पंतप्रधान कार्यालय

भारत-बांगलादेश आभासी परिषदेचे संयुक्त निवेदन

Posted On: 17 DEC 2020 11:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2020

 

  1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या दरम्यान 17 डिसेंबर 2020 रोजी दूरस्थ पद्धतीने परिषद पार पडली. उभय बाजूंनी द्विपक्षीय संबधांच्या सर्व पैलूंवर सविस्तर चर्चा केली व प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय बाबींवर विचारविनिमय केला.

 

भारत-बांगलादेश भागीदारी

  1. उभय देशांमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक, भाषिक आणि इतर अनेक स्वतंत्र बाबींमधील एकसमानतेने बांधलेल्या  सध्याच्या उभयपक्षीय संबधांबाबत दोन्ही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भारत व बांगलादेशातील संबध हे पूर्वापारचे असून सार्वभौमत्व, समता, विश्वास व सहमतींवर  आधारित भागीदारीचे प्रतिक आहेत असे त्यांनी  ठामपणे सांगीतले. त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धातील शहीद म्हणजेच मुक्तीयोद्धे व भारतीय सैनिक यांनी 1971 मध्ये केलेल्या महान त्यागाचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या दोन्ही मित्र देशांमधील नागरीकांचे आशास्थान असणाऱ्या लोकशाही व समता या मूल्यांचे रक्षण व त्यांचा पुरस्कार करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
  2. बांगलादेशच्या पंतप्रधान ऑक्टोबर 2019मध्ये अधिकृत दौऱ्यादरम्यान दिल्लीत असताना  घेतल्या गेलेल्या निर्णयांबाबत प्रगती सुरू असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.  सप्टेंबर 2020मध्ये संयुक्त सल्लागार आयोगाच्या सहा बैठका यशस्वीरित्या पार पडल्याचे आठवण दोघांनी सांगितली.

 

आरोग्य क्षेत्रात सहयोग – जागतिक पातळीवरील आरोग्यासंबधीच्या आव्हानाचा वेध

  1. उभय देशानी आपापल्या देशातील कोविड 19 महामारीसंबधीत परिस्थितीचा आढावा घेतला व या संकटातही दोन्ही देशांमधील बंध ज्या पद्धतीने कायम राखले गेले त्यावद्दल संतोष व्यक्त केला. शेजारी देशांबाबत ‘शेजारधर्म प्रथम’ (Neighbourhood First Policy) हे भारताचे धोरण असून त्यामध्ये बांगलादेशला सर्वाधिक प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस भारतात तयार झाल्यावर ती बांगलादेशमध्येही पुरवली जाईल असा विश्वास दिला. या क्षेत्रातील  दोन्ही देशांदरम्यानच्या खाजगी क्षेत्रादरम्यानच्या द्विपक्षीय संबधांची दखलही दोन्ही नेत्यांनी घेतली.
  2. भारताने रोगनिवारणात सहयोग व लसउत्पादनात भागीदारीचा प्रस्ताव दिला. वैद्यकीय व्यावसायिकांची क्षमता वाढवण्यासाठी बंगाली भाषेतील अभ्यासक्रम आयोजित केल्याबद्दल  बांगलादेशने प्रशंसा केली.

 

