पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

Posted On: 04 NOV 2021 3:41PM by PIB Mumbai

 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

आज दिवाळीचा पवित्र सण आहे आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील आपल्या माणसांबरोबर दिवाळी साजरी करायची आहे.  मलाही वाटते की मी माझ्या कुटुंबातील सदस्यांबरोबर दिवाळी साजरी करावी आणि म्हणूनच मी प्रत्येक दिवाळी माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत साजरी करायला येतो. कारण तुम्ही माझे कुटुंब आहात, मी तुमच्या कुटुंबातीलच सोबती आहे. त्यामुळे  मी इथे  पंतप्रधान म्हणून आलो नाहीए.  मी तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आलो आहे.  तुमच्याकडे येत असताना मला माझ्या कुटुंबात गेल्यावर जे वाटतंं तीच भावना माझ्या मनात आहे. ही घटनात्मक जबाबदारी मी सांभाळत आहे त्याला 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.  देशवासीयांनी मला दीर्घकाळ अशा सेवेची संधी दिली.  आधी गुजरातच्या जनतेने दिली, आता देशवासीयांनी दिली.  पण मी प्रत्येक दिवाळी तुमच्यासोबत आणि सीमेवर तैनात असलेल्या माझ्या कुटुंबियांसोबत साजरी केली आहे.  आज मी पुन्हा तुमच्यामध्ये आलो आहे, तुमच्याकडून नवी उर्जा घेऊन जाईन, नव्या उमेदीने जाईन, नव्या विश्वासाने जाईन.  पण मी एकटा आलो नाही.  मी तुमच्यासाठी 130 कोटी देशवासियांचे आशीर्वाद घेऊन आलो आहे, खूप आशीर्वाद घेऊन आलो आहे.  तुमचा त्याग, तपस्या, वीरता, पराक्रम, शौर्याच्या नावाने, देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या तुम्हा सर्वांसाठी, भारतातील प्रत्येक नागरिक आज संध्याकाळी  एक दिवा प्रज्वलित करेल. त्या ज्योती सोबतच  तुम्हाला अनेक शुभेच्छा देत राहतील.  मला खात्री आहे की आज तुम्ही घरच्यांशी बोलाल, कदाचित फोटोही पाठवाल आणि मला खात्री आहे की तुम्ही म्हणाल खरंच मित्रा, यंदाच्या  दिवाळीची बात काही औरच होती, म्हणाल नाबघा, तुम्ही निवांत व्हा! तुम्हाला कोणी पाहत नाहीए, काळजी करू नका.  अच्छा, तुम्ही हे ही सांगाल ना की मिठाई देखील खूप खाल्ली होती, सांगणार ना?

 

मित्रांनो,

माझ्यासमोर आज जे देशाचे वीर, देशाच्या शूर कन्या आहेत त्या भारत मातेची अशी सेवा करत आहेत, जे भाग्य प्रत्येकाला मिळत नाही, ते कुणाला तरीच मिळते. ते सौभाग्य तुम्हाला मिळाले आहे.  मी पाहतोय, मला जाणवतय, मला तुमच्या चेहऱ्यावरचे ते दृढ भाव दिसतात.  तुम्ही संकल्पाने भारलेले आहात आणि हेच तुमचे संकल्प, तुमच्या पराक्रमाच्या पराकाष्‍ठेची भावना, मग ते हिमालय असो, वाळवंट असो, बर्फाच्छादित शिखरे असोत, खोल पाणी असो, तुम्ही कुठेही असलात तरी भारतमातेचे जिवंत संरक्षण कवच आहात.  तुमच्या उरात जी धगधगती जाज्वल्यता आहे, त्यावर 130 कोटी देशवासीयांचा विश्वास आहे, त्यामुळे ते शांतपणे झोपू शकतात.  तुमच्या सामर्थ्याने देशात शांतता आणि सुरक्षिततेची निश्चिंतता असते, विश्वास असतो.  तुमच्या पराक्रमामुळे आपल्या सणांमध्ये प्रकाश पसरतो, आनंद भरतो, आपले सण झळाळून निघतात.   आता दीपावली, गोवर्धन पूजा, त्यानंतर भाऊबीज आणि छठ सणही पाठोपाठ येत आहेत.  नौशेराच्या या वीर वसुंधरांसोबत मी तुमच्यासह देशवासियांना या सर्व सणांच्या खूप खूप शुभेच्छा देतो.  देशाच्या इतर भागात दिवाळीचा दुसरा दिवस आला की मोठ्या संख्येने लोक नवीन वर्षाची सुरुवात करतात. आमच्या इथे तर दिवाळीपासून हिशेब पूर्ण होतो आणि दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो.  विशेषत: गुजरातमध्ये उद्या नवीन वर्ष आहे.  म्हणून आज, या वीर भूमीवरून, मी गुजरातच्या लोकांना आणि जिथे जिथे नवीन वर्ष साजरे केले जाते, त्यांना अनेक शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

नौशेराच्या पवित्र भूमीवर जेव्हा मी  उतरलो, इथल्या मातीला स्पर्श केला, तेव्हा एक वेगळीच अनुभूती, एक वेगळाच थरार माझ्या मनात भरून राहिला.  इथला इतिहास भारतीय सैन्याच्या शौर्याचा जयघोष करतो, तो जयघोष प्रत्येक शिखरावरून ऐकू येतो.  तुमच्यासारख्या शूर सैनिकांच्या शौर्याचे जिवंत उदाहरण म्हणजे इथले वर्तमान.  शौर्याचा जिवंत पुरावा माझ्यासमोर आहे.  प्रत्येक युद्धाला, प्रत्येक फसव्या चालीला, प्रत्येक कटाला चोख प्रत्युत्तर देऊन नौशेराने काश्मीर आणि श्रीनगरचा रक्षक म्हणून काम केले आहे.  स्वातंत्र्यानंतर लगेचच शत्रूंच्या नजरा यावर होत्या .  नौशेरावर हल्ला झाला, शत्रूंनी उंचावर बसून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताच व्हिडिओ पाहिल्यानंतर मला सर्व गोष्टी पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली आणि मला आनंद आहे की नौशेरातील वीरांच्या शौर्यासमोर, सर्व कट उधळले गेले.

 

मित्रांनो,

भारतीय लष्कराची ताकद काय असते, हे शत्रूला सुरुवातीच्या काळातच कळून चुकले होते. देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्या नौशेराचे सिंह ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान, नाईक जदुनाथ सिंग यांना मी नमन करतो. भारतीय लष्कराच्या विजयाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या लेफ्टनंट आर आर राणे यांना मी सलाम करतो.  अशा किती वीरांनी या नौशेराच्या भूमीवर अभिमानाच्या गाथा लिहिल्या आहेत, आपल्या रक्ताने लिहिल्या आहेत, आपल्या पराक्रमाने लिहिल्या आहेत, आपल्या परिश्रमाने, देशासाठी जगण्याच्या आणि मरण्याच्या निर्धाराने लिहिल्या आहेत.  दिवाळीच्या या पवित्र सणाच्या दिवशी मला आज अशा दोन महापुरुषांचे आशीर्वाद प्राप्‍त करण्याचे सौभाग्य लाभले, हा माझ्या आयुष्यातील  अमूल्य वारसा आहे.  मला श्री बलदेव सिंह आणि श्री बसंत सिंहजी यांचे आशीर्वाद लाभले. हे दोन्ही महापुरुष बालपणी, साधनांचा अभाव असतानाही भारतमातेच्या रक्षणासाठी सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. मी आज जेव्हा ते ऐकत होतो, तेव्हा त्यांच्यात तीच भावना होती. तीच रग होती. त्यांची मनःस्थिती तशीच होती आणि जणू काही ते आज रणांगणातून आले होते असे वर्णन करत होते.  स्वातंत्र्योत्तर युद्धात ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली अशा अनेक स्थानिक तरुणांनी बाल सैनिकांची भूमिका बजावली.  जीवाची पर्वा न करता त्यांनी देशाच्या सैन्याच्या खांद्याला खांदा लावून काम केले, एवढ्या लहान वयात लष्कराला मदत केली.  तेव्हापासून सुरू झालेली ही नौशेराची शौर्याची साखळी कधीच थांबली नाही, कधीही नतमस्तक झाली नाही, हे तेच नौशेरा आहे.  सर्जिकल स्ट्राईकमध्ये इथल्या ब्रिगेडने वठवलेल्या भूमिकेनं प्रत्येक देशवासीयाचा ऊर अभिमानाने भरुन येतो. आणि मला तो दिवस नेहमी आठवत राहीलकारण मी ठरवले होते की प्रत्येकाने जवानाने सूर्यास्तापूर्वी परत यायला हवे. माझे सर्व जवान पोहोचले आहेत ना, आणि कोणतीही हानी न होता, हे शूर सैनिक परत आले आहेत, ते पराक्रम गाजवून आले आहेत, त्यांनी सिद्धी प्राप्त केली आहे हाच विचार करत मी फोनजवळच चिकटून बसलो होतो. सर्जिकल स्ट्राईकनंतर इथे अशांतता  पसरवण्याचे अगणित कुत्सित प्रयत्न झाले, ते आजही होतात, परंतु प्रत्येक वेळी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले जाते.  या मातीत असत्य आणि अन्यायाविरुद्ध एक नैसर्गिक प्रेरणा आहे.  असे मानले जाते आणि मी मानतो की ही स्वतःमध्येच एक मोठी प्रेरणा आहे, असे मानले जाते की पांडवांनी त्यांच्या वनवासाचा काही काळ या भागात घालवला होता.  आज तुमच्यामध्ये आल्याने मला इथल्या ऊर्जेशी जोडले गेल्याची जाणीव होत आहे.

 

मित्रांनो,

सध्या देश आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे.  गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात असंख्य त्याग करून आपण हे स्वातंत्र्य मिळवले आहे.  या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्व भारतीयांच्या शिरावर आहे, आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे.  स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपल्यासमोर नवी उद्दिष्टे, नवे संकल्प आणि नवी आव्हाने आहेत.  अशा महत्त्वाच्या काळात आजचा भारत आपल्या सामर्थ्याबद्दलही सजग आहे आणि संसाधनांबद्दलही जागरूक आहे.  दुर्दैवाने पूर्वी आपल्या देशात असे मानले गेले होते की लष्कराशी निगडित साधनसामग्रीसाठी जे काही मिळेल, ते परदेशातूनच मिळेल. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पडते घ्यावे लागायचे, जास्त पैसे खर्च करावे लागायचे.  नवीन शस्त्रे, नवीन उपकरणे विकत घ्यायची असतील तर  ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालायची.  म्हणजे एखाद्याने अधिकाऱ्याने नस्ती (फाइल) सुरू केली, तर तो निवृत्त झाला तरी ती गोष्ट पोहोचायची नाही, असा काळ होता.  त्यामुळे गरजेच्या वेळी घाईगडबडीत शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात आली. इतकी अवस्था होती की  सुट्या भागांसाठीही आपण इतर देशांवर अवलंबून राहायचो.

 

मित्रांनो,

संरक्षण क्षेत्रामध्ये  आत्मनिर्भरतेचा संकल्प म्हणजे ती जुनी परिस्थिती बदलण्याचा एक सशक्त मार्ग आहे. देशाच्या संरक्षण खर्चासाठी जी तरतूद केली जात असते, आता त्याच्या जवळपास 65 टक्के देशांतर्गतच खरेदी करण्यासाठी खर्च होत आहे. आपला देश हे सर्व काही करू शकतो, देशाने करून दाखवले आहे. एक अभूतपूर्व पाऊल उचलून आता भारताने असेही निश्चित केले आहे की, 200 पेक्षा जास्त शस्त्रे-सामान आणि उपकरणे आता देशांतर्गत खरेदी करण्यात येतील. आत्मनिर्भर भारताचा हाच तर संकल्प आहे.  आगामी काही महिन्यांमध्ये यामध्ये आणखी सामग्री समाविष्ट होणार आहे. देशाला आत्मनिर्भर बनवणारी ही सकारात्मक सूची अधिक मोठी होईल. यामुळे देशाचे संरक्षण क्षेत्र बळकट होईल. नवनवीन हत्यारे, उपकरणे यांच्या निर्मितीसाठी गुंतवणुकीत वृद्धी होईल.

