॉर्म,परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मचा गाडा पुढे सरकेल. आज भारत जलदगतीने काम करत आहे आणि जीवनमान सुलभता, राहणीमानाचा दर्जा, रोजगार सुलभता आणि शिक्षणाचा दर्जा, परिवहन सुलभता, प्रवासाचा दर्जा, व्यवसाय सुलभता, सेवांचा दर्जा आणि उत्पादनांचा दर्जा यामध्ये नवे आयाम प्रस्थापित करत आहे. हा तोच देश आहे जो तुम्ही सोडला आहे आणि येथे आला आहात. नोकरशाही, सरकारी कार्यालये आणि सरकारी यंत्रणा तीच आहे पण आता आम्ही अधिक चांगले परिणाम प्राप्त करू लागलो आहोत.

मित्रांनो,

2014 पूर्वी मी तुमच्यासारख्या मित्रांशी बोलायचो तेव्हा एक मोठी तक्रार असायची. तुम्हाला ते दिवस आठवत असतील जेव्हा सर्वत्र ‘'कार्य प्रगतीपथावर’ होते. मी कोणावरही टीका करत नाही, पण आपल्या देशात रस्ता तयार झाल्यानंतर लगेचच वीजवाहिनी टाकण्यासाठी तो खोदला जायचा त्यानंतर जलविभागाचे लोक तेथे जलवाहिनी टाकण्यासाठी जात असत. मग दूरसंचार विभागाची पाळी असायची, अशी पद्धत होती. एका रस्त्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च व्हायचा मात्र तरीही काम पूर्ण होत नव्हते. तुम्ही या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. त्यामुळे मी तुम्हाला हे एकच उदाहरण दिले आहे. सरकारी विभागांमध्ये एकतर संवाद नसल्यामुळे किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यात समन्वय नसल्यामुळे हे असे घडते. प्रत्येकाने स्वतःचे असे जग निर्माण केले आहे आणि त्यातच ते गुंतलेले आहेत. प्रत्येकाकडे इतके रस्ते बांधले, अनेक तारा आणि जलवाहिन्या टाकल्या याचे प्रगतीपुस्तक असायचे, पण परिणाम काय असायचा तर 'कार्य प्रगतीपथावर' आहे.

आता ही पद्धत संपुष्टात आणण्यासाठी आम्ही पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा तयार केला आहे. त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पातील प्रत्येक विभागीय स्तरावरील अशाप्रकारची पद्धत संपुष्टात आणून आम्ही सर्व भागधारकांना एका व्यासपीठावर आणले आहे. आता सरकारचे सर्व विभाग आपापल्या कामाचे पूर्व नियोजन करतात. या नवीन पद्धतीमुळे विकास प्रकल्पांची गती आणि प्रमाण वाढले आहे. आज भारत सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्वसहमतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे नवीन आरोग्य धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. आज भारतात विक्रमी संख्येने नवीन विमानतळ बांधले जात आहेत, लहान शहरांना हवाई मार्गांनी जोडले जात आहे. आज भारतात मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जितके काम केले जात आहे तितके काम यापूर्वी कधीही झाले नव्हते. आज भारतात विक्रमी संख्येने नवीन मोबाईल मनोरे बसवले जात आहेत आणि 5 जी भारताचे दरवाजे ठोठावत आहे. आज भारतात विक्रमी संख्येने गावे ऑप्टिकल फायबरने जोडली जात आहेत. तुम्ही कल्पना करू शकता की, लाखो गावे ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडल्यानंतर भारतातील गावे जगाशी जोडली जातील. भारत आणि जर्मनीतील लोकांना भारतातील वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी जाणवेल. आणि भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त डेटाची तुम्ही प्रशंसा कराल, जो डेटा अनेक देशांसाठी अकल्पनीय आहे. आता भारत छोटा विचार करत नाही. जागतिक स्तरावर प्रत्यक्ष डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा वाटा 40% आहे.

मित्रांनो,

मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे आणि तुम्हाला ती नक्कीच आवडेल. भारतात प्रवास करताना रोख रक्कम बाळगण्याची गरज नाही. अगदी दुर्गम गावांमध्येही मोबाईलद्वारे सर्व प्रकारची देयके भरली जात आहेत.

