पंतप्रधान कार्यालय

जागतिक जल दिनाचे औचित्य साधत ‘जल शक्ती अभियान: वर्षा जल संचय’ अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ


केन बेतवा जोड प्रकल्पासाठी ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

भारताचा विकास आणि आत्मनिर्भरता जल सुरक्षा आणि जल कनेक्टीव्हिटीवर अवलंबून असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

Posted On: 22 MAR 2021 4:44PM by PIB Mumbai

 

जागतिक जल दिनाचे औचित्य साधत जल शक्ती अभियान: कॅच द रेनअर्थात वर्षा जल संचयअभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे शुभारंभ केला. केन बेतवा जोड प्रकल्प या, नद्या जोडण्यासाठीच्या राष्ट्रीय दृष्टीकोन आराखड्याच्या पहिल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी, पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जल शक्ती मंत्रालय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचे सरपंच आणि वॉर्ड पंच यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

जागतिक जल दिनी केन बेतवा जोड कालव्यासाठी महत्वाचे पाऊल उचलण्याबरोबरच  कॅच द रेनअभियानाची सुरवात केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या लाखो शेतकऱ्यांच्या हितासाठी  अटलजी यांचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीने हा करार महत्वाचा आहे असे ते म्हणाले. जल सुरक्षा आणि प्रभावी जल व्यवस्थापनावाचून वेगवान विकास शक्य नसल्याचे सांगून भारताचा विकास आणि आत्मनिर्भरता, आपले जल स्त्रोत आणि जल कनेक्टीव्हिटीवर अवलंबून असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

भारताच्या विकासाबरोबरच पाणी टंचाईचे संकट तितकेच वाढत आहे. देशाच्या भावी पिढ्यांसाठी आपले उत्तरदायित्व निभावण्याची सध्याच्या पिढीची जबाबदारी आहे.  सरकारने आपली धोरणे आणि निर्णय यामध्ये जल प्रशासनाला प्राधान्य दिले आहे. या दिशेने गेल्या सहा वर्षात अनेक पावले उचलण्यात आल्याचे ते म्हणाले. प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना, प्रत्येक शेताला पाणी पुरवण्यासाठीचे हर खेत को पानी, नमामि गंगे, जल जीवन अभियान किंवा अटल भूजल योजना याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या सर्व योजनांबाबत काम वेगाने हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाच्या पाण्याचे भारत जितके उत्तम व्यवस्थापन करेल तितकेच देशाचे भूजलावरचे अवलंबित्व कमी होईल.  म्हणूनच कॅच द रेनसारख्या अभियानाचे यश महत्वाचे आहे. जल शक्ती अभियानात नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांचा समावेश करण्यात आला आहे. पावसाळ्या पर्यंतच्या दिवसात जल संवर्धनाच्या प्रयत्नांना गती देण्याचे आवाहन त्यांनी केले. सरपंचाचे महत्व अधोरेखित करतानाच, संपूर्ण देशात आयोजित करण्यात आलेली जल शपथही प्रत्येकाची प्रतिज्ञा व्हयला हवी असे त्यांनी सांगितले. पाण्याचे महत्व आपण जाणून घेतले तर निसर्गही आपल्याला साथ देईल.

रेन वॉटर हार्वेस्टिंग बरोबरच देशातल्या नद्यांच्या पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत दशकांपासून चर्चा होत राहिली. पाण्याच्या संकटापासून देश सुरक्षित राहावा यासाठी या दिशेने झपाट्याने काम करणे आवश्यक आहे. याच दृष्टिकोनाचा एक भाग म्हणजे केन बेतवा जोड प्रकल्प आहे. हा प्रकल्प वास्तवात साकारल्याबद्दल त्यांनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सरकारची प्रशंसा केली.

दीड वर्षांपूर्वी, देशातल्या 19 कोटी ग्रामीण कुटुंबापैकी केवळ 3.5 कोटी कुटुंबाना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळत होते. जल जीवन अभियानाची सुरवात झाल्यानंतर, अल्पावधीत 4 कोटी नव्या कुटुंबाना नळाद्वारे पेय जल मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. लोक सहभाग आणि स्थानिक प्रशासन मॉडेल हे जल जीवन अभियानाचा गाभा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखादे सरकार पाणी परीक्षणाबाबत गांभीर्याने काम करत आहे. यासाठीच्या अभियानात ग्रामीण भागातल्या कन्या आणि भगिनींना समाविष्ट करून घेण्यात आले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोरोना काळातही  4.5 लाख महिलांना पाणी तपासणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले. पाणी चाचणी साठी प्रत्येक गावात किमान 5 प्रशिक्षित महिला असाव्यात याकडे लक्ष पुरवण्यात येत आहे. जल सुशासनात महिलांच्या वाढत्या सहभागासह उत्तम परिणाम आश्वासक असल्याचे ते म्हणाले.

 

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706633) Visitor Counter : 394