पंतप्रधान कार्यालय

इतकी व्यापक लसीकरण मोहीम मानव इतिहासात अभूतपूर्व-पंतप्रधान

लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याची वैज्ञानिक आणि तज्ञांकडून खातरजमा झाल्यानंतरच मेड इन इंडिया लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली - पंतप्रधान

जगभरात 60 टक्के बालकांना मेड इन इंडिया जीव रक्षक लसी देण्यात येत असल्याची पंतप्रधानांची माहिती

Posted On: 16 JAN 2021 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रारंभ केला. संपूर्ण देशभरात राबवली जात असलेली ही मोहीम म्हणजे जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार असून जगभरातल्या सुमारे 100 देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे असे सांगून त्यांनी या मोहिमेच्या अभूतपूर्व व्यापकतेची कल्पना दिली.  ही संख्या दुसऱ्या टप्यात 30 कोटी पर्यंत न्यायची असून यामध्ये वयस्कर आणि गंभीर बहु व्याधी असलेल्या लोकांना लस दिली जाणार आहे. 30 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले भारत, अमेरिका आणि चीन हे तीनच देश असल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या व्यापक प्रमाणातली लसीकरण मोहीम इतिहासात अभूतपूर्व असल्याचे सांगून यातून भारताची क्षमता सिद्ध होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

अफवा आणि अपप्रचार यांना थारा देऊ नका असे आवाहन त्यांनी केले. मेड इन इंडिया अर्थात भारतात उत्पादन केलेल्या आणि आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलेल्या या लसी सुरक्षितता आणि परिणामकारकता या आघाड्यांवर वैज्ञानिक आणि तज्ञ आश्वस्त झाल्यानंतरच  त्यांना परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय लस वैज्ञानिक, वैद्यकीय व्यवस्था, प्रक्रिया आणि संस्थात्मक यंत्रणा यांची जागतिक स्तरावर विश्वासार्हता  असून सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर ही विश्वासार्हता कमावली असल्याचे ते म्हणाले. भारतात उत्पादित आणि कठोर भारतीय वैज्ञानिक चाचण्या पार केलेल्या जीव रक्षक लसी जगातली 60 टक्के बालके घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय लस आणि लस वैज्ञानिक यांच्या वरचा जगाचा विश्वास या मेड इन इंडिया लसीमुळे अधिक बळकट होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारतीय लसी या केवळ स्वस्तच नव्हे तर उपयोग करण्यासाठीही सुलभ आहेत. काही विदेशी लसींची प्रती डोससाठी पाच हजार रुपये इतकी किंमत असून त्यांच्या साठवणीसाठी उणे 70 डिग्री तापमानाची आवश्यकता असते याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर भारतात तयार झालेल्या लसी या भारतात अनेक वर्षापासून उपयोगात येणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे  त्यांनी सांगितले. साठवण ते वाहतूक या सर्वच आघाड्यांवर या लसी भारतातल्या परिस्थितीसाठी अनुकूल आहेत असे सांगून कोरोना विरोधातल्या लढ्यात त्या  निर्णायक विजय प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

कोरोना विरोधातला लढा आत्मविश्वास आणि आत्मनिर्भर राहिला आहे. आत्मविश्वास डळमळीत होऊ द्यायचा नाही हा निर्धार प्रत्येक भारतीयात असल्याची प्रचीती आल्याची  ते म्हणाले. एक कोरोना चाचणी प्रयोगशाळा ते 2300 प्रयोगशाळांचे भक्कम जाळे, मास्क, पीपीई आणि व्हेंटीलेटर साठी दुसऱ्यावर अवलंबून असल्याच्या स्थितीतून आता या वस्तूंसाठी आत्मनिर्भर होण्याबरोबरच त्यांची निर्यात करण्याची क्षमता या प्रवासाचे त्यांनी स्मरण केले.  लसीकरण अभियानातही असाच आत्मविश्वास आणि स्वयंपूर्णतेच्या भावनेचे दर्शन घडवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1689144) Visitor Counter : 108