माहिती आणि प्रसारण मंत्रालय
शिक्षक दिनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आभासी माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
Posted On:
04 SEP 2020 4:55PM by PIB Mumbai
मुंबई, 4 सप्टेंबर 2020
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतक महोत्सवी वर्षातील 5 सप्टेंबर 2020 हा #शिक्षकदिन, शिक्षक कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण" या विषयावर मा. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पार्ले टिळक विद्यालय संस्थेतील शिक्षकांना आणि विदयार्थ्यांना एका खास आभासी कार्यक्रमात संबोधित करतील. नवीन शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीमध्ये जावडेकरांचे मोठे योगदान आहे, या विषयावर ते मार्गदर्शन करतील. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा कार्यक्रम PTVA YouTube Channel आणि PTVA Facebook page या ऑनलाईन माध्यमांवर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
पार्श्वभूमी:
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन ही एक शैक्षणिक संस्था असून प्रामुख्याने मुंबई उपनगरात ती कार्य करीत आहे. नुकतेच 9 जून 2020 रोजी संस्थेने शंभराव्या वर्षात पदार्पण केले. लोकमान्य टिळकांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने प्रेरित झालेल्या विले पार्ल्यातील काही देशभक्त सुजाण नागरिकांनी लोकमान्यांची स्मृती चिरंतन रहावी म्हणून लोकमान्यांची मूल्ये जपणारी शैक्षणिक संस्था पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनची स्थापना केली आणि संस्थेची पार्ले टिळक विद्यालय ही पहिली मराठी शाळा 9 जून 1921 रोजी सुरु झाली; त्यावेळी शाळेत केवळ 4 विद्यार्थी होते. आज संस्थेच्या 5 शाळा, 3 महाविद्यालये व एक व्यवस्थापन संस्थान, या सर्वात मिळून सुमारे सव्वीस हजारांहून अधिक विद्यार्थी दर वर्षी शिकत आहेत. याशिवाय पा. टि.वि.अ. चे लाखो माजी विद्यार्थी जगभर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
यामध्ये महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे, शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी, भारतीय हवाई दल प्रमुख प्रदीप नाईक (निवृत्त ) यांच्यासारखे दिग्गज आहेत. तसेच अवघ्या 16 व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळवणारी सुप्रसिद्ध बुद्धिबळपटू अनुपमा अभ्यंकर गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले आणि छत्रपती पुरस्कार विजेते कितीतरी खेळाडूही आहेत. अनेक अभिनेते, राजकिय आणि सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक या संस्थेने घडवले आहेत. शंभर वर्षांचा हा प्रगतीचा आलेख हा विद्यालयाच्या शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे साध्य झाला आहे. संस्थेच्या शाळांमधील अनेक शिक्षक / शिक्षिका आजवर राष्ट्रपती, राज्य व महापौर पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.
* * *
RT/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1651311)
Visitor Counter : 24