पंतप्रधान कार्यालय

पीएम केयर्स अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पीएसए ऑक्सिजन प्लांटसच्या  लोकार्पणप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 07 OCT 2021 11:04PM by PIB Mumbai

 

भारत माता की जय,

भारत माता की जय,

उत्तराखंडचे राज्यपाललेफ्टनंट जनरल सेवानिवृत गुरमीत सिंह जी, युवा, ऊर्जावान आणि उत्साही मुख्यमंत्री, माझे मित्र श्री पुष्कर सिंह धामी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री मनसुख मांडवीया जी, श्री अजय भट्ट जी, उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष श्री प्रेमचंद अग्रवाल जी, उत्तराखंड सरकार मधील मंत्री आणि ज्यांचा आज वाढदिवसही आहेअसे डॉक्टर धन सिंह रावत, यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, देशातल्या विविध ठिकाणाहून या कार्यक्रमात सहभागी झालेले राज्यांचे मंत्रीमहोदय, लेफ्टनंट गव्हर्नर्स, राज्यातील इतर मंत्री, खासदार , आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !

उत्तराखंड ही देवभूमी कधीकाळी ऋषींच्या तपश्चर्येचे स्थान होती. योगनगरी या रूपाने जगभरातल्या लोकांना ती आजही आकर्षित करते. गंगामाईच्या जवळ आपण आहोत, आपल्या सर्वांना तिचा आशीर्वाद मिळतो आहे. आजपासून नवरात्रीचा पवित्र उत्सवही सुरु होतो आहे. आज पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री हिमालयाची कन्या आहे. आणि आज मला इथे येण्याची संधी मिळणे, इथल्या मातीला वंदन करणे, हिमालयाच्या या भूमीला वंदन करण्यापेक्षा अधिक आयुष्यात काय धन्यता असू शकेल? आणि आज मी इथे उत्तराखंड मध्ये आलो आहे इतर एका खास गोष्टीसाठी मला अभिनंदनही करायचे आहे. , ते अशासाठी की यावेळी टोक्यो ऑलिंपिक मध्ये या देवभूमीने विशेष कर्तृत्व गाजवले आहे. आणि म्हणूनच आपण सगळे लोक, अभिनंदनास पात्र आहात. उत्तराखंडच्या दिव्यधरेने माझ्यासारख्या अनेक लोकांच्या आयुष्याचे प्रवाह बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच ही भूमी माझ्यासाठीही महत्वाची आहे. या भूमी माझ्या मर्मस्थानी आहे, कर्मभूमी आहे, माझे तिच्याशी तत्वाचे नाते आहे आणि सत्वाचेही !

 

मित्रांनो,

आताच मुख्यमंत्र्यांनी जसे सस्मरण करुन दिले की आजच्याच दिवशी 20 वर्षे आधी मला जनतेची सेवा करण्यासाठी एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली होती. लोकांमध्ये राहून, लोकांची सेवा करण्याचा माझा प्रवास तर त्याआधी अनेक दशकांपासून सुरु झाला आहे. मात्र आजपासून बरोबर 20 वर्षांपूर्वी,गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मला नवी जबाबदारी देण्यात आली होती.  आणखी एक योगायोग म्हणजे उत्तराखंड सरकारची स्थापना ही 2000 साली झाली होती, आणि माझा प्रवास यानंतर काही महीन्यानंतर, वर्ष 2001 पासून सुरु झाला.

 

मित्रांनो,

सरकारचा प्रमुख या नात्याने पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि देशातल्या लोकांच्या आशीर्वादाने, देशाच्या पंतप्रधानपदी पोचणे,यांची मी तर कधी कल्पनाही केली नव्हती. वीस वर्षांचा हा अखंड प्रवास आता एकविसाव्या वर्षात प्रवेश करतो आहे. आणि अशा या महत्वाच्या वर्षात, ज्या भूमीने मला कायमच आपला स्नेह दिला, आपलेपणा दिला आहे, तिथे येणे, हे मी माझे सौभाग्य समजतो. हिमालयाची हि तपोभूमी, जी तप आणि त्यागाचा मार्ग दाखवते, त्या भूमीवर येऊन, कोट्यवधी भारतीयांची सेवा करण्याचा माझा संकल्प अधिकच दृढ झाला आहे, भक्कम झाला आहे. इथे येऊन मला एक नवी ऊर्जा मिळते.

 

बंधू आणि भगिनींनो

योग आणि आयुर्वेदाच्या ज्या शक्तिने जीवनाला निरोगी बनण्याचे समाधान दिले आहे, तिथूनच आज देशभरातील अनेक नव्या ऑक्सिजन प्लांटसचे लोकार्पण झाले आहे. देशातील विविध राज्यांमध्ये ऑक्सिजन प्लांटसच्या नव्या सुविधेसाठी मी आपल्या सर्वांना, देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो

शंभर वर्षातील सर्वात मोठ्या अशा या संकटाचा सामना आपण सर्व भारतीय ज्या धैर्याने करतो आहोत, त्याकडे संपूर्ण जग अत्यंत बारकाईने बघत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत, इतक्या कमी वेळात भारताने ज्या सुविधा तयार केल्या आहेत, त्या आपल्या देशाचे सामर्थ्य दर्शवणाऱ्या आहेत. फक्त एका चाचणी प्रयोगशाळेपासून ते सुमारे तीन हजार प्रयोगशाळांपर्यंतचे जाळे तयार करणे, मास्क आणि किटची आयात करण्यापासून ते आता त्याचे निर्यातदार होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत वेगाने झाला आहे. देशाच्या दुर्गम, दूरवरच्या गावात देखील नव्या वेंटिलेटर्सच्या सुविधा पोचवणे, भारतात उत्पादित, कोरोंना लसीचे अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन, जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वेगवान लसीकरण अभियान, भारताने हे सगळे जे करुन दाखवले आहे, ते आपल्या सर्वांची संकल्पशक्ती, आपला सेवाभाव आणि ऐक्याचेच प्रतीक आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

भारतात कोरोनाविरुद्धच्या लढाईत, एक आव्हान, आपली मोठी लोकसंख्या हे तर होतेच, त्याशिवाय भारताची विविधांगी भौगोलिक स्थिती हे ही एक मोठे आव्हान होते. ऑक्सिजन पुरवठ्यापासून ते लसीकरणापर्यंत, ही दोन आव्हाने देशासमोर सतत येत राहिली. देशाने त्यांचा कसं सामना केला, हे जाणून घेणे, समजून घेणे, प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

 

मित्रांनो,

एरवी भारतात, एका दिवसांत, 900 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचे उत्पादन होत असे. मागणी वाढताच, भारताने वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन 10 पटींनी अधिक वाढवले आहे. हे जगातील कोणत्याही देशासाठी एक अकल्पित लक्ष्य होते, मात्र भारताने ते साध्य करुन दाखवले आहे.

 

मित्रांनो,

इथे उपस्थित अनेक मान्यवरांना याची कल्पना आहे, की ऑक्सिजनच्या उत्पादनासोबतच, त्याची वाहतूक हे देखील किती मोठे आव्हान असते. ऑक्सिजन असाच, कुठल्याही टँकरमध्ये भरुन नेला जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी एक विशिष्ट टँकर हवा असतो. भारतात, ऑक्सिजनचे सर्वाधिक उत्पादन पूर्व भारतात होते, मात्र अडचण अशी की त्याची सर्वाधिक गरज, उत्तर आणि पश्चिम भारतात लागली.

 

बंधू आणि भगिनींनो,

या लॉजिस्टिक्सच्या आव्हानांचा सामना करतांना देशाने युद्धपातळीवर काम केले. देश आणि जगात, अहोरात्र, जिथून शक्य असेल, तिथून ऑक्सिजन प्लांटस, ऑक्सिजन टॅंकर्सची व्यवस्था केली गेली. विशेष ऑक्सिजन एक्सप्रेस देखील चालवल्या गेल्या. रिकामे टँकर्स जलदगतीने पोचवण्यासाठी, हवाईदलाच्या विमानांची मदत घेतली गेली. उत्पादन वाढवण्यासाठी डीआरडीओच्या मदतीने, तेजस लढावू विमानांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. पीएम केयर्स मुळे देशात पीएसए ऑक्सिजन प्लांटस लावण्याच्या कामाला तर गती मिळालीच; त्याशिवाय, एक लाखांपेक्षा अधिक ऑक्सिजन काँसंट्रेटर्ससाठी देखील निधी देण्यात आला.