मित्रांनो,

आज भारतामध्ये ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा प्रशासनामध्ये समावेश केला जात आहे, हे एका नव्या भारताची नवीन राजकीय इच्छाशक्ती दर्शविते आणि लोकशाहीच्या वितरण क्षमतेचा दाखला आहे. ही आकडेवारी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आज केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुमारे 10,000 सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. सरकारी मदत असो, शिष्यवृत्ती असो किंवा शेतकऱ्याच्या पिकाला भाव असो, सर्व काही आता थेट बँक खात्यात जमा होत आहे. मी दिल्लीतून एक रुपया पाठवतो आणि पंधरा पैसे लोकांपर्यंत पोहोचतात, मग यातील 85 पैसे घेणारा हात कोणाचा? असे आता कोणत्याही पंतप्रधानांना सांगावे लागणार नाही.

मी तुमच्यासोबत आता सामायिक करत असलेली आकडेवारी तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेल. हे आकडे लक्षात राहतील का? घाबरू नका, हा तुमच्यासाठी प्रयत्न आहे. गेल्या सात-आठ वर्षांत, भारत सरकारने डीबीटीच्या (थेट लाभ हस्तांतरण) माध्यमातून एका क्लिकवर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवले. आम्ही डीबीटीद्वारे पाठवलेली रक्कम 22 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आता तुम्ही जर्मनीत आहात, तर मी तुम्हाला सांगतो की ही रक्कम 300 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. मध्यस्थ नाही आणि कमिशन नाही. यामुळे यंत्रणेमध्ये पारदर्शकता आली आहे आणि परिणामी, ही धोरणे, हेतू आणि तंत्रज्ञान यामुळे दरी संपुष्टात येऊन विश्वासाचा पूल निर्माण करण्यात मदत झाली आहे.

मित्रांनो,

अशाप्रकारची साधने उपलब्ध झाल्यावर सामान्य नागरिक सक्षम होतो. त्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि तो स्वत:च संकल्प करायला लागतो आणि तो संकल्प कठोर परिश्रमातून पूर्ण करतो. यामुळेच देश पुढे जातो, मित्रांनो, नवा भारत केवळ सुरक्षित भविष्याचाच विचार करत नाही, तर तो जोखीम पत्करण्यास, नवनिर्मिती करण्यास आणि इन्क्युबेट करण्यास सज्ज आहे. मला आठवते की,  2014 च्या आसपास देशात फक्त 200-400 स्टार्ट-अप्स होते. आज 68,000 हून अधिक स्टार्ट-अप्स आहेत. 400 ते 68,000 पर्यंत! हे ऐकून अभिमानाने तुमचा ऊर भरून आला असेल आणि मान उंचावली असेल? इतकेच नाही तर जागतिक मापदंडानुसार डझनभर स्टार्टअप्स युनिकॉर्न बनले आहेत. हे केवळ युनिकॉर्नपर्यंतच मर्यादित नाही. असे अनेक युनिकॉर्न आहेत जे काही काळातच 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्याचे डेकाकॉर्न बनले आहेत. मला आठवते की, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मुलांबद्दल विचारायचे. ते म्हणायचे त्यांची मुले भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करत आहेत. आता मी त्यांना हाच प्रश्न विचारला तर ते म्हणतात की त्यांची मुले स्टार्ट-अप्स मध्ये व्यस्त आहेत. मित्रांनो हा काही छोटासा बदल नाही.

मित्रांनो,

मूळ मुद्दा काय आहे?  आज सरकार नवोन्मेषींना प्रोत्साहन देत आहे. त्यांच्यावर बंधन नाही. जर तुम्हाला भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन करायचे असेल, नवीन ड्रोन बनवायचे असतील किंवा अंतराळ क्षेत्रात नवीन उपग्रह किंवा प्रक्षेपक बनवायचे असतील तर सरकार पोषक वातावरण उपलब्ध करून देत आहे.एक काळ असा होता जेव्हा एखादा विशिष्ट कागद जोडण्यात अपयश आल्यास कंपनीची नोंदणी करण्यासाठी काही महिने लागायचे. नागरिकांचा सरकारवरचा विश्वास वाढला की अविश्वासाची पोकळी संपते. मित्रांनो, आता  पनीची नोंदणी करण्यासाठी 24 तास लागतात. गेल्या काही वर्षात सरकारी कार्यालयांमध्ये अनेकवेळा एकच प्रकारची कागदपत्रे मागितली जाण्याची पद्धत होती. एखाद्या कार्यालयात सहा लोक असतील तर ते स्वतंत्रपणे तीच कागदपत्र मागत असत. अनेक अनुपालन मार्गदर्शक तत्त्वे होती.

