पंतप्रधान कार्यालय
वाराणसी इथे विविध विकास उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
23 DEC 2021 5:13PM by PIB Mumbai
हर-हर महादेव ! त्रिलोचन महादेव की जय ! माता शीतला चौकिया देवी की जय ! उत्तर प्रदेशचे उत्साही आणि लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉक्टर महेंद्रनाथ पांडे जी, उत्तर प्रदेश सरकार मधले मंत्री अनिल राजभर जी, नीलकंठ तिवारी जी, रवीद्र जायसवाल जी, संसदेतले माझे सहकारी बीपी सरोज जी, सीमा द्विवेदी जी, विधानसभा आणि विधानपरिषदेचे सर्व माननीय सदस्य, बनास डेअरीचे अध्यक्ष शंकर भाई चौधरी आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,
वाराणसी के इस पिंडरा क्षेत्र के लोगन के प्रणाम करत हईला ! पडोस के जिला जौनपुर के सब बंधु एवं भगिनी लोगन के भी प्रणाम! आज वाराणसी आणि आजूबाजूचा हा संपूर्ण भाग, पुन्हा एकदा संपूर्ण देश,संपूर्ण उत्तर प्रदेशातली गावे, शेतकरी – पशुपालक यांच्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचा साक्षीदार ठरला आहे.आजचा दिवस इतिहासातही विशेष आहे कारण आज देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह जी यांची जयंती आहे. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देश शेतकरी दिन साजरा करत आहे.
मित्रहो,
आपल्या इथे गायीबाबत बोलणे,गायीचे शेण याबाबत बोलणे, काही लोकांनी अशी परिस्थिती निर्माण केली, जसा काही गुन्हा करत आहोत. गुन्हा ठरवला आहे. काही लोकांसाठी गाय गुन्हा असू शकते आमच्या साठी गाय म्हणजे माता आहे, पूजनीय आहे. गाय-म्हैस यांची खिल्ली उडवणारे लोक हे विसरतात की देशाच्या 8 कोटी कुटुंबांचा निर्वाह अशाच पशुधनावर चालतो.याच कुटुंबांच्या परिश्रमामुळे भारत आज सुमारे साडे आठ लाख कोटी रूपये मूल्याचे दुध उत्पादन करतो आणि ही रक्कम, भारतात उत्पादित होणाऱ्या गहू आणि तांदूळाच्या किमतीपेक्षा कितीतरी अधिक या दूध उत्पादनाची किंमत आहे. म्हणूनच भारताचे दुध उत्पादन क्षेत्र मजबूत करणे हे आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्य असलेल्या बाबींपैकी एक आहे. याच मालिकेत आज इथे बनास काशी संकुलाची पायाभरणी करण्यात आली आहे. मित्रहो, मैदान अपुरे पडत आहे, जागा नाही, आपण तिथेच आपल्याला सांभाळा.बनास डेअरीच्या लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. रामनगरचा दुध प्रकल्प चालवण्यासाठी बायोगॅसवर आधारित प्रकल्पाचेही भूमिपूजन झाले आहे. एक आणखी महत्वाची गोष्ट झाली आहे, ज्याचा देशाच्या संपूर्ण दुध क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव जाणवेल. आज इथे दुधाची शुद्धता सिद्ध करण्यासाठी देशभरात एकीकृत व्यवस्था आणि त्याचे बोधचिन्हही जारी करण्यात आले आहे. दुघ क्षेत्राशी निगडीत या बाबींबरोबरच आज उत्तर प्रदेशातल्या लाखो लोकांकडे आपल्या घराचे कायदेविषयक दस्तावेज म्हणजे घरौनी सोपवण्यात आली.वाराणसी शहर अधिक सुंदर आणि सुविधा संपन्न करणाऱ्या 1,500 कोटीपेक्षा अधिक रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजनही झाले आहे. या सर्व प्रकल्पांसाठी आपणा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन. उत्तर प्रदेश आणि देशभरातल्या गो पालकांचे विशेष अभिनंदन.
