पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्यात पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 28 JAN 2022 3:22PM by PIB Mumbai

कार्यक्रमाला उपस्थित देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह,उपस्थित मान्यवर,अधिकारीवर्ग,प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेले कलाकार, एनएसएस- एनसीसीचे मित्रहो,

देश सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. जेव्हा एक युवा देश असा ऐतिहासिक प्रसंग अनुभवतो तेव्हा त्या उत्सवात एक आगळेच चैतन्य दिसून येते. हाच उत्साह मी आत्ता करीअप्पा मैदानावर पाहत होतो. हे भारताच्या या युवा शक्तीचे दर्शन आहे जी युवा शक्ती आपल्या संकल्पांची पूर्तता करेल, 2047 मध्ये देश स्वातंत्र्याचा शतकमहोत्सव साजरा करत असताना, 2047 चा भव्य भारत घडवेल.

आपल्याप्रमाणेच मी सुद्धा पूर्वी राष्ट्रीय छात्र सेनेचा सक्रीय छात्र होतो याचा मला अभिमान आहे.मात्र आपल्याला जे भाग्य लाभले आहे ते मला प्राप्त झाले नव्हते . एनसीसीमध्ये मला जे प्रशिक्षण मिळाले, जे शिकायला मिळाले,त्या प्रशिक्षणातून, त्या संस्कारातून आज देशाप्रती आपले उत्तरदायित्व निभावताना मला अपार सामर्थ्य प्राप्त होते.काही काळापूर्वी मला एनसीसी माजी विद्यार्थी हे कार्डही मिळाले होते. आज देशाचे पंतप्रधान या नात्याबरोबरच मी आपला सहकारी या नात्यानेही आपल्याशी जोडलेला आहे. एनसीसीचे सर्व पदाधिकारी,सर्व छात्रांना या प्रसंगी मी सलाम करतो.आज ज्या छात्रांना पुरस्कार मिळाला आहे त्या सर्वाना माझ्या हार्दिक शुभेच्छा. थोर स्वातंत्र्य सेनानी पंजाब केसरी लाला लजपत राय यांची आज जयंती आहे. फील्ड मार्शल करिअप्पा यांचीही आज जयंती आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या देशाच्या या वीर सुपुत्रांना मी आदरपूर्वक प्रणाम करतो.

मित्रहो,

आज देश नव्या संकल्पांसह आगेकूच करत असतानाच देशात एनसीसी मजबूत करण्यासाठीही आमचे प्रयत्न जारी आहेत.यासाठी देशात एका उच्च स्तरीय आढावा समितीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात देशाच्या सीमावर्ती भागात 1 लाख नवे छात्र घडवण्यात आले आहेत. एनसीसी छात्रांच्या प्रशिक्षणात सिमुलेशन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगही वाढत आहे याचा मला आनंद आहे.आपल्या शिक्षण प्रणालीशी एनसीसीची सांगड घालण्यासाठीही देशात पाऊले उचलली जात आहेत. संपूर्णपणे स्वतःचे वित्तीय पाठबळ असलेल्या योजनेअंतर्गत देशातल्या महाविद्यालयात 1 लाख छात्रांचा विस्तार करण्यात आला आहे. 1 लाख छात्र घेऊन असाच प्रयत्न शाळांमध्येही सुरु करण्यात आला आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत देशातल्या 90 विद्यापीठात एनसीसी पर्यायी विषय म्हणून सुरु करण्यात आला आहे. आज इथे मोठ्या संख्येने कन्या छात्र मला दिसत आहेत. देशाच्या बदलत्या दृष्टीकोनाचे हे प्रतिक आहे. देशाला आज आपल्या विशेष योगदानाची आवश्यकता आहे. देशात आपल्यासाठी अमाप संधी आहेत. आता देशाच्या कन्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. सैन्यात महिलांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येत आहेत.हवाई दलात देशाच्या कन्या लढाऊ विमाने चालवत आहेत. अशा वेळी एनसीसी मध्ये जास्तीत जास्त मुली सहभागी व्हाव्यात यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत. ज्या मुलींनी स्वतः एनसीसी मध्ये सहभागी झाल्या आहेत त्या यासाठी प्रेरणादायी ठरू शकतात.

मित्रहो,

प्रसिद्ध कवी माखनलाल चतुर्वेदी यांची कविता आहे, या कवितेत त्यांनी म्हटले आहे-     

भूखंड बिछा, आकाश ओढ़, नयनोदक ले, मोदक प्रहार,

ब्रह्मांड हथेली पर उछाल, अपने जीवन-धन को निहार।

येत्या 25 वर्षांचा अमृत काल अपार देशभक्तीचा काळ आहे. आज जग भारताकडे इतक्या अपेक्षेने पाहत आहे, इतक्या विश्वासाने पाहत आहे तर भारताच्या प्रयत्नात कुठेही उणे राहू नये हे आज महत्वाचे आहे.

आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारताने जे संकल्प घेतले आहेत, जे अभियान सुरु केले आहे, त्यांना अखंड बळ मिळत राहावे याची मोठी जबाबदारी आपल्या देशाच्या कोट्यवधी युवकांवर आहे. आज या वेळी एनसीसी, एनएसएस मध्ये जे युवक- युवती आहेत त्यापैकी बहुतांश जणांचा या शतकातच जन्म झाला आहे. आपल्याला, 2047 पर्यंत कीर्ती,सन्मान आणि प्रतिष्ठेने भारताला न्यायचे आहे. म्हणूनच आपले प्रयत्न, आपले संकल्प, त्या संकल्पांची पूर्तता, भारताच्या संकल्पांची पूर्तता ठरेल,भारताचे यश ठरेल.राष्ट्रभक्तीपेक्षा मोठी भक्ती कोणतीच नसते,राष्ट्रहितापेक्षा मोठे हित कोणतेच नाही. देश सर्वोच्च स्थानी ही भावना घेऊन आपण जे कार्य कराल ते देशाच्या विकासात सहाय्य करेल. आज आपल्या युवकांनी भारताला स्टार्ट अपच्या जगतात सर्वोच्च तीन मध्ये स्थान प्राप्त करून दिले आहे. कोरोना संकटाच्या या काळात जितके युनि कॉर्न निर्माण झाले आहेत ते भारताच्या युवाशक्तीचा आविष्कार आहेत. आपण कल्पना करू शकता, 50 पेक्षा जास्त युनीकॉर्न कोरोना काळात अस्तित्वात आले आहेत. आपण हे जाणताच की की एका -एका स्टार्ट अपचे भांडवल साडे सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही क्षमता, हे सामर्थ्य खूप मोठा विश्वास निर्माण करते. यामध्ये सर्वात महत्वाची बाब कोणती आहे हे आपल्याला माहित आहे का ? हे हजारो स्टार्ट अप्स देशाची कोणती ना कोणती आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. एखादा स्टार्ट अप कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करत आहे तर कोणी पुरवठा साखळी सुधारण्यासाठी नवे काम करत आहे. कोणी शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी नवीन काही करत आहे. यांच्या मध्ये देशासाठी काही करण्याची जाज्वल्य भावना आहे.

मित्रहो,

राष्ट सर्वप्रथम हा विचार घेऊन ज्या देशाचा युवा वर्ग वाटचाल करतो तेव्हा त्याला जगातली कोणतीच ताकद रोखु शकत नाही. आज क्रीडा क्षेत्रातली भारताची यशस्वी कामगिरी म्हणजे याचेच एक मोठे उदाहरण आहे. खेळाडूची प्रतिभा, त्याचा संकल्प,यांचे तर महत्व आहेच, खेळाडूच्या परिश्रमालाही तितकेच महत्व आहे, मात्र आता त्याच्या यश- अपयशात 130 कोटी देशवासीय सहभागी होतात. भारताचा युवक कोणत्याही मैदानात कोणाशीही लढत देत असेल तेव्हा संपूर्ण देश एकजुटीने त्याच्या पाठीशी असतो. खेळाडूंमध्येही आपण केवळ पुरस्कारासाठी नव्हे तर आपल्या देशासाठी खेळत आहोत ही भावना प्रबळ आहे. याच भावनेने प्रत्येक क्षेत्रात भारताच्या युवकाला, देशाच्या भावी पिढीला आगेकूच करायची आहे.

मित्रांनो,

कोरोनाच्या या काळाने, संपूर्ण जगाला भारतीयांची शिस्त आणि भारतीय समाजाच्या शक्तीचा परिचय करून दिला. ज्यावेळी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता, त्यावेळी संपूर्ण देश कोरोनाच्याविरोधात लढण्यासाठी एकजूट झाला होता; हे पाहून सगळ्या विश्वाला अगदी नवल वाटले होते. काही लोक आपल्या समाजाला दूषणे देतात मात्र याच समाजाने दाखवून दिले की, ज्यावेळी असे काही अघटीत घडते आणि देशासमोर संकट निर्माण होते, त्यावेळी देशापेक्षा काहीही मोठे असत नाही. ज्यावेळी योग्य दिशा मिळते, योग्य उदाहरण समोर येते, त्यावेळी आपला देश कितीतरी आणि खूप काही करून दाखवतो, त्याचेच हे उदाहरण आहे.

 

तुम्ही एनसीसी आणि एनएसएसच्या युवा मंडळींनीही कोरोना संकटकाळामध्ये आपल्या सेवाभावनेने सर्वांची मने जिंकली आहेत. आता तुमच्यावर आणखी जबाबदारी आली आहे. तुम्ही जे काही एनसीसीमध्ये शिकले आहात, ते फक्त गणवेश घातल्यानंतरच कामी येईल, असे कधीच नसते. तर हे शिक्षण तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये कामी येणार आहे. त्या शिक्षणाप्रमाणेच तुम्ही बनले पाहिजे, वेळोवेळी तशा पद्धतीने वागले पाहिजे, तुमच्यामध्ये विकसित झालेले गुण वेळोवेळी प्रकट झाले पाहिजेत. एक राष्ट्रीय सेनेचा छात्र म्हणून आपण जे काही शिकलो आहोत, त्याचा समाजाला कसा लाभ मिळू शकणार आहे, याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये वास्तव्य करीत असाल तर , तुम्ही काही गोष्टींविषयी जरूर माहिती घ्या. जसे की, त्या गावामध्ये कोणी विद्यार्थी शाळा सोडून देत असेल तर, तुम्ही त्याला जाऊन भेटा, त्याला जर शाळेला जाण्यासाठी काही समस्या येत असेल तर ती जाणून घ्या. त्याचे शिक्षण पुन्हा कसे सुरू होऊ शकेल, यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. यामुळेच तर एनसीसीची भावना तुम्ही पुढे घेवून जाऊ शकणार आहात.

तुम्ही स्वच्छता अभियानाला प्रोत्साहन देण्याचे काम करावे. आपले गाव - गल्ली, आपले शहर- विभाग यामध्ये वेगवेगळे समूह बनविण्याचे काम तुम्ही करू शकता. कारण तुम्ही नेतृत्वगुण तर इथे शिकले आहातच. आता त्या गुणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी समाजामध्ये करायची आहेत. ज्याप्रमाणे सागरी किना-यांच्या स्वच्छतेसाठी ‘पुनीत सागर अभियान’ चालविण्यात आले होते, आणि त्याचे खूप कौतुकही झाले होते. तेच काम आता एनसीसीचा कार्यकाळ संपल्यानंतरही सुरू ठेवण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आजकाल, देशामध्ये ‘कॅच द रेन’ या संकल्पनेवर एक जनआंदोलन सुरू झाले आहे. पावसाचे पाणी आपण कशा पद्धतीने वाचवू शकतो, आपले जे तलाव आहेत, तळी आहेत, त्यांना कशा प्रकारे स्वच्छ ठेवता येवू शकेल, या दिशेनेही तुम्ही लोकांमध्ये जागृती घडवून आणू शकता.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महात्मा गांधीजींनी देशातल्या सामान्य माणसांना त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणे, वेगवेगळी कामे सोपवून जोडले होते. यामुळे लोकांची दैनंदिन रोजगाराची गरजही पूर्ण होत होती आणि त्याच्याच जोडीने देशभक्तीचे आंदोलनही वेगाने पुढे जात होते. याप्रमाणे कोणी सूत कातण्याचे काम करीत होता, तर कोणी प्रौढ शिक्षणाच्या कार्याबरोबर जोडला गेला होता. कोणी गो-पालनाचे काम करीत होता. तसेच कोणी स्वच्छतेचे काम करीत असे. अशा सर्व विषयांना गांधींजींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडून टाकले होते. याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वाच्या काळामध्ये आजपासून आगामी 25 वर्ष, आपल्याला सर्वांना आपआपल्या प्रवृत्तींचा विचार करून, आपल्या कार्याला देशाच्या विकासाबरोबर, देशाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, देशाच्या आकांक्षांचा विचार करून जोडले पाहिजे. आज देश आत्मनिर्भर भारताचा संकल्प करून पुढची वाटचाल करीत आहे. तुम्ही सर्व युवक ‘वोकल फॉर लोकल’ या अभियानामध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडू शकता.