सांस्कृतिक सहयोग- ऐतिहासिक दुव्यांचा संयुक्त उत्सव

  1. सध्या सुरू असलेल्या ‘मुजिब बोर्शो’च्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करून भारताने प्रगट केलेल्या आपुलकीबद्दल  पंतप्रधान शेख हसीना यांनी मनःपूर्वक आनंद व्यक्त केला. बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने  भारत सरकारने जारी केलेल्या स्मरणात्मक (कॉमोमरेटीव्ह) टपालतिकिटाचे अनावरण दोन्ही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. नुकत्याच सप्टेंबर 2020 ला साजऱ्या झालेल्या महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ बांगलादेशाने टपालतिकीट प्रसारित केल्याबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आभार मानले.
  2. महात्मा गांधी व बंगबंधू या विसाव्या शतकातील दोन महान नेत्याच्या स्मरणार्थ भरवल्या गेलेल्या डिजिटल प्रदर्शनाची ओळख करुन देणारा व्हिडीओही यावेळी दाखवण्यात आला. बांगलादेश व भारताच्या विविध शहरांमधून तसेच जगभरातील निवडक शहरांमध्ये व संयुक्त राष्ट्रसंघात हे प्रदर्शन भरवले जावे, त्यामुळे विशेषतः युवावर्गाला न्याय, समता आणि अहिंसा या मूल्यांची प्रेरणा मिळेल असा विश्वास दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
  3. बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्यावरिल चरित्रपटाचे काम भारतीय दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली जानेवारी 2021 पासूम सुरू होणार असल्याची दोन्ही बाजूंनी नोंद घेतली.
  4. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याचा पन्नासावा वर्धापनदिन व भारत बांगलादेश यांच्यामधील राजनैतिक संबंधांचा आरंभ यामुळे भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबधांच्या दृष्टीने 2021 हे वर्ष ऐतिहासिक महत्वाचे असल्याची उभयतांना दखल घेतली व भारत, बांगलादेश आणि एकूणच तिसऱ्या जगातील देशांच्या दृष्टीने युगारंभ करणाऱ्या महत्वपूर्ण घटनेच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम संयुक्तरित्या आयोजित करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.
  5. बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक महत्वाच्या, बांगलादेश भारत सीमेवरील मुजीबनगर ते नोदिया दरम्यानच्या रस्त्याला “शोधिनोता शोरक”  असे नामकरण करण्याचा बांगलादेशचा प्रस्ताव विचारात घेण्याची विनंती बांगलादेशच्या पंतप्रधानांनी भारताला केली.   
  6. संस्कृती, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, युवा, क्रीडा आणि जनमाध्यमांच्या उन्नतीसाठी संबधित चमूची परस्परांमध्ये देवाण घेवाण सुरू ठेवण्याचा दोन्ही बाजूनी पुनरुच्चार केला. 

 

सीमा व्यवस्थापन व संरक्षण सहयोग

  1. इच्छामती, कालिंदी, रायमोंगोल व हरियाभंगा नद्यांच्या परिसरात मेन पिलर 1 ते भूमी सीमा स्थानक या दरम्यान सीमारेखन पूर्ण करून त्याचे  पट्टी नकाशे तयार करण्याच्या दृष्टीने संयुक्त सीमा परिषदेच्या प्राथमिक बैठका भरवण्यावर दोन्ही बाजूमध्ये एकमत झाले.  कुहसीयारा नदीदरम्यानची आंतरराष्ट्रीय सीमा ही निश्चित सीमा करण्यासाठी काम करण्यावर उभय बाजू सहमत झाल्या.
  2. पद्मा नदीमार्गात राजशाही जिल्ह्याजवळून 1.3 किमीचा सरळ मार्ग काढून देण्याच्या विनंतीचा बांगलादेशने पुनरुच्चार केला. या विनंतीवर विचार करण्याचे आश्वासन भारताच्या बाजूने देण्यात आले.
  3. भारतातील त्रिपुरा ते बांगलादेश क्षेत्रापासून सुरुवात करून दोन्ही देशांमधील सर्व आंतरराष्ट्रीय सीमांपैकी उरलेल्या भागात लवकरात लवकर कुंपण घालण्याचे काम सुरू करून ते पूर्णत्वाला नेण्यावर दोन्ही नेते सहमत झाले. सीमारेषेजवळ नागरिकांचे जाणारे बळी हा चिंतेचा विषय आहे यावरही दोन्ही नेते सहमत झाले, आणि दोन्ही सीमादलांना यासाठीच्या संयुक्त प्रयत्नांवर लक्ष्य केंद्रीत करून, वेग देत अश्या घटना शून्यावर आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. समन्वयीन सीमा व्यवस्थापन योजना पूर्णतः लागू करण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. शस्त्रास्त्रे, अंमली पदार्थ, नकली चलन यांच्या अवैध वाहतुकीला तसेच  मानवी तस्करी विशेषतः महिला व बालकांची तस्करी यांना आळा घालण्याच्या हेतूने दोन्ही सीमा रक्षक दलांच्या अलीकडील नियोजनबद्ध प्रयत्नांची उभय बाजूंनी संतोषपूर्वक दखल घेतली.
  4. बांगलादेश व भारत हे दोन्ही देश नैसर्गीक संकटांना वेळोवेळी सामोरे जातात, हे लक्षात घेऊन आपत्कालिन व्यवस्थापनाच्या क्षेत्रात लवकरात लवकर सामंजस्य करार आकाराला आणण्याच्या सूचना  दोन्ही देशांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या.
  5. जागतिक शांततेला आणि सुरक्षेला असलेला दहशतवादाचा धोका ओळखून, दोन्ही बाजूंनी दहशतवादाच्या कोणत्याही प्रकाराला आणि स्वरूपाला थारा न देण्याचा पुनरुच्चार केला.
  6. दोन्ही बाजूंनी  परस्परांच्या देशांमध्ये नागरिकांची येजा सुलभ करण्यावर  दोन्ही बाजूंनी भर दिला. वैध कागदपत्रांसहीत प्रवास करत भारताच्या भूमीवर येणाऱ्या वा तिथून प्रस्थान करणाऱ्या बांगलादेशीयांवरील अजूनही असलेले काही निर्बंध हटवून त्यांना अखाउरा (त्रिपुरा) व घोजदंगा (पश्चिम बंगाल) येथील तपासणी नाक्यापासून सुरुवात करत टप्प्याटप्प्याने प्रवासाची मुभा देण्याच्या भारताच्या आधीच्या आश्वासनाची त्वरीत अंमलबजावणी करण्याची विनंती बांगलादेशच्या बाजूने करण्यात आली.

 

वाढीसाठी व्यापार भागीदारी

  1. SAFTA अंतर्गत 2011 पासून भारतात बांगलादेशातील आयातीस विनाशुल्क आणि अमर्यादित प्रवेश (कोटा फ्री) मिळाल्याबद्दल पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रशंसा केली.  उभय देशांना SAFTA सवलतींचा पूर्ण लाभ घेता यावा यासाठी प्रवासेतर अडचणींचा वेध घेणे तसेच बंदरांवरुन वाहतूकीसाठीचे निर्बंध, प्रक्रियाजन्य अडचणी व अलगीकरण निर्बंध या बाबींसंबधीत समस्यांचे निराकरण करण्यावर उभय पंतप्रधानांनी भर दिला. भारताकडून बांगलादेशात जीवनावश्यक वस्तूंच्या होणारी निर्यात हा  बांगलादेशाचा अंतर्गत बाजारावर परिणाम करणारा महत्वाचा घटक असल्यामुळे भारत सरकारच्या आयात-निर्यात धोरणात होणाऱ्या कोणत्याही बदलाची आगावू सूचना मिळावी अशी विनंती बांगलादेशच्या बाजूने करण्यात आली. भारताच्या बाजूने या विनंतीची नोंद घेण्यात आली.
  2. कोविड-19 दरम्यान  बाजूने दरवाजे असलेले कंटेनर व पार्सल गाड्यांचा वापर करत दोन्ही देशांदरम्यान असलेल्या रेल्वे रुळांवरून मालाची देवाणघेवाण तसेच मालाचा विनाव्यत्यय पुरवठा सुरु ठेवल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी व्यावसायिकांचे आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
  3. द्विपक्षीय आर्थिक व व्यापारी संबधांमध्ये असलेली अमर्यादित क्षमता लक्षात घेता, दोन्ही पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना द्विपक्षीय व्यापक भागीदारी करार (CEPA) करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी सुरु असलेला  संयुक्त अभ्यास निष्कर्षाप्रत आणण्याच्या सूचना दिल्या.
  4. यावर्षी सुरुवातीला होणाऱ्या भारत- बांगलादेश वस्त्रोद्योग चर्चासत्राच्या पहिल्या बैठकीचे स्वागत करत उभय नेत्यांनी वस्त्रोद्योगातील वाढते दुवे व सहभाग यांच्या महत्वावर जोर दिला, तसेच भारत सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय व बांगलादेशाचे वस्त्रोद्योग व ज्युट मंत्रालय यांच्यामधील सामंजस्य करारावर सुरु असलेल्या वाटाघाटी निष्कर्षाप्रत आणण्याच्या सूचना केल्या. बांगलादेशातून भारतात निर्यात होणाऱ्या ज्युट उत्पादनांवरील अँटी डम्पींग व अँटी सर्कमव्हेन्शन्स शुल्क  माफ करण्यावर भारताच्या विचाराधीन असलेल्या बाबींवर विचारविनिमय सुरु असल्याबाबत दोघांनी समाधान व्यक्त केले, आणि ADD संबधित बाबी लवकरात लवकर सोडवण्याल्या जातील असा विश्वास व्यक्त केला.