मित्रहो,
एक काळ होता जेव्हा आपल्या अंगणातल्या गायी-गुरांची संख्या हीच संपन्नतेची ओळख होती. आपल्याकडे म्हटलेही जाते, प्रत्येकजण त्याला पशुधन म्हणतो. कोणाच्या दारात दावणीला किती खुंटे आहेत याची चढाओढ असे. आपल्या शास्त्रातही म्हटले आहे-
गावो मे सर्वतः
चैव गवाम् मध्ये वसाम्यहम्।।
म्हणजे माझ्या चहुबाजूला गायी आहेत आणि त्यांच्यात माझा निवास असावा. हे क्षेत्र आपल्याकडे रोजगाराचेही एक मोठे माध्यम राहिले आहे. मात्र दीर्घ काळापासून या क्षेत्राला ज्या पाठबळाची गरज होती ते आधीच्या सरकारांकडून प्राप्त झाले नाही. आता आमचे सरकार देशभरातल्या या परिस्थितीत बदल घडवत आहे. आम्ही कामधेनु आयोग स्थापन केला आहे,दुध क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी हजारो कोटी रुपयांचा विशेष निधी निर्माण केला आहे. आम्ही एक मोठे अभियान चालवून लाखो पशुपालकांना किसान क्रेडीट कार्डशी जोडले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी उत्तम चारा मिळावा यासाठीही सातत्याने काम सुरु आहे. पशुंवर घरीच उपचार व्हावेत, घरीच कृत्रिम गर्भाधान व्यवस्था व्हावी यासाठी देशव्यापी अभियान चालवण्यात आले आहे. आम्ही पशुधनाच्या लाळ्या खुरकत रोगाच्या नियंत्रणासाठीही राष्ट्रव्यापी लसीकरण अभियान चालवले आहे. आमचे सरकार, मुलांचे मोफत लसीकरण, कोरोना लसीकरण मोफत याबरोबरच पशुधन वाचवण्यासाठीही अनेक लसी मोफत देत आहे.
मित्रहो,
देशातल्या या प्रयत्नांचाच हा परिणाम आहे की 6-7 वर्षांपूर्वीच्या तुलनेत देशात दुध उत्पादनात सुमारे 45 टक्के वाढ झाली आहे. म्हणजे ते सुमारे दीड पट झाले आहे. जगातल्या दुध उत्पादनापैकी सुमारे 22 टक्के दुध आज भारत उत्पादित करतो. जवळ-जवळ एक चतुर्थांश.उत्तर प्रदेश आज देशातले सर्वात जास्त दुध उत्पादक राज्य तर आहेच, दुध क्षेत्राच्या विस्तारातही खूपच अग्रेसर आहे याचा मला आनंद आहे.
बंधू-भगिनीनो,
देशाचे दुध उत्पादन क्षेत्र,पशुपालन, श्वेत क्रांतीमधली नवी उर्जा, शेतकऱ्यांची स्थिती बदलण्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावू शकतात असा मला विश्वास आहे. या विश्वासासाठी अनेक कारणेही आहेत. पहिले म्हणजे, देशातले अल्पभूधारक शेतकरी, ज्यांची संख्या 10 कोटीपेक्षाही जास्त आहे, त्यांच्या अतिरिक्त उत्पन्नाचे दुध उत्पादन क्षेत्र हे मोठे साधन ठरू शकते.दुसरे म्हणजे भारताच्या दुध उत्पादनांकडे परदेशातली मोठी बाजारपेठ आहे. ज्यात अधिक व्यापकता आणण्याच्या खूप मोठ्या संधी आपल्याकडे आहेत.तिसरे म्हणजे महिलांची आर्थिक प्रगती,त्यांची उद्योजकता वृद्धींगत करण्यासाठी, पशुपालन हे एक मोठे साधन आहे. चौथे म्हणजे आपले पशुधन हे बायोगॅस, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यांचा मोठा आधार आहे. जे पशु भाकड झाले आहेत, असे पशु शेतकऱ्यांसाठी ओझे ठरत नाहीत तर तेही दर दिवशी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालू शकतात.