मित्रांनो,

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आम्ही 25000 पेक्षा अधिक अनुपालन रद्द केले आहेत. आता हे काम देखील मलाच करावे लागत आहे. एवढेच नाही, तर माझ्या पक्षाने 2013 साली माझे नाव पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर मी या निवडणुकांची तयारी करत होतो. एकदिवस दिल्लीच्या एका उद्योजकांनी मला एका उद्योग परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले. तिथे एक सद्गृहस्थ होते, ते त्या परिषदेत सांगत होते, की हा कायदा केला, तो कायदा केला आहे, असे अनेक कायदे ते सांगत होते. आता निवडणुका असतांना तर सगळे जण हेच सांगतात की मी हे करेन. मात्र, मित्रांनो, मी जरा वेगळ्या धाटणीचा माणूस आहे. मी तिथे भाषण द्यायला उभा राहिलो. ही 2013 सालची गोष्ट आहे. मी भाषण द्यायला उभा राहिलो आणि मी त्यांना म्हटले की, “मित्रांनो, आपण कायद्याविषयी बोलत आहात, कायदे तयार करण्याविषयी बोलत आहात. पण माझा विचार तर जरा वेगळा आहे. मला माहीत नाही, मी जर माझा विचार सांगितला तर तुम्ही मला मते द्याल की नाही,” पण तरीही, मी त्यांना सांगितले की मी तुम्हाला वचन देतो, की मी सत्तेत आल्यावर दररोज एक कायदा रद्द करेन. अनेकांना आश्चर्य वाटले की, या माणसाला सरकार म्हणजे काय, याची काही समज आहे की नाही? असेच वाटले असेल त्यांना कदाचित.मात्र, आज मित्रांनो, मी तुम्हाला माझा हिशेब देतो आहे, पहिल्या पाच वर्षात आमच्या सरकारने 1500 कालबाह्य कायदे रद्द केले आहेत. हे सगळे कशासाठी? नागरिकांवर कायद्यांचा हा भार कशासाठी?

मित्रांनो,

मेक इन इंडिया, आज आत्मनिर्भर भारतची शक्ती बनत आहे. आत्मविश्वासपूर्ण भारत आज प्रक्रियाच सोप्या करत नाही आहे तर उत्पादन संलग्नित प्रोत्साहन देखील देतो आहे. याचा मोठा परिणाम भारतातून होणाऱ्या निर्यातीवर बघायला मिळतो आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी आपण 400 बिलियन डॉलरच्या निर्यातीचा विक्रम मोडला आहे. जर आपण वस्तू आणि सेवा बघितलं तर गेल्या वर्षी भारतातून 670 बिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ 50 लाख कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. आकडा बघून टाळ्या वाजवायला हात थांबले का? भारताचे अनेक नवे जिल्हे नवनव्या देशांत नव्या बाजारपेठांत निर्यातीची व्याप्ती वाढवत आहेत आणि वेगाने निर्यात होत आहे आणि त्याची एक मजा देखील आहे. आज देशात जे तयार होत आहे ती सगळी उत्पादने, ‘झिरो डिफेक्ट झीरो इफेक्ट’ या मंत्रावर बनत आहे की उत्पादनाच्या गुणवत्तेत काहीच त्रुटी नाहीत आणि उत्पादनात पर्यावरणावर काहीच परिणाम नाही.

मित्रांनो,

21व्या शतकाच्या हा तिसऱ्या दशकात सर्वात मोठं सत्य हे आहे की आज भारत जागतिक बनतो आहे. कोरोनाच्या या काळात भारतानं 150 पेक्षा जास्त देशांना आवश्यक औषधं पाठवून अनेकांचे जीव वाचविण्यात मदत केली आहे. जेव्हा भारताला कोविड लस बनविण्यात यश आलं तेव्हा आम्ही आमच्याजवळची लस जवळपास 100 देशांना दिली.

मित्रांनो,

आजची ताजी बातमी, व्यत्ययाबद्दल दिलगीर आहोत. आज जग गव्हाच्या टंचाईचा सामना करत आहे. अन्न सुरक्षेविषयी मोठमोठे देश चिंतीत आहेत. अशा वेळी भारताचा शेतकरी जगाचं पोट भरायला पुढे येतो आहे, मित्रांनो.

मित्रांनो,

जेव्हा केव्हा मानवतेपुढे कुठलं संकट येतं तेव्हा भारत उपाय घेऊन पुढे येतो, जे लोक संकट घेऊन येतात त्यांना ते लखलाभ असो, उपाय घेऊन आम्ही येतो, जगाने केलेला जयजयकार दिसत असतो मित्रांनो. हाच मित्रांनो, हाच नवा भारत आहे. हीच नव्या भारताची ताकद आहे. आपल्यापैकी जे लोक अनेक वर्ष भारतात गेले नाहीत, वाईट वाटून घेऊ नका. मात्र त्यांना नक्की वाटत असेल, शेवटी हे झालं कसं, इतका मोठा बदल कसा काय झाला. नाही मित्रांनो, आपलं उत्तर चुकलं आहे, मोदीनं काहीच केलं नाही 130 कोटी देशवासियांनी केलं आहे.

मित्रांनो,

भारताला वैश्विक शक्ती बनवण्यात तुमचं योगदान देखील पुष्कळ असणार आहे, महत्वाचं असणार आहे. आज भारतात लोकल बद्दल जे आकर्षण निर्माण झालं आहे, हे तसंच आहे, जे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात स्वदेशी वस्तूंसाठी निर्माण झालं होतं. अनेक वर्ष आपण बघत होतो की, लोक सांगायचे ही वस्तू आम्ही अमुक देशातून विकत घेतली आहे, ही वस्तू तमुक देशातून विकत घेतली आहे. मात्र आज भारताच्या लोकांमध्ये आपल्या स्थानिक उत्पादनांविषयी अभिमानाची भावना आली आहे.  आपल्याला माहित असेल आज पासून 20 वर्ष 10 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही घरी पत्र पाठवत असाल तेव्हा लिहित असाल की मी अमुक तारखेला येतो आहे, मग घरून पत्र येत असेल की येताना या वस्तू घेऊन ये. आज व्हा तुम्ही जाता, तेव्हा घरून पत्र येतं की इथे सगळं मिळतं, काही आणू नको. मी बरोबर बोलतोय की नाही, असंच  होतं न मित्रांनो. मित्रांनो, हीच शक्ती आहे आणि म्हणून मी म्हणतो व्होकल फॉर लोकल, मात्र तुमचं लोकल इथलं नाही, मित्रांनो, ही जी शक्ती निर्माण झाली आहे ना, ही निर्माण करायला करायला प्रत्येक भारतीयाने म्हण घेतली आहे. या प्रत्येक उत्पादनात कुठल्यातरी भारतीयाच्या घामाचा गंध आहे मित्रांनो, त्या मातीचा सुगंध आहे मित्रांनो. आणि म्हणूनच जे हिंदुस्तानात बनलेलं आहे, हिंदुस्तानच्या मातीचा ज्यात सुगंध आहे, हिंदुस्तानच्या तरुणांनी घाम गाळला आहे ते आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट असायला पाहिजे मित्रांनो. तुम्ही बघा एकदा हा अनुभव घेतला ना तर या संवेदनांच्या लहरी आजूबाजूच्या परिसरात पोचायला वेळ लागणार नाही. आणि मग बघा जेव्हा जाल तुम्ही, ‘आता मी भारतात जातो आहे 10 दिवसांसाठी तर इथून लोक चिट्ठी देतील की परत येताना हिंदुस्तानातून हे घेऊन या’ . असं व्हायला हवं की नको? हे काम तुम्ही करायला हवं की नाही? 

