पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण चा (पीएमएवाय - जी ) पहिला हप्ता त्रिपुरातील 1.47 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना केला हस्तांतरित
“ आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रदान केलेल्या पहिल्या हप्त्याने त्रिपुराच्या स्वप्नांना नवे पंख दिले आहेत ”
Posted On:
14 NOV 2021 4:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण या योजनेअंतर्गत पहिला हप्ता त्रिपुरातील 1.47 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना हस्तांतरित केला. यावेळी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 700 कोटींहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार , त्रिपुराची अनोखी भौगोलिक-हवामान स्थिती लक्षात घेऊन, 'कच्चा' घराची व्याख्या विशेषत: राज्यासाठी बदलली आहे,त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने 'कच्च्या ' घरांमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांना 'पक्के' घर बांधण्यासाठी मदत मिळू शकली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय ग्राम विकास मंत्री आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री उपस्थित होते.पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवादही साधला.
पंतप्रधानांनी, धलाई त्रिपुराच्या अनिता कुकी देबबर्मा यांच्याशी संवाद साधून, त्यांना त्यांच्या जीवनाबद्दल आणि उपजीविकेबद्दल विचारले आणि त्यांना एक मजबूत आणि उठावदार असे घर बांधण्यास सांगितले, लवकरच त्यांना पक्के घर मिळणार आहे. पंतप्रधानांनी त्यांना सांगितले की, हे सरकार सत्तेत आल्यापासून गरीब आणि आदिवासी वर्गाच्या कल्याणाला त्याचे सर्वोच्च प्राधान्य आहे. एकलव्य शाळा, वन उत्पादनाशी संबंधित योजना यांसारख्या योजना आखल्या जात असून त्या तळागाळापर्यंत राबवल्या जात आहेत, त्यांनी लाभार्थीला मुलांना शिक्षण देण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी सेपाहीजला येथील श्रीमती सोमा मजुमदार यांना योजनेचा लाभ घेण्याबाबतचा अनुभव विचारला.नवीन पक्के घर मिळाल्यावर त्यांच्या आयुष्यात कशाप्रकारे सुधारणा होईल असा प्रश्नही त्यांनी विचारला. या योजनेमुळे पक्के घर घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असून पावसाळ्यातही यापासून मोठी मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे घरासाठी मिळालेले हप्ते केवळ घराच्या बांधकामावर खर्च करण्याची विनंती पंतप्रधानांनी लाभार्थी सोमा मजुमदार यांना केली.लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय किंवा मध्यस्थीशिवाय योजनेचा लाभ मिळावा, हे त्यांच्या सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी उत्तर त्रिपुरातील श्री समीरन नाथ यांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत प्राप्त होणाऱ्या हप्त्यांसह मिळणार्या फायद्यांची माहिती आहे का? यासंदर्भात विचारणा केली. पंतप्रधानांनी त्यांना त्यांच्या घराच्या बांधकामासाठी केलेल्या सर्वेक्षणासारख्या पूर्व-योजना उपक्रमातील अनुभव विचारला.योजनेंतर्गत लाभ मिळविताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? किंवा लाभ मिळवण्यासाठी कोणी लाच घेतली का? याबाबतही पंतप्रधानांनी विचारणा केली. पूर्वीच्या व्यवस्थेत लाभार्थ्यांना लाच दिल्याशिवाय कोणताही लाभ मिळत नव्हता, असे सांगत पंतप्रधानांनी पूर्वीच्या व्यवस्थेवर टीका केली.
दक्षिण त्रिपुरातील श्रीमती कादर बिया यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी विचारले की, त्यांना या योजनेंतर्गत हप्त्याच्या माध्यमातून किती पैसे मिळतील हे माहीत आहे का? पंतप्रधानांनी त्यांना विचारले की, त्यांना हवे तसे घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करेल असा विचार त्यांनी कधी स्वप्नातही केला होता का? पक्के घर त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली. सरकार कोणताही भेदभाव आणि मध्यस्थाविना लाभ मिळणे सुनिश्चित करत आहे ,याचा पुरावा श्रीमती बिया यांसारखे लाभार्थी आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, सरकार नागरिकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी वेगाने काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या संघाचे कौतुक केले. आणि ते म्हणाले की, बिप्लब कुमार देबजींचे सरकार असो की मोदी सरकार, नागरिकांच्या कल्याणासाठी नियमांचा अडथळा येऊ दिला जात नाही.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शक्य तितक्या प्रमाणात महिलांच्या नावावर घरे बांधली जात आहेत , याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला.
या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा कार्यक्रम त्रिपुरासाठी आगामी चांगल्या दिवसांचे संकेत आणि आशेचा किरण आहे. राज्यातील बिप्लब देबजी यांचे सरकार आणि केंद्रातील सरकार हे राज्य प्रगतीच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “आज प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रदान केलेल्या पहिल्या हप्त्याने त्रिपुराच्या स्वप्नांना नवे पंख दिले आहेत. मी त्रिपुरातील सर्व लोकांचे, पहिल्या हप्त्याचा लाभ घेतलेल्या सुमारे दीड लाख कुटुंबांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो”, असे श्री मोदी म्हणाले.
त्रिपुराला गरीब अवस्थेत ठेवणाऱ्या, त्रिपुरातील लोकांना सुविधांपासून दूर ठेवणाऱ्या विचारसरणीला आज त्रिपुरामध्ये स्थान नाही, आता दुहेरी इंजिन असलेले सरकार पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे राज्याच्या विकासासाठी कार्यरत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
या भागाकडे प्रदीर्घकाळापासून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी देशाच्या उत्तर आणि पश्चिमेकडील नद्या पूर्वेकडे येत होत्या, मात्र विकासाची गंगा येथे येण्यापूर्वीच थांबत असे.“देशाचा सर्वांगीण विकास खंडशः आणि राजकीय दृष्टीकोनातून पाहिला गेला, त्यामुळे आपले ईशान्येकडे दुर्लक्ष झाले ,असे त्यांनी नमूद केले. पण आज देशाच्या विकासाकडे 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेने पाहिले जात आहे. विकास हा आता देशाच्या एकता-अखंडतेसाठी समानार्थी शब्द मानला जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी देशाच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आत्मविश्वासाने भरलेल्या भारताच्या आत्मविश्वासपूर्ण नारी शक्तीचा गौरव केला.या नारी शक्तीचे प्रमुख प्रतीक म्हणून आपल्याकडे महिला बचत गट देखील आहेत.या बचत गटांना जन धन खात्याशी जोडण्यात आले आहे.अशा बचत गटांना मिळणारे तारण मुक्त कर्ज दुप्पट करून 20 लाख रुपये करण्यात आले आहे, असे श्री मोदी यांनी सांगितले.
जगण्यातील वाढत्या सुलभतेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, पूर्वी सामान्य माणसाला प्रत्येक कामासाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या, पण आता सरकार स्वतःहून सर्व सेवा आणि सुविधा लोकांपर्यंत पोहोचवत आहे.“पूर्वी, सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळेल का? याची चिंता असायची , आता त्यांना 7 व्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे,” असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याच्या इतिहासात आपल्या ईशान्येकडील आणि देशाच्या अन्य भागातील आदिवासी सेनानींनी देशासाठी बलिदान दिले आहे. या परंपरेचा गौरव करण्याच्या दृष्टीने हा वारसा पुढे नेण्यासाठी देश अथक प्रयत्न करत आहे.अमृत महोत्सवादरम्यानच्या या मालिकेत देशाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.देश आता दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी करणार आहे. 2 ऑक्टोबर - अहिंसा दिवस, 31 ऑक्टोबर -एकता दिवस, 26 जानेवारी -प्रजासत्ताक दिन, राम नवमी, कृष्णाष्टमी इ.महान व्यक्तींसंबंधीत साजरे केले जाणाऱ्या राष्ट्रीय दिवसांप्रमाणेच या दिवसाला तितकेच महत्त्व प्राप्त होईल. “हा दिवस केवळ आदिवासी समाजाच्या योगदानाला आदरांजली वाहण्याचा दिवस नसून एक सौहार्द समाजाचे प्रतीक म्हणूनही पुढे येईल”, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून आणि संपर्क सुविधा सुधारून या प्रदेशाची प्रचंड क्षमता समोर येईल. या प्रदेशात सुरू असलेले काम देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1771651)
Visitor Counter : 399
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam