पंतप्रधान कार्यालय

संयुक्त निवेदन  : भारत-ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषद

Posted On: 21 MAR 2022 7:00PM by PIB Mumbai

 

भारताचे माननीय नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माननीय स्कॉट मॉरिसन यांच्यात 21 मार्च 2022 रोजी भारत-ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.

2. उभय नेत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या (सीएसपी)  वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी राजकीय, आर्थिक, सुरक्षा, सायबर, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यामध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीचे स्वागत केले.  विश्वास, मतैक्य, समान हितसंबंध आणि लोकशाहीची सामायिक मूल्ये तसेच कायद्याचे राज्य या बळकट पायावर द्विपक्षीय संबंध समृद्ध झाले आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी  त्यांनी वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्याची  वचनबद्धता दर्शवली.

3. उभय नेत्यांनी भारताच्या 2023 मधील जी 20 अध्यक्षपदासंदर्भात उत्सुकता व्यक्त केली आणि जागतिक हितसंबंध आणि चिंतांच्या आर्थिक मुद्द्यांवर एकत्र काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

 

आर्थिक आणि व्यापार सहकार्य

4. ऑस्ट्रेलिया भारत व्यवसाय विनिमयाच्या माध्यमातून सीएसपी अंतर्गत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही नेते वचनबद्ध आहेत.ऑस्ट्रेलिया भारत पायाभूत सुविधा मंचाचा शुभारंभ आणि बंगळुरूमध्ये नवीन महावाणिज्य दूतावास सुरू करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे स्वारस्य  आणि मानकांसंदर्भातील  सहकार्य, भविष्यातील कौशल्ये आणि नवीन ऑस्ट्रेलिया भारत  नवोन्मेष  नेटवर्कसहद्विपक्षीय  व्यापार आणि नवोन्मेषच्या  नवीन उपक्रमांच्या घोषणांचा संदर्भ देत पंतप्रधान मॉरिसन यांनी आनंद व्यक्त केला.

5. सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार (सीईसी) वाटाघाटींमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीचे उभय नेत्यांनी स्वागत केले.अखेरच्या टप्प्यात अनेक घटकांबाबत  मोठ्या प्रमाणात एकमत  झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. व्यापार आणि गुंतवणुकीतील संबंध अधिक दृढ करण्याच्या आणि  देश विशेष धोरण (सीएसपी )अधिक सखोल करण्याच्या दृष्टीने, अंतरिम सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार हा वर्षाच्या अखेरीला  एक महत्त्वाकांक्षी आणि संपूर्ण सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करार आणण्याच्या दिशेनं कार्य करण्यासंदर्भात उभय नेत्यांनी पुन्हा वचनबद्धता दर्शवली. पर्यटन सहकार्याशी  संबंधित  भारत-ऑस्ट्रेलिया सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाचेही नेत्यांनी स्वागत केले.

6. भारत ऑस्ट्रेलिया दुहेरी कर टाळण्या संदर्भातील कराराअंतर्गत  (डीटीएए ) भारतीय कंपन्यांच्या परदेशी  उत्पन्नावर कर आकारणीच्या समस्येचे लवकर निराकरण करण्याच्या महत्त्वावर नेत्यांनी भर दिला.

7. उभय नेत्यांनी मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित व्यापार वातावरण निर्माण करण्यासाठी  त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. जागतिक व्यापार संघटनेच्या केंद्रस्थानी असलेल्या नियमांवर आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणाली कायम ठेवण्यासाठी आणि ती बळकट करण्याच्या  त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. आणि  जूनमध्ये एमसी 12 आयोजित करण्यासाठी मान्यता देत यासाठी उत्सुकता दर्शवली.पुरवठा साखळी तयार आणि  बळकट  करणे त्यात विविधता आणणे तसेच  पुरवठा साखळीतील व्यत्यय टाळण्यासाठी एकत्र काम करण्याचे महत्व त्यांनी नमूद केले.