 

दळणवळणातून समृद्धीचा मार्ग

  1. दोन्ही देशांदरम्यान 1965 पूर्वी असलेल्या रेल्वेमार्गांची वाहतूक पुन्हा सुरु करण्याच्या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी दोन्ही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही नेत्यांच्या हस्ते हल्दीबाडी( भारत) ते चीलाहाटी( बांगलादेश) दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे संयुक्तरित्या उद्घाटन झाले. या रेल्वेमार्गामुळे दोन्ही देशांतील नागरिकांमधले संबंध अधिकच दृढ होतील, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. कोविडची परिस्थिती सुधारल्यानंतर, ही रेल्वेगाडी सुरु करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
  2. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय दळणवळण प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. अंतर्गत जलमार्ग  वाहतूक आणि व्यापार  विषयक प्रोटोकॉलच्या दुसऱ्या परिशिष्टावर झालेल्या स्वाक्षऱ्यासह, भारतीय मालवाहू जहाजाचा कोलकाता ते अगरतला मार्गे चातगाव (बांगलादेश) प्रवास, आणि सोनामुद्रा-दौडकांडी प्रोटोकॉल मार्ग या सर्व वाहतूक मार्गांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. चतगाव आणि मोंगला बंदरावरुन भारतीय जहाजांची आंतरदेशीय मालवाहतूक लवकरात लवकर सुरु केली जाण्यासाठी प्रयत्न करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला.
  3. दोन्ही देशांदरम्यानच्या वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि प्रवासी तसेच माल वाहतुकीची सुलभ सुविधा देण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. याच दृष्टीने, बीबीआयएन मोटार वाहन कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी बांगलादेश, भारत आणि नेपाळ यांच्यातील प्रवासी आणि मालवाहतुक विषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणे, आणि याच कराराअंतर्गत भूतानलाही नंतर वाहतुकीसाठी परवानगी देणे, यावर सहमती झाली.
  4. भारत-म्यानमार-थायलंड यांच्यातील त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्पाबाबत बांगलादेशच्या पंतप्रधानांनी विशेष रुची दर्शवली. बांगलादेशलाही या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा असून त्यासाठी भारताने पाठींबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली. या महामार्गामुळे दक्षिण आणि दक्षिण पूर्ण आशिया प्रदेशातील दळणवळण वाढण्याची अपेक्षा आहे. याच धर्तीवर, भारतानेही बांगलादेशमार्गे पश्चिम बंगाल (हिल्ली) आणि मेघालय (महेंद्रगंज), अशी वाहतूक करण्याची परवानगी बांगलादेश सरकारला मागितली.
  5. भारत आणि बंगलादेश यांच्यातल्या शेजारी असलेल्या राज्यात कमीतकमी मालावर निर्बंध असलेले किमान एक भू-बंदर असावे, या मागणीचा भारताने पुनरुच्चार केला. यातील पहिले अगरतला-अखौरा असू शकेल. भारतातील फेनी पूल पूर्ण झाल्यावर, या मार्गाने बांगलादेशच्या चतगाव बंदरातून ईशान्य भारतात ट्रकने मालवाहतूक करण्याची परवानगी दिली जावी, असा प्रस्ताव बांगलादेशने मांडला.
  6. दोन्ही देशांमधील भागीदारीत झालेल्या गतिमान विकासाची दखल घेत, दोन्ही देशांनी अलीकडेच स्थापन केलेल्या उच्चस्तरीय देखरेख समितीचे काम लवकरात लवकर सुरु करण्यावर भर दिला. बांगलादेशच्या वित्तीय संबंध विभागाचे सचिव आणि ढाक्यातील भारताचे उच्च्चायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती, दोन्ही देशांमधील संयुक्त प्रकल्पांच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेऊन, ते लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करेल.
  7. कोविड-19 महामारीच्या काळात दोन्ही देशातल्या प्रवाशांना अत्यावश्यक कामांसाठी विमान प्रवास करता यावा यादृष्टीने दोन्ही देशांदरम्यान तात्पुरत्या हवाई प्रवास बबल सेवेची सुरुवात केल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. जमिनीवरील बंदरांच्या मार्फत होणारा नियमित प्रवास लवकरात लवकर सुरु करावा, अशी विनंती बांगलादेश सरकारने भारताला केली.

