PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
04 SEP 2020 7:36PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
दिल्ली-मुंबई, 4 सप्टेंबर 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, अकादमीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवा आयपीएस अधिकाऱ्यांशी नियमितपणे संवाद साधत असतो, मात्र यावर्षी कोरोनाविषाणू परिस्थितीमुळे तुम्हाला भेटणे शक्य झाले नाही. पण, माझ्या कारकिर्दीत मी नक्कीच तुम्हाला भेटेन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-अमेरिका शिखर परिषद 2020 मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बीजभाषण केले. भारत- अमेरिका राजनैतिक भागीदारी मंच (USISPF) ही एक स्वयंसेवी संस्था असून भारत आणि अमेरिकेतील भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी ती काम करते. या शिखर परिषदेत बोलतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोविड या जागतिक साथीच्या आजाराचा सर्वच देशांना फटका बसला असून आपली चिकाटी आणि संयम, आपल्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि आपल्या आर्थिक व्यवस्थांसाठी हा कसोटीचा काळ आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
प्रतिदिन 10 लाखांहून अधिक कोविड चाचण्यांचे ध्येय यशस्वीरित्या साध्य केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी कोविड 19 चाचण्यांमध्ये भारताने नवा उच्चांक कायम राखला आहे.
सलग दुसऱ्या दिवशी देशभरात 11.70 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 11,69,765 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.
इतर कुठल्याही देशाने प्रतिदिन इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केलेल्या नाहीत.
इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्यामुळे आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची एकूण संख्या 4.7 कोटी इतकी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या 4,66,79,145 इतकी झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या होऊन देखील प्रतिदिन पॉझिटीव्हिटीचा दर 7.5% हून कमी आहे तर एकूण पॉसिटीव्हिटीचा दर 8.5 % हून कमी आहे.
केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट या धोरणाची बहुतेक राज्य/केंद्रशासित प्रदेशात यशस्वी अंमलबजावणी केल्यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या चाचण्यांमुळे रुग्णांमध्ये असलेली लक्षणे लवकर लक्षात येणे, तातडीने अलगीकरण, आणि वेळेवर उपचार सहज होत आहेत. गृह विलगिकरण आणि रुग्णालयात प्रमाणित उपचार नियमनावर आधारीत उपचार यावर लक्ष ठेवले जात असल्यामुळे मृत्युदर कमी होत आहे. 1 टक्क्यांहून कमी मृत्युदर हे लक्ष्य गाठताना सध्याचा मृत्यूदर 1.74 टक्के इतका असून त्यात घट होत आहे.
देशभरातील चाचणी प्रयोगशाळेच्या जाळ्यांमधील तितक्याच वेगवान विस्तारामुळे चाचणीतील ही वाढ देखील शक्य झाली आहे. भारतात आज 1631 प्रयोगशाळा देशभरात आहेत, 1025 प्रयोगशाळा या सरकारी क्षेत्रात आणि 606 खासगी प्रयोगशाळा आहेत. यातील समाविष्ट होणाऱ्यांमध्ये :
- रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 827 : (शासकीय : 465 + खासगी : 362)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 683 (शासकीय : 526 + खासगी : 157)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 121 : (शासकीय : 34 + खासगी 87)
केंद्र सरकारच्या टेस्ट-ट्रॅक-ट्रीट धोरणातील उद्दिष्टांपैकी एक म्हणजे कोविडचा मृत्यूदर कमी करणे आणि रुग्णांची मृत्यूसंख्या आटोक्यात ठेवणे हा आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढता राहील याकडे विशेष लक्ष दिले जात असून त्यासाठी वैद्यकीय उपचारांचे प्रोटोकॉल पाळत सर्वांना एक प्रमाणित वैद्यकीय उपचार मिळतील यावर भर दिला जात आहे.
जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतातील रुग्ण मृत्यू दर तर कमी आहेत आणि तो सातत्याने कमी होत आहे, (सध्याची आकडेवारी -1.74 %), त्यासोबतच, कोविड संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांपैकी अगदी थोडे, म्हणजे 0.5% रुग्ण सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. आकडेवारीनुसार, केवळ 2 टक्के रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, 3.5 टक्यांपेक्षाही कमी रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज आहे.
या सर्व उपाययोजनांमुळे भारतातील कोविड-19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज 30 लाखांच्या (30,37,151) वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात देशभरातील 66,659 रुग्ण बरे झाले असून सलग आठव्या दिवशी दररोज 60,000 रुग्ण बरे होण्याच्या विक्रमातील सातत्य भारताने कायम राखले आहे. कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याचा दर आता 77.15% असून, गेल्या काही महिन्यांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचेच हे निदर्शक आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असतांनाच उपचाराखालील सक्रीय रुग्ण आहे बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावतही वाढते आहे. आज ही तफावत 22 लाखांच्या पुढे गेली आहे. यामुळे सध्या देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 8,31,124 इतकी आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात ही संख्या 21.11 टक्के इतकी आहे.
इतर अपडेट्स:
- शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रदेशात एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के जागतिक लोकसंख्या राहते, त्यामुळे या प्रदेशात शांततामय, स्थिर आणि सुरक्षित वातावरण असावे, यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भर दिला. या भागात विश्वास आणि सहकार्याचे वातावरण, आक्रमक भूमिकेचा त्याग आणि आंतरराष्ट्रीय कायदे व नियमांचा सन्मान केला जावा, परस्परांचे हित जपत मतभेद शांततामय मार्गांनी सोडवण्याची व्यवस्था असावी, असे राजनाथ सिंह म्हणाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण मंत्र्यांच्या मॉस्को इथे झालेल्या संयुक्त बैठकीत ते आज बोलत होते.
- विविध राज्यांतील पोटनिवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाची आज बैठक पार पडली. सध्या, विधानसभा/लोकसभा मतदारसंघातील 65 जागा रिक्त आहेत, यापैकी 64 जागा विधानसभेच्या आहेत आणि एक जागा लोकसभा मतदारसंघातील आहे. निवडणूक आयोगाने अहवालांचा आढावा घेतला तसेच विविध राज्यांच्या मुख्य सचिव/ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काही राज्यांमधील पूरस्थिती आणि महामारीची परिस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकलण्याविषयी सांगितले होते, त्याविषयी माहिती घेतली.
- चालू खरीप हंगामात विक्रमी 1095.38 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. भाताची पेरणी अद्याप सुरु असून दली डाळी, भरड धान्य, बाजरी, तेलबिया यांची पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. आतापर्यंत खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्राच्या प्रगतीवर कोविड-19 चा परिणाम झालेला नाही.
- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज विविध निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. देशाचा जगाशी व्यापार, त्या संदर्भातली परिस्थिती आणि निर्यातदारांना येणाऱ्या समस्या याबाबत यावेळी चर्चा झाली. विशेषकरून लॉकडाऊन पासून गोयल विविध निर्यात प्रोत्साहन परिषदा समवेत सातत्याने चर्चा करत आहेत.
- पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतक महोत्सवी वर्षातील 5 सप्टेंबर 2020 हा शिक्षकदिन, शिक्षक कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण" या विषयावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पार्ले टिळक विद्यालय संस्थेतील शिक्षकांना आणि विदयार्थ्यांना एका खास आभासी कार्यक्रमात संबोधित करतील.
- वाहन निर्मिती उद्योगाचा जीडीपीमध्ये मोठा वाटा आहे आणि सर्वाधिक रोजगार असलेले क्षेत्र आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले. त्यांनी आज एसआयएएमच्या 60 व्या वार्षिक संमेलनाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत या उद्योगाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. समाज आणि अर्थव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने या क्षेत्रातील समस्यांचा निपटारा करण्याबद्दल त्यांनी आश्वस्त केले.
महाराष्ट्र अपडेट्स :
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील केदार हे सहावे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 18,105 जणांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8.43 लाख इतकी झाली आहे. मुंबईत ही संख्या 1.50 लाख इतकी आहे. दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या अधिकारक्षेत्रानुसार विद्यपीठाच्या परीक्षा घरून ऑनलाईन घेण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.
* * *
M.Chopade/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651389)
Visitor Counter : 301