पंतप्रधान कार्यालय

आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 07 NOV 2020 8:24PM by PIB Mumbai

 

नमस्कार,

मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रमेश पोखरियाल निशंक’, संजय धोत्रे, प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रोफेसर वी रामगोपाल राव, बोर्ड आणि सिनेटचे सदस्यगण, अध्यापक सदस्य, पालक, युवा मित्र, स्त्री आणि पुरुषगण.

आज तंत्रज्ञान जगतासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज आयआयटी दिल्लीच्या माध्यमातून देशाला 2 हजार पेक्षा अधिक तंत्रज्ञानातील उत्तम तज्ज्ञ मिळत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आज पदवी मिळत आहे, त्या सर्व विद्यार्थी मित्रांना, विशेषतः त्यांच्या पालकांना, त्यांचे मार्गदर्शक, शिक्षक, सर्वांना आजच्या या महत्वपूर्ण दिनी माझ्याकडून अनेक-अनेक शुभेच्छा.

आज, आयआयटी दिल्लीचा 51 वा दीक्षांत सोहळा आहे आणि यावर्षी ही महान संस्था आपला हीरक महोत्सव देखील साजरा करत आहे. आयआयटी दिल्लीने या दशकासाठी आपले व्हिजन डॉक्युमेंट देखील तयार केले आहे. हीरक महोत्सवी वर्ष आणि या दशकाच्या तुमच्या उद्दिष्टांसाठी देखील मी तुम्हाला अनेक-अनेक शुभेच्छा देतो, आणि भारत सरकारच्या वतीने पूर्ण सहकार्याचा विश्‍वास देखील देतो. 

आज, महान वैज्ञानिक डॉक्टर सी.व्ही. रामण यांची जयंती आहे. आजच्या दीक्षांत सोहळ्यासाठी आणि त्यांच्या जन्मदिनाशी जोडले जाण्याचा आजचा दिवस शुभ आहे. मी त्यांनाही आदरपूर्वक नमन करतो. रामण यांचे उत्तम काम  पुढील अनेक शतके आपणा सर्वांना विशेषतः माझ्या युवा वैज्ञानिक मित्रांना प्रेरणा देत राहील.

 

मित्रांनो,

कोरोनाचा हा संकटकाळ जगभरात खूप मोठे बदल घेऊन आला आहे. कोविडनंतरचे जग खूप वेगळे असणार आहे. आणि यात सर्वात महत्वाची भूमिका तंत्रज्ञानाचीच असेल. एक वर्षांपूर्वी कुणीही विचार केला नसेल की बैठका असो किंवा परीक्षा, वादविवाद असो किंवा दीक्षांत समारंभ, या सगळ्याचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. व्हर्चुअल रिऍलिटी आणि ऑगमेंटेड रिऍलिटी यांनीच वर्किंग रिऍलिटीची जागा घेतली आहे.

तुम्हाला कदाचित असेही वाटत असेल की तुमची तुकडी तेवढी भाग्यवान नाही. मला खात्री आहे की तुम्ही स्वत: ला विचारत आहात- हे सगळे आमच्याच  पदवीच्या वर्षात घडायचे होते? परंतु याचा वेगळ्या पद्धतीने विचार करा. तुमच्याकडे नवोदित असल्याचा फायदा आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आणि त्याव्यतिरिक्त नवीन शिकण्यासाठी आणि नव्या निकषांशी जुळवून  घेण्यासाठी तुमच्याकडे खूप वेळ आहे. तर याचा अधिकाधिक उपयोग करा. आणि याच्या सकारात्मक बाजूचा  देखील विचार करा. तुमची तुकडी देखील भाग्यवान आहे. तुम्हाला कॅम्पसमधील तुमच्या शेवटच्या वर्षात एकमेकांना भेटण्याचा खूप आनंद घेता आला. गेल्या ऑक्टोबरमध्ये आणि यंदाच्या ऑक्टोबरमधली परिस्थिती पाहा. तुम्ही आनंदाने मागे वळून पाहाल. परीक्षेपूर्वी ग्रंथालय आणि वाचन कक्षातील सर्व रात्री. रात्री उशीरा मेसमध्ये खाल्लेले पराठे, तासिकांदरम्यानचे कॉफी आणि मफिन. मला असेही सांगितले गेले की आयआयटी-दिल्लीत दोन प्रकारचे मित्र आहेत: कॉलेज मित्र. वसतिगृह व्हिडिओ गेम मित्र. तुम्हाला नक्कीच दोन्हीही आठवतील.