 

जलसंपदा, उर्जा आणि वीज या क्षेत्रात सहकार्य :

  1. तिस्ता नदीच्या पाणी वाटपाबाबत दोन्ही देशांदरम्यान 2011 साली झालेल्या सहमतीनुसार, एक अंतरिम करार लवकरात लवकर केला जावा, यावर बंगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भर दिला. याबाबत भारत कटिबद्ध असून, या दिशेने सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.
  2. दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या सहा नद्या- मनु, मुहुरी, खोवाई, गोमती, धारला आणि दूधकुमार यांच्या पाणीवाटपाबतच्या अंतिम कराराचा आराखडा लवकरात लवकर पूर्ण करायला हवा, यावर दोन्ही नेत्यांनी या चर्चेत भर दिला.
  3. बांगलादेशमधील कुशियारा नदीचे पाणी सिंचनासाठी वापरण्यासाठी रहिमपूर खालच्या उर्वरित भागात खोदकाम पूर्ण करण्याची परवानगी भारताच्या सीमेवरील संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी विनंती बांगलादेशने केली. कुशियारा नदीचे पाणी सोडल्यावर दोन्ही बाजूंनी त्यावर देखरेख ठेवणे शक्य व्हावे, यासाठी सामंजस्य करार करण्याच्या भारताच्या प्रस्तावावर लवकरात लवकर अनुमती द्यावी, जेणेकरून कुशियारा नदीबाबतचे प्रलंबित करार पूर्ण होऊ शकतील, असे भारताने यावर सांगितले. संयुक्त नदी आयोगाने याबाबत दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, या आयोगाची पुढची सचिवस्तरीय बैअथ्क लवकरात लवकर आयोजित करण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली. 
  4. उर्जा आणि वीज क्षेत्रात, खाजगी क्षेत्रांसह, दोन्ही बाजूंनी मिळालेल्या उत्तम सहकार्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. विविध प्रकल्पांची अंमलबजावणी- यात भारत-बांगलादेश मैत्री पाईपलाईन, मैत्री सुपर औष्णिक प्रकल्प तसेच इतर प्रकल्पांना गती द्यावी, यावर सहमती झाली. हायड्रोकार्बन क्षेत्रात दोन्ही बाजूंनी सहकार्यविषयक सामंजस्य करारावर झालेल्या स्वाक्षऱ्यांचे स्वागत करत, यामुळे गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त अभ्यास, परीक्षण आणि हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करण्यात आले.उर्जा क्षमता आणि स्वच्छ उर्जेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही सहमती झाली. दोन्ही देशांच्या हरित, स्वच्छ, अक्षय उर्जा स्त्रोतांकडे वळण्याच्या कटिबद्धतेनुसार वाटचाल करताना नेपाळ आणि भूतान च्या सहभागाने उपप्रादेशिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आला. उर्जा आणि वीजजोडणी  क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यास परस्परसंमती देण्यात आली.

 

म्यानमारच्या राखाईन भागातून बळजबरीने विस्थापित केलेले लोक

  1. म्यानमारच्या राखाईन प्रांतातून स्थानिकांनी बळाचा वापर करून विस्थापीत केलेल्या 1.1 दक्षलक्ष लोकांना मानवतेच्या दृष्टीने आसरा देण्याच्या बांगलादेशच्या कृतीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या सर्व विस्थापितांना लवकरात लवकर, सुरक्षितपणे आणि शाश्वत दृष्ट्या आपल्या मूळभागात पाठवणे अत्यंत महत्वाचे असल्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व  मिळाल्याबद्दल शेख हसीना यांनी भारताचे अभिनंदन केले. म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्यांना आपल्या देशात परत पाठवण्यात भरताने सहकार्य करावे, अशी अपेक्षा बांगलादेशने व्यक्त केली. 