ज्या गोष्टीच्या निर्मितीसाठी कोणा भारतीयाचे श्रम पणाला लागले आहेत, त्या गोष्टीच्या उत्पादनासाठी भारतीयाने आपला घाम गाळला आहे, तीच गोष्ट आपण वापरायची आहे, असा भारतातल्या प्रत्येक युवकाने एकदा का दृढनिश्चय केला तर, भारताचे भाग्य अतिशय वेगाने बदलू शकते. ‘वोकल फॉर लोकल’ चा मंत्र थेट आपल्या देशाच्या युवकांबरोबर जोडला गेला आहे. ज्यावेळी लोक स्थानिक उत्पादने खरेदी करायला लागतील, त्यावेळी स्थानिक उत्पादनही वाढणार आहे. त्याची गुणवत्ताही सुधारत जाईल. ज्यावेळी स्थानिक उत्पादन वाढेल, त्यावेळी आपोआपच स्थानिक पातळीवर रोजगाराची नवीन साधनेही वाढतील.

मित्रांनो,

 

हा काळ तंत्रज्ञानाचा आणि नवोन्मेषी संकल्पनांचा आहे. हा काळ डिजिटल क्रांतीचा आहे. या युगाचा जर कोणी नायक आहे तर तो म्हणजे तुम्ही- माझे युवा मित्रच आहात. म्हणूनच परिवर्तनाच्या या काळखंडामध्ये एक छात्र सैनिक म्हणून अनेक नवीन जबाबदा-या तुमच्यावर आहेत. तुम्हाला या क्रांतीमध्ये भारताचे नेते बनण्यासाठी देशाला आपले नेतृत्व द्यायचे आहे आणि त्याचबरोबर याविषयी येणाऱ्या आव्हानांना सामोरेही जायचे आहे. आज एकीकडे डिजिटल तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत. तर दुसरीकडे चुकीच्या माहितीमुळे धोक्याची परिस्थितीही निर्माण झाली आहे. आपल्या देशाचा सामान्य नागरिक, कोणत्याही अफवेचा शिकार बनू नये, ही गोष्टही पाहणे जरूरी बनले आहे. एनसीसीचे छात्र यासाठी एक जागरूकता अभियान सुरू करू शकतात. आणखी एक आव्हान आजच्या युवकांसमोर आहे. ते म्हणजे आभासी आणि प्रत्यक्ष जीवन यांच्यामध्ये बिघडत जाणारे सामंजस्य! एनसीसीला आपल्या छात्र सैनिकांसाठी यामध्ये संतुलन राखण्यासाठी प्रशिक्षणाच्या पद्धती तयार करता येतील. त्यांचा उपयोग इतर लोकांनाही होऊ शकेल.