 

हवामान, ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन सहकार्य

8. दोन्ही देशांमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्याची महत्त्वपूर्ण व्याप्ती नेत्यांनी निश्चित केली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन सहकार्याचा आधारस्तंभ - ऑस्ट्रेलिया-भारत धोरणात्मक संशोधन निधीच्या  (एआयएसआरएफ )  विस्ताराचे स्वागत केले  आणि यशस्वी 2021   भारत ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था हॅकेथॉन स्थापन करण्याची  वचनबद्धता दर्शवली.

9. हवामान बदलावर मात करण्यासाठी उत्सर्जन कमी करणे ऊर्जा सुरक्षा आणि रोजगार निर्मितीसाठी  राष्ट्रीय स्तरावर योग्य कृतींना प्रोत्साहन देणे आणि क्वाड, जी 20, युएनएफसीसीसी आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह  आंतरराष्ट्रीय सहकार्य कायम राखण्याच्या अनुषंगाने  उभय नेत्यांनी आपली बांधिलकी अधोरेखित केली.  हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शाश्वत  वापर  आणि उत्पादन, आणि संसाधन-कार्यक्षम, चक्रीय अर्थव्यवस्थांचे योगदान त्यांनी नमूद केले.या संदर्भात, दोन्ही नेत्यांनी सजग वापर , अधिक शाश्वत जीवनशैली आणि कचरा कमी करण्याचे महत्त्व नमूद केले. शाश्वत जीवनशैलीसाठी सजग वापराला  प्रोत्साहन देणाऱ्या आणि कचरा कमी करण्याच्या अनुषंगाने, जागतिक जनचळवळीच्या आवाहनाचा पंतप्रधान मोदी यांनी  पुनरुच्चार केला.

10. 15 फेब्रुवारी 2022 रोजी मंत्री सिंह  आणि मंत्री टेलर यांच्यात झालेल्या, व्यापक ऊर्जा आणि संसाधने सहकार्याला समर्थन देणाऱ्या चौथ्या भारत-ऑस्ट्रेलिया ऊर्जा संवादाचे नेत्यांनी स्वागत केले. कमी आणि शून्य उत्सर्जन तंत्रज्ञानाची किंमत कमी करून उच्च उत्सर्जन करणार्‍या पर्यायांसह स्पर्धात्मक होण्यासाठी आणि वचनबद्ध आवश्यक प्रगतीसाठी संशोधन आणि विकास तसेच नवोन्मेष अभियानासारख्या  मंचांद्वारे स्वच्छ तंत्रज्ञानावर सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानावरील इरादा पत्राचे त्यांनी स्वागत केले.आंतराष्ट्रीय ऊर्जा संघटनेच्या विस्तारलेल्या  उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी  आणि भारतासाठी आंतराष्ट्रीय ऊर्जा संघटनेच्या  सदस्यत्वाच्या वाटचालीच्या प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संघटनेच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमण  कार्यक्रमासाठी  ऑस्ट्रेलियाच्या  2 दशलक्ष डॉलर्स निधीच्या योगदानासह 2022 आंतरराष्ट्रीय ऊर्जा  संघटना ( आय ई ए ) मंत्रिस्तरीय बैठकीपूर्वी होणाऱ्या आगामी  बहुपक्षीय ऊर्जा सहकार्याचेही उभय नेत्यांनी स्वागत केले. जुलै 2022 मध्ये होणार्‍या हिंद -प्रशांत क्षेत्रामधील  स्वच्छ ऊर्जा पुरवठा साखळीवरील सिडनी ऊर्जा मंचामध्ये  भारताच्या सहभागाची उभय नेत्यांनी अपेक्षा केली.

