पंतप्रधान कार्यालय

वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) शिखर परिषद 2020 च्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 02 OCT 2020 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2020

नमस्कार!

या संमेलनात सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा आणि खूप खूप आभार ! या मंचावर, भारतीय आणि अनिवासी भारतीय अशा दोन्ही मान्यवरांच्या गुणवत्ता एकत्र झाल्या आहेत. भारतीय वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) शिखर परिषद हा भारत आणि जगातील विज्ञान आणि नवोन्मेष याचा उत्सव साजरा करणारी परिषद आहे. मी याला प्रतिभावंतांचा संगम असे म्हणेन. अशा संमेलनांच्या माध्यमातून आपल्याला भारत आणि एकूणच वसुंधरेला सक्षम करण्यासाठी एक दीर्घकालीन सहकार्य निर्माण करण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल.

मित्रांनो,

ज्या शास्त्रज्ञांनी आज आपल्या सूचना, सल्ले किंवा कल्पना इथे मांडल्या त्यांचे मला विशेष आभार मानायचे आहेत. तुमच्या या संवादात तुम्ही अनेक विषयांना स्पर्श केला. तुमच्यापैकी बहुतेकांनी भारतातील अभ्यासक आणि संशोधक यांचा परदेशातील अभ्यासक व संशोधकांशी समन्वय वाढून त्यातून एक सहकार्याची व्यवस्था निर्माण करण्याचे महत्व अधोरेखित केले. खरे तर, हाच या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. वैज्ञानिक संशोधन, हे समाजाच्या गरजांच्या अनुकूल असायला हवे, हा अत्यंत योग्य विचार आपण मांडला. त्याशिवाय भारतात संशोधक वृत्ती जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्यासाठी आपण काही उपयुक्त सूचनाही केल्या आहेत. तुम्ही मांडलेल्या या विचारांबद्दल मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत. आपली मते ऐकल्यानंतर, ही वैभव शिखर परिषद अत्यंत समृद्ध आणि फलदायी होईल, याचा मला विश्वास वाटतो आहे.

मित्रांनो,

विज्ञान हे कायमच मानवाच्या प्रगतीच्या केंद्रस्थानी राहिले आहे. जेव्हा आपण मानवाच्या अस्तित्वापासूनच्या अनेक शतकांचा विचार करतो, तेव्हा पण काळाची विभागणी कशी करतो? अश्मयुग? ताम्रयुग, लोहयुग, औद्योगिक काल, अवकाश युग आणि आताचे डिजिटल युग. अशा संज्ञा आपण वापरतो. म्हणजे प्रत्येक टप्पा त्या त्या काळातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार निश्चित करण्यात आला आहे. तंत्रज्ञानातील परिवर्तनाने आपल्या जीवन शैलीत बदल घडवले आहेत. त्यातून आपल्यात वैज्ञानिक कुतूहल देखील निर्माण झाले आहे.

मित्रांनो,

भारत सरकारने विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. देशात सामाजिक-आर्थिक परिवर्तन आणण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या केंद्र स्थानी विज्ञानच आहे. आम्ही व्यवस्थेमधील जडत्व संपवले आहे. लस विकसित करण्याच्या कामाला देण्यात आलेला दीर्घ विराम आम्ही तोडला आहे. 2014 साली, आमच्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत चार नव्या लसी विकसित करण्यात आल्या. त्यात भारतात विकसित झालेल्या रोटा व्हायरस या लसीचाही समावेश होता. आम्ही स्वदेशी बनावटीच्या लस उत्पादनाला प्रोत्साहन देतो. अलीकडेच आम्ही भारतात विकसित झालेल्या न्युमोकॉक्क्ल या लहान मुलांसाठीच्या लसीचे व्यावसायिक उत्पादन करण्यासाठीची परवानगी दिली आहे. हा लसीकरण कार्यक्रम आणि आमचे पोषण अभियान यातून देशातील बालकांसाठी अत्यंत आवश्यक असलेले आरोग्य आणि पोषाहार आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत.  आजच्या या कोविड काळातही आमचे लस विकसित करणारे सर्व लोक अत्यंत सक्रीय असून जागतिक स्पर्धेत उतरले आहेत. आजची वेळ अत्यंत महत्वाची आहे, हे आम्ही जाणतो. 

आम्ही देशातून 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. जागतिक उद्दिष्टाच्या हे पाच वर्ष आधीचे उद्दिष्ट आहे.