 

मित्रांनो,

यापूर्वी मला आयआयटी मद्रास, आयआयटी मुंबई आणि आयआयटी गुवाहाटीच्या  दीक्षांत समारंभात अशाच प्रकारे सहभागी होण्याची संधी मिळाली, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळाली. या सर्व ठिकाणी मला ही  समानता दिसली की प्रत्येक ठिकाणी काही ना काही नाविन्यपूर्ण संशोधन होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी होण्यासाठी ही खूप मोठी ताकद आहे. कोविड-19 ने जगाला आणखी एक गोष्ट शिकवली आहे. जागतिकीकरण महत्वपूर्ण आहेच मात्र त्याचबरोबर स्वयंपूर्णता देखील तितकीच आवश्यक आहे.

 

मित्रांनो,

आत्मनिर्भर भारत अभियान आज देशातील तरुणांना, तंत्रज्ञान कुशल व्यक्तींना, तंत्रज्ञान आधारित उद्योजकांना अनेक नव्या संधी देण्याचे देखील एक महत्वाचे  अभियान आहे. त्यांच्या ज्या कल्पना आहेत, अभिनव संशोधने आहेत त्यांची ते मोकळेपणाने अंमलबजावणी करू शकतील, त्याचे मोजमाप करू शकतील त्याचे विपणन करू शकतील यासाठी आज सर्वाधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे. आज भारत आपल्या युवकांना व्यवसाय सुलभता देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. जेणेकरून ही युवा मंडळी आपल्या नाविन्यपूर्ण संशोधनाने कोट्यवधी देशवासियांच्या जीवनात  परिवर्तन घडवू शकतील. देश तुम्हाला व्यवसाय सुलभता देईल, तुम्ही केवळ एक काम करा, देश तुम्हाला व्यवसाय सुलभता देत आहे, सरकार व्यवस्था देत आहे तर तुम्ही तुमच्या कौशल्याने, तुमच्या अनुभवाने, तुमच्या गुणवत्तेने, तुमच्या अभिनव संशोधनाने या देशातील गरीबातील गरीबांसाठी सुलभ जीवनमान देण्यासाठी नवनवीन संशोधने घेऊन या, नवनवीन गोष्टी घेऊन या.

अलिकडेच जवळपास प्रत्येक क्षेत्रात ज्या मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत, त्यामागे देखील हाच विचार आहे. प्रथमच कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन आणि नव्या स्टार्टअप्ससाठी अमाप संधी निर्माण झाल्या आहेत. प्रथमच अंतराळ क्षेत्रात खासगी गुंतवणुकीचे मार्ग खुले केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच  BPO क्षेत्राच्या व्यवसाय सुलभतेसाठी देखील एक मोठी सुधारणा करण्यात आली आहे.  सरकारने अन्य सेवा प्रदाता- OSP मार्गदर्शक तत्वे एकदम सोपी आणि सरळ केली आहेत. बहुतांश सर्वच निर्बंध हटवण्यात आले आहेत.  एक प्रकारे आता सरकारचे अस्तित्व जाणवणार नाही.प्र त्येकावर विश्वास ठेवण्यात आला आहे. यामुळे बीपीओ उद्योगांसाठी अनुपालनाचा जो भार असतो, विविध प्रकरची बंधने असतात ती सर्व कमी होतील. याशिवाय बँक हमीसह अन्य अनेक आवश्यकतांमधूनही बीपीओ उद्योगाला मुक्त करण्यात आले आहे. एवढेच नाही तर अशा तरतुदीज्या तंत्रज्ञान उद्योगाला घरून काम करण्यासाठी किंवा कुठूनही काम करण्यासारख्या सुविधांसाठी जे कायदे मनाई करत होते ते कायदे देखील हटवण्यात आले आहेत. यामुळे देशाचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र जागतिक आणि स्पर्धात्मक बनेल आणि तुमच्यासारख्या तरुण प्रतिभावंतांना अधिक संधी उपलब्ध होतील.