 

मित्रांनो,

भविष्यात, कोरोनाशी आपली लढाई अधिकच मजबूत व्हावी, यासाठी, देशभरात पीएसए ऑक्सिजन प्लांटसचे जाळे तयार केले जात आहे. गेल्या काही महिन्यांत, पीएम केयर्स ने मंजूर केलेले 1150 पेक्षा अधिक ऑक्सिजन प्लांटस आता कार्यरत झाले आहेत. आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात पीएम केयर्स अंतर्गत, तयार करण्यात आलेले ऑक्सिजन प्लांटस आहेत. पीएम केयर्स च्या सहकार्याने तयार करण्यात आलेले हे ऑक्सिजन प्लांटस मोजले, तर, केंद्र सरकार, राज्य सरकारे या सर्वांच्या प्रयत्नांतून देशात सुमारे चार हजार ऑक्सिजन प्लांटस तयार होत आहेत. ऑक्सिजनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आता देश आणि देशातली रुग्णालये आधीपेक्षा कितीतरी सक्षम होत आहेत.

 

मित्रांनो

प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानस्पद गोष्ट आहे, की कोरोना लसीच्या 93 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. लवकरच,आपण एक कोटींचा आकडा ओलांडू शकू आणि ओलांडणार आहोतच ! भारताने कोविन प्लॅटफॉर्म तयार करुन संपूर्ण जगाला मार्ग दाखवला आहे, की इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण कसे केले जाते. डोंगराळ भाग असो किंवा वाळवंट, जंगल असो किंवा सागरी भाग, 10 लोक असोत किंवा 10 लाख लोक असोत, प्रत्येक क्षेत्रात आज आपण संपूर्ण सुरक्षितपणे लस पोहोचवतो आहोत. यासाठी, देशभरात एक लाख 30 हजार पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. इथे राज्य सरकारच्या प्रभावी व्यवस्थापन धोरणामुळे उत्तराखंड देखील पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट शंभर टक्के गाठणारे राज्य होणार आहे. आणि यासाठी, मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या पूर्ण चमूला, सरकारला छोट्या-मोठ्या कामात मदत करणाऱ्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो.

 

बंधू आणि भगिनींनो

जिथे सपाट भूप्रदेश आहे, तिथे कदाचित ही मोहीम सहजपणे राबवली जाऊ शकत असेल.मला या भूमीची चांगलीच माहिती आहे. इथे लस पोचवणे किती कठीण आहे, हिमालयाच्या पलीकडे जात, लोकांपर्यंत पोचणे किती कठीण असते, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. असे असून देखील, एवढे मोठे यश मिळवल्याबद्दल आपण सर्वच जन अभिनंदनास पात्र आहात..

 

बंधू आणि भगिनींनो

एकविसाव्या शतकातला भारत जनतेच्या अपेक्षा, जनतेच्या आवश्यकतांचे पूर्ण समाधान करतच पुढे वाटचाल करतो आहे. आज सरकार याची वाट बघत नाही, की नागरिक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतील, त्यावेळी काहीतरी पावले उचलू. सरकारी मानसिकता आणि व्यवस्थेला आम्ही या समाजातून बाहेर काढले आहे. आता सरकारच नागरिकांकडे जाते.

गरिबांकडे पक्के घर असावे, वीज, पाणी, शौचालय आणि गॅस जोडणी असो, 80 कोटींपेक्षा अधिक लोकांना मोफत शिधा पोचवणे असो, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हजारो कोटी रुपये जमा करणे असो, पेन्शन आणि विम्याची सुविधा प्रत्येक भारतीयापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असो, लोकहिताचे असे प्रत्येक लाभ, जलद गतीने, पात्र लाभार्थीपर्यंत पोचले आहेत.

 

मित्रहो,

आरोग्य क्षेत्रात हाच दृष्टीकोन घेऊन भारत पुढे जात आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गाची बचतही होत आहे आणि त्यांना सुविधाही मिळत आहेत. पूर्वी कोणाला गंभीर आजार असेल तर आर्थिक मदतीसाठी नेत्यांकडे किंवा सरकारी कार्यालयाच्या खेपा मारत असत. आयुष्मान भारत योजनेने ही समस्या कायमस्वरूपी नष्ट केली. रूग्णालयाबाहेर लांबच लांब रांगा, उपचारासाठी होणारा विलंब, वैद्यकीय पूर्वेतिहासाचा अभाव यामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत असे. आता आयुष्मान भारत डिजिटल मिशनद्वारे प्रथमच याचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 

