पंतप्रधान कार्यालय
जागतिक आयआयटी-2020 शिखर परिषदेत पंतप्रधानांचे बीजभाषण
री-लर्निंग, री-थिंकिंग, री-इनोवेटिंग, रिइंवेंटिंग, ही कोविड-19 नंतरची यंत्रणा असेल : पंतप्रधान
Posted On:
04 DEC 2020 11:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2020
अमेरिकेच्या पॅन आयआयटी या संस्थेने 4 डिसेंबर 2020 रोजी आयोजित केलेल्या जागतिक आयआयटी-2020 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीजभाषण केले.
भारत सरकार “सुधारणा, प्रत्यक्ष कार्य आणि परिवर्तन” या तत्वांशी पूर्णपणे वचनबद्ध आहे असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. सुधारणांच्या कक्षेपासून आता कोणतेही क्षेत्र वंचित राहिलेले नाही, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. विविध क्षेत्रांमध्ये 44 केंद्रीय श्रम कायद्यांचे फक्त 4 कायद्यांमध्ये एकत्रीकरण,जगातील सर्वात कमी कॉर्पोरेट दर लागू करणे, उत्पादन आणि निर्यात वाढविण्यासाठी 10 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्पादनावर आधारित प्रोत्साहन अनुदान योजना यासारख्या, केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक नवीन निर्णयांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. कोविड-19 महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत देखील भारतात विक्रमी गुंतवणूक झाली आणि त्यापैकी बहुतांश गुंतवणूक तंत्रज्ञान क्षेत्रात करण्यात आली याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
आपण आज करत असलेल्या कार्यातून उद्याच्या जगाचे भविष्य घडणार आहे असे पंतप्रधान म्हणाले. री-लर्निंग (नव्याने शिकणे), (री-थिंकिंग) नव्याने विचार करणे, (री-इनोवेटिंग) नव्याने प्रयोग करणे आणि (रिइंवेंटिंग) नव्याने शोध लावणे ही कोविडनंतरची यंत्रणा असेल यावर त्यांनी जोर दिला. आपल्याशी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये आर्थिक सुधारणांची मालिका निर्माण होते आहे त्यामुळे आपल्या संपूर्ण जगालाच पुनर्प्रोत्साहन मिळेल. यामुळे आपले सुलभ जीवन जगणे सुनिश्चित होईल आणि गरीब तसेच दुर्बल घटकांवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असेही पंतप्रधान म्हणाले. महामारीच्या काळात औद्योगिक जगत आणि शिक्षण क्षेत्र यांच्या सहयोगाने अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचे शोध लागले असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. आजच्या जगाला नवीन नॉर्मल परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त मार्गांची गरज आहे असे ते म्हणाले.
पॅन आयआयटी चळवळीच्या एकत्रित शक्तीमुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास चालना मिळेल असे पंतप्रधान म्हणाले. भारताचे महत्त्वाचे दृष्टीकोन योग्य रीतीने जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी प्रवासी भारतीय भारताचे अग्रदूतच आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की पॅन आयआयटी चळवळीतील सहभागी विद्वानांना “गिव्हिंग बॅक टू इंडिया” अर्थात भारताला आपल्या प्रतिभाशक्तीचा उपयोग होईल असे कार्य करण्याची विनंती केली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उल्लेखनीय रित्या साजरा करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विद्वानांनी त्यांच्या सूचना, मते आणि नवीन कल्पना MyGov वर पाठवाव्या किंवा नरेंद्र मोदी ॲपद्वारे प्रत्यक्ष पंतप्रधानांना सांगाव्या अशा सूचना त्यांनी केल्या.
भारतात सध्याच्या काळात हॅकेथॉन संस्कृती विकसित होत आहे आणि या हॅकेथॉनच्या माध्यमातून युवा वर्ग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर अनुपम उपाय शोधून काढत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की देशातील युवकांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा आणि त्यांना वैश्विक पातळीवरील उत्तम ज्ञान मिळवता यावे या उद्देशांच्या पूर्तीकरिता केंद्र सरकार, आग्नेय आशिया आणि युरोपातील अनेक देशांशी समन्वय साधून काम करीत आहे. विज्ञान आणि नवीन संशोधन क्षेत्रातील उत्तमोत्तम दर्जाच्या विद्वानांना एकत्र आणणाऱ्या वैभव शिखर परिषदेचे यजमानपद भारताने भूषविले आणि या परिषदेद्वारे भविष्यात विज्ञान आणि नवीन संशोधन क्षेत्रातील सहकार्याच्या अनेक शक्यता निर्माण केल्या असे ते म्हणाले.
भारतात आता अत्यंत मोठ्या प्रमाणात कार्यपद्धतीत बदल झाले आहेत. यापूर्वी, जेव्हा आयआयटी संस्थांमध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी अवकाश संशोधन क्षेत्रातील अभियंत्याची पदवी प्राप्त करायचे तेव्हा त्यांना नोकऱ्या देण्यासाठी देशात योग्य सशक्त औद्योगिक पर्यावरण नव्हते. मात्र अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक सुधारणांमुळे, आज भारतातील या क्षेत्रातील विद्वत्तेला योग्य मान मिळू शकत आहे. म्हणूनच, रोज देशात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नवीन स्टार्टअप्स सुरु होत आहेत असे ते म्हणाले. आज उपस्थित असलेल्यांपैकी अनेक तज्ञ विविध क्षेत्रांमध्ये धाडसीपणे नवीन कार्य उभारतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील अनेक क्षेत्रांमध्ये अत्यंत अचूक आणि नाविन्यपूर्ण कार्य होत असे असे ते म्हणाले.
आजच्या घडीला, मोठ्या प्रमाणात आयआयटीतून शिक्षण पूर्ण केलेले विद्वान जागतिक स्तरावर उद्योग, शिक्षण, कला, प्रशासन अशा अनेक क्षेत्रात नेतृत्वपदांवर कार्यरत आहेत. अशा अनेक माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, वाद-विवाद, चर्चा आणि सक्रीय सहभाग याद्वारे नव्या युगातील उदयोन्मुख तंत्रज्ञान रचनेतील समस्यांवर उपाय शोधावेत असे आवाहन पंतप्रधानांनी उपस्थितांना केले.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678546)
Visitor Counter : 277
Read this release in:
Urdu
,
Odia
,
English
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam