पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते भुज येथील के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे राष्ट्रार्पण


"भूकंपामुळे झालेल्या विध्वंसावर मात करत, भुज आणि कच्छमधील लोक आता आपल्या मेहनतीने या प्रदेशाचे नवे भाग्य घडवत आहेत"

"उत्तम आरोग्य सुविधा केवळ रोगाच्या उपचारापुरत्या मर्यादित नसून त्या सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देतात"

“जेव्हा गरिबाला स्वस्त आणि सर्वोत्तम उपचार उपलब्ध होतात, तेव्हा त्याचा व्यवस्थेवरील विश्वास दृढ होतो. जर त्यांना उपचाराच्या खर्चाच्या चिंतेतून मुक्तता मिळाली तर ते अधिक दृढनिश्चयाने गरिबीतून बाहेर पडण्यासाठी कठोर परिश्रम करतात.

Posted On: 15 APR 2022 2:04PM by PIB Mumbai


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुजरातमधील भुज येथे के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रुग्णालय राष्ट्राला समर्पित केले. हे रुग्णालय भुजच्या श्री कच्छी लेवा पटेल समाजाने बांधले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसावर मात करत भुज आणि कच्छमधील लोक आता आपल्या मेहनतीने या प्रदेशाचे नवे भाग्य घडवत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. "आज या भागात अनेक आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. या मालिकेत भुजला आज एक आधुनिक, सुपर स्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध होत आहे", पंतप्रधान म्हणाले. हे रुग्णालय या प्रदेशातील पहिले धर्मादाय सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहे जे लाखो सैनिक, निम लष्करी कर्मचारी आणि व्यापाऱ्यांसह कच्छमधील लोकांसाठी दर्जेदार वैद्यकीय उपचारांची हमी म्हणून काम करेल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

चांगल्या आरोग्य सुविधा केवळ रोगाच्या उपचारापुरत्या मर्यादित नसून त्या सामाजिक न्यायालाही प्रोत्साहन देतात, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. जेव्हा गरिबांना स्वस्त आणि सर्वोत्तम उपचार उपलब्ध होतात, तेव्हा त्याचा व्यवस्थेवरील विश्वास दृढ होतो. जर त्यांना उपचारांच्या खर्चाच्या चिंतेतून मुक्तता मिळाली, तर ते अधिक दृढनिश्चयाने गरिबीतून बाहेर पडण्यासाठी कठोर परिश्रम करतात, पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, गेल्या काही वर्षांत आरोग्य क्षेत्रातील सर्व योजना याच विचारातून राबविल्या गेल्या आहेत.

आयुष्मान भारत योजना जनऔषधी योजनेसह गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या उपचारात दरवर्षी लाखो कोटी रुपयांची बचत करण्यात महत्त्वपूर्ण ठरली आहे. आरोग्य आणि कल्याण केंद्रे आणि आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा योजना यासारखी अभियाने सर्वांना उपचार सुलभ करण्यासाठी मदत करत आहेत.

आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान रुग्णांसाठी सुविधांचा विस्तार करत आहे. आयुष्मान आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात आधुनिक आणि महत्वपूर्ण आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत आणि तालुका स्तरापर्यंत त्याचा विस्तार केला जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय बांधले जात आहे. त्याचप्रमाणे एम्सची स्थापना करण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालये वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करत असून पुढील 10 वर्षांत देशाला विक्रमी संख्येने डॉक्टर मिळण्याची शक्यता आहे.

गुजरात बाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘अशी परिस्थिती आली आहे की मी कच्छ सोडू शकत नाही आणि कच्छ मला सोडू शकत नाही’. गुजरातमधील वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि शिक्षणाच्या अलीकडच्या विस्ताराविषयी ते बोलले. ते म्हणाले की आज 9 एम्स आहेत, पूर्वीच्या 9 महाविद्यालयांवरून आज तीन डझनहून अधिक वैद्यकीय महाविद्यालये आहेत. वैद्यकीय जागा 1100 वरून 6000 पर्यंत वाढल्या आहेत. राजकोट एम्स कार्यान्वित झाले आहे, आणि सिव्हिल हॉस्पिटल अहमदाबादमध्ये माता आणि बाल संगोपनासाठी 1500 खाटांची पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कार्डिओलॉजी आणि डायलिसिसच्या सुविधा अनेक पटींनी वाढल्या आहेत.

मोदींनी आरोग्याबाबत प्रतिबंधात्मक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्याचा पुनरुच्चार केला आणि स्वच्छता, व्यायाम आणि योगासने यावर भर देण्याची विनंती केली. त्यांनी चांगला आहार, शुद्ध पाणी आणि पोषणाचे महत्त्व सांगितले. त्यांनी कच्छ प्रदेशाला योग दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे आवाहन केले. त्यांनी पटेल समुदायाला कच्छ महोत्सवाला परदेशात प्रोत्साहन देण्याचे आणि त्यासाठी परदेशी पर्यटकांची संख्या वाढवण्यास सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांच्या आवाहनाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1817051) Visitor Counter : 216