11. जागतिक कमी कार्बन उत्सर्जनासाठी  स्वच्छ तंत्रज्ञानाचा जलद विकास आणि महत्वाच्या  खनिज क्षेत्रामध्ये समान प्रवेश आवश्यक आहे, असे उभय नेत्यांनी नमूद केले. सुरक्षित, लवचिक आणि शाश्वत महत्वाच्या खनिजांची  पुरवठा साखळी तयार करण्याच्या अनुषंगाने  सहकार्यासाठी उभय नेत्यांनी  त्यांच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.संशोधन आणि वैज्ञानिक संस्थांमधील तांत्रिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या गोलमेज बैठकांसह भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाने अंमलबजावणी योजना पुढे नेण्यासाठी  केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.भारताच्या  खानिज बिदेश लिमिटेड (काबिल) आणि ऑस्ट्रेलियाच्या  क्रिटिकल मिनरल्स फॅसिलिटेशन ऑफिस  यांच्यात महत्वाच्या  खनिज प्रकल्पांवर संयुक्त सहकार्यासाठी झालेल्या सामंजस्य करारावर  स्वाक्षरी झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

12. 12 फेब्रुवारी 2022 रोजी मंत्री पायने आणि मंत्री जयशंकर यांच्यात झालेल्या उद्घाटनपर  भारत-ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्र्यांच्या सायबर आराखडा  संवादाचे नेत्यांनी स्वागत केले. सायबर प्रशासन , सायबर सुरक्षा, क्षमता बांधणी , सायबर गुन्हे, डिजिटल अर्थव्यवस्था  तसेच महत्वाच्या  आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील  सहकार्याचे त्यांनी स्वागत केले.आपल्या  सामायिक लोकशाही मूल्यांशी आणि मानवी हक्कांच्या सन्मानाशी  सुसंगत तंत्रज्ञानाची रचना करून ते विकसित करत प्रशासित करून त्याचा वापर सातत्याने व्हायला हवा यावर त्यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करणार्‍या  खुल्या, सुरक्षित, मुक्त, प्रवेशयोग्य, स्थिर, शांततापूर्ण आणि इंटरऑपरेबल सायबरस्पेस आणि  तंत्रज्ञानाबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य  बिघडवण्यासाठी सायबरस्पेस आणि सायबर-आधारित  तंत्रज्ञान वापरण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी निषेध केला. सायबर स्पेससाठी आंतरराष्ट्रीय मानके, मानदंड आणि आराखडा  विकसित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय मंचांवर परस्पर सहकार्य बळकट करण्यासाठी  सहकार्याने काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी वचनबद्धता दर्शवली.

14. भारताच्या गगनयान अंतराळ कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचा मिळणारा  पाठिंबा यासह भारत आणि ऑस्ट्रेलियाचे  अंतराळ क्षेत्रातील  सहभागाचे महत्त्व उभय  नेत्यांनी अधोरेखित केले. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे निर्माण होणाऱ्या  द्विपक्षीय अंतराळ सहकार्याच्या विस्ताराला दोन्ही  नेत्यांनी प्रोत्साहन दिले.ऑस्ट्रेलियन अंतराळ संस्थेच्या  आंतरराष्ट्रीय अंतराळ गुंतवणूक उपक्रमाअंतर्गत  समर्पित भारतीय शाखेची घोषणा करताना  पंतप्रधान मॉरिसन यांनी आनंद व्यक्त केला.

 

नागरिकांचा परस्पर संबंध

15. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील   नागरिकांचा परस्पर संबंध दृढ असल्याचे उभय  नेत्यांनी मान्य केले.नवीन मैत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम, मैत्री अनुदान आणि फेलोशिप कार्यक्रम आणि ऑस्ट्रेलिया भारत मैत्री सांस्कृतिक भागीदारी व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया भारत संबंध केंद्राच्या स्थापनेची घोषणा मॉरीसन यांनी केली. स्थलांतर आणि वाहतुकीसंदर्भातील  इरादा पत्राचे स्वागत करत   विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी वाहतूक वाढवण्याला समर्थन  देणाऱ्या स्थलांतर आणि वाहतूक  भागीदारी करार लवकर पूर्ण करण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. ऑस्ट्रेलिया सरकारने 29 कलाकृती भारताला परत केल्याच्या घटनेचे पंतप्रधान मोदी यांनी  स्वागत केलं.प्रसारभारती, भारत आणि एसबीएस  ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रसारणामधील  सहकार्य आणि सहयोगाबाबतच्या सामंजस्य कराराचेही दोन्ही  नेत्यांनी स्वागत केले.