मित्रांनो,

आणखी एक विषय आज मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. हा विषय आहे अंमली पदार्थांच्या नशेचा. नशा आपल्या युवा पिढीला खूप रसातळाला नेते, हे तुम्ही मंडळी खूप चांगले जाणून आहात. मग, ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये एनसीसी असेल, एनएसएस असेल तिथे अंमली पदार्थ कसे काय पोहाचू शकतात. तुम्ही छात्र सैनिक म्हणून स्वतः अंमली पदार्थांपासून दूर आणि मुक्त राहिले पाहिजेच आणि त्याचबरोबर आपल्या विद्यालयाच्या परिसरालाही अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवले पाहिजे. तुमची जी सहकारी मंडळी आहेत, ती एनसीसी-एनएसएसमध्ये नाहीत, त्यांनाही या वाईट सवयीतून मुक्त्त करण्यासाठी तुम्ही मदत करावी.

मित्रांनो,

देशामध्ये अशाच प्रकारच्या सामुहिक प्रयत्नांना नवीन चैतन्य, शक्ती देण्यासाठी काही वर्षांपूर्वी एक पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल आहे- सेल्फफॉरसोसायटी पोर्टलडॉट! या पोर्टलवर वेगवेगळ्या व्यक्तींनी येऊन, वेगवेगळ्या कंपन्यांनी येऊन, वेगवेगळ्या संघटनांनी येऊन समाज सेवा म्हणून जे काम केले जात आहे, त्या कार्यामध्ये सहयोग केला जात आहे. विशेष म्हणजे भारतातल्या आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांनी या दिशेने अतिशय चांगले काम केले आहे. आज या उपक्रमाबरोबर सात हजारांपेक्षा जास्त संघटना आणि सव्वा दोन लाखांपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. ही सर्व मंडळी काही ना काही कार्य समाज सेवा म्हणून करीत आहेत. एनसीसी-एनएसएसचे लाखो युवकही या पोर्टलबरोबर जोडले गेले पाहिजे.

बंधू- भगिनींनो,

आपल्याला एकीकडे एनसीसी छात्रसेनेचा विस्तार करायचा आहे. तर दुसरीकडे ‘कॅडेट स्पिरीट’ही पुढे घेवून जायचे आहे. हे चैतन्य लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. गावां-गावांपर्यंत त्याचा आवाज पोहोचला पाहिजे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि मला असे वाटते की, यामध्ये एनसीसीचे माजी छात्र खूप मोठी भूमिका बजावू शकतात. एनसीसी माजी छात्र संघटना या कामामध्ये जणू एक सेतू बनून जाळे तयार करण्याचे महत्वाचे काम करू शकते. वास्तविक मी स्वतःच या संघटनेचा सदस्य आहे. म्हणूनच मी देश-विदेशांमध्ये असलेल्या सर्व माजी छात्र सहकारी मंडळींना आवाहन करतो की, त्यांनी या मिशनमध्ये सक्रिय सहभागीदार बनावे. कारण ‘वन्स ए कॅडेट, ऑलवेज ए कॅडेट’ म्हणजेच एकदा का कुणी छात्र सैनिक बनला की तो, कायमच छात्र सैनिक असतो! तुम्ही कुठेही असा, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली सेवा देत असाल, तुमचे अनुभव या देशाला आणि नवीन पिढीला खूप उपयोगी ठरू शकतात. तुमचे अनुभव एका संघटनेच्या रूपाने एनसीसीलाही आधीपेक्षा आणखी चांगले माध्यम बनवू शकतात. यामुळे एनसीसीचे जे स्पिरीट-चैतन्य आहे आणि कर्तव्याची भावना आहे, त्यांचा समाजामध्येही विस्तार होईल.

मला पूर्ण विश्वास 

आहे की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपण केलेले हे प्रयत्न नवीन भारताच्या दृष्टीने शक्ती- ऊर्जा बनणार आहेत आणि एनसीसी छात्र यामध्ये खूप मोठी भूमिका बजावणार आहेत. याच विश्वासाने तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद!

भारत माता की जय !

भारत माता की जय !

भारत माता की जय !

वंदे मातरम्, वंदे मातरम् !!

***

JaideviPS/NilimaC/SuvarnaB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1793454) Visitor Counter : 73