 

मित्रांनो,

आज देशात तुमच्या प्रत्येक गरजा समजून घेऊन, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन एकापाठोपाठ एक निर्णय घेतले जात आहेत. जुने नियम बदलले जात आहेत. आणि माझे असे मत आहे कि मागच्या शतकातील नियम-कायद्यांमुळे पुढल्या शतकाचे भविष्‍य ठरू शकत नाही. नवीन शतक, नवीन  संकल्‍प. नवीन शतक नवे  रीति‍-रिवाज, नवीन शतक, नवे कायदे. आज भारत त्या देशांपैकी एक आहे जिथे कॉर्पोरेट कर सर्वात कमी आहे. Start-up India या अभियानानंतर भारतात 50 हजारांहून अधिक स्टार्ट अप सुरु झाले आहेत. सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम आहे की मागील पाच वर्षात देशात पेटेंटची  संख्या 4 पट झाली आहे.  ट्रेडमार्क नोंदणीमध्ये 5 पट वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्येही फिनटेक बरोबरच कृषी, संरक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडित स्टार्ट अप्स आता वेगाने वाढत आहेत. मागील काही वर्षात  20 पेक्षा अधिक यूनिकॉर्न्स भारतीयांनी भारतात बनवले आहेत. ज्याप्रकारे देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे, मला  विश्वास आहे कि आगामी एक-दोन वर्षात त्यांची संख्या आणखी वाढेल आणि असेही होऊ शकेल कि आज इथून बाहेर पडणारे तुमच्यासारखे जे तरुण लोक आहेत ते त्यात आणखी नव्या ऊर्जेची भर घालतील.

 

मित्रांनो,

इन्क्युबेशन पासून निधी पुरवण्यापर्यंत आज  स्टार्ट अप्सना विविध प्रकारे मदत केली जात आहे. निधी पुरवण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा फंड ऑफ फंड्स तयार करण्यात आला आहे. 3 वर्षांसाठी कर सवलत, स्व-प्रमाणीकरण, इझी एक्झिट सारख्या अनेक सुविधा स्टार्ट अप्ससाठी पुरवण्यात येत आहेत. आज राष्ट्रीय पायाभूत प्रकल्पाअंतर्गत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची तयारी आहे. यामुळे संपूर्ण देशात अद्ययावत पायाभूत सुविधांची निर्मिती होईल जी वर्तमान आणि भविष्य दोघांच्या गरजा पूर्ण करेल.

 

मित्रांनो,

आज देश प्रत्येक क्षेत्राच्या बहुतांश क्षमताचा वापर करण्यासाठी नव्या पद्धतींसह काम करत आहे. तुम्ही जेंव्हा इथून जाल, नव्या ठिकाणी काम कराल तेव्हा तुम्हालाही नव्या मंत्रासह काम करावे लागेल. हा मंत्र आहे - दर्जाकडे लक्ष द्या, कधीही तडजोड करू नका, व्यापकता सुनिश्चित करा, तुमची संशोधने मोठ्या  पातळीवर काम करण्यास सक्षम बनवा. बाजारात विश्वासार्हता, दीर्घकालीन विश्वास निर्माण करा.  कुठल्याही परिस्थितीनुरूप बदल करण्यासाठी तयार राहा आणि अनिश्चितता जीवनाचा भाग समजा. जर आपण या मूलमंत्रानुसार काम केले तर त्याची चमक तुमच्या ओळखीबरोबरच ब्रँड इंडिया मध्येही नक्कीच दिसेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे कारण ब्रँड  इंडियाचे सर्वात मोठे ब्रँड अँबेसेडर तुम्हीच लोक आहात. तुम्ही जे काम कराल त्यामुळे देशाच्या उत्पादनांना जागतिक ओळख मिळेल. तुम्ही जे कराल त्यामुळे देशाच्या प्रयत्नांना गती मिळेल. गाव गरीबांसाठी देश जे प्रयत्न करत आहे ते प्रयत्न  तुमचे समर्पण, तुमच्या नवसंशोधनामुळे सिद्धीला जाणार आहेत.

