PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
03 SEP 2020 7:30PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई 3 सप्टेंबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी आज अनुसूचीत वाणिज्य बँका आणि गैर-बँकींग वित्त महामंडळाच्या प्रमुखांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड-19 संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात कर्ज निराकरण आराखड्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान सीतारमण कर्जपुरवठादारांना म्हणाल्या, जेंव्हा कर्जाचे हप्ते फेडण्याच्या मुदतवाढीची सुविधा बंद केली जाईल, तेंव्हा कर्जदारांना कोविड-19 संकटातून बाहेर येण्यासाठी पाठिंबा द्यावा आणि कर्जदारांच्या पत मुल्यांकनावर याचा परिणाम होऊ देऊ नये.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
- गेल्या दोन दिवसांपासून दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या घेण्याचा सपाटा सुरू ठेवत, भारतामध्ये दैनंदिन चाचण्यांमध्ये आज अभूतपूर्व वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 11.7 लाखांहून अधिक (11,72,179) चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या यशामुळे संचयी चाचण्या 4.5 कोटींपेक्षा अधिक (4,55,09,380) झाल्या आहेत. यातून दररोजच्या कोविड-19 चाचण्यांमधील भारतातील चाचण्यांचे घातांकीय वाढीचे प्रमाण दर्शविते. 30 जानेवारीपासून दररोज 10 चाचण्या घेण्यास प्रारंभ झाल्यापासून, आजमितीला रोजची सरासरी 11 लाखांपुढे गेली आहे.
- एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक भारताने नोंदविला आहे. गेल्या 24 तासांत कोविड -19 चे 68,584 रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत जवळपास 30 लाख (2,970,492) वाढ झाली आहे. यामुळे, कोविड -19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 77% पेक्षा (77.09%) अधिक झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या संख्येपेक्षा (8,15,538) 21.5 लाखांनी जास्त झाली आहे.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी काल स्टॉप टीबी पार्टनरशिपचे कार्यकारी संचालक डॉ. लुसिका डीटियू यांच्याशी डिजिटली संवाद साधला. केंद्रीय मंत्री म्हणाले की क्षयरोगाचे उच्चाटन करणे ही भारत सरकारची प्राथमिकता आहे. ते पुढे म्हणाले की, जलद रेणू चाचण्यांद्वारे मोफत निदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, औषध प्रतिकार विषयी माहिती पुरवण्यासाठी तसेच क्षयरोग ग्रस्त सर्व लोकांना उत्कृष्ट प्रतीची औषधे आणि रेजिमेन्स , रूग्णांना आर्थिक व पौष्टिक सहाय्य देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
इतर अपडेट्स
- लहान मोठी सर्व रुग्णालये, आरोग्य केंद्र, नर्सिंग होम यांनी कोरोनाच्या भीतीला बाजूला सारून कोरोना उपचार द्यायला हवेत, असे मत डॉ धनंजय केळकर यांनी आज व्यक्त केले. प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो (महाराष्ट्र आणि गोवा), तसेच पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभाग यांनी आज ‘कोविड-19च्या काळात खासगी रुग्णालयांची भूमिका आणि जबाबदाऱ्या’ या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले होते, त्यात ते बोलत होते.
- केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन खात्याचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग एनसीजीजी-नीती आयोगाने आयोजित केलेल्या कोविड-19 संदर्भातील एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप सत्राला संबोधित करतील.
- केंद्रिय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वेमंत्री श्री पियुष गोयल म्हणाले की, नवोदित कल्पना भारताला जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सहाय्यभूत ठरतील. ‘सीआयआय’ च्या ‘लाँच ऑफ इंडियाज फ्युचर बिझनेस ग्रुप’ कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
- केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांच्या हस्ते आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत, रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आठ नैसर्गिक पोषक औषधांचे उद्घाटन झाले. ही सर्व औषधे, जनऔषधी केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध राहतील. कोविड-19 या साथीच्या आजाराच्या काळात, या नैसर्गिक औषधांचा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होईल, असे यावेळी बोलतांना गौडा यांनी सांगितले.
- पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह आणि सदस्य उद्या आयोगाच्या आर्थिक सल्लागार समितीसोबत दिवसभर बैठक घेणार आहेत.
- सर्वोच्च न्यायालयाने 3.4.2020 रोजी याचिका डब्ल्युपी (जनहित याचिका) क्र.10808/2020 संबंधी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोविड-19 संक्रमणामुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासंदर्भात पिण्याचे पाणी आणि स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, यांनी 13 एप्रिल 2020 रोजी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी नियमावली जारी केली आहे.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मागील शनिवार आणि रविवारपर्यंत देशात राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ओलांडले आहे. या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान, 2771 किलोमीटर लांबीचे उद्दिष्ट असताना, या काळात 3181 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधून झाला. यामध्ये 2104 किलोमीटर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, 870 किलोमीटर एनएचएआयकडून आणि 198 किलोमीटर एनएचआयडीसीएलकडून यांचा समावेश आहे.
- रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने 1 डिसेंबर 2017 पूर्वी विक्री केलेल्या जुन्या वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याबाबत हितधारकांकडून मते आणि सूचना मागविण्यासाठी 1 सप्टेंबर 2020 रोजी जीएसआर 541 (E) मसुदा अधिसूचना अधिसूचित केली आहे.
- गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप एस पुरी, यांनी माध्यमांशी संवाद साधताना मेट्रो परिचालनासाठी प्रमाणित मार्गदर्शक नियमावली जाहीर केली. गृह मंत्रालयाच्या 29.8.2020 रोजीच्या आदेश क्र. 40-3/2020-DM-I(A) नुसार मेट्रो सेवा 7 सप्टेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होतील. यासाठी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने प्रमाणित मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, ज्याला गृह मंत्रालयाने सहमती दर्शवली आहे.
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651110)
Visitor Counter : 206
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam