पंतप्रधान कार्यालय

देशातील प्राणवायू व औषधांची उपलब्धता आणि पुरवठा यांचा पंतप्रधानांनी घेतला आढावा


औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी व लागेल ती मदत पुरविण्यासाठी भारत सरकार सातत्याने उत्पादकांच्या संपर्कात

गेल्या काही आठवड्यात रेमडेसीवीरसह सर्व औषधद्रव्यांच्या उत्पादनात भरीव वाढ

पहिल्या लाटेच्या शिखरबिंदूच्या वेळी असणाऱ्या पुरवठ्याच्या तुलनेत आता प्राणवायूचा तिपटीपेक्षा अधिक पुरवठा

Posted On: 12 MAY 2021 10:16PM by PIB Mumbai

 

प्राणवायू आणि औषधांच्या उपलब्धता आणि पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

कोविड आणि म्युकोरमायकोसिस या दोन्हींच्या व्यवस्थापनात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या पुरवठ्यावर सरकार सक्रियपणे देखरेख करत असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. उत्पादन वाढविण्यासाठी व गरजेची सर्व मदत देण्यासाठी सरकार सातत्याने उत्पादकांच्या संपर्कात असल्याचेही मंत्रिमहोदयांनी पंतप्रधानांना सांगितले. अशा प्रत्येक औषधद्रव्यांच्या आणि त्यांच्या घटकांच्या उत्पादन व साठ्याविषयीही माहिती देण्यात आली. राज्यांना चांगल्या प्रमाणात औषधे पुरविण्यात येत असल्याबद्दल चर्चा झाली. रेमडेसीवीरसह सर्व औषधद्रव्यांचे उत्पादन गेल्या काही आठवड्यांत भरघोस वाढविण्यात आल्याचेही पंतप्रधानांना सांगण्यात आले. "भारतात औषधनिर्मिती क्षेत्र अतिशय मजबूत असून सरकारने त्याच्याबरोबर सातत्यपूर्ण समन्वयाचे धोरण ठेवल्याने सर्व औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकत आहेत", असे पंतप्रधान म्हणाले.

देशात प्राणवायूची उपलब्धता आणि पुरवठा याचाही आढावा पंतप्रधानांनी घेतला. पहिल्या लाटेच्या चरमबिंदूच्या वेळी असणाऱ्या पुरवठ्याच्या तुलनेत आता प्राणवायूचा तिपटीपेक्षा अधिक पुरवठा होत असल्याविषयी यावेळी चर्चा झाली. ऑक्सिजन रेल्वे आणि प्राणवायूसाठी भारतीय वायुदलाच्या विमानांच्या उड्डाणांविषयी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन सिलेंडर या सामग्रीच्या खरेदीची स्थिती तसेच पीएसए पद्धतीच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीची सद्यस्थिती- याविषयीही त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

राज्यांनी व्हेन्टिलेटर्स म्हणजेच जीवरक्षक प्रणालींचे कार्यान्वयन ठराविक कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच उत्पादकांच्या मदतीने त्यातील तांत्रिक व प्रशिक्षणविषयक अडचणी सोडवून घ्याव्यात असा अभिप्राय पंतप्रधानांनी व्यक्त केला.

***

M.Chopade/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718167) Visitor Counter : 312