मित्रहो,

लहान-लहान उपचारासाठी, आजारपणात नित्याच्या तपासणीसाठी ये-जा करणे किती त्रासाचे ठरते हे उत्तराखंडमधल्या लोकांशिवाय कोण उत्तम जाणू शकते.लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी आता ई संजीवनी अ‍ॅप ही सुविधा देण्यात आली आहे. यामुळे गावात आपल्या घरी बसल्या बसल्या रुग्ण, शहरांमधल्या डॉक्टरांकडून सल्ला घेत आहेत. याचा लाभ आता उत्तराखंडच्या लोकांनीही घ्यायला सुरवात केली आहे.

 

बंधू-भगिनीनो,

आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत सेवा पोहोचण्यासाठी एक बळकट आरोग्य पायाभूत संरचना अतिशय आवश्यक असते. 6-7 वर्षांपूर्वी केवळ काही राज्यांमध्ये एम्सची सुविधा होती, आज प्रत्येक राज्यात एम्स पोहोचवण्याचे काम सुरु आहे. 6 एम्स पासून पुढे जात 22 एम्स चे बळकट  जाळे निर्माण करण्याच्या दिशेने आपण वेगाने वाटचाल करत आहोत.देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असावे असेही सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी गेल्या सात वर्षात देशात 170 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. डझनाहून अधिक नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरु आहे. इथे माझ्या उत्तराखंडमधेही रुद्रपुर, हरिद्वार आणि  पिथोरागडमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना  मंजुरी देण्यात आली आहे.

 

मित्रहो,

उत्तराखंडच्या निर्मितीचे स्वप्न अटल जी यांनी पूर्ण केले. कनेक्टीव्हिटीचा थेट संबंध विकासाशी आहे असे अटल जी मानत असत.त्यांच्याच प्रेरणेने आज देशात  कनेक्टीव्हिटीशी निगडीत पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व गतीने आणि मोठ्या प्रमाणात काम होत आहे. उत्तराखंडचे सरकारही या संदर्भात गांभीर्याने काम करत आहे याचा मला आनंद आहे. बाबा केदार च्या आशीर्वादाने केदारधामची भव्यता अधिक वाढवण्यात येत आहे, भाविकांसाठी  तिथे नव्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत.ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून या कामांच्या प्रगतीचा मी अनेकदा आढावा घेत असतो. चारधामना जोडणाऱ्या सर्व हवामानात सुरु राहणाऱ्या रस्त्यांचे काम वेगाने सुरु आहे. चारधाम प्रकल्प, देश आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा तर करतच आहे त्याचबरोबर गढवाल आणि कुमाऊच्या आव्हानात्मक क्षेत्रांना परस्परांशी जोडतही आहे. कुमाऊमधला चारधाम रस्त्याचा सुमारे दीडशे किलोमीटरच्या पट्ट्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होणार आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गामुळेही उत्तराखंडच्या रेल्वे कनेक्टिविटीचा आणखी विस्तार होईल. रस्ते आणि रेल्वे याशिवाय हवाई कनेक्टिविटी संदर्भातल्या कामांचा लाभही उत्तराखंडला मिळाला आहे. डेहराडून विमानतळाची क्षमता 250 प्रवाश्यांवरून वाढवून  1200 पर्यंत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री धामी जी यांच्या उत्साही नेतृत्वाखाली उत्तराखंड मध्ये हेलीपोर्ट पायाभूत संरचनेला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

 

मित्रहो,

पाण्याच्या संदर्भातही उत्तराखंड मध्ये आज प्रशंसनीय काम होत आहे. याचा मोठा लाभ इथल्या महिलांना मिळू लागला आहे. त्यांचे जीवन अधिक सुलभ होऊ लागले आहे. 2019मध्ये जल जीवन अभियान सुरु होण्यापूर्वी उत्तराखंड मधल्या केवळ  1 लाख 30 हजार घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत असे. आज उत्तराखंड मधल्या 7 लाख 10 हजार घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होऊ लागला आहे. म्हणजे केवळ 2 वर्षात राज्यात सुमारे 6 लाख घरांना नळ जोडण्या मिळाल्या आहेत. उज्ज्वला योजने अंतर्गत मिळालेल्या गॅस जोडण्यानी महिलांना दिलासा दिला, स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेल्या शौचालयांमुळे महिलांना सुविधा, सुरक्षा आणि सन्मान दिला त्याच प्रमाणे जल जीवन अभियाना अंतर्गत होणाऱ्या नळ जोडण्या महिलांना मोठी सुविधा देत आहे.