मित्रांनो,

मी तुम्हाला खादीचे एक उत्तम उदाहरण देतो.  तुम्हा सर्वांना खादी माहीतच आहे. खादी आणि नेते यांचेही निकटचे नाते  होते. नेते आणि खादी वेगळे करताच येत नव्हते.  खादी म्हणजे नेते आणि नेते  म्हटल्यावर खादीच डोळ्यासमोर यायची. ज्या खादीसह महात्मा गांधी  संपूर्ण आयुष्य जगले,  ज्या खादीने भारतातील स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले ,  त्या खादीची  स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यप्रेमींच्या स्वप्नांप्रमाणेच स्थिती झाली, ही  देशाची जबाबदारी नव्हती का? ज्या खादीमुळे गरीब मातेचा  उदरनिर्वाह होतो आणि विधवा मातेला मुलांचे संगोपन करण्यासाठी आधार मिळतो त्या खादीला तिच्या नशिबाच्या हवाली सोडण्यात आले, आणि एक प्रकारे ती नामशेष होण्याच्या मार्गावर होती. मी मुख्यमंत्री झाल्यावर पुढाकार घेतला. तुमच्याकडे अमुक  साडी किंवा कुर्ता असल्याचा तुम्ही अभिमानाने दावा करता. आपण करतो की नाही? हो म्हणा ना, खरे बोलायला काय जाते.   मी त्यांना खादी देखील  ठेवायला सांगायचो.

मित्रांनो ,

ही  खूप छोटी गोष्ट होती.  मात्र  आज मी खादी स्वीकारल्याबद्दल देशापुढे नतमस्तक होतो. तुम्हालाही  हे जाणून आनंद होईल की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा खादीची उलाढाल यावर्षी 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. किती गरीब विधवा मातांना रोजीरोटी मिळाली असेल ! गेल्या 8 वर्षात खादीचे उत्पादन जवळपास 175 टक्क्यांनी वाढले आहे. ज्या भावनेने मी स्टार्ट अप्सबद्दल बोलतो, त्याच भावनेने मी खादीबद्दल बोलतो. मी ज्या भावनेने उपग्रहांबद्दल बोलतो, त्याच भावनेने मी मातीबद्दल देखील बोलतो.

मित्रांनो ,

आज मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की, भारतातील स्थानिक उत्पादने जागतिक स्तरावर नेण्यासाठी माझ्यासोबत या. तुम्ही इथल्या लोकांना भारतातील स्थानिक उत्पादनांची विविधता, शक्ती आणि सौंदर्याची सहज ओळख करून देऊ शकता. विचार करा, जगातील एवढा मोठा भारतीय समुदाय , जगातील प्रत्येक देशात विस्तारलेला समुदाय आणि भारतीय समुदायाचे  वैशिष्ट्य म्हणजे ते दुधात जशी साखर विरघळते त्याप्रमाणे (स्थानिकांमध्ये) मिसळतात. आणि थोड्याच वेळात, ते मूल्य वाढवते आणि दूध गोड करते. ज्याच्याकडे ही क्षमता आहे तो आपल्या प्रयत्नांतून भारतातील स्थानिक (उत्पादने) जर्मनीमध्ये सहजपणे जागतिक बनवू शकतो. करणार ना ?  तुमचा आवाज का कमी झाला ? सांगायला काय जातंय. मोदीजी कुठे पुन्हा येणार आहेत. मित्रांनो, माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही ते कराल.

मला तुम्हाला आणखी एका गोष्टीची  आठवण करून द्यायची आहे की आज योग, आयुर्वेद आणि आपल्या पारंपारिक औषधांच्या उत्पादनांमध्ये इतकी क्षमता आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही भारतातले  आहात अशी ओळख करून देताना समोरची व्यक्ती तुम्हाला योगाबद्दल विचारते की नाही ? तुम्हाला योगाबद्दल काहीही माहीत नसले तरी तुम्ही नाक पकडले तरी , तो तुम्हाला तज्ञ समजेल. भारतातील ऋषीमुनींच्या तपश्चर्येची अशी कीर्ती आहे की तुम्ही फलक लावलात, ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केलात आणि नाक कसे पकडायचे  शिकवले तरी लोक तुम्हाला डॉलरमध्ये फी द्यायला तयार आहेत की नाहीत?  हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी जे संचित ठेवले होते, आता जग ते घेऊन आले आहे. पण तुम्ही त्यात सहभागी आहात का? 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस फार दूर नाही. म्हणूनच आतापासून गट तयार करून तुम्ही सर्वांना शिकवा , नाक कसे  पकडायचे, नाक कापायचे शिकवायचे नाही. 

मित्रांनो ,

आज मला तुमच्याशी आणखी एका विषयावर चर्चा करायची आहे आणि तो म्हणजे हवामान संबंधी  कृती. भारतातील हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही लोकांच्या सामर्थ्यापासून ते तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यापर्यंत सर्व उपायांवर काम करत आहोत. गेल्या आठ वर्षांत, आम्ही भारतात एलपीजीची व्याप्ती 50 टक्क्यांनी वाढवून जवळपास 100 टक्के केली आहे. भारतातील जवळपास प्रत्येक घर आता एलईडी बल्ब वापरत आहे. उजाला योजनेंतर्गत, आम्ही देशात सुमारे 37 कोटी एलईडी दिवे वितरित केले आहेत आणि एलईडी दिवे ऊर्जा बचतीसाठी वापरले जातात. भारतातील एका छोट्याशा बदलामुळे सुमारे 48 हजार दशलक्ष किलोवॅट विजेची बचत कशी झाली हे तुम्ही जर्मनीतील लोकांना अभिमानाने सांगू शकता. यामुळे दरवर्षी सुमारे 4 कोटी  टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. या एका योजनेमुळे पर्यावरणाचे किती मोठे रक्षण झाले आहे  याची कल्पना तुम्ही करू शकता.

मित्रांनो,

अशा प्रयत्नांमुळे भारत अभूतपूर्व पातळीवर हरित नोकऱ्यांमध्ये नवीन क्षेत्र  खुले करत  आहे. मला आनंद आहे की भारत आणि जर्मनीनेही मोठ्या ऊर्जा भागीदारीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आम्ही हवामानाची जबाबदारी पुढच्या स्तरावर नेण्याचे ठरवले आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की भारतीयांनी देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 नवीन अमृत सरोवर (तलाव) बांधण्याचा संकल्प केला आहे. येत्या 500 दिवसांत देशात 50,000 नवीन जलाशय  बांधले जातील आणि जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन केले जाईल. पाणी हे जीवन आहे. पाणी असेल तर भविष्य आहे, पण पाण्यासाठी सुद्धा घाम गाळावा लागतो मित्रांनो. तुम्ही या मोहिमेत सहभागी होऊ शकता का? तुम्ही ज्या गावातून आला आहात त्या गावात तलाव बांधण्यासाठी तुम्हीही सहकार्य करा. आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान अमृत सरोवरांसाठी जगभरातल्या  भारतीयांचे योगदान असेल याचा किती आनंद मिळेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

मित्रांनो,

प्रसिद्ध जर्मन विद्वान मॅक्स मुलर, ज्यांना भारताची उत्तम समज होती, ते भारत-युरोपीय जगाच्या सामायिक भविष्याबद्दल बोलले होते . इथे तुम्ही सर्वजण दिवसातून 10 वेळा त्यांचा  उल्लेख करत असाल. 21 व्या शतकात त्याची अंमलबजावणी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. भारत आणि युरोपची मजबूत भागीदारी जगात शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करू शकते. ही भागीदारी अशीच वाढत राहो आणि तुम्ही भारताच्या मानवता आणि कल्याणासाठी त्याच उत्साहाने योगदान देत रहा . कारण आपण तर वसुधैव  कुटुंबकम वर विश्वास असणारे लोक आहोत.  मित्रांनो, तुम्ही कुठेही असाल, खूप प्रगती करा ,तुमची  भरभराट होवो, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत, या माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि 130 कोटी देशवासीयांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही आनंदी रहा, निरोगी रहा! खूप खूप धन्यवाद!

 

* * *

JPS/ST/SRT/NC/Shailesh/Chavan/Radhika/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823374) Visitor Counter : 310