 

मित्रांनो,

तंत्रज्ञान कशा प्रकारे आपल्या प्रशासनाचे, गरीबातील गरीबांपर्यंत पोहचण्याचे सर्वात सशक्त माध्यम बनू शकते हे मागील वर्षांमध्ये देशाने करून दाखवले आहे. आज घर, वीज, शौचालय, गॅस जोडणी किंवा आता पाणी, अशा प्रत्येक  सुविधा विदा आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या सहकार्याने पोहचवल्या जात आहेत.  आज जन्माच्या दाखल्यापासून हयातीच्या दाखल्यापर्यंत प्रत्येक सुविधा डिजिटली उपलब्ध केली जात आहे. जनधन-आधार-मोबाइलची ट्रिनिटी JAM, डीजी -लॉकर्स सारख्या सुविधा आणि आता डिजिटल आरोग्य ओळखपत्रासाठी प्रयत्नसामान्य नागरिकाचे जीवन सुलभ बनवण्यासाठी देश एकापाठोपाठ एक जलद गतीने अनेक पावले उचलत आहे. तंत्रज्ञानाने शेवटच्या गावातील व्यक्तीपर्यंत सेवा पोहचवणे प्रभावी बनवले आहे, आणि भ्रष्टाचाराला कमी वाव ठेवला आहे. डिजिटल व्यवहारांमध्येही भारत जगातील अनेक देशांच्या खूप पुढे आहे. भारताने बनवलेल्या युपीआय सारख्या व्यवस्था आता जगातील अनेक विकसित देश देखील स्वीकारू इच्छित आहेत.

 

मित्रांनो,

अलिकडेच सरकारने आणखी  एक योजना सुरु केली आहे, ज्यात तंत्रज्ञान मोठी भूमिका पार पाडत आहे. ही  योजना आहे-  स्वामित्व योजना. या अंतर्गत प्रथमच भारतातील गावांमध्ये जमीन आणि मालमत्ता, घराची मालमत्ता याचे मॅपिंग केले जात आहे. पूर्वी जर हे काम झाले असते तर तर त्यातही मानवी हस्तक्षेप एकमेव माध्यम होते.. त्यामुळे गडबड, पक्षपात, शंका-कुशंका स्वाभाविक होते. तुम्हाला आनंद होईल कारण तुम्ही तंत्रज्ञान जगतातील लोक आहात, आज ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून गावागावांमध्ये हे मॅपिंग होत आहे. आणि गावातील लोक देखील यामुळे पूर्णपणे संतुष्ट आहेत. त्यांना  भागीदारीसह पुढे नेले जात आहे. यातून हे दिसून येते की भारताचा सामान्यातील सामान्य नागरिकाची देखील तंञज्ञानावर किती आस्था आहे.

 

मित्रांनो,

तंत्रज्ञानाची गरज आणि त्याप्रति भारतीयांची आस्था, हेच तुमच्या भविष्याला प्रकाशमय करतात. संपूर्ण देशात तुमच्यासाठी अमाप संधी आहेत, अनेक आव्हाने आहेत ज्यावर तुम्हीच उपाय देऊ शकता. पूर आणि चक्रीवादळादरम्यान आपत्ती व्यवस्थापन असेल, भूजल पातळी कशी कायम राखता येईल यासाठी प्रभावी तंत्रज्ञान असेल, सौर ऊर्जा निर्मिती आणि बॅटरीशी निगडित तंत्रज्ञान असेलटेलिमेडिसिन  आणि रिमोट सर्जरी तंत्रज्ञान असेल, बिग डाटा विश्लेषण असेल, अशा क्षेत्रांमध्ये खूप काम करता येऊ शकते.

 

मित्रांनो,

मी एकापाठोपाठ एक देशाच्या अशा अनेक गरजा तुमच्यासमोर मांडू शकतो. या गरज नवसंशोधनाद्वारे पूर्ण होतील, तुमच्याच नव्या कल्पना, तुमचीच ऊर्जा, तुमच्याच प्रयत्नांमुळे हे पूर्ण होऊ शकते. म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना खास विनंती आहे की आज तुम्ही देशाच्या गरजा ओळखाव्यात. प्रत्यक्षात जे बदल होत आहेत, आत्मनिर्भर भारताशी निगडित सामान्य माणसाच्या ज्या आकांक्षा आहेत त्याच्याशी जोडण्याचे काम करा, मी तुम्हाला निमंत्रण देतो. आणि यात तुम्हा माजी विद्यार्थ्यांचे जे अल्युमनी नेटवर्क आहे ते देखील खूप उपयुक्त ठरणार आहे.

 

मित्रांनो,

तसेही तुम्हा सर्वांसाठी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करणे खूप सोपे असते. इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या Alumni meet साठी बऱ्याचदा लांबचा प्रवास करावा लागतो.  महाविद्यालयात देखील जावे लागते. मात्र तुमच्याकडे  एक अतिशय सोपा पर्याय असतो. तुम्ही तुमचा माजी विद्यार्थी मेळावा, कधीही शनिवार-रविवारी अगदी कमी कालावधीत कळवूनही बे-एरियामध्ये करू शकता, सिलिकॉन  व्हॅलीत करू शकता, वॉल स्ट्रीटवर करू शकता किंवा मग एखाद्या सरकारी सचिवालयात देखील तुमची Alumni meet होऊ शकते, कारण तुम्ही सर्वच ठिकाणी उपस्थित आहात. खूप मोठ्या प्रमाणात तुमचे अस्तित्व आहे. भारताचे स्टार्टअप्स राजधानी मुंबई असेल, पुणे असेल, किंवा बंगळुरू असेल, तुम्हाला याठिकाणी आयआयटीतून शिकून बाहेर पडलेल्या लोकांचे मोठे नेटवर्क आढळेल. हे आहे तुमचे यश, हा आहे तुमचा प्रभाव.

 

मित्रांनो,

तुम्ही सर्व अलौकिक क्षमता असलेले  विद्यार्थी आहात. तुम्ही वयाच्या 17-18 व्या वर्षी जे-ई-ई ही  सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण झाला आहात आणि नंतर  मग तुम्ही आयआयटीला आलात. परंतु, दोन गोष्टी तुमची क्षमता आणखी वाढवतील. एक म्हणजे लवचिकता. दुसरी  नम्रता. लवचिकतेबाबत मी सांगेन :  उभे राहा आणि चपखल बसा.  जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही तुमची ओळख गमावू नका.  कुणाचेही  किंवा कशाचेही 'लाइट व्हर्जन' बनू नका. मूळ आवृत्ती बना. तुमचा विश्वास असलेल्या मूल्यांमध्ये चोख राहा, त्याच वेळी, टीममध्ये सहभागी होण्याबाबत कधीही  संकोच करू नका. वैयक्तिक प्रयत्नांना त्यांची मर्यादा असते. पुढे जाण्याचा मार्ग टीमवर्कमध्ये आहे. टीमवर्क परिपूर्णता आणते. दुसरे म्हणजे नम्रता. तुमच्या यशाचा, तुमच्या कामगिरीचा तुम्हाला सार्थ -अभिमान असायलाच हवा. तुम्ही जे केले आहे ते फारच कमी लोकांनी केले आहे. यामुळे तुम्ही अधिक नम्र बनाल.

 

मित्रांनो,

हे महत्वाचे आहे की एखाद्याने स्वतःलाच कायम आव्हान देत राहायला हवे आणि दररोज शिकत रहायला हवे. तुम्ही स्वत: ला आयुष्यभर एक विद्यार्थी म्हणून वागवणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्हाला जे माहित आहे ते पुरेसे आहे असा कधीही विचार करू नका.

आपल्या शास्त्रात सांगितले आहे- सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म

म्हणजे, ज्ञान आणि  सत्य ब्रह्माप्रमाणेच अनंत असतात, अमर्याद असतात. जितके नवनवीन शोध तुम्ही लोक लावता, ते सर्व सत्याचा, ज्ञानाचाच तर  विस्तार आहेत. म्हणूनच तुमच्या संशोधनात देशासाठी, देशवासियांसाठी , गाव -गरीबांसाठी, आत्मनिर्भर भारतासाठी अमाप संधी आहेत.

तुमचे ज्ञान, तुमचा अनुभव, तुमचे सामर्थ्य देशाच्या उपयोगी पडावे याच विश्वासासह पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन, खूप-खूप शुभेच्छा , तुमच्या माता-पित्यांच्या आशा-अपेक्षानुसार तुमच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाचा प्रारंभ होवो, तुमच्या गुरुजनांनी तुम्हाला जे शिकवले आहे, दीक्षा दिली आहे, ती तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडो आणि केंद्र सरकार बाबत बोलायचे तर भारताला आपल्या देशातील लोकांचा अभिमान वाटतो. आणि आपल्याकडील लोकसंख्येत आयआयटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते तेंव्हा जगातही त्याचे महत्व वाढते. सामर्थ्यानिशी आज एका नव्या जीवन प्रवासाची सुरुवात करत आहात, माझ्याकडून तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना, तुमच्या शिक्षकांना खूप खूप धन्यवाद देत मी माझे भाषण संपवतो.

खूप-खूप शुभेच्छा

 

S.Thakur/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1671079) Visitor Counter : 267