 

मित्रांनो,

आज आपल्या देशामध्ये अर्जुन रणगाडा बनविण्यात येत आहे. तेजससारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने तयार होत आहेत. अलिकडेच विजयादशमीला सात नवीन संरक्षण कंपन्याही राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या आहेत. आपल्याकडे ज्या ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत, त्या आता विशेष क्षेत्रामध्ये आधुनिक संरक्षण उपकरणे बनवणार आहेत. आज आपल्याकडे खाजगी क्षेत्रही राष्ट्राच्या सुरक्षेच्या संकल्पाचा सारथी बनत आहे. आपल्या अनेक नवीन संरक्षण सामग्रीचे स्टार्ट अप्स आज आपली ध्वजपताका फडकवित आहेत. आपले नवयुवक, 20,22,25 वर्षांचे तरूण कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी पुढे येत आहेत, ते पाहून त्यांच्याविषयी अभिमान वाटतो.

 

मित्रांनो,

उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये बनविण्यात येत असलेल्या संरक्षण कॉरिडॉरमुळे कामांचा वेग आणखी जास्त वाढणार आहे. आज अशी सर्व पावले आपण उचलत आहोत, त्यामुळे भारताचे सामर्थ्य वाढतेय त्याचबरोबर आपला देश संरक्षण क्षेत्रातला निर्यातदार म्हणून वेगळी आणि सशक्त ओळख निर्माण करणार आहे.

 

मित्रांनो,

आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे की-

को अतिभारः समर्थानाम।

याचा अर्थ असा आहे की, जो कोणी समर्थ असतो, त्याच्यासाठी अतिभार काही फार विशेष नसतो. तो अगदी सहजपणाने आपल्या संकल्पांना सिद्धीस नेत असतो. म्हणूनच आज आपण बदलते  विश्व, युद्धाचे बदलते स्वरूप यांच्या अनुसार आपली सैन्यशक्ती वाढवित आहोत. त्यांना नव्या ताकदीनिशी तयारही करायचे आहे. दुनियेत होत असलेल्या वेगवान परिवर्तनामुळे त्यानुसार  आपल्याला तयारीमध्ये बदल करावेच लागणार आहेत. आपल्याला माहिती आहेच, कोणी एकेकाळी हत्ती, घोडे यांच्या मदतीने लढाया होत होत्या. आता कोणी अशा प्रकारे लढण्याचा विचारही करणार नाही. लढाईचे स्वरूपच बदलले आहे. आधी युद्धाचे स्वरूप बदलण्यासाठी कदाचित अनेक दशके लागत होती. शतके उलटत होती. आज तर सकाळी एका वेगळ्या पद्धतीने लढाई सुरू असेल तर सायंकाळी युद्धाची पद्धत दुसरीच असेल. इतक्या वेगाने तंत्रज्ञान आपले स्थान घेत आहे. आजची युद्धकला फक्त ऑपरेशन्सच्या रिती-पद्धती यांच्यापर्यंत सीमित नाही. आज वेगवेगळ्या पैलूंमध्ये अधिक चांगले संतुलन, ताळमेळ ठेवून, तंत्रज्ञान आणि मिश्र व्यूहरचनांचा उपयोग करून खूप मोठा फरक निर्माण केला जातो. संघटित नेतृत्व, कृती यांच्यामध्ये अधिक चांगला समन्वय आज खूप आवश्यक आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक स्तरावर सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती असो अथवा संरक्षण व्यवहार मंत्रालयाची निर्मिती असो, अशा गोष्टी आपल्या सैन्यशक्तीला बदलत्या काळाबरोबर पावले टाकताना महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

 

