PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
31 AUG 2020 7:25PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 31 ऑगस्ट 2020



(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


आपल्या शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठिण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशात यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टक्के वाढ झाली आहे. धान रोपणीमध्ये सुमारे 10 टक्के, डाळींच्या क्षेत्रात सुमारे 5 टक्के आणि इतर अन्नधान्याच्या पेरणीत जवळपास 3 टक्के, तेलबियांच्या क्षेत्रात 13 टक्के, कापूस लागवडीच्या क्षेत्रात सुमारे 3 जास्त वाढ झाली आहे. यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल ‘मन की बात’ कार्यक्रमात प्रतिपादन.
‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी सप्टेबर महिना पोषण माह- पोषक आहाराचा महिना म्हणून पाळणार असल्याचे जाहीर केले. पोषण आणि राष्ट्र यांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. “यथा अन्नम तथा मनम” या वाक्प्रचाराची म्हणजे आपल्या मानसिक आणि बौद्धिक विकासाचा संबंध आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्याशी असतो याची त्यांनी आठवण करून दिली.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
- भारताने कोविड-19 चाचण्यात वाढ करण्याच्या ठाम निर्धाराचे दर्शन घडवल्याने या चाचण्यात वेगाने वाढ होत आहे. देशात कोविड-19 तपासणीचे काम सर्व प्रथम 20 जानेवारी 2020 ला पुण्यातल्या प्रयोगशाळेपासून सुरू झाले होते, ऑगस्ट महिन्यापर्यंत दररोज 10 लाखाहून अधिक चाचण्या करण्याची क्षमता आता झाली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या आज 4.23 कोटीहून अधिक झाली आहे. गेल्या चोवीस तासात 8,46,278 चाचण्या करण्यात आल्या. गेल्या चोवीस तासात (रविवार, 30 ऑगस्ट 2020 ) भारतात 78,512 रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच गेल्या 24 तासात सुमारे 80,000 रुग्णांची नोंद झाल्याच्या काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये तथ्य नाही. गेल्या 24 तासातल्या या नव्या रुग्णापैकी 70% रुग्ण सात राज्यातले आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 21% रुग्ण आहेत, त्याखालोखाल आंध्रप्रदेश(13.5%),कर्नाटक (11.27%) आणि तामिळनाडू 8.27% आहे. तर उत्तर प्रदेश 8.27%,पश्चिम बंगाल 3.85% आणि ओदिशात 3.84% आहेत.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि ओदिशा या चार राज्यांमध्ये उच्च स्तरीय केंद्रीय पथकं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे आणि यापैकी काही राज्यांमध्ये उच्च मृत्यूदराची नोंद आहे. केंद्रीय पथकं प्रतिबंध, निगराणी, चाचण्या आणि पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रभावी रुग्णालय व्यवस्थापन याकामी मदत करतील. तसेच राज्यांना वेळेत निदानासाठीचे प्रभावी व्यवस्थापन आणि आव्हाने यात मार्गदर्शन करतील.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यासमवेत बल्लारी येथील विजयनगर वैद्यकीय विज्ञान संस्थेमधील सुपर स्पेशलिटी ट्रॉमा केंद्राचे (एसएसटीएस) आज आभासी पद्धतीने लोकार्पण केले. त्यानंतर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी एक्स्प्रेस फीडर लाइन, आयसीयू कक्ष आणि 13 केएल लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकचे आणि कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी अत्याधुनिक सीटी स्कॅनचे उद्घाटन केले.
इतर अपटेडस:
महाराष्ट्र अपडेटस:
राज्यात अंतिम सत्र/अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितल्याप्रमाणे कुलगुरु आणि शिक्षण तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक बाबतीत सरकार कसलीही तडजोड करणार नाही असे सांगितले.




M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1650095)
आगंतुक पटल : 258