 

प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील भागीदारी

  1. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निवडणूकित भारताला पाठींबा दिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांचे आभार मानले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत लवकरात लवकर सुधारणा व्हाव्यात यासाठी यापुढेही एकत्रित काम करत राहण्याचा निर्णय, दोन्ही देशांनी घेतला. त्याशिवाय, हवामान बदलाचा सामना, शाश्वत  विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचे प्रयत्न आणि स्थलांतरितांच्या हक्कांचे संरक्षण यावरही एकत्रित काम करण्याचे निश्चित करण्यात आले. विकसित देशांनी, 2030 च्या अजेंड्यानुसार, जागतिक भागीदारी अंतर्गत शाश्वत विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या कटीबध्दतेचे पालन करावे, असे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले.
  2. कोविड-19 च्या उद्रेकानंतर, प्रादेशिक आणि जागतिक आर्थिक चित्र बघता, सार्क आणि बिमस्टेक सारख्या प्रादेशिक संघटनांची भूमिका आता अत्यंत महत्वाची आहे. कोविड-19 ची सुरुवात झाल्यानंतर मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी सार्क देशांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित केल्याबद्दल बांगलादेशच्या पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले. तसेच, या महामारीचे दक्षिण  पूर्व आशियावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी  सार्क आपत्कालीन प्रतिसाद निधीची स्थापना केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. सार्क वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाचा शेख हसीना यांनी पुनरुच्चार करत भारताने या प्रस्तावाला पाठींबा द्यावा अशी विनंती केली. 2021 साली बांगलादेश कडे आयओआरए चे अध्यक्षपद असणार आहे, यावेळी व्यापक सागरी सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या मुद्यावर सहकार्य करण्याची विनंती बंगलादेशने केली. अलीकडच्या काळात, बंगलादेशने हवामान परिणामविषयक मंचाचे अध्यक्षपद सांभाळल्याबद्दल मोदी यांनी हसीना यांचे अभिनंदन केले.
  3. नवीन विकास बँकेच्या कामांविषयी शेख हसीना त्यांनी समाधान व्यक्त केले आणि या संस्थेत सहभागी होण्याच्या आमंत्रणाबद्दल आभार मानले. पायाभूत सुविधांसह इतर अनेक शेत्रात या बँकेच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले आणि या बँकेचे सदस्य होण्याची इच्छा दर्शवली.

 

द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या आणि प्रकल्पांचे संयुक्त उद्घाटन

  1. यावेळी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी खालील द्विपक्षीय करारांवर केल्या:
  • हायड्रोकार्बन क्षेत्रात सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराचा आराखडा.  
  • सीमापार बंधनांच्या पलीकडे हत्तींचे संरक्षण-संवर्धन करण्याविषयीचा प्रोटोकॉल
  • उच्च परिणामक्षमता असलेल्या सामुदायिक विकास प्रकल्पांची, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर सार्वजनिक आस्थापनांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात भारताच्या व्यापक सहकार्याविषयीचा सामंजस्य करार
  • उपकरणांचा पुरवठा आणि लामचोरी भागातील बरीशाल सिटी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करण्याविषयीचा सामंजस्य करार.
  • भारत-बांगलादेश सीईओ मंचाबाबतच्या संदर्भविषयक अटी.
  • बांगलादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान स्मृती संग्रहालय, ढाका, आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय यांच्यातील सामंजस्य करार. आणि,
  • कृषीक्षेत्रात सहकार्यविषयक करार.

 

यावेळी खालील द्विपक्षीय विकास प्रकल्पांचे संयुक्तरित्या उद्घाटन करण्यात आले.

    • राजशाही शहराचे सौंदर्यीकरण आणि शहर विकास प्रकल्प
    • खुलाना येथे खालीशपूर महाविद्यालयीन मुलींची शाळानिर्मिती प्रकल्प 
  1. कोड नंतरच्या नव्या वातावरणात या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या आयोजकांचे आभार मानले.
  2. मार्च 2021 मध्ये बांगलादेशचा दौरा करून, बंगलादेशच्या स्वातंत्र्याचा 50 वा वर्धापन दिन आणि भारत-बंगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंधाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी,  शेख हसीना यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल, त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

 

* * *

MC/VS/RA/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1681729) Visitor Counter : 322