16. लिंगभाव समानतेसाठी  दोन्ही देशांचे कार्य तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शाखांमधील  .लिंगभाव विषयक तफावत दूर करून महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी एकत्र काम करणे सुरू ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

17. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील शिक्षण आणि कौशल्य संबंधांचा विस्तार आणि ते अनुकूल करण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक पात्रतेच्या मान्यतेसाठी दोन्ही देशांमधील भिन्न प्रणालींना मान्यता देण्याच्या उद्देशाने,शैक्षणिक पात्रता मान्यता  या संदर्भात कृतीदल  स्थापन करण्याच्या व्यवस्थेचे उभय  नेत्यांनी स्वागत केले.हे कृतीदल  त्याच्या स्थापनेच्या सहा महिन्यांच्या आत, उच्च शिक्षण प्रवेशासाठी आणि रोजगाराच्या संधींना समर्थन देण्यासाठी पात्रता (विविध वितरण पद्धतींद्वारे मिळवलेल्या लोकांसह) ओळखण्यासाठीची  व्यवस्था सुधारण्यासाठी एक सहकारी यंत्रणा निर्माण करेल.

18. लसीकरण प्रमाणपत्र उपायांच्या जागतिक कार्यपद्धतीच्या  महत्त्वासंदर्भात नेत्यांनी सहमती दर्शवली. पंतप्रधान मॉरिसन यांनी भारताच्या लस मैत्री उपक्रमाचे आणि जागतिक लसीकरणाच्या प्रयत्नांमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे स्वागत केले.

19. क्वाड आणि कोवॅक्सच्या माध्यमातून  बळकट सहकार्य मान्य करत, जागतिक स्तरावर उच्च दर्जाच्या, सुरक्षित, प्रभावी आणि परवडणाऱ्या कोविड-19 प्रतिबंधक लस, उपचार आणि महत्वाच्या  वैद्यकीय पुरवठाच्या योग्य, वेळेवर आणि न्याय्य प्रवेशाला प्रोत्साहन देण्याच्या आपापल्या संकल्पाचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.त्यांनी हिंद - प्रशांत क्षेत्रातील  आणि जागतिक भागीदारांना उच्च-दर्जाच्या लसींचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही देशात च्या सुरु असलेल्या सहकार्यावर भर दिला.

20. सुरक्षा आणि संरक्षण जोखिमा आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्यावर उभय  नेत्यांनी सहमती दर्शवली. जनरल रावत भारत-ऑस्ट्रेलिया यंग डिफेन्स ऑफिसर एक्सचेंज कार्यक्रमाच्या  स्थापनेचे त्यांनी  स्वागत केले. उभय देशातील  सागरी माहितीची वाढलेली देवाणघेवाण आणि सागरी क्षेत्रातील  जागरूकतेचे त्यांनी   स्वागत केले.हिंद - प्रशांत क्षेत्रामध्ये अधिक  समन्वय साधण्यासाठी संरक्षण माहिती सामायिकरण व्यवस्था तयार करण्याच्या  वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.   या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या हिंद प्रशांत प्रयत्न सरावात भारताच्या सहभागासाठी त्यांनी उत्सुकता दर्शवली.

21. दृढ  कार्यान्वयन  संरक्षण सहकार्य सुलभ करण्यासाठी परस्पर प्रवेश व्यवस्थेचे महत्त्व तसेच मुक्त आणि खुल्या महत्त्वपूर्ण प्रादेशिक सागरी मार्गिकेसाठी  त्याचे योगदान.दोन्ही  नेत्यांनी अधोरेखित केले . परस्पर हिताच्या क्षेत्रात संरक्षण सहकार्यासाठी आगामी  संधींचा पाठपुरावा करण्याबाबत उभय नेत्यांनी वचनबद्धता दर्शवली. .

22. दहशतवाद हा आपल्या प्रदेशातील शांतता आणि स्थैर्याला धोका आहे हे ओळखून,दोन्ही नेत्यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आणि दहशतवादाच्या प्रसाराचा तसेच सीमापार दहशतवाद पसरवण्यासाठी  दहशतवाद्यांचा  वापर करण्याचा  तीव्र निषेध केला. सर्व देशांनी त्यांच्या नियंत्रणाखालील कोणताही प्रदेश दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जाणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आणि  अशा हल्ल्यातील दोषींवर  त्वरीत खटला चालवून न्याय देण्यासाठी तात्काळ, शाश्वत, सत्यापित आणि अपरिवर्तनीय कारवाई करण्यासाठी तातडीच्या गरजेचा नेत्यांनी पुनरुच्चार केला.  माहितीची देवाणघेवाण सुरू ठेवण्यासाठी आणि दहशतवादविरोधी प्रयत्नांसंदर्भात द्विपक्षीय आणि क्वाड देशांची  सल्लामसलत आणि बहुपक्षीय मंचावर समन्वय साधण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली.

 

प्रादेशिक आणि बहुपक्षीय सहकार्य

23. युक्रेनमध्ये सुरू असलेला  संघर्ष आणि मानवतावादी संकटाबद्दल उभय नेत्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. हा   संघर्ष  तात्काळ थांबवण्याच्या गरजेचा  त्यांनी पुनरुच्चार केला.सार्वभौमत्व आणि देशांच्या  प्रादेशिक अखंडतेसाठी. संयुक्त राष्ट्र सनद ,आंतरराष्ट्रीय कायदा आणि सन्मान यासाठी समकालीन जागतिक व्यवस्था तयार करण्यात आली आहे यावर त्यांनी भर दिला. हिंद - प्रशांत क्षेत्रासाठी या विषयावर आणि व्यापक संबंधांच्या अनुषंगाने एकत्र काम करण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली.

24. केंद्रस्थानी आसियान अशा बळकट  प्रादेशिक रचनेद्वारे  समर्थित,मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित हिंद प्रशांत क्षेत्रासाठी नेत्यांनी सामायिक वचनबद्धता दर्शवली आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर  करणाऱ्या सर्वसमावेशक आणि समृद्ध प्रदेशासाठी आणि   लष्करी, आर्थिक आणि राजकीय जुलुमापासून  देश मुक्त असतील यासंदर्भात आपल्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी  पुनरुच्चार केला.

25. प्रादेशिक स्थैर्य आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी क्वाडच्या सकारात्मक आणि महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला पुढे घेऊन जाण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका  यांच्यातील सहकार्याबाबत नेत्यांनी आपली वचनबद्धता अधोरेखित केली. मार्च 2022 मध्ये क्वाड नेत्यांमध्ये झालेल्या  आभासी बैठकीचे त्यांनी स्वागत केले आणि येत्या   काही महिन्यात या नेत्यांसोबत वैयक्तिक बैठक घेण्यासाठी उत्सुकता दर्शवली. हिंद - प्रशांत  महासागर उपक्रमाबाबत  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दृढ  सहकार्याचेही त्यांनी स्वागत केले.

26. पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलिया-यूके-यूएस (AUKUS) भागीदारीबद्दल पंतप्रधान मॉरिसन यांनी दिलेल्या माहितीची प्रशंसा केली. अण्वस्त्रे विकसित न करण्याच्या   आणि त्याचा  प्रसार न करण्याच्या सर्वोच्च मानकांचे पालन करण्याची ऑस्ट्रेलियाची वचनबद्धता याबद्दल नेत्यांनी सहमती दर्शवली.

27. इंडियन ओशन रिम असोसिएशनला पाठबळासह हिंद महासागर क्षेत्रात आणि इतर हिंद महासागर क्षेत्रातील  देशांसोबत सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी उभय नेत्यांनी वचनबद्धता सुनिश्चित केली.  हिंद महासागर क्षेत्रातील  सागरी आणि आपत्ती सज्जता , व्यापार, गुंतवणूक आणि संपर्क सुविधांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वाढलेल्या  सहभागाचे पंतप्रधान मोदी यांनी  स्वागत केले.

