पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते पुर्वांचल एक्स्प्रेस वे चे उद्‌घाटन


सुलतानपूर जिल्ह्यातील एक्स्प्रेसवेवर बांधलेल्या 3.2 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवरून झालेल्या एअरशोचे केले अवलोकन

“हा एक्स्प्रेसवे म्हणजे उत्तरप्रदेशने केलेल्या दृढ संकल्पांच्या पूर्ततेचा पुरावा आणि उत्तरप्रदेशाचा अभिमान व आश्चर्य यांचे प्रतिक आहे ”

“पश्चिमेकडील प्रदेशांच्या मागण्यांएवढेच पुर्वांचलच्या मागण्यांना आता महत्व दिले जात आहे.”

सध्याच्या दशकातील गरजा ध्यानात घेऊन समृद्ध उत्तरप्रदेशच्या बांधणीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी

उत्तरप्रदेशच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार पूर्णपणे कटीबद्ध

Posted On: 16 NOV 2021 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुर्वांचल एक्स्प्रेसवे चे उद्‌घाटन झाले. सुलतानपूर जिल्ह्यातील एक्स्प्रेसवेवर बांधलेल्या 3.2 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवरून झालेल्या एअरशोचे अवलोकनही त्यांनी केले.

तीन वर्षापूर्वी एक्सप्रेसवेचे भूमिपूजन करताना आपण एक दिवशी याच एक्सप्रेसवेवर उतरू अशी कल्पनाही केली नव्हती असे पंतप्रधानांनी संबोधित करताना सांगितले. हा एक्सप्रेसवे  उत्तम भविष्याकडे नेणारा मार्ग आहे. उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी असलेला हा एक्सप्रेसवे नवीन उत्तरप्रदेशची बांधणी करेल. उत्तर प्रदेशातील आधुनिक सुखसोयींचे प्रतिबिंब म्हणजे हा एक्सप्रेस वे आहे. उत्तर प्रदेशने घेतलेल्या संकल्पांच्या पूर्ततेचे प्रत्यक्ष पुरावा तसेच उत्तर प्रदेशचा अभिमान आणि आश्चर्य हा एक्सप्रेस वे आहे असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचा संतुलित विकाससुद्धा तेवढाच गरजेचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. दशकानुदशके काही प्रदेश विकासाच्या मार्गावर पुढे आहेत तर काही प्रदेश मागे राहिले. देशासाठी ही असमानता चांगली नाही. भारताचा पूर्वेकडील प्रदेश आणि ईशान्येकडील राज्ये यांच्यामध्ये विकासाच्या दृष्टीने अधिक क्षमता असूनही देशात घडून येत असलेल्या विकासाचा फायदा त्यांना फारसा झाला नाही. आधीची सरकारे अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने चालत होती त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले नाही. आता मात्र उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागात विकासाचा नवीन अध्याय सुरू होत आहे असे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला.

पुर्वांचल एक्सप्रेस वे पूर्ण झाल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच त्यांचा चमू आणि उत्तर प्रदेशच्या जनतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना ही त्यांनी धन्यवाद दिले. तसेच या प्रकल्पांसाठी राबणारे कामगार आणि अभियंत्यांचे त्यांनी कौतुक  केले .

देशाच्या समृद्धी एवढीच देशाची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले पूर्वांचल एक्सप्रेस वे ची उभारणी करताना आणीबाणीच्या प्रसंगी लढाऊ विमाने उतरवण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विचार केला गेला. या देशातील संरक्षणासंबंधीच्या पायाभूत बाबींकडे ज्यांनी दुर्लक्ष केले, त्यांच्या कानावर या लढाऊ विमानांचा आवाज पडेल असे पंतप्रधान म्हणाले.

गंगा आणि इतर नद्यांचे आशीर्वाद लाभलेला हा मोठा प्रदेश असूनही सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत येथे कोणताही विकास घडून आला नाही याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. 2014 मध्ये जेव्हा जनतेने देशाची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा आपण उत्तर प्रदेशच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांना पक्की घरे, गरिबांना शौचालये, स्त्रियांना उघड्यावर शौचाला जावे लागू नये, तसेच प्रत्येकाच्या घरी वीज यावी अशा अनेक गोष्टी येथे प्रत्यक्षात आणणे आवश्यक होते. आधीच्या सरकारवर टीका करून पंतप्रधान म्हणाले की त्यामुळेच तेव्हाच्या उत्तर प्रदेश सरकारने आपल्याला या सुविधा पुरवण्यासाठी कोणतेही सहकार्य दिले नाही,याचा आपल्याला अत्यंत खेद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. उत्तर प्रदेशातील जनतेने आधीच्या सरकारने  त्यांना दिलेल्या अयोग्य वागणुकीबद्दल, विकासात केलेल्या भेदभावाबद्दल आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाचे हित जोपासण्याबद्दल जबाबदार धरले आणि त्यांना सत्तेवरून दूर केले.

 उत्तर प्रदेश मध्येपूर्वी  किती वेळा वीज गायब होत असे हे कोण विसरेल, असे विचारून पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय होतीवैद्यकीय सुविधांची परिस्थिती काय होती, हे कोणाच्या विस्मरणात गेले असेल? असा प्रश्न विचारला. गेली साडेचार वर्षे उत्तर प्रदेशातील पूर्वेकडचा भाग असो की पश्चिमेकडचा, हजारो गावे नवीन रस्त्यांनी जोडली गेली आहेत आणि हजारो किलोमीटरचे नवे रस्ते तेथे बांधले गेले आहेत, असे सांगितले.

लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून उत्तर प्रदेशच्या विकासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे. नवीन वैद्यकीय कॉलेजेस उभारली जात आहेत. एम्स येऊ घातले आहे. आधुनिक शैक्षणिक संस्था उत्तर प्रदेशात उभारल्या जात आहे., असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.  काही आठवड्यांपूर्वी कुशीनगर मधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले, त्याची त्यांनी आठवण करून दिली.

उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमधील अनेक भाग एकमेकांपासून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तुटलेले होते. लोक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जात असत पण जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांना त्रास होत असे. पूर्वेकडील प्रदेशातील लोकांना लखनऊपर्यंत जाणेही खूप कठीण होते. आधीच्या मुख्यमंत्र्यांसाठी विकास हा स्वतःची घरे असलेल्या ठिकाणांपर्यंतच मर्यादित होता. परंतु आता पूर्वांचलच्या मागण्यांना पश्चिमेकडील प्रदेशांच्या मागण्यांइतकेच महत्त्व दिले जात आहे, यावर पंतप्रधानांनी जोर दिला. लखनऊ इतकीच विकासाची प्रचंड ओढ असलेल्या आणि क्षमता असलेल्या शहरांना हा एक्सप्रेस वे जोडतो असे पंतप्रधान म्हणाले. जेथे चांगले रस्ते असतील, चांगले महामार्ग पोहोचत असतील तेथे विकास वेगाने होतो आणि रोजगाराच्या संधी वेगाने उपलब्ध होतात असे पंतप्रधानांनी नमूद केले उत्तर प्रदेश या औद्योगिक विकासासाठी प्रदेशांमध्ये उत्तम संपर्क गरजेचा आहे, उत्तर प्रदेशचा प्रत्येक कानाकोपरा एकमेकांशी जोडला गेला पाहिजे असे म्हणून उत्तरप्रदेशात एक्सप्रेस वे बांधले जात आहेत औद्योगिक कॉरिडॉर चे काम होता है असे त्यांनी सांगितले. लवकरच पूर्वांचल एक्सप्रेस वे वरून नवीन उद्योग येथे प्रवेश करतील. येत्या काही काळातच या एक्सप्रेस वे च्या बाजूला असलेल्या शहरांमध्ये अन्नप्रक्रिया, दूध, शीतगृहे, फळे आणि भाज्या साठवणूक, अन्नधान्य पशूपालन आणि इतर कृषीधारित उत्पादनांचे प्रमाण वेगाने वाढेल. उत्तर प्रदेशमध्ये औद्योगिकीकरणासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे असे सांगून या मनुष्यबळाला प्रशिक्षित करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या शहरांमध्ये आयटीआय आणि इतर शैक्षणिक संस्था वैद्यकीय संस्था शैक्षणिक संस्था यांची स्थापना लवकरच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशात संरक्षण कॉरिडोर बांधला जात आहे, त्यामुळे नवीन रोजगार संधी उपलब्ध होतील. उत्तर प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या कामामुळे भविष्यात अर्थव्यवस्था नवीन उंचीवर जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

एखाद्या माणसाला घर बांधायचे असेल तर तो प्रथम रस्ते माती या गोष्टींचा विचार करेल, परिक्षण करेल, इतर बाबीही विचारात घेईल. मात्र उत्तर प्रदेशात अनेक वर्षापासून सरकारे औद्योगिकीकरणाचे स्वप्न दाखवत आहेत पण स्थानिक प्रदेश एकमेकांशी जोडले गेलेले नाही त्याबद्दल कुठलीही पर्वा करत नाहीत. दिल्ली आणि लखनऊ या दोन्ही ठिकाणी घराण्याचे वर्चस्व सातत्याने होते हे कमनशिबी असल्याची टीका त्यांनी केली. वर्षानुवर्षे कुटुंबातल्या सदस्यांनी उत्तर प्रदेशच्या आकांक्षांना चिरडून टाकण्याचे काम केले.

उत्तर प्रदेश मधील डबल इंजिन सरकार हे उत्तर प्रदेशच्या सामान्य लोकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे हित लक्षात घेऊन काम करते. नवीन कारखान्यांसाठी वातावरण तयार होत आहे. या दशकांच्या गरजा लक्षात घेऊन समृद्ध उत्तर प्रदेश उभारणीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

कोरोना लसीकरणाच्या कामात उत्तर प्रदेश सरकारने बजावलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. उत्तर प्रदेशच्या जनतेने  भारतात बनवलेल्या लसींविरुद्ध चाललेल्या कोणत्याही राजकीय प्रचाराला महत्व दिले नाही याबद्दल त्यांनी उत्तर प्रदेशाच्या जनतेचेही कौतुक केले.

उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी सरकार रात्रंदिवस काम करत आहे असे ते म्हणाले. कनेक्टिविटीशिवाय उत्तर प्रदेशातील पायाभूत सुविधांनाही अग्रक्रमाने प्राधान्य दिले जात आहे असे सांगून ते म्हणाले की दोनच वर्षात उत्तर प्रदेश सरकारने तीस लाख ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जोडण्या दिल्या आणि यावर्षी डबल इंजिन सरकार लाखो भगिनींना त्यांच्या घरी नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी संपूर्णपणे कटीबद्ध आहे. समर्पित भावनेने देश उभारण्याच्या कार्याला वाहून घेणे हे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही ते करतच राहू असे ते म्हणाले.

 

 Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1772389) Visitor Counter : 318