मित्रांनो,

सीमावर्ती भागातील आधुनिक पायाभूत सुविधाही आपल्या सैन्याची ताकद अधिक मजबूत करणारी आहे. सीमावर्ती भागांमध्ये संपर्क यंत्रणेसाठी याआधी कशा प्रकारे काम होत होते, हे आज देशाचे लोक खूप चांगल्या प्रकारे जाणून आहेत. आता  आज लडाखपासून  अरूणाचल प्रदेशापर्यंत, जैसलमेरपासून ते अंदमान निकोबार बेटापर्यंत, आपल्या सीमा क्षेत्रांमध्ये ज्याठिकाणी सामान्य दळणवळण व्यवस्थाही नव्हती, तिथे सगळीकडे आज आधुनिक मार्ग, मोठमोठाले बोगदे, पूल आणि ऑप्टिकल फायबरचे जाळे टाकण्यात येत आहे. यामुळे आपल्या डिप्लॉयमेंट कॅपेबिलिटीमध्ये अभूतपूर्व सुधारणा झाली आहे. सैनिकांनाही आता अधिक सुविधा मिळत आहेत.

 

मित्रांनो,

नारीशक्तीला नवीन आणि समर्थ भारताची शक्ती बनविण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या सात वर्षात गांभीर्याने केला. प्रत्येक क्षेत्रात असे प्रयत्न होत आहेत. देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्येही भारताच्या कन्यांची भागीदारी आता नवीन विक्रम स्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नाविक दल आणि हवाईदलामध्ये युद्ध आघाडीवर तैनातीनंतर आता लष्करामध्येही महिलांच्या भूमिकेचा विस्तार केला जात आहे. लष्करी पोलिसांचे व्दार कन्यांसाठी मुक्त केल्यानंतर आता महिला अधिका-यांना कायमस्वरूपी कमिशन देणे, त्यांच्या भागीदारीचा विस्तार करण्याचाच एक भाग आहे. आता मुलींसाठी  राष्ट्रीय संरक्षण अकादमी, राष्ट्रीय लष्करी प्रशाला, आणि राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालय यांच्यासारख्या देशातल्या महत्वपूर्ण लष्करी संस्थांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यावर्षी 15 ऑगस्टला मी लाल किल्ल्यावरून अशीही घोषणा केली होती की, आता देशभरातल्या सर्व सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. यासाठी सर्वत्र वेगाने काम सुरू करण्यात आले आहे.

 

मित्रांनो,

मला तुमच्या या सैनिकी वेशामध्ये केवळ अथांग सामर्थ्याचे दर्शन होते असे नाही, तर मी ज्यावेळी तुम्हाला पाहतो, त्यावेळी मला अढळ सेवाभावाचे, ठाम संकल्पशक्तीचे आणि अतुलनीय संवेदनशीलतेचे दर्शन होते. म्हणूनच भारतीय सेना जगातल्या कोणत्याही इतर सेनेपेक्षा वेगळी आहे. या सेनेची वेगळी ओळख आहे. आपण विश्वातल्या शीर्ष सेनांप्रमाणे एक व्यावसायिक दल तर आहोतच मात्र तुमच्यामध्ये असलेले मानवीय मूल्य, तुमच्यावर असलेले भारतीय संस्कार तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे, एक असामान्य व्यक्तित्वाचे धनी बनवते. तुमच्यासाठी लष्करामध्ये येणे म्हणजे फक्त एक नोकरी करणे नाही. पहिल्या तारखेला वेतन येईल, यासाठी काही तुम्ही इथे येणारे लोक नाहीत. तुमच्यासाठी लष्करामध्ये येणे ही एक साधाना आहे. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी ऋषीमुनी साधना,तप करीत होते ना, मी आपल्या प्रत्येकामध्ये त्या साधकाचे रूप पाहतो आहे. आणि तुम्ही भारत मातेची साधना करीत आहात. तुम्ही जीवनाला एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवत आहात, ज्यामध्ये 130 कोटी देशवासियांचे आयुष्य जणू आपल्यामध्ये समाविष्ट होत आहे. हा साधनेचा मार्ग आहे. आणि आपण तर प्रूभ श्रीरामामध्ये आपले सर्वोच्च आदर्श शोधणारे लोक आहोत. लंकेवर विजय प्राप्त केल्यानंतर प्रभू श्रीराम ज्यावेळी अयोध्येला परतले होते, त्यावेळी असा उद्घोष करीत परतले होते - अपि स्वर्ण मयी लंका, न ये लक्ष्मण रोचत। जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।।

याचा अर्थ असा आहे की, सोने आणि समृद्धी यांनी भरलेल्या लंकेवर आम्ही नक्कीच विजय मिळवला आहे. परंतु आमची ही लढाई, आमच्या सिद्धांतासाठी आणि मानवतेच्या रक्षणासाठी होती. आमच्यासाठी तर आमची जन्मभूमीच आमची आहे. आम्हाला तिथेच परत जायचे आहे आणि त्या जन्मभूमीसाठीच जगायचे आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी प्रभू राम परत आले त्यावेळी संपूर्ण  अयोध्यानगरीने त्यांचे स्वागत एका मातेच्या रूपात केले. अयोध्येच्या प्रत्येक स्त्री-पुरूषाने, इतकेच नाही तर संपूर्ण भारतवर्षाने दिवाळीचे आयोजन केले. हाच भाव आपल्याला इतरांपेक्षा वेगळे बनवतो. आपली ही उदात्त भावना आपल्याला मानवीय मूल्यांच्या त्या अमर शिखरावर विराजमान करते. ती काळाच्या कोलाहलामध्ये, सभ्यतांमध्येही ठाम असते. इतिहास घडत असतो, बिघडत असतो. सत्ता येतात आणि जातात, साम्राज्यांची समृद्धी शिखरावर पोहोचते, त्याच प्रकारे साम्राज्ये लयाला देखील जातात. परंतु भारत हजारो वर्षांपूर्वीही अमर होता, भारत आजही अमर आहे आणि हजारो वर्षांनीही अमरच राहणार आहे. आपण राष्ट्राला शासन, सत्ता आणि  साम्राज्य यांच्या रूपात पाहत नाही. तर आपल्यासाठी तर हा साक्षात जीवंत आत्मा आहे.  त्याचे रक्षण करणे म्हणजे आपल्यासाठी केवळ भौगोलिक रेषांचे रक्षण करणे नाही. आपल्यासाठी राष्ट्र-रक्षा याचा अर्थ असा आहे की, राष्ट्रीय जीवंतपणाचे रक्षण, राष्ट्रीय एकतेचे रक्षण, आणि राष्ट्रीय अखंडतेचे रक्षण! म्हणूनच आपल्या लष्करामध्ये आकाशाला गवसणी घालणारे शौर्य आहे, तसेच त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये मानवता आणि करूणेचा सागरही आहे. म्हणूनच आमच्या सेना केवळ सीमेवरच पराक्रम  दाखवत नाहीत, ज्यावेळी देशाला गरज पडते, त्यावेळी तुम्ही सर्व आपत्ती, संकटे, रोगराई, महामारी यांच्यापासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी देखील मैदानात उतरत असता. जिथे कुठे कोणी पोहोचू शकत नाही, तिथे भारताची सेना पोहोचते. असा आज देशाचा अतूट विश्वास आहे. प्रत्येक हिंदुस्तानीच्या मनामध्ये हा भाव आपोआपच प्रकट होत असतो. सेना आली आहे ना, मग आता चिंता करण्याची गरजच नाही. सगळे काही होणार आहे. ही काही लहान गोष्ट नाही. आपण देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षक आहात. एक भारत-श्रेष्ठ भारत या संकल्पाचे रक्षक आहात.

मला पूर्ण विश्वास आहे की, तुमचे शौर्य पाहून त्यातून मिळत असलेल्या प्रेरणेने आम्ही आपल्या भारताला यापेक्षाही उंच, शीर्ष स्थानी घेवून जावू.

 

मित्रांनो,

दीपावलीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तुमच्या परिवारातल्या सर्व मंडळींना शुभेच्छा आणि तुमच्या सारख्याच वीर पुत्रांना-कन्यांना जन्म देणा-या त्या मातांनाही माझा नमस्कार. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना दीपावलीच्या अनेक-अनेक शुभेच्छा देतो. माझ्याबरोबर संपूर्ण ताकदीनिशी जयघोष करावा,-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

धन्यवाद!!

***

S.Patil/V.Ghode/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1769648) Visitor Counter : 270