28. प्रशांत क्षेत्रातील लवचिकता आणि सुधारणेला समर्थन देण्यासाठी उभय देशांमध्ये सुरु असलेल्या सहकार्यावर नेत्यांनी चर्चा केली.  हुंगा टोंगा-हुंगाहापाई ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या आणि त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर टोंगाला आणि कोविड-19 उद्रेकाला प्रतिसाद म्हणून किरिबाटीला भारताने केलेल्या मदतीचे पंतप्रधान मॉरिसन यांनी स्वागत केले. या प्रशांत क्षेत्रातील   भागीदारांना भारतीय एचएडीआर वितरित करण्यातील ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेसंदर्भात सहमती व्यक्त केली.

29. दळणवळण आणि हवाई क्षेत्राच्या स्वातंत्र्यासह आंतरराष्ट्रीय कायद्याशी, विशेषत: यूएन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS) यांच्याशी सुसंगत, हिंद - प्रशांत  प्रदेशातील सर्व समुद्र आणि महासागरांमध्ये अधिकार आणि स्वातंत्र्य उपयोगाचे  महत्त्व उभय नेत्यांनी अधोरेखित केले.विवादांचे निराकरण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शांततापूर्ण मार्गाने केले पाहिजे, धमकी किंवा शक्तीचा वापर न करता किंवा एकतर्फी स्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न न करता तसेच  शांतता आणि स्थैर्यावर  परिणाम करणारे विवाद गुंतागुंतीचे होतील  किंवा वाढवू शकतील अशा उपक्रमांच्या अंमलबजावणीत  देशांनी आत्मसंयम पाळला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. दक्षिण चीन समुद्रासह, सागरी नियम-आधारित व्यवस्थेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी. विशेषतः यूएन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS) मध्ये प्रतिबिंबित केल्याप्रमाणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याच्या महत्त्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय कायद्यासह, कोणत्याही देशाच्या कायदेशीर हक्क आणि हितसंबंधांबद्दल  पूर्वग्रह न ठेवता, आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत वाटाघाटींमध्ये सहभागी नसलेल्यांचा समावेश असलेल्या  आणि विद्यमान समावेशक प्रादेशिक रचनेला  समर्थन देणारी , दक्षिण चीन समुद्रातील कोणतीही आचारसंहिता प्रभावी, ठोस आणि पूर्णपणे सुसंगत असावी असे आवाहन त्यांनी केले.

30.  म्यानमारमधील नागरी लोकसंख्येवरील हिंसाचार त्वरित थांबवावा, परदेशी लोकांसह अनियंत्रितपणे ताब्यात घेतलेल्या सर्वांची सुटका करावी आणि विना अडथळा मानवतावादी साहाय्य हे आवाहन उभय नेत्यांनी केले. उभय  नेत्यांनी आसियानच्या पंचसूत्री सहमतीची अंमलबजावणी करण्याचे म्यानमारला आवाहन केले आणि  हिंसाचाराच्या समाप्तीला पाठिंबा देण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला  प्रोत्साहित केले.

31. बिघडत चाललेली मानवतावादी परिस्थिती पाहता, अफगाण जनतेला मानवतावादी मदत देण्याच्या त्यांच्या दृढ वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला, आणि यूएनएससीआर  2593 नुसार, दहशतवाद विरोधी  वचनबद्धता  आणि अफगाणिस्तानमध्ये सत्ता पदावर असलेल्यांनी  मानवी हक्कांचे पालन करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.   महिला आणि मुलींच्या हक्कांचे संरक्षण आणि सार्वजनिक जीवनात त्यांचा पूर्ण सहभाग या त्यांच्या आवाहनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. अफगाणिस्तानात दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक सरकार आवश्यक आहे यावर त्यांनी सहमती दर्शवली.

32. या बैठकीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उत्साहपूर्ण, घनिष्ट बंध अधिक दृढ झाले आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी नवीन उंचीवर नेण्यासाठी उभय नेत्यांनी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1809670) Visitor Counter : 175