पंतप्रधान कार्यालय

ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या लोहमार्गचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण


मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला

छत्रपती शिवाजी महाराजांची उद्या जयंती असून, यानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून पंतप्रधानांनी भाषणाला केली सुरुवात

“हे नवीन लोहमार्ग सतत धावणाऱ्या मुंबई महानगरातील नागरिकांचे जीवन सुलभ करतील ”

"आत्मनिर्भर भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या अनुषंगाने मुंबईची क्षमता अनेकपटींनी वाढवण्याचा प्रयत्न आहे"

मुंबईसाठी 21 व्या शतकातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आमचा विशेष भर आहे "

“भारतीय रेल्वेला अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला कोरोना महामारी देखील धक्का लावू शकली नाही”

"भूतकाळात गरीब आणि मध्यमवर्गाच्या वापरासाठीच्या संसाधनांमध्ये झालेल्या अपुऱ्या गुंतवणुकीमुळे देशातील सार्वजनिक वाहतुकीकडे पुरेसे लक्ष दिले गेले
नाही ."

सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अतिरिक्त लोहमार्गांमुळे उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीवर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीमुळे होणारा परिणाम लक्षणीयरीत्या दूर होईल

Posted On: 18 FEB 2022 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  दूरदृश्‍य प्रणालीद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त लोहमार्ग राष्ट्राला समर्पित केले. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन  गाड्यांनाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री उपस्थित होते.

उद्या  छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून यानिमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख भारताचा अभिमान , अस्मिता आणि भारतीय संस्कृतीचे रक्षक असा केला.

ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या लोहमार्गाबद्दल  मुंबईकरांचे अभिनंदन करताना पंतप्रधान  म्हणाले की, या मार्गांमुळे सदैव धावणाऱ्या मुंबई महानगरातील नागरिकांचे  जीवन सुखकर  होईल. पंतप्रधानांनी या दोन मार्गांमुळे होणारे  चार थेट लाभ  अधोरेखित केले. एक, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका; दुसरे , इतर राज्यांतून येणाऱ्या गाड्यांना लोकल गाडया पुढे जाईपर्यंत  थांबावे लागणार नाही; तिसरा लाभ म्हणजे  मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते कुर्ला दरम्यान  विना व्यत्यय चालवता येतील आणि चौथा लाभ म्हणजे कळवा  मुंब्रा प्रवाशांना दर रविवारी मेगाब्लॉकमुळे त्रास होणार नाही. ते म्हणाले की, मध्य रेल्वे मार्गावरील हे मार्ग आणि 36 नवीन लोकल गाड्या  ज्या बहुतांश वातानुकूलित ( एसी ) असून  लोकल गाड्यांच्या  
सुविधेचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.

स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबई महानगराने दिलेल्या योगदानाचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या अनुषन्गाने  मुंबईची क्षमता अनेक पटींनी वाढवण्याचा आता प्रयत्न आहे. “यासाठी  मुंबईसाठी 21 व्या शतकातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आमचा भर आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रणाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होत असून  मुंबईतील रेल्वे संपर्क यंत्रणा चांगली करण्‍यासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. मुंबई उपनगरात अतिरिक्त 400 किमी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि 19 स्थानकांचे सीबीटीसी सिग्नल प्रणालीसारख्या सुविधांसह आधुनिकीकरण करण्याची योजना असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, “अहमदाबाद-मुंबई अतिजलद  रेल्वे ही देशाची गरज आहे आणि यामुळे  मुंबईची स्वप्नांचे शहर ही ओळख अधिक दृढ  होईल. हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य आहे,” असेही ते म्हणाले.

भारतीय रेल्वेला अधिक सुरक्षित, सुखकर आणि आधुनिक बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला कोरोना महामारी ही धक्का देऊ शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले.गेल्या दोन वर्षांत रेल्वेने मालवाहतुकीचे  नवे विक्रम केले,असे पंतप्रधानांनी सांगितले. या कालावधीत 8 हजार किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आणि 4.5 हजार किमी मार्गाचे दुहेरीकरण करण्यात आले.कोरोनाच्या काळात शेतकरी किसान रेलच्या माध्यमातून देशभरातील बाजारपेठांशी जोडले गेले ,  असे ते म्हणाले.

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पूर्ततेबाबत नव्या भारताच्या बदललेल्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी, पूर्वीचे प्रकल्प नियोजनापासून ते अंमलबजावणीच्या टप्प्यापर्यंत समन्वयाच्या अभावामुळे रेंगाळले याकडे लक्ष वेधले. यामुळे 21व्या शतकातील पायाभूत सुविधांची निर्मिती शक्य झाली नाही, त्यामुळेच पीएम गतिशक्ती योजनेची संकल्पना पुढे आल्याचे ते म्हणाले. ही योजना केंद्र सरकारचे प्रत्येक विभाग, राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी क्षेत्राला एका व्यासपीठावर आणेल. हे व्यासपीठ  सर्व संबंधितांना योग्य नियोजन आणि समन्वयाच्या अनुषंगाने  आगाऊ  संबंधित माहिती प्रदान करेल.

गरीब आणि मध्यमवर्गीयांकडून वापरल्या जाणार्‍या संसाधनांमध्ये पुरेशी गुंतवणूक रोखणार्‍या विचार प्रक्रियेबद्दल मोदी यांनी दुःख व्यक्त केले. यामुळे देशातील सार्वजनिक वाहतुकीचा विकास मंदावला असे सांगत  "आता भारत हा विचार मागे टाकून पुढे जात आहे", असे ते म्हणाले.

भारतीय रेल्वेला नवा चेहरा देणार्‍या उपाययोजनांची यादी पंतप्रधानांनी  सांगितली.  गांधीनगर आणि भोपाळ सारखी  अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज  स्थानके भारतीय रेल्वेची ओळख बनत आहेत आणि 6,000 हून अधिक रेल्वे स्थानके वायफाय सुविधेने जोडली गेली आहेत,असे त्यांनी सांगितले.वंदे भारत गाड्या देशातील रेल्वेला नवीन गती आणि आधुनिक सुविधा प्रदान करत  आहेत.  येत्या काही वर्षांत देशाच्या सेवेसाठी 400 नवीन वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील, असे पंतप्रधान म्हणाले.

कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे.देशाच्या उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण येथे विलीन होते आणि सीएसएमटी  (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या दिशेने जाते.कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार रेल्वे मार्गांपैकी   दोन मार्ग धीम्या उपनगरी गाड्यांसाठी आणि दोन मार्गिका  जलद उपनगरी गाड्यांसाठी , मेल एक्सप्रेस आणि  मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची मार्गिका वेगळ्या करण्यासाठी दोन अतिरिक्त रेल्वे मार्गांची   योजना आखण्यात आली होती.

ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका  सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आल्या आहेत आणि या मार्गांवर 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, 3 मोठे पूल, 21 छोटे पूल आहेत. या मार्गांमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीसह लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या  वाहतुकीमधील  अडथळा दूर होईल. या मार्गांमुळे शहरात 36 नवीन उपनगरीय सेवा सुरु केल्या जातील.

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

JPS/S.Bedekar/S.Chavan/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1799393) Visitor Counter : 185