बंधू-भगिनीनो,
दुहेरी इंजिन असलेले आमचे सरकार, सचोटीने,संपूर्ण सामर्थ्याने, शेतकरी,पशुपालक यांना सहाय्य पुरवत आहे. आज इथे भूमिपूजन करण्यात आलेले बनास काशी संकुल म्हणजे सरकार आणि सहकार यांच्या याच भागीदारीचे प्रतिक आहे. सहकार क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणारी बनास डेअरी आणि पूर्वांचलचे शेतकरी, गो पालक यांच्यात आज नवी भागीदारी सुरु झाली आहे. हा आधुनिक दुग्ध प्रकल्प सुरु झाल्यानंतर पिंडराच नव्हे तर शिवपुर, सेवापुरी, रोहनिया आणि गाजीपुर, जौनपुर, चंदौली, मिर्जापुर, बलिया, आझमगढ, महू अशा जिल्ह्यातल्या हज़ारों-लाखों शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. बनास काशी संकुलामुळे, आजूबाजूच्या अनेक गावात दुध समित्या स्थापन होतील, संकलन केंद्रे तयार होतील आणि दुध खराब होण्याची चिंता दूर होईल. इतकेच नव्हे तर जातिवंत पशुंसाठी शेतकऱ्यांना सहाय्य मिळेल आणि पशुंसाठी दर्जेदार खाद्यही उपलब्ध करून देण्यात येईल. दूध, दही, ताक, लोणी, पनीर याशिवाय इथे आइसक्रीम आणि मिठाई सुद्धा तयार होईल. म्हणजे बनारसची लस्सी, फाटवलेल्या दुधाच्या एकापेक्षा एक सरस मिठाया, लवंगलतिका या सर्वांचा स्वाद द्विगुणीत होईल.एका प्रकारे बनास काशी संकुल बनारसच्या नावारुपात आणखी भर घालेल.
बंधू-भगिनीनो,
सर्वसाधारणपणे आपल्याकडे दुधाच्या अस्सल दर्जासंदर्भात खूपच गोंधळाची स्थिती असते.दुध घेताना कोणते दुध सुरक्षित आहे,हे ओळखणे सर्वसामान्य जनतेसाठी कठीण असते. प्रमाणीकरणासाठी वेगवेगळ्या व्यवस्थांमुळे, पशुपालक, दुध संघ यांच्यासह संपूर्ण दुध क्षेत्राला या आव्हानाचा मुकाबला करावा लागतो. आता देशभरातल्या दुध क्षेत्रासाठी या समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. भारतीय मानक ब्युरोने देशभरासाठी एकीकृत व्यवस्था जारी केली आहे. प्रमाणपत्रासाठी कामधेनु गाय असलेले एकीकृत बोधचिन्हही जारी करण्यात आले आहे. हे प्रमाण,हे बोधचिन्ह पाहिल्यानंतर शुद्धतेची खूण पटणे सोपे होईल आणि भारताच्या दुध उत्पादकांची विश्वासार्हताही वाढेल.
मित्रहो,
दुध क्षेत्राशी संबंधित पशुधनापासून जे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात त्याचा योग्य वापर करणे ही देशाची मोठी गरज आहे. रामनगर दुध प्रकल्पाजवळ बायोगॅसपासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची निर्मिती हा एक असाच मोठा प्रयत्न आहे.