 

मित्रहो,

देशाच्या सुरक्षेत उत्तराखंडची मोठी भूमिका आहे. इथले वीर जवान, वीर कन्या भारतीय सुरक्षा दलांचा गौरव आणि अभिमान आहेत. आमचे सरकार प्रत्येक जवान, माजी सैनिकांच्या हितासाठी सर्वतोपरी काम करत आहे. वन रॅन्क वन पेन्शनलागू करून सैनिक बंधूंची 40 वर्षांची मागणी आमच्या सरकारनेच पूर्ण केली. आमचे धामी जी तर स्वतः सैनिकाचे पुत्र आहेत. वन रॅन्क वन पेन्शनया निर्णयाने सैनिकांना किती मोठी मदत झाली आहे हे ते सांगत होते.

 

मित्रहो,

आमच्या सरकारने दिल्लीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारून देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.आमच्या सरकारने बॅटल कॅज्युअल्टी वेल्फेअर फंडाचा लाभ लष्कराबरोबरच नौदल आणि हवाई दलाच्या शहीदांनाही सुनिश्चित केला.आमच्या सरकारने जेसीओ आणि अन्य श्रेणीच्या पदोन्नती संदर्भात गेल्या चार दशकांपासून सुरु असलेल्या बाबीचे निराकरण केले आहे. माजी सैनिकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवत आहोत.

 

मित्रहो,

आपल्या सैन्यातल्या झुंजार वीरांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे असताना, आपल्या संरक्षणासाठी आधुनिक उपकरणे असताना ते  तितक्याच सहजपणे शत्रूशी मुकाबला करू शकतात. अशा ठिकाणी जिथे हवामान नेहमी खराब असते, तिथे आधुनिक उपकरणांची त्यांना खूप मदत होते. आमच्या सरकारने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे जे अभियान सुरु केले आहे, त्याचीही आपल्या सैनिकांना मोठी मदत होणार आहे. सरकारच्या या सर्व प्रयत्नांचा लाभ निश्चितच उत्तराखंडला,इथल्या जनतेलाही होईल.

 

बंधू-भगिनीनो,

देवभूमीची, दशकापासुनची  उपेक्षा दूर करण्याचा आम्ही अतिशय प्रामाणिक आणि तळमळीने प्रयत्न करत आहोत.उत्तम पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर ओसाड पडलेली गावे पुन्हा गजबजू लागली आहेत. कोरोना काळात इथल्या युवकांशी, शेतकऱ्यांशी माझा अनेकदा संवाद झाला. आपल्या घरापर्यंत रस्ता झाला आहे, आता त्यांनी होम स्टे सुरु केले आहे असे ते सांगतात तेव्हा आनंद होतो. नव्या पायाभूत सुविधांमुळे कृषी, पर्यटन- तीर्थयात्रा आणि उद्योगांसाठी, युवावर्गासाठी अनेक नव्या संधींची दालने खुली होणार आहेत. 

 

मित्रहो,

उत्तराखंडमध्ये उत्साहाने सळसळणारी  टीम आहे. येत्या काही वर्षात उत्तराखंड आपल्या स्थापनेच्या 25 व्या वर्षात प्रवेश करेल. उत्तराखंडला नजीकच्या भविष्यात 25 वर्ष होणार आहेत. तेव्हा उत्तराखंड ज्या शिखरावर असेल ते निश्चित करण्याचा त्यासाठी जोमाने कामाला लागण्याचा हा काळ आहे. केंद्र सरकार, उत्तराखंडच्या या नव्या चमूला संपूर्ण सहाय्य करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे एकत्रित प्रयत्न इथल्या जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीचा मोठा आधार आहे.विकासाचे हे दुहेरी इंजिन उत्तराखंडला नव्या शिखरावर नेणार आहे. बाबा केदारच्या कृपेने आपण प्रत्येक संकल्प पूर्णत्वाला नेऊ, या आकांक्षेसह आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद.  

धन्यवाद !

***

M.Chopade/R.Aghor/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762109) Visitor Counter : 227