मित्रांनो,

त्या शिवाय, इतरही प्रयत्न सुरू आहेतच. आम्ही सुपर कॉम्पुटिंग आणि सायबर-फिजिकल व्यवस्था या क्षेत्रात दोन महत्वाचे अभियान सुरु केले आहेत. या व्यवस्था, काही क्षेत्रे, जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सेन्सर आणि बिग डाटा एनालीटिक्स यांच्यातल्या मूलभूत संशोधन आणि वापराच्या आधारावर विस्तारित करण्यात आल्या आहेत. यातून, भारतीय उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. यातून कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे. यातून स्टार्ट अप क्षेत्र अधिक समृद्ध होणार आहे. या अभियानाअंतर्गत, आतापर्यंत 25 नावोन्मेष केंद्रे देखील स्थापन करण्यात आली आहेत.

मित्रांनो,

आम्हाला आमच्या शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी उत्तम दर्जाची  वैज्ञानिक संशोधने हवी आहेत. आपल्या कृषी संशोधन वैज्ञानिकांनी देशात डाळींचे उत्पादन वाढावे यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आज आम्ही आमच्या उत्पादनापैकी थोड्या डाळी आता आम्ही निर्यात देखील करतो आहोत, आमचे अन्नधान्य उत्पादन आता विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.

मित्रांनो,

अलीकडेच, भारतात राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करण्यात आले आहे. तब्बल तीन दशकांनंतर, भारतात नविन शिक्षण धोरण आणले गेले आहे. हे धोरण तयार करतांना, अनेक महिने दीर्घकाळ सल्लामसलती आणि चर्चा करण्यात आल्या. या धोरणाचा उद्देश विज्ञानाविषयी कुतूहल, जिज्ञासा जागी करणे हा आहे. संशोधन आणि नवोन्मेषांला प्रोत्साहन देणारे हे धोरण आहे. मी स्वतः बहुशाखीय शिक्षण देण्याबाबत अत्यंत आशावादी आहे. या मुक्त आणि व्यापक दृष्टीकोनाच्या शिक्षण व्यवस्थे मुळे विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि नैपुण्य बहरेल.

आज, जागतिक पातळीवर भारत अनेक वैज्ञानिक संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांत भागीदार आहे किंवा योगदान देत आहे. याबाबत  सांगायचे झाल्यास, लेझर इंटरफेरोमीटर ग्राव्हीटेशनल- व्हेव ऑब्झर्वेटरी (LIGO),जिला फेब्रुवारी 2016 मध्ये मान्यता मिळाली, ती अणु संशोधन विषयक युरोपीय संस्था (CERN) आहे. भारताने जानेवारी 2017 पासून याचे सदस्यत्व घेतले असुन, भारत इंटरनैशनल थर्मोन्युक्लीयर एक्सपिरीमेंटल रियेक्टर (I-TER) यावर काम करत आहे. या संस्थेसाठीचे पूरक संशोधन गुजरातच्या फार्मा रिसर्च संस्थेत केले जाते. 

मित्रांनो,

अधिकाधिक युवकांमध्ये विज्ञानाविषयी रुची निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी, आपल्याला त्याविषयीची चांगली जाण असणे आवश्यक आहे.   इतिहासाचे विज्ञान आणि विज्ञानाचा इतिहास आपण अगोदर पूर्ण समजून घेतला पाहिजे. गेल्या काही शतकांत, प्रमुख ऐतिहासिक समस्या विज्ञानाच्या मदतीने सोडवल्या आहेत. तारखा निश्चित करण्यात आणि संशोधनात मदत करण्यासाठी आता वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातात.

आपल्याला भारतीय विज्ञानाच्या समृद्ध इतिहासाचा विस्तार करण्याची गरज आहे. दुर्दैवाने, युवकांना खोटे सांगितले गेले आहे की आधुनिकतेच्या आधी असलेली प्रत्येक गोष्ट अंधश्रद्धा आणि अंधकारमय होती. आजचं युग हे संगणक, प्रोग्रामिंग, मोबाईल्स आणि अ‍ॅप्लिकेशनचं आहे. तरीसुद्धा, संगणकीकरणाचा आधार काय आहे, तर बायनरी कोड 1 आणि 0. 

मित्रांनो,

ज्यावेळी एखादी व्यक्ती शून्याबद्दल बोलते, तेंव्हा ती भारताबद्दल कशी काय बोलू शकणार नाही? शून्याने सर्वांसाठी गणित आणि वाणिज्य बनवले आहे. आमच्या युवकांना बौद्धायन, भास्कर, वराहमिहीर, नागार्जुन, सुश्रूत आणि आधुनिक युगातील सत्येंद्र नाथ बोस आणि सर सी व्ही रमन यांच्याविषयी माहिती असली पाहिजे. ही यादी तशी बरीच मोठी आहे.

मित्रांनो,

आपल्या गौरवशाली भूतकाळापासून प्रेरित आणि सध्याच्या आपल्या उपलब्धी, यामुळे भविष्याकडे मोठ्या आशेने पाहत आहोत. आम्ही आगामी पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि समृद्ध भविष्य घडविण्याचे उद्दीष्ट ठेवत आहोत. भारताचा आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारताविषयीच्या भूमिकेत जागतिक कल्याण या दृष्टीचा समावेश आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी, मी आपणा सर्वांना आमंत्रित करतो आणि तुमचा पाठिंबा मागतो. भारताने नुकतीच अंतराळ सुधारणेची सुरूवात केली आहे. या सुधारणा उद्योग आणि शिक्षण दोन्हींना संधी उपलब्ध करुन देणाऱ्या आहेत. तुम्हा सर्वांना भारताच्या व्हायब्रंट स्टार्टअप पारिस्थितिकीविषयी माहिती असेल. शास्त्रज्ञ, नाविन्यपूर्ण आणि शिक्षणतज्ञांनी केलेल्या जमिनीवरील कामांशिवाय ही प्रगती कधीच पूर्ण होणारी नव्हती. आमच्या स्टार्ट अप क्षेत्राला आपल्या मार्गदर्शनामुळे फायदा होईल.    

मित्रांनो,

परदेशातील भारतीय नागरीक जागतिक स्तरावर भारताचे उत्कृष्ट राजदूत आहेत. ते ज्या-ज्या ठिकाणी गेले आहेत, त्यांनी आपल्याबरोबर भारताची नीतिनियम सोबत नेले आहेत. त्यांनी नवीन ठिकाणची संस्कृतीही स्वीकारली आहे. परदेशी भारतीय नागरीक अनेक क्षेत्रात यशस्वी आहेत. शिक्षणक्षेत्र हे झळाझळते उदाहरण आहे. अनेक शीर्ष जागतिक विद्यापीठे आणि जगातील बरीच शीर्ष तंत्रज्ञान संस्था यांना भारतीय प्रतिभेचा मोठा लाभ झाला आहे.   

‘वैभव’ परिषदेच्या माध्यमातून, आम्ही तुम्हाला मोठी संधी देत आहोत. जोडले जाण्याची आणि योगदान देण्याची संधी. तुमचे प्रयत्न भारताला आणि जगाला मदतीचे ठरतील. एकंदरीतच, जेंव्हा भारताची प्रगती होते, तेंव्हा जग देखील पुढे झेपावते. हा लाभदायी विनिमिय आहे. तुमच्या प्रयत्नांतून आदर्श संशोधन परिसंस्था निर्माण होण्यास मदत होईल. परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ होईल. यामुळे भारताला आव्हानांवर घरगुती तोडगा उपलब्ध करुन देण्यात मदत होईल. हे इतरांसाठी समृद्धी निर्माण करेल. यामुळे भारताला विघटनकारी तंत्रज्ञान निर्मिती करण्यास मदत होईल.  

मित्रांनो,

आपण महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी भेटत आहोत. गांधीजींनी 100 वर्षांपूर्वी 1925 मध्ये महाराजा महाविद्यालय, थिरुअनंतपूरम येथे सांगितलेल्या बाबींचे मी तुम्हाला स्मरण करुन देतो. वैज्ञानिक प्रगतीची फळे ग्रामीण भागातज्या ठिकाणी सर्वाधिक लोक राहतात, तिथे पोहचावीत ही त्यांची इच्छा होती. बापूंचा देखील ब्रॉड-बेसिंग विज्ञानावर विश्वास होता.

1929 मध्ये त्यांनी अद्वितीय प्रयोग केला. त्यांनी क्राऊड-सोर्सिंगचा प्रयत्न केला. त्यांनी कमी वजनाचा चरखा निर्माण करण्याचे मार्ग शोधले. खेडी, युवा वर्ग, गरीब यांची त्यांनी काळजी घेतली. मोठ्या संख्येने लोकांना विज्ञानाशी जोडण्याची त्यांची दृष्टी, आपल्याला प्रेरणा देते. आज आपण आणखी एका सुपूत्राचे म्हणजे आमचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांचे स्मरण करतो. त्यांचा नम्रपणा, साधेपणा आणि महान नेतृत्वाचे स्मरण करतो. 

मित्रांनो,

मी तुम्हा सर्वांना चर्चासत्रांसाठी शुभेच्छा देतो, आणि वैभव परिषद आम्ही यशस्वी करुन दाखवू. समारोप करण्यापूर्वी माझा सल्ला आहे की, सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, योग्य ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे.

धन्यवाद. अनेकानेक धन्यवाद

 

B.Gokhale/S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661359) Visitor Counter : 362