हा प्रकल्प इतरांपेक्षा वेगळा आहे, कारण या प्रकल्पातल्या दुग्धालय संयंत्रासाठी लागणा-या संपूर्ण ऊर्जेची गरज जैवइंधन प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. याचा अर्थ शेतकरी बांधव फक्त दूधच नाही तर शेणाच्या विक्रीतूनही उत्पन्न मिळवू शकणार आहेत. सामान्यपणे शेतक-यांना शेणाला जी किंमत मिळते, त्यापेक्षा जास्त किंमतीने जैवइंधन प्रकल्पच शेणाची खरेदी करणार आहे. इथे जी जैव स्लरी बनेल, त्याचा उपयोग जैव स्लरीआधारित जैविक खत उत्पादनासाठी केला जाईल. जे काही ठोस जैविक खत बनविण्यात येणार आहे, त्याची किंमत रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये खूपच कमी असून ते, शेतकरी बांधवांना उपलब्ध होणार आहे. यामुळे जैविक शेती- नैसर्गिक शेतीचाही विकास होईल आणि अनाथ, भटक्या पशू-प्राण्यांची सेवा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
मित्रांनो,
एक काळ असा होता की, भारतामध्ये नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती आणि तीही नैसर्गिक पद्धतीने केली जात होती. नैसर्गिक शेती म्हणजे इतर बाहेरच्या गोष्टींची त्यामध्ये कोणत्याही प्रकारे भेसळ केली जात नव्हती. जे काही शेतातून मिळते, शेतीसाठी वापरण्यात आलेल्या प्राणी-पशूंपासून मिळते, त्याच तत्वांचा वापर शेती उत्पादन वृद्धीसाठी केला जात होता. मग यामध्ये खत असो, कीटकनाशक असो सगळे काही नैसर्गिक पद्धतीने बनविले जात होते आणि त्याचा वापर केला जात होता. परंतु काळाच्या बरोबर नैसर्गिक शेतीचे क्षेत्र कमी कमी होत गेले. रासायनिक शेतीचा प्रभाव जास्त वाढला. भूमातेचा कायाकल्प घडवून आणण्यासाठी, आपली माती सुरक्षित ठेवण्यासाठी, भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आता आपल्याला पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळावेच लागेल. आजच्या काळाची ही मागणी आहे. आणि म्हणूनच, आता सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकरी बांधवांना जागरूक करण्यासाठी मोठी मोहीमच सुरू केली आहे. आणि आज आपण ज्यावेळी स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, त्यावेळी मी देशवासियांना विशेषतः आमच्या शेतकरी बांधवांना, विशेषतः माझ्या लहान शेतकरी बांधवांना आज शेतकरी दिनानिमित्त एक आग्रह करू इच्छितो. तुम्ही नैसर्गिक शेतीकडे जरूर वळावे. या सेंद्रीय, नैसर्गिक शेतीमध्ये खर्चही कमी आहे आणि उत्पादनही चांगले मिळते. हा शेती करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग आहे. तसेच तो सर्वात सुरक्षित आहे आणि आज जगामध्ये नैसर्गिक शेतीतून पिकवलेल्या अन्नधान्याला किंमतही जास्त मिळते. आपल्या कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने उचललेले हे एक मोठे आणि महत्वाचे पाऊल आहे. देशातल्या स्टार्टअप क्षेत्राला आणि युवावर्गाला मी सांगू इच्छितो की, या नैसर्गिक शेतीमध्ये रोजगाराचे अनेक पर्याय आहेत, अनेक संधी आहेत. या सर्व गोष्टींचा त्यांनी पूर्ण लाभ उठवावा. आता, इथे व्यासपीठावर येण्याआधी मला काही युवकांना भेटण्याची संधी मिळाली. सरकारी योजनांशी संबंधित त्यांनी कितीतरी मोठी, साहसी कामे या युवकांनी केली आणि खूप मोठे परिवर्तन त्यांनी जीवनात घडवून आणले आहे. ते ऐकून मला खूप आनंद झाला. योजनांविषयी माझा विश्वास आता आणखी मजबूत झाला.
बंधू आणि भगिनींनो,
गावांना, शेतकरी बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी स्वामित्व योजनेची खूप मोठी भूमिका आहे. मला आनंद आहे की, योगी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात या क्षेत्रात चांगले काम होत असून हे राज्य या कामामध्ये अग्रणी आहे. उत्तर प्रदेशातल्या सर्व 75 जिल्ह्यांमध्ये 23 लाखांपेक्षा जास्त घरपट्टे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास 21 लाख परिवारांना आज हे दस्तऐवज देण्यात आले आहेत. आपल्या घराचा नामपट्टा-घरपट्टा ज्यावेळी आपल्या हाती येतो, त्यावेळी गरीब, दलित, वंचित, मागास मंडळी चिंतामुक्त होतील. आपल्या घरावर कोणी अवैध ताबा मिळवील काय? या चिंतेतून आता सर्वजण मुक्त होतील. मागील सरकारच्या काळात अवैध ताबा मिळविण्याची जी प्रवृत्ती दिसून येत होती, त्यालाही आता लगाम बसणार आहे. घरपट्टा मिळाल्यामुळे आवश्यकता भासेल, त्यावेळी बँकेकडून कर्जही सहजपणे घेता येणार आहे. यामुळे गावांतल्या युवकांना रोजगार, स्वयंरोजगार यासाठी नवीन माध्यम उपलब्ध होईल.
बंधू आणि भगिनींनो,
विकासाची चर्चा ज्यावेळी केली जाते, त्यावेळी काशी हे एक स्वतःच मॉडेल बनत चालले आहे. काशीची प्राचीन, पुरातन ओळख कायम ठेवून आपले शहर नवीन काया कशी धारण करू शकते, हे काशीमध्ये दिसून येते. आज ज्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास करण्यात आला आहे, त्यामुळे भव्य काशी, दिव्य काशी अभियानाला आणखी वेग मिळू शकणार आहे. काळभैरवासहीत शहरातल्या सहा वार्डांमध्ये पुनर्विकासाची कामे करण्यात येत आहेत. 700 पेक्षा जास्त स्थानांवर जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, त्यामुळे स्मार्ट आणि सुरक्षित सुविधांच्या दिशेने काशीचा जो प्रवास सुरू आहे, त्याला अधिक बळ मिळत आहे. महान संत पूज्य श्री रविदास जी यांचे जन्मस्थान विकसित करण्याचे कार्यही वेगात सुरू आहे. लंगर सभागृह बनल्यामुळे इथे देशभरातून येणा-या भक्तांची खूप चांगली सोय होऊ शकणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज वाराणसीचे चौक सुंदर होत आहेत. शहरातले मार्ग रूंद केले जात आहेत. नवीन पार्किंग स्थाने तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरामध्ये होत असलेली वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटत आहे. हा जो वाराणसी कँटपासून लहरतारा येथून प्रयागराजच्या दिशेने जाणारा महामार्ग आहे, त्यावर वाहतुकीचा किती मोठा दबाव निर्माण होत होता, हे तुमच्यापेक्षा चांगले कोण जाणू शकते? आता ज्यावेळी हा मार्ग सहापदरी होईल, त्यावेळी दिल्ली, आग्रा, कानपूर, प्रयागराज येथून येणा-या यात्रेकरूंना आणि मालवाहतूकदारांना चांगली सुविधा मिळणार आहे. इतकेच नाही, शहरातल्या दुस-या भागातल्या लोकांना, वाहनांना येणे-जाणे अतिशय सुकर होणार आहे. हा मार्ग जिल्ह्याच्या प्रवेशव्दाराप्रमाणे विकसित होईल. वाराणसी- भदोई- गोपीगंज मार्गाच्या रूंदीकरणामुळे शहरातून बाहेर पडणा-या गाड्या रिंगरोड फेज-2 वरून आता बाहेर जावू शकतील. यामुळे वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता मिळेल.
बंधू आणि भगिनींनो,
आरोग्य, शिक्षण आणि संशोधन केंद्राच्या रूपाने काशीची ओळख अधिक सशक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आज एका आयुष रूग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. तर नवीन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेचे काम सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सुविधा भारतीय औषधोपचार पद्धतीचे प्रमुख केंद्र या रूपातही काशीची ओळख तयार होणार आहे. क्षेत्रीय निर्देश मानक प्रयोगशाळा तयार होत असल्यामुळे जल परीक्षण, कपडे आणि गालिचे यांच्या परीक्षणाचे काम आता इथे होऊ शकणार आहे. यामुळे वाराणसी आणि परिसरातल्या अनेक उद्योगांना, विणकरांना थेट लाभ होईल. तसेच आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राने जी नवीन वेगाने वाढणा-या वाणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे धान्याचे नवीन प्रकार विकसित करण्याचे कार्य पूर्वीपेक्षा अतिशय कमी वेळेत होवू शकणार आहे.
बंधू आणि भगिनींनो,
मी ज्यावेळी काशीच्या, उत्तर प्रदेशच्या विकासामध्ये डबल इंजिनाच्या डबल शक्तीची आणि डबल विकासाची चर्चा करीत असतो, त्यावेळी काही लोकांना फारच वेदना होतात. ज्यांनी उत्तर प्रदेशाच्या राजकारणाकडे फक्त आणि फक्त जाती, पंथ, धर्म यांच्या चष्म्यातून पाहिले आहे, तेच हे लोक आहेत. उत्तर प्रदेशचा विकास व्हावा, उत्तर प्रदेशची नवी, आधुनिक ओळख निर्माण व्हावी, अशी या लोकांची कधीच इच्छा नव्हती. शाळा, महाविद्यालये, रूग्णालये, रस्ते, पाणी, वीज, गरीबांना घरे, गॅस जोडणी, शौचालये या गोष्टींना तर ते विकास मानतच नाहीत. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हे शब्द, ही भाषा त्यांच्या अभ्यासक्रमात, कार्यक्रमामध्ये, त्यांच्या शब्दकोशातच काय त्यांच्या बोलण्या-चालण्यात आणि त्यांच्या विचारांमध्ये आहे की नाही, हे सर्वकाही तुम्ही जाणून आहात. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये माफियावाद, परिवारवाद आहे. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये घरे-जमिनी यांच्यावर अवैध ताबा मिळवणे आहे. आधीच्या सरकारांच्या काळामध्ये उत्तर प्रदेशच्या लोकांना जे काही मिळाले आणि आज उत्तर प्रदेशातल्या लोकांना आमच्या सरकारकडून जे काही मिळाले आहे, त्यामध्ये असलेला फरक अगदी स्पष्टपणे दिसून येतोय. आम्ही उत्तर प्रदेशचा वारसा वृद्धिंगत करीत आहोत आणि उत्तर प्रदेशचा विकासही करीत आहोत. परंतु फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करणा-या या लोकांना उत्तर प्रदेशचा विकास होत आहे, हे पसंत नाही. परिस्थिती तर अशी आहे की, या लोकांना पूर्वांचलाच्या विकासाविषयी, बाबांच्या कामाविषयी, विश्वनाथ धामाच्या कामाविषयीही आपत्ती वाटते. मला सांगण्यात आले आहे की, गेल्या रविवारी, काशी विश्वनाथ धाममध्ये दर्शनासाठी दीड लाखांपेक्षा जास्त भाविक आले होते. उत्तर प्रदेशाला दशके मागे लोटणा-या या लोकांची नाराजी आता आणखी वाढणार आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशचे लोक डबल इंजिनच्या सरकारबरोबर ठामपणे उभे आहेत, आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि जस-जसा आम्हाला मिळणारा हा आशीर्वाद वाढतोय, तस-तसा त्यांचा राग सातव्या मजल्यापर्यंत, अगदी आकाशाला जाऊन भिडणार आहे.
मित्रांनो,
डबल इंजिनचे सरकार, उत्तर प्रदेशच्या विकासासाठी रात्रंदिवस परिश्रम करीत राहणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आणि काशीवासियांच्या स्नेहामुळे विकासाचे नवीन विक्रम निर्माण होत राहतील. या विश्वासाने सर्व विकास प्रकल्पांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप -खूप अभिनंदन करतो. माझ्याबरोबर सर्वांनी जयघोष करावा -
भारत माता की जय!
भारत माता की जय!
भारत माता की जय!
खूप-खूप धन्यवाद!!
***
Jaydevi PS/S.Tupe/N.Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1784977)
Visitor Counter : 266
Read